Monday, 18 May 2015

SWITZERLAND INTERLAKEN III


स्वित्झर्लंड इंटरलाकेन ()

इतक्यात श्रीशैल म्हणाला बाबा, आपण सिऑनला किल्ल्यावर गेलो होतो त्याच्या प्रवेशाची वेळ संध्याकाळी साडेपाचपर्यंतच होती. स्वित्झर्लंडमधे सगळ्या गोष्टी साडेपाचला बंद तर होत नसतील ना?

तशी जर इथे असेल तर? म्हणजे इतके वर येऊनही पुनः चालतच खाली जाणे आले आणि आता तर सहा वाजून गेले होते. अर्थात या मुलींकडे (खेळणार्‍या) बघितल्यावर खात्री पटली की ही काही चालत येण्यापैकी नव्हेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो होतो.

थोडं वर गेल्यानंतर ते हॉटेल आलं. नेहेमीप्रमाणेच छान. आम्ही बसून निवांतपणे कॉफी घेतली. इतक्या भागदौडी नंतर श्रमपरिहार आवश्यक होताच. त्या क्रीम घातलेल्या कॉफीने पोट पुनः दब्ब झालं. पण आता दुपारप्रमाणे काही धावाधाव नव्हती त्यामुळे काळजीचा लवलेशही नव्हता. समोर एक बोर्ड दिसत होता त्याच्याकडे बघून आम्हाला कळत होतं आम्ही फ्युनिक्युलर रेल्वेच्या जवळ पोहोचलो होतो. वाटेतला एक चिंचोळा, झाडांनी झाकोळलेला रस्ता पार करून आम्ही त्या स्टेशनपर्यंत पोहोचलो. फ्युनिक्युलरची पहिलीच वेळ. कशी असते कोण जाणे असं मनात आलं. बघितलं तर आपल्या लिफ्टसारखी दिसत होती. कदाचित रूळावरून जाते म्हणून तिला रेल्वे म्हणत असावेत का?

सगळा मिळून दहा मिनिटांचा प्रवास. पण अनुभवण्याजोगा. मुळात इंटरलाकेनचा परिसर अतिशय सुंदर आहेच. आम्ही वर चढत असतानाही त्याच्याकडे पाहून श्रमपरिहार व्हावा असं वाटत होतच. वाटेत थांबण्याकरता ते एक प्रलोभन असे. पण आता निवांतपणे बसून त्याचा आनंद घेत जाणं म्हणजे खरं सुख होतं. याआधी म्हटले होते ते दोन विस्तीर्ण तलाव आणि शहराची सौंदर्यपूर्ण आकृती यांचा हा हवाई मेळ सुखावून गेला. वर येतानाही उगीच दमणूक झाली असं वाटलं तरी आम्ही चढून आलो ती बाजू वेगळी होती त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंच दर्शन झालं होतं हा फायदा होताच. तरी चालण्याला प्रवृत्त करण्याला कारणीभूत ठरलेल्या दोन गोष्टींच्या आठवणीने आता हसायला येत होतं. एकतर आम्हाला उगीचच सवय आहे आपण दमत नाही, चालायला नाही म्हणत नाही वगैरे सांगण्याची आणि मग असं हे श्रीशैलने विचारलं की बळी पडायला होतं! दुसरं आणि महत्वाच कारण म्हणजे तिथे होता तो बोर्ड. त्यावर चालत जाण्याला लागणारा वेळ दाखवला होता 15 मिनिटे पण तो बोर्ड जुना झाला होता त्यावरची काही अक्षरं पुसली गेली होती त्यामुळे 2 तास पंधरा मिनिटांऐवजी फक्त 15 मिनिटं वाचलं गेलं. काही का असेना आमचा चालत आणि फ्युनिक्युलर दोन्ही दर्शनांचा योग होता आणि तो मनपसंत झाला.

मला मात्र कोणी विचारलच की चालत जाऊ का तर मी आवर्जून सांगेन की फ्युनिक्युलरचं तिकिट जेव्हा हॉटेलमधून देतात तेव्हा त्यात परतीचं तिकिटही असतं. तेव्हा उगीच चढण्याचे एवढे श्रम घेण्यात अर्थ नाही. तसा तो चढ खूप दमवणारा आहे, अंतर आणि चढ दोन्ही बघू जाता.

संध्याकाळ होऊन गेली होती. काय करायचं या विचारात आम्ही निघालो होतो. एका ठिकाणी दुकान बघितलं, आपलं वाटलं. श्रीशैल म्हणाला श्रीलंकन वाटतो आहे. आम्ही म्हटलं ठीक ना, इंडियन स्टोअर तर आहे! काही लागलं तर आपल्याला माहित असलेलं बरं. पुढे रेल्वेचं फाटक ओलांडून गेल्यावर एक स्टोअर होतं तिथे फळं घेण्यासाठी गेलो. रात्रीच्या जेवणाचं काय करू या, कुठे जाऊ या हा प्रश्न होता. हॉटेलवर जाऊन पुनः बाहेर पडणं पायांनी नाकारलंच. उत्तरा म्हणाली मघा ते इंडियन स्टोअर बघितलं त्याच्याकडे काही मिळालं तर बघू. पुनः मागे गेलो. आपले हल्दीराम वगैरे सगळे ब्रॅन्डस होते. उर्सुला दुपारी म्हणालीच होती की किचनमध्ये गॅस स्टोव्ह आणि मायक्रो दोन्ही आहे. त्याचा वापर करा कारण बाहेरचं जेवण हे खूप महाग पडतं. त्यापेक्षा तोच पैसा आपण फिरण्याकरता वापरू शकतो. सरळ रेडी टू कूकची वेगवेगळी पॅकेटस घेतली आणि परतलो.

ती पॅकेटस मायक्रोवेव्हमध्ये टाकताना एक लक्षात आलं की इथले बरेचसे गेस्टस, बहुसंख्य जपानी आणि भारतीय होते, त्यांनी अशीच पॅकेटस आणलेली होती. आम्हाला मुंबईचं एक नवपरिणित अमहाराष्ट्रीय जोडपं भेटलं, हनीमून कपल म्हटलं तर लवकर कळेल का?, बर, तसं म्हणू या! त्यांनी तर मुंबईहून आणलेल्या या पॅकेटसमुळे किती बचत होते याचा आढावाच सादर केला. अमहाराष्ट्रीय असा उल्लेख का? असा विचार वाचताना मनात आला असेल! तर आमच्या या गप्पा सुरू असतानाच एक असाच हनीमूनर आला, मराठी माणूस. बायकोचा गुरूवारचा उपास म्हणून दूध गरम करण्याकरता आला होता. त्याने त्या  जोडप्याला हे सांगितलं म्हणून कळलं. आम्ही त्याच्याकडे आपला म्हणून ओळखीच हसून काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो तोवर साहेब गायब झाले! आपण इतके का संवादाला घाबरतो? तेही आपल्या माणसांबरोबर? 

खूप दमणूक झाली होती परंतु या पॅकेट फूडमधील का होइना व्यवस्थित पोटभर जेवणामुळे रात्रीची शांत झोप मिळाली.

सकाळी आता लवकर उठून जायची गडबड होती.  जायचं म्हटल्यावर जरा लवकर जागही आली होती. मग आज आम्ही लॉन्ड्रीचाही प्रोग्रॅम काढला. खाली ब्रेकफास्टला जातानाच कपड्यांची बॅग घेऊन खाली जाऊ म्हणजे पुनः पुनः जा ये नको हा विचार. खाली उतरताना प्रत्येक जिन्यावरच्या आपल्या देवांच्या तसबिरींनी आमचं लक्ष वेधून घेतलं. लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांना या परक्या मुलखात बघितल्यावर अगदी घरचा "फील" आला! या लोकांचं पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठीच्या या क्लृप्त्यांचं कौतुक वाटतं. स्वागतकक्षातला बुद्ध आणि या तसबिरी बघूनही पूर्व आशिया आणि भारत इथे भेटेल हे येणार्‍या माणसाला सहज उमगेल.

लॉन्ड्रीकरता गेलो खरे पण तिकडे आधी आलेल्या माणसाचा नंबर होता. सुदैवाने इंडिकेटर दाखवत होता त्याप्रमाणे त्याचं संपायला फार वेळ लागणार नव्हता. आम्ही त्याचं संपल्यावर कपडे धुवायला टाकले आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. सकाळची उत्तम न्याहारी असणं आवश्यक कारण नंतर काय कुठे आणि कसं मिळेल ही चिंता होती.

आम्हाला ब्रेकफास्ट टेबलकडे बघून  उर्सुला आली ती आमच्या जाण्याची तिकिटं घेऊनच. सोबत एक प्रिन्टआऊट होतं. बघू नंतर म्हणून बाजूला ठेवलं. आमचा ब्रेकफास्ट निवांत सुरू होता. आमच्या डोक्यात लॉन्ड्रीला लागणारा वेळ हा हिशोब होता. श्रीशैल तिने दिलेला कागद वाचत होता. तिने सांगितलेली माहिती आणि कागदावरली माहिती जुळत नव्हती. ठीक आहे विचारू नंतर म्हणून त्याने तो कागद बाजूला ठेवला. आमचा हा वाजवीपेक्षा जास्त निवांतपणा पाहून तिथे आलेली उर्सुला एकदम कडाडलीच. You are still here? तिच्या मते आम्ही लवकर आटोपून एव्हाना बाहेर पडलो असू. मग तिलाच जाणवलं असावं. आवाजाची पट्टी बदलत म्हणाली आज हवा खूप छान आहे. पण काय होतं, छान आहे म्हणेपर्यंत ढग येतात मग वर जाण्यात काय मजा? तेव्हा आटपा लवकर आणि सुटा! तिच्या बोलण्यातली ती काळजी, कळकळ, ती अधीरता (anxiety) आम्हाला जाणवत होती. येणार्‍या प्रत्येक पाहुण्यात ती अशी गुंतत असेल तर खरच ग्रेट म्हणायला हवं. हे सगळं सुरू असताना एक छोटी गोड मुलगी उर्सुलाने तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून हट्ट धरून होती. एका हाताने ती तिला समजावत होती. तिचा संपूर्ण राग झेलत होती आणि आमच्याकडे वळून आम्हाला चुकून दिलेल्या प्रिंटाआऊटबद्दल दिलगिरी व्यक्त करत होती. कामाचा आणि घराचा तोल सांभाळण्याची तिची चाललेली कसरत छान होती. शेवटच्या सूचना तशी तिने आठवण केली गरम, गार पाणी बरोबर घेऊन ठेवा. आम्ही सवयीने दोनही बरोबर ठेवलं होतच.

तिला हो म्हटलं तरी लगेच निघता येणं अशक्य होतं. लॉन्ड्रीमध्ये टाकलेले कपडे धुवून झाल्यानंतर ड्रायरला लावायला हवे होते म्हणजे आणखी किमान अर्धा पाऊण तास. पण उर्सुला द ग्रेट. आमचा प्रश्न तिच्या लक्षात आल्यावर ती पुढे आली. आमच्याकडून ड्रायरकरता लागणारी नाणी तिने घेतली. आमच्या बॅगेवर आमच्या खोलीच्या नंबरचा कागद चिकटवला. म्हणाली, ही माझी जबाबदारी. मी सगळे कपडे वाळवून यात भरून ठेवते आणि बॅग तुमच्या दारासमोर ठेवते पण आता एकही क्षण तुम्ही इथे वाया घालवू नका. ताबडतोब निघा.

आम्हाला काय वाटलं असेल ते शब्दात वर्णन करता येणं केवळ अशक्य. त्या हॉटेलमध्ये प्रत्येक मजल्यावर किमान 10 तरी खोल्या होत्या असे तीन मजले. इतक्या सगळ्या धबडग्यात ही बाई हसतमुख राहून सर्व्हिस देते इथवर ठीक. पण आम्ही आलो तेव्हा आमची ती जड बॅग उचलून तीन जिने चढून जाणं किंवा आता वाळलेले कपडे ठेवण्याची जबाबदारी घेणं आणि तेही का तर आमचं शिलथॉर्न दर्शन व्यवस्थित पार पडावं म्हणून? काय संबंध? आम्ही स्टेशनवर जाता जाता आपल्याकडे अशी परिस्थिती असती तर काय होऊ शकलं असतं याचा विचार करत होतो. एकतर हा प्रश्नच गैरलागू होता कारण 'तुम्हाला जायचं होतं तर कपडे धुवायचं काय नडलं होतं?' ही पहिली प्रतिक्रिया असती. तरीही बाबापुता करून त्याला पैशाचं आमिष दाखवून समजा राजी केलंही असतं तरी त्याने आधी सगळी कॅव्हिएटस (caveats) आम्हाला ऐकवली असती. 'तुमच्या जबाबदारीवर ठेवा! काही हरवलं तर आमची जबाबदारी नाही' वगैरे वगैरे. इथे हा जो विश्वासाचा पाया दिसतो तोच मला वाटतं आपण आणि त्यांच्यातला महत्वाचा फरक आहे. विश्वास टाकावा आणि आपणही बाळगावा हा फरक जेव्हा आपल्याकडे येइल तो सुदिन!

आता आमच्यापुढे पर्याय नव्हता. आता थेट शिलथॉर्न


                                                            पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड शिलथॉर्न
No comments:

Post a Comment