Monday, 23 December 2013

जाता जाता


आज सोमवारचा दिवस. जुलै महिन्याच्या ३० तारखेपासून एक वेड लागलं होतं, ध्यास म्हणा ना. दर सोमवारी रात्रीचे १२ वाजण्याची वाट बघत मी शांतपणे लेखावर शेवटचा दृष्टिक्षेप टाकत असे. फोटो कोणते, हा की तो यावर  मनात  द्वंद्व  सुरू  असे.  त्या  अस्वस्थतेतही  एक  मनःशांती  होती.  मंगळवारी  सकाळी  ब्लॉग वाचणा-यांना आपण काहीतरी नवीन देण्याचं, वचन नाही म्हणत मी, पण आश्वासन दिलं आहे याचं भान सतत असे आणि एकदा का ते publish बटण दाबलं की खूप बरं वाटत असे. आजही असाच बसलो आहे पण थोडी गुगली टाकण्याकरता. गुगली वाचणा-यांकरता आहे की मला स्वतःला?

आज मी कोणालाही मेल करून हे कळवणार नाही की मी ब्लॉगवर काहीतरी अपलोड केलं आहे आणि तुम्ही वाचा. आज आपलं असच सहज अपलोड करून थांबणार आहे. कदाचित सवयीने वाचतीलही काहीजण. अस का कशाकरता? पुनः उत्तर माझं, कारणाविना!

तसं कारण अगदीच नाही असं म्हणत नाही. गेल्या मंगळवारी लेखाचा शेवट करताना टीप होती " इति बार्सिलोना अध्याय समाप्त " त्यावरची प्रतिक्रिया होती

लेखमाला संपली याची हुरहुर वाटते. असाच दूर देशी फिरत रहा आणि तुझ्याबरोबर वाचण्या-याच्या आनंदातही भर घालत रहा. जमलेली लेखमाला.

madhav joshi
To Aadim@yahoogroups.com
Dec 17 at 10:24 PM
अपुरा वाटतो .हुरहुर लागून राहिली .या नंतर काय? वाट पहात आहोत .


यावर आणखी एक कॉमेंट पण निनावी
बार्सिलोना अध्याय संपला.

नक्की काय सुचवायचं असेल? हे एक वाक्य आहे नुसतं की सूचना की भविष्य? मी सहज वाचून सोडून दिलेलं हे वाक्य इतरांना सूचक वाटलं, लिहिणा-याने स्पष्ट नाही पण अधिकारात सांगितल्यासारखं वाटलं की संपला तो फक्त बार्सिलोना अध्याय.

याच वेळी एक छान फोन आला. “मी ब्लॉग नियमित वाचते. मला आवडतोही त्यामुळे दर मंगळवारी वेळ काढतेच.” इथे मला वाटलं पूर्णविराम असेल पण नाही. 
संभाषण पुढे सुरू करताना मला वाटलं नवा मुद्दा आला. त्यांनी सुरू केलं पुढे. "माझा मुलगा आता ---वीत आहे. त्यांच्या शाळेची ट्रीप गेली होती दिल्ली आग्रा वगैरे. माझ्या नव-याने काही परवानगी दिली नाही. तो म्हणाला दिल्ली बघून झालेली आहे उरलेलं नंतर जाऊ. ते महत्वाचं नाही.” 
मला कळे ना हे सारं कुठे चाललं आहे? 
“ तर प्रश्न आला शाळेत निबंध लिहून आणायला सांगितला तेव्हा. विषय माझी ट्रीप. आता शाळेच्या ट्रीपला न गेलेला माझा मुलगा निबंध कसा लिहिणार? मुलाने सवयीप्रमाणे सर्वज्ञ असलेल्या बापाला विचारलं. आणि काय आश्चर्य! माझ्या मुलाचा बाप खराच हुशार आहे त्याने सांगितलं. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलो होतो ते लिहून काढ. मुलगा म्हणाला आता कसं आठवणार इतक्या दिवसांनी? तो म्हणाला काय कठीण आहे? इंटरनेटवर कितीतरी साइटसवर माहिती मिळेल ती उतरवून काढ म्हणजे झालं! तर मी माझ्या मुलाला म्हटलं अरे ते काका नाहीत का ब्लॉगवर उतरवून काढत तसच फटाफट लिहून टाकायचं! आहे काय आणि नाही काय!”

ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो. तर अशीही गंमत! या फोननंतर आलेलं नैराश्य झटकण्यासाठी मी पूर्वीचा इ मेल व्यवहार बघत होतो तर  मला हे सापडलं आणि माझं नैराश्य कुठल्या कुठे नाहीसं झालं.

Deepak Joshi
To Podarites All
Nov 16

प्रिय आनंद ,

सगळे भाग एकत्रितपणे वाचून काढले आणि एखाद शैलीदार लेखकाने लिहिलेलं प्रवासवर्णन वाचतोय अस वाटलं. तसं विवेक नंतर तू नेहमीचा "आदिम कार्यक्रम वार्ताहर" झाला होतासच. पण वाटलं ते तेवढया पुरतच आणि तात्कालिक असावं . तेंव्हा हे कळल नाही की तू तुझ्या लेखणीला धार लावत होतास. तुझी "लंबीरेस" तू आता खेळायला बसला आहेस.

वाचताना असं वाटत रहात कि तुझ्याबरोबरच आम्ही फिरत आहोत. अगदी तब्बेतीत. कुठेही घाई नाही. एका वर्णानातून दुसऱ्या वर्णनात शिरताना कुठेही धक्का नाही. एखाद्या प्रसंगाचं, दृशाच, अनुभवाचं सांगोपांग शब्दचित्र उभं केल्याशिवाय पुढ सरकायचंच नाही. हे सगळ सांगतांना तू पुन:प्रत्ययाचा आनंद घेत राहतोस मग वाचकांच्या डोळ्यासमोर ते जीवंतपणे का उभं राहणार नाही? मुंबईत परतल्यावर आणि hangover (प्रवासाचा) उतरल्यावर एका सकाळी उठून अचानकपणे वाटलं "चला प्रवास वर्णन लिहू या" असायाचं स्वरूप निश्चितच नाही. त्यासाठी तू प्रवासात ठेवलेली दृष्टी आणि घेतलेली मेहनत जाणवते. प्रांताच नाव, नदीच नाव, त्या नदीच्या खोऱ्यात येणारी गावं, एकाद्या स्थळाचा भूगोल आणि प्रसंगी इतिहास, भेटलेल्या माणसांची नावं, गाडीचं गंतव्य स्थानच नव्हे तर उगमस्थानसुद्धा, इत्यादी तपशील प्रयत्नपूर्वक लक्षात / टीपून ठेवलेले असले पाहिजेत. त्याच्याशिवाय लेखनाला जो भरीवपणा आला आहे तो आला नसता.
तू तपशील तर देतोसच पण त्याबरोबर त्याप्रसंगाचा, दृश्याचा तुझावर होणारा परिणाम, मनात उठले तरंग आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भावना याचाही उहापोह करतोस. लेखनाला जिवंतपणा आला आहेत यामुळे केवळ तपशिलामुळे नव्हे.

वाचकाला लेखनात रस वाटून तो पुढे पुढे वाचत जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथल्या परिस्थितीची ,प्रसंगांची आणि एकंदरीत मानवी व्यवहाराची भारतातल्या तपशिलाशी केलेली तुलना. त्यामुळे त्या प्रसंगला किंवा घटनेला एक तऱ्हेचा perspective मिळून तो सहजपणे समजण्यासारखा होतो.

एखाद्या दृश्याचा आस्वाद घेताना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्या विषयी आपण काय लिहिणार आहोत याचा विचार नकळतपणे येत असावा का? अम्मान विमानतळाच्या छताचा फोटो म्हणूनच तुझाकडून काढला गेला का? अर्थात हा प्रश्न तुझ्या लेखन- प्रक्रियेच्या संदर्भात. सहज, सुंदर आणि ओघवत्या शैलीतली मला आवडलेली काही खास "आनंद -छाप" वाक्य वानगीदाखल उदधृत केल्याशिवाय मला रहावत नाही

"रात्री येण्याचा हा एक फायदा! सगळं सौंदर्य सकाळी आश्चर्याच्या रूपात भेटीला येतं."
"या दोन टप्प्यांमधलं वैराण वाळवंट हेसुद्धा याच जीवनतलं एक सत्य आहे हे दाखवण्यासाठी तर आमचा अम्मानचा थांबा नव्हता ना?"

"तिस-या सीटवरच्या माणसाला आत ढकलून चौथी सीट बळकावण्याच्या पेक्षा थोडी कळ सोसणं आणि अधिक सुविधा निर्माण करणं हा त्यांचा चॉइस आहे."

"अपरात्रीसुद्धा त्याच हळू वेगात गाड्या तेथून धावतात, बहुधा त्यांना मानवी जीवनाचं मूल्य माहीत असावं "

"अस्वस्थपणा हा आपला स्थायी भाव झाला आहे. इथे नेमकं मला तेच आपल्याकडे जे कमी आहे ते मिळाल्याचा आनंद मिळतो "

"याप्रकारे लीन होवून मेट्रो स्टेशन शोधायला लावणारे ते स्पॅनिश धन्य होत“

या लेखनाच्या साहित्यिक मुल्यांवर बोलायचं तर एकाद्या चाणाक्ष संपादकाची नजर या लेखनावर पडली किंवा पाडली गेली तर हे पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला वेळ लागणार नाही.

आता तू बार्सिलोनाला आला आहेस . अनिकेत /मालाविकाच्या confarance च्या वेळी बेबी-सीटर म्हणून गेलो असताना दिवसभर नंदिताला बाबागाडीत घालून आम्ही दोघं चार दिवस बार्सिलोना फिरलो आहे. त्यामुळे गौडीच घर ,पार्क आणि म्युझीयम, राम्बला रस्ता ,पिकासो म्युझीयम, कोलम्बस मॉन्यूमेंट इत्यादी बाबतीत तुझाकडून ऐकायला उत्सुक आहे.

HAPPY BLOGGING

----दीपक

bmukund52
To Aadim@yahoogroups.com

Nov 16

Dear Deepak,

I am still not comfortable with Marath keyboard and hence I avoid to write long messages in Marath. Therefore I thank you for expressing my exact feelings about Anand's style of writing. You have covered beautifully every comment that I would have liked to cover about Anand's fantastic "Pravas Varnan". I also could visualizer every seen myself. No doubt, it is a worth publishing stuff. Keep it up Anand.

Regards.




Jayant Gune


Nov 16

आनंदा,

तू हात धरून मला तिकडे फिरवतोयस असं वाटलं.

जयंत गुणे

Regards

Jayant Gune
91-9619016385 / 22-65516995

madhuri Deo


Nov 17

दीपक,

आनंदचे लिखाण मी नियमित वाचत आहे. तो इतके सुरेख लिहतो आहे, कि जवाब नही. शब्दचित्र म्हणजे काय ते त्याचे प्रवास वर्णन वाचून समजते.

आज तुझी मेल वाचून खूप बरे वाटले. कारण तो जितके सुरेख लिहित आहे, तितकीच सुरेख तुझी प्रतिक्रिया असणार हे नक्की होते. आनंदचे लिखाण वाचल्यावर जे विचार माझ्याही मनात येतात ते तू अगदी सुरेख व्यक्त केले आहेस.
खूप वाट पाहिल्या नंतर आलेली या विषया वरची मेल वाचून वाटले कि जे वाटते व्यक्त करण्यासाठी सुद्धा ...."तेथे पाहिजे जातीचे" .....

माधुरी



Uday Thakurdesai
वाचन कसे करावे ह्याचा एक सुंदर वस्तुपाठच.


थोडं माझ्या श्रीमंतीचं वैभव दाखवावं म्हणून हे आपलं! भेटू या पुनः फक्त थोडा प्रश्न आहे सरत्या वर्षाचा. वर्षातून एकदाच येणारी ही वर्ष अखेर. तिच्या मागण्याही पु-या करायला हव्यातच ना? मग आपले ध्यास, आपले हव्यास काही काळासाठी थोडे बाजूला ठेवायचे! काय? खर ना?







































Monday, 16 December 2013

SPAIN BARCELONA VI

स्पेन बार्सिलोना VI

आता खाऊन परत जाऊ म्हणून एका हॉटेलमध्ये शिरलो. छान हसतमुख मंगोलिअन वेटर. हे चिनी काही पाठ सोडत नाहीत असं  उत्तरा  म्हणाली  तेव्हाच  तिला  म्हटलं  हा चिनी वाटत नाही फिलिपिनो  असावा.  तो  प्रत्येक गि-हाइकाशी बोलणार. इंग्रजी चांगलं. त्याला व्हेज म्हणजे काय ते माहिती त्यामुळे कशात सामिष नाही ते पदार्थ त्याने दाखवले. वाईनचा एकच ग्लास ना हे पण डोळे मिचकावत विचारलं. प्लेटस घेऊन येताना खुर्च्यांच्या रांगेतून सरळ न येता आट्यापाट्या खेळत नाचत आला. कामातला आनंद कसा लुटावा आणि तो दुस-याला सहभागी करून घेत कसा वाटावा याचं तो म्हणजे मूर्तीमंत उदाहरण होता. 

जेवून घरी यायला तरी साडे दहा झाले होते. आज टिअ‍ॅगोबरोबर बोलणे आवश्यक होते. उद्या सकाळी ९ ऐवजी आम्ही रात्री ३ वाजता निघणार होतो हे त्याच्या कानावर घालणे गरजेचे होते. निघताना किल्लीची व्यवस्था काय वगैरे बोलायला हवे. आमच्याकरता रात्रीच्या ऑड  वेळी टॅक्सी हवी असल्याकारणाने त्याकरता  रिक्वेस्ट  करायची  होतीच. दार उघडून आम्ही घरात शिरलो.  घरात दिवा होता पण टिअ‍ॅगो कुठे दिसला नाही. ठीक आहे म्हणत आम्ही आमच्या खोलीत गेलो. जरा फ्रेश होऊन मी बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो असताना दोघेजण आले. टिअ‍ॅगोने ओळख करून दिली हा दिएगो, your host. मग त्याच्याशी गप्पा झाल्या. दोघेही इथले म्हणजे स्पेनमधले नाहीत हे कळले. दिएगो साग्रादा फमिलिआमध्ये (हा एक  मोठा ट्रस्ट आहे) नोकरी करतो. आमचं खरच दुर्दैव. वेळ कमी होता आणि तोही भेटला नाही सकाळी नाहीतर त्याच्याबरोबरच ते चर्च बघता आले असते. दिएगो कोलंबियाचा आणि टिअ‍ॅगो ब्राझिलचा त्याचा स्टुडिओ आहे. हा उद्योग, म्हणजे अपार्टमेंट मधल्या बेडरूम्स रेंट करण्याचा,  त्यांनी नव्याने सुरू केला होता. म्हणजे आम्ही पहिलेच पाहुणे होतो त्यांचे.स्वतःचा व्यवसाय असल्याने टिअ‍ॅगो कधीही available होऊ शकत होता. त्याला हे manage करणे शक्य होते. आमच्या अनुभवाप्रमाणे ते तो प्रामाणिकपणे करत होता आणि चांगले enjoy ही करत होता. 

आमचा बदललेला प्लॅन त्यांच्या कानावर घातला आणि टॅक्सीची अडचणही सांगितली. त्याने ताबडतोब टॅक्सीला फोन केला. अपार्टमेंटपाशी आल्यावर मला (=टिअ‍ॅगोला) फोन कर असेही टॅक्सीवाल्याला त्याने सांगितले. मी त्याला म्हटलं माझा नंबर टॅक्सीवाल्याकडे दे म्हणजे इतक्या ऑड वेळेला उठण्याची तुला आवश्यकता नाही पण त्याला त्याची तयारी होती. हे सगळं झाल्यानंतर पुढे म्हणाला टॅक्सीवाल्याने हो म्हटले म्हणजे तो येईल असे नाही. पण मला फोन कर असे मी त्याला सांगितले आहे. फोन आला की तुम्हाला मी पहाटे सांगतो.

आम्ही सव्वादोनचा गजर लावून झोपलो.  उठून आवरलं आणि तीन वाजता अपार्टमेंटची चावी टेबलावर ठेवून बॅगा घेऊन खाली अपार्टमेंटच्या दारात आलो. टॅक्सीवाला आला की फोन करून टिअ‍ॅगोला उठण्याचा त्रास नको द्यायला. पण ती वेळच आली नाही.

आम्ही वाट बघत बसलो होतो. आमचा अस्वस्थपणा वाढत होता. घड्याळात सव्वातीन वाजले होते. पावणेचारची बस.  अपार्टमेंटचा दरवाजा उघडून बाहेर पडलो की पुनः आत येणं शक्य नाही कारण किल्ली वर देऊन टाकली होती. पण इथे नुसते बसून काय साध्य होणार? उत्तराला म्हटलं उचल बॅग आणि चल रस्त्यावर. बाहेर आलो तर दूरवर एक टॅक्सी, हिरवा दिवा असलेली (इथे टॅक्सी रिकामी आहे हे कळण्यासाठी असा दिवा असतो) दिसली. मी जरा पुढे होऊन त्याला हात उंचावला. वेगाने पुढे येत त्याने टॅक्सी थांबवली. आमच्या बॅगा डिकीत टाकल्या आणि मी सांगितले बुसेस इस्टॅशिया!

रात्रीची वेळ. रस्ते सारे सुनसान. अनोळखी देश. पण मनात कुठे हा आपल्याला फसवेल वगैरे नव्हते त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. आपल्याच देशात आपण इतके निर्भर राहू शकतो का असा विचार मनात डोकावून गेला. रात्रीचे तीन वाजून गेले होते. रहदारी ती काय असणार रस्त्यावर? पण ट्रॅफिक लाइटस सुरू होते आणि टॅक्सीवाला प्रत्येक लाल दिव्याकडे गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट बघत होता.


आम्ही काल बस स्टेशन बघून गेलो होतो उद्या एकदम नव्याने बघायला नको म्हणून. पण आताचा टॅक्सी थांबवली त्या एन्ट्रन्सचा काल आम्ही आलो होतो त्या बाजूशी काही संबंध नव्हता. आम्ही लिफ्टने खाली २८-२९ प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. हा प्लॅटफॉर्म वगळता बाकी सारे बस स्टेशन सुनसान होते. एअरपोर्ट बस वगळता इतक्या लवकर बसेसची वाहतुक सुरू होत नसावी. कुठे तिकिट काढण्य़ाचे मशीन दिसते का ते पहात होतो. एका मशीनपाशी एक काळा माणूस उभा होता तो जाण्याची वाट बघत मागे उभा राहिलो. तेव्हढ्यात एक बाई (सफाई कामगार) झाडता झाडता थांबून विचारू लागली तिकेट? हातानेच तिने इथे नाही सांगितले. नंतर सरळ जाऊन बस थांबली आहे तिकडून वर जा आणि काऊंटरवर तिकिट मिळेल हे खुणेने सांगितले (भाषेची बोंब! तिची नव्हे आमची! आम्हाला स्पॅनिश येत नव्हते.) . "ग्राशियस" म्हणून आभार मानून आम्ही लिफ्टने वर गेलो. अर्धवट ज्ञान घातक असते त्याचा अनुभव आला. काल प्लॅटफॉर्म बघितला होता म्हणून आज त्या दिशेने धावत सुटलो. तेव्हा टॅक्सीतून उतरून आत आल्याबरोबर समोर असलेली खिडकी दिसलीच नव्हती त्या घाईत.  समोरच्या काऊंटरवर तिकिट काढून पुनः खाली आलो. बसचा ड्रायव्हर आला आणि आमच्या हातातली तिकिटं घेऊन स्वतःच स्वॅप केली. बरोबर ३.४५ वाजता गाडी सुरू होऊन ३.४६ला आम्ही एअरपोर्टच्या दिशेने प्रस्थान केले. चला आता काळजी नाही. विमानात बसले की आपल्या (आइंडहोवनच्या) घरी!

                                                                   इति बार्सिलोना अध्याय समाप्त


ता.क.

हे लेख वाचणा-या अनेकांनी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटीत एक गोष्ट स्पष्ट केली की फोटोंच्या निवडीचा अधिकार राखून ठेवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? उदा पार्क ग्युएलच्या इतक्या सुंदर गॅलेरीज किंवा सिरॅमिक्स वर्क्स, कासा मिलावरील शिल्पसदृष आकृती यांच्याविषयी तुला कळत नाही इथवर ठीक आहे पण म्हणून ते फोटो आम्ही बघू नयेत हे ठरवण्याचा अधिकार म्हणण्यापेक्षा नकाराधिकार तू वापरू शकत नाहीस.. मला हे पूर्णतया मान्य आहे म्हणून मी सर्व फोटो तुमच्यासाठी अपलोड करून त्याची लिंक खाली देत आहे म्हणजे ज्यांना खरोखर त्यात रस असेल त्यांना बघता येईल.


Monday, 9 December 2013

SPAIN BARCELONA V

स्पेन बार्सिलोना V 

पार्क ग्युएलवरून परतीच्या  प्रवासात कासा मिला ही गौडीची प्रसिद्ध इमारत बघितली. एका रस्त्यावरून सुरू होऊन वळून दुस-या रस्त्यावर संपणारी ही मोठी इमारत. गच्चीवर काही शिल्पसदृष आकृती आहेत. आमच्या एका आर्किटेक्ट मित्राने फ्री फ्लोइंग बाल्कनीजचं उदाहरण म्हणून यापैकी एक बिल्डिंग दाखवल्याचं मला चांगलं स्मरतं. या प्रत्येक इमारतीत जाण्याकरता १२ ते १५ युरो द्यावे लागतात. त्यामुळे बाहेरून दर्शन आणि फोटोरूपी आठवण जवळ ठेवत आम्ही तिथून निघालो.
   
Casa Milà





दुपारचा एक वाजून गेला होता. पोटपूजा झाली नव्हती. मघा पार्कमध्ये दुप्पट पैसे देऊन कॉफी घेतली त्याचा काय तो पोटाला आधार होता. सगळीकडे मांसाहाराचा जल्लोष होता. अर्थात हे स्पेन आहे हे आम्हाला सुद्धा माहीत होते त्यामुळे तक्रार नव्हतीच. शेवटी कंटाळून एका सुपर स्टोअरकडे, आपल्याकडचा वाणी, वळलो. म्हटलं निदान केळी, फळं तरी मिळतील. केळी घेतली आणि समोर केक्स दिसले, पुढे काऊंटरवर आलो तर सामोसे. चला म्हणजे आपल्याच माणसाचं दिसतं आहे दुकान!  तो काऊंटरवरचा मुलगा पुढे आला त्याला हिंदीतून विचारलं बाबा फ्रेश का तर म्हणाला नका घेऊ, सकाळचे आहेत आणि केव्हा बनवले असतील कोण जाणे. आम्ही हे ठेवतो, बनवत नाही. त्याला आमच्याकडे बोलताना पाहून त्या गो-या लोकांच्या चेहे-यावरचे कौतुक की आणखी काही भाव बघून गंमत वाटली. पण जरा तेवढच आपल्या (!) माणसाशी बोललो याचं समाधान आणि हो, आम्ही आज खूप बचत केली होती हे मात्र खरेच. 

आता फिरत निघू या म्हणत दिशाहीन फिरत असताना दूरवर, त्या रस्त्याच्या टोकाशी, एकदम तो समोर उभा! 

Torre Agbar

अगबार टॉवर!. एका फ्रेन्च आर्किटेक्टने उभा केलेला हा सुळका रात्रीच्या रोषणाईत छान दिसतो असं सांगितलं जातं. आत असलेल्या कॉर्पोरेट ऑफिसेसमुळे आत जाण्याची परवानगी नाही.  एरवी इथून शहराचं दर्शन सुंदर झालं असतं. इथे येताना वाटेत लागणारा ट्रॅम वे पार करून आलो होतो. आम्ही काढलेल्या तिकिटावर ट्रेन (मेट्रो ) बस याबरोबर ट्रॅमही होती. त्यात बसून आम्ही ओल्ड टाऊन म्हणजे Ciutata Vella हा शेवटचा स्टॉप गाठला. अलीकडेपर्यंत हा भाग म्हणजेच बार्सिलोना होतं. विसाव्या शतकात मग ते विस्तारलं आणि ऑलिंपिकनंतर त्याला हे आधुनिक रूप मिळालं. 

उतरलो तेथून हाकेच्या अंतरावर समुद्र होता. काल खरतर येऊन गेलो होतो. आज  निदान धावती भेट तरी द्यावी म्हणून गेलो. आजही ऊन असल्याने उत्साहाचा माहोल होता. सगळे टॅन होणारे आडवे पडलेले होते. बीचबॉल, व्हॉलीबॉल वगैरे खेळ सुरू होतेच. काल लक्षात न आलेला डेक आज नव्याने बघितला.

आम्ही तिथून पुढे होऊन मग कॅथेड्रल किंवा इतर काही बघण्याकरता जाणार होतो. पण आमचा आणि नकाशाचा मेळ तसाही कधी जमला नाही. रस्तोरस्ती असलेले बाण आणि नकाशा यांचा अजिबात मेळ नव्हता. आम्ही निघालो तेथे एक मोठा चौक दिसला आणि मोठे पार्कही. झू बोटॅनिकल गार्डन वगैरे पाट्या पाहून परत फिरायचं तर आर्क डी ट्रॉम्फची पाटी दिसली. सुदैवाने तोही मिळाला आणि मग लक्षात आलं की याच्या जवळच बुसेस इस्टाशिया (Busos Estacia) आहे. ते Trein Estacia Barcilona Noord च्या जवळ आणि बस स्टेशनही त्याच्या जवळ. उद्या विमानतळाची बस शोधण्याकरता यायच होतं ते हे अनायासे झालं. हे सगळं बोलणं सुरू आहे आम्हा दोघात इतक्यात श्रीशैलचा फोन!

Arc de Triomf

बाबा तुमचं उद्याचं बार्सिलोनाहून निघणारं फ्लाइट रद्द झालं आहे फ्रान्समधल्या संपामुळे. तेव्हा बार्सिलोनाऐवजी जिरोनाहून आइंडहोवनचं फ्लाइट बुक करून तुम्हाला मेल करतो. प्रिंट आऊट घ्या. आज रात्रीच जिरोनाला जा म्हणजे सकाळी धावपळ नको. फ्लाइट सकाळी ६.५५ चे आहे. बार्सिलोनाहून बस निघते ती ३.४५ला त्याऐवजी जिरोनातून ५ वाजता निघता येईल. थोडी झोपही होईल. इतका द्राविडी प्राणायाम कशासाठी तर एक दीड तासाच्या झोपेसाठी.  काही तासांकरता कमीतकमी ६५ युरो द्या जिरोना हॉटेलला. शिवाय रेल्वे भाडं वेगळं. मी श्रीशैलला म्हटलं तिकीट मेल कर पुढचं माझ्यावर सोपव. आम्ही बस स्टेशनजवळ आहोत. इथली व्यवस्था मी करेन. तशीच वेळ आली तर रात्रीची शेवटची बस घेऊन एअरपोर्टला जाऊ पण १०० वर युरो फुकट घालवायचे नाहीत. नशीब! ऐकलं माझं. आम्ही बसची चौकशी केली आणि इकडे तिकडे करेपर्यंत त्याचा फोन, मेल केला आहे प्रिंट आऊट घ्या आणि मला सांगा किंवा मेलला रिप्लाय करा. आम्ही कॉफी घेऊन जात असता इंटरनेट अशी अक्षरं दिसली. सुदैवाने कॅफे होता. आत गेलो तर चेहरा भारतीय वाटला म्हणून विचारले तर दिल्लीकर होता. गप्पांना सुरवात, तोपर्यंत प्रिंटआऊट तयार झाली. मध्यंतरीच्या वेळात दिवस कसे खराब आहेत, रुमानियाच्या मुलाला कसं लुबाडलं, तुम्ही कशी काळजी घ्या हे सगळं त्या दिल्लीकराने आम्हाला सांगून झाल्यावर आम्ही तिथून प्रिंट  आऊट घेऊन निघालो.


आता फार गुंतायचं नाही कारण घरी जाऊन टिऍगोला सांगून टॅक्सी ठरवायला हवी. टॅक्सी कंपनीचे फोन नंबर माझ्याकडे असून उपयोग नव्हता. त्यांची भाषा स्पॅनिश, म्हणजे  भाषेचा प्रश्न! कॅथेड्रल अजून बघायचं होतं आणि ते मार्केट. पैकी मार्केट दुरुस्तीसाठी बंद होतं. ओल्ड टाऊनमधल्या गल्ल्या धुंडाळताना एक चर्च दिसलं होतं. भव्य वगैरे पण कॅथेड्रल ते हे नसावं असं वाटलं. तिथून निघालो तो एक काही छानसं डोकावतं आहे बिल्डिंगआडून ते पाहू आणि निघू असं ठरवीत पुढे गेलो आणि थेट कॅथेड्रलसमोर. 

Barcelona Cathedral

टिऍगोचे शब्द आठवले, I will definitely go to Cathedral. आल्याचं समाधान झालं. अतिशय सुंदर अशी ती वास्तू आहे. समाधानानं आता परत जाऊ म्हणून निघालो तर उत्तराला त्या पिकासो मुझीची आस लागली. ते म्हणे सुंदर आहे बाहेरून सुद्धा. कोण सांगतं हे तिला ते माहीत नाही. शोधत गेलो तर एका सामान्य अरूंद गल्लीत तशीच एक इमारत होती त्यावर म्युझिअमचा बोर्ड  होता. एक दोन पेंटिंग्जची दुकानं दिसली. म्युझियम दिसल्यामुळे (!) उत्तराची भुणभुण थांबली होती. म्युझियम अर्थात बंद होतं त्यामुळे मीही आनंदात  होतो.  तसाही पॅरीसनंतर मी म्युझियम न बघण्याचा पण केला आहे. इथून आता उत्तराला नवीन काही आठवण्याच्या आत लवकरात लवकर काढता पाय घेणं श्रेयस्कर  होतं.
                                                    
                                          भाग सहावा आणि शेवटचा पुढील मंगळवारी

Monday, 2 December 2013

SPAIN BARCELONA IV



स्पेन बार्सिलोना IV 

सकाळी जाग काहीशी उशीराच आली. तसही आज लवकर बाहेर पडून चालणार नव्हतं. कारण टिऍगोला भेटून जायचं होतं. तो उशीरापर्यंत जागणारा म्हणजे सूर्यवंशी असणार! आरामात आम्ही आटोपलं पण तो आधीच आवरून तयार होता. हातात एक मॅप घेऊन त्याने काल काय काय झाले त्याची यादी ऐकून घेतली. झालेल्या ठिकाणांवर नकाशाच्या प्रिंट आऊटवर फुल्ली मारली आणि म्हणाला
"अरे तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त पाहिलं आहे की शहर! मीसुद्धा त्या मॅजिक फाऊंटन वगैरेकडे गेलो नाही आजवर! पण आज तुम्ही सकाळी बाहेर पडणार तर मग सुरवातीलाच पार्क ग्युएलParc Guell करा. खूप मोठं आणि छान आहे त्यामुळे वेळ खूप लागेल आणि मग जमेल त्याप्रमाणे ओल्ड टाऊन मधे भटका. पण I would go to the Cathedral in Old Town. या लोकांचं हे वैशिष्ट्यच म्हणायला पाहिजे. आपण कस नेहेमी आज्ञार्थी बोलतो. म्हणजे "आधी तुम्ही हे बघा नंतर कॅथेड्रलला मात्र जाच”. यांचं तसं नाही ते म्हणताना मी इथे नक्की गेलो असतो किंवा मला इथे जायला जास्त आवडेल असं म्हणतात.

"कसं जायचं ते मी सांगतो" अस म्हणत मग तो मॅपकडे वळला. पसाज दी ग्रासिया किंवा पॅरालल स्टेशन. इथे गेलात की या रस्त्यावर तुम्हाला २४ नंबरची बस मिळेल ती घेऊन तुम्ही पार्कला जा. खूप मोठं आहे. फिरायला आणि बघायलाही. तिथून शहराचा एरिअल व्ह्यूही छान दिसतो. आज जरा मी दिवसभर बाहेर असेन पण For anything you need please contact me without any hesitation. हेझिटेशन कसलं? काल तर रात्री उशीराही हाक मारलीच होती की! असं मनात म्हणत त्याचे आभार मानून आम्ही फिरायला बाहेर पडलो.

पसाज दी ग्रासिया स्टेशन आम्हाला नवीन नव्हतं. या शहरात पाऊल ठेवलं तेच इथे त्यामुळे ओळखीचं. आम्ही रस्त्यावर आलो आणि स्टॉपचा अंदाज घेत होतो कारण २४ नंबरची बस खरी, पण कुठे जाणारी हे कुठे माहीत होतं? .बसला यायला ९ मिनिटं होती (हो इथल्या स्टॉपवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पट्टीवर बसची वेळ आणि किती वेळात ती अपेक्षित आहे दोन्ही दाखवतात)  तोपर्यंत निरीक्षण करू म्हटलं तर बरेच आमच्यासारखे टूरिस्ट दिसले म्हणजे बहुधा बरोबर आहोत. बस आली आणि कार्ड स्वॅप करायचं कुठे असा विचार करत असता ड्रायव्हरने हात दाखवून खूण केली. त्याला पार्क म्हणेपर्यंत त्याने जोरदार मान हलवली हसत हसत. आधीच्या प्रत्येक प्रवाशने हाच प्रश्न विचारला असावा. खच्चून भरलेल्या त्या बसमध्ये आम्ही एका कोप-यात उभे राहिलो.

बस सुरू झाली. वेगाचा प्रश्नच नव्हता. शहरातून सिग्नलच्या मांदियाळीतून ती जाणार होती त्यामुळे शहर दर्शन होत होतं. एक दोन स्टॉप्स गेल्यावर बघितलं तर आजूबाजूला सगळे सहप्रवासी म्हातारे! आपण कोण हा विचार त्यावेळी तरी मनात आला नाही. सगळ्या जास्तच नटलेल्या बायका आणि काठीच्या आधारावर जेमतेम उभे असलेले त्यांचे नवरे. बसलेल्यांमध्येही म्हातारे पुरूष किंवा स्त्रियाच होत्या. हास्यविनोद मोठमोठ्याने सुरू होते. गंमत म्हणजे शेजा-याने केलेल्या विनोदावर हसायला इथे बंदी नव्हती. ओळख पाळख काही लागत नव्हती. आमच्या शेजारची एक बाई बाहेर बघत मधेच मान वळवून कोणावर तरी कॉमेंट करून हसत होती आमच्याकडे पाहून रिस्पॉन्स मागितल्यासारखे हसत होती. एकूण मस्त माहोल होता. उभे राहिल्याचा त्रास या वातावरणामुळे नाहीसा झाला. इतक्यात एका स्टॉपवर एक तरूण बाई चढली. काय ते कळलं नाही पण एका म्हातारीने चटकन उठून तिला बसायला सांगितले. ती नाही नाही म्हणत होती तर दोघी तिघींनी तिला जबरदस्तीने बसायला भाग पाडले. मला काही कळत नव्हते. त्या शेजारच्या बाईने सगळी अ‍ॅक्शन करून दाखवली आणि त्या म्हाता-या बायांनी गर्भार बाईला ती नको नको म्हणत असताना बळे बळे बसायला कसं भाग पाडलं ते माझ्यासमोर उभं केलं की हसू आवरेना आम्हा दोघांना.

एखाद्या कसलेल्या गाइडप्रमाणे वाटेतल्या सुंदर इमारतींकडे निर्देश करत तिच्या बरोबरच्या बाईला शहर दाखवत होती. In fact जाता जाता आम्हाला दिसलेल्या (किंवा अशा प्रकारे दाखवल्या गेलेल्या) गौडीच्या ला कासामुळे (आमच्या इंटरनेट होमवर्कमुळे सगळी चित्र आम्हाला पाठ झाली होती) परत येताना कुठे उतरायचं हे ठरवता आलं. वळणा वाकणाचा तो रस्ता ४०-४५ मिनिटानंतर संपला आणि पार्क आल्याचं सगळ्यांना कळलं. उतरण्याची इथे कोणालाच घाई नसते. त्याप्रमाणे आम्हीही निवांत उतरलो आणि सुरू झालो.

उजवी बाजू धरून जायचं असं ठरवल्यानंतर प्रवेशद्वारावरील वादकांच्या गर्दीकडे दुर्लक्ष करून आत गेलो. सन १९०० मधे गौडीने हे पार्क उभं केलं. त्याने बांधलेल्या वेगवेगळ्या टेरेसेस बघताना थक्क व्हायला होतं. गुहा वाटाव्या असं हे बांधकाम दुरून नैसर्गिक वाटावं असं आहे. झाडांचे बुंधे वाटावेत असे खांब तो वापरतो. हे खांब पुनः सरळ नाहीत. सौंदर्याची त्याची आणि आमची व्याख्या जरी वेगळी असली तरी या गोष्टी बघताना स्तिमित व्हायला होतं. ते बघत बघत आम्ही अरूंद पायवाटांवरून चालत वरच्या दिशेने गेलो तेव्हा एका रस्त्याला लागलो. हा सर्वोच्च भाग असावा या पार्कचा. इथून शहर खाली दिसत होते. रस्ता मात्र प्रायव्हेट रोड असावा. कच्चा रस्ता. कदाचित एखादी गाडीही येत असेल. पण तिथून खाली उतरत जाणारा रस्ता एका टेनिस ग्राऊंडसारख्या मैदानावरून पुनः बागेकडे वळत होता. येताना पाय-या चढून आलो होतो आता रस्त्याने उतरायचं ठरवलं.

इथे असलेली इतर वास्तु शिल्प बघितली.सिरॅमिक्सच्या काही छान रचना दिसतात. एक मोठी पाल, त्याला म्हणताना ड्रॅगन म्हटले तरी ती पालच, आहे सिरॅमिक्समधलीच. तिच्या प्रतिकृती जागोजागी विकायला दिसत होत्या. वाटेतले बहुसंख्य विक्रेते दिसत तर आपलेच होते पण कोणीही ओळखीचं हसायला तयार नाही असं का हा विचार कालपासून डोक्यात घोळत होता त्याचं उत्तर आज मिळालं त्यांच्या संभाषणातून. "अरे वह लडकी लाहोर तक गयी उसके लिये लेकिन वह माना नहीं तो क्या करेगी बेचारी" तरीच! आमचा हिंदू बाणा उत्तराच्या कपाळावरील कुंकवाने स्पष्ट केला होता त्यामुळे त्यांना शत्रूराष्ट्रातील आमच्याविषयी संभ्रम नसावा आणि म्हणून ते हसत नव्हते! पण अशातही काही जण या पलीकडचे त्यातही मजा करणारे असतात. बरेच जण तिथे पाण्याच्या बाटल्या विकत होते. आमच्याकडे हातातच असलेली पाण्याची बाटली जाहीर करत होती की आम्ही पाणी घेणार नाही. ऍक्वा ऍक्वा असा स्पॅनिश जप सुरू असताना एकजण जवळ येऊन मोठयाने पानी असे ओरडला आणि आम्ही चमकून त्याच्याकडे पाहिल्यावर हसून हात करून पुढे निघून गेला.

खूप फिरलो या पार्कमध्ये. उंचावर असलेला एक क्रॉस बघितला. फोटो घेतले. शहराचे फोटो घेतले. कालपासून आम्ही बघत असलेले पोर्ट, साग्रादा फमिलिया चर्च, तो अघबार टॉवर ज्याने आम्हाला हुलकावणी दिली होती सगळं पहात होतो त्यावेळी स्वाभाविकपणे आठवण झाली आयफेल टॉवरवरून दिसलेल्या पॅरीसची. आखीव रेखीव सुंदर रस्ते, ती सुंदर सीन नदी, त्यातल्या बोटी, एखादाच अपवाद असणारी ती विजोड उंच इमारत वगळता प्रत्येक चौक प्रत्येक इमारतीवरील घुमट हा इतक्या सौंदर्यपूर्ण रीतीने त्या त्या जागी मांडला होता. एकदाही आम्हाला कुठली असुंदर, कुरूप तर सोडाच, गोष्ट दिसली नाही. इथे आम्ही आलो खूप अपेक्षेने पण दिसत होतं ते फक्त गजबजलेलं शहर, दाटीवाटीने उभी असलेली घरं, इमारती!. ना कसलं नियोजन ना सौंदर्य. अर्थात हा फक्त एरिअल व्ह्यू आहे. प्रत्यक्षात मात्र तितकेच सुंदर रस्ते, झाडं, मैदानं, चौक आणि वास्तु शिल्पं या बार्सिलोना शहरातही आहेत याचा प्रत्यय आम्ही कालपासून घेत होतो आणि आजही त्याचा प्रत्यय येणार होता.

                                                        भाग पाचवा पुढील मंगळवारी



गौडीच्या टेरेस. त्या लांबून बघताना इतक्या नैसर्गिक वाटतात! आज शतकानंतरही उभं असलेलं हे बांधकाम आपल्याला अश्चर्यचकित करून सोडतं.













पार्क ग्युएलवरून दिसणारं बार्सिलोना शहर! फोटोत बांधकाम सुरू असणारं साग्रादा फमिलिआ हे चर्च व डावीकडचा सुळका अघबार टॉवरचा. एक एकोणिसाव्या शतकाची साक्ष काढणार तर दुसरा विसाव्या शतकाचा प्रतिनिधी.

दुरून दिसणा-या या टेरेस

नैसर्गिकतेचा आभास हे गौडीचं वैशिष्ट्य आहे का?


आणि हे तिरके खांब, हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारे


ही सिरॅमिक्सची करामत! गौडीची खासियत!














या ठिकाणी त्याने टाइल्सचा वापर केला आहे.
परीराज्यातला महाल. हा माणूस स्वप्नात तर जगेत नसेल?


शब्दाविना सौंदर्य कळावे











Monday, 25 November 2013

SPAIN BARCELONA III

स्पेन बार्सिलोना III

आता परत फिरायला हवे होते. आणखी कुठे जायचं त्याचा विचार डोक्यात घोळत असताना मला मॅजिक फाऊंटनची आठवण झाली. इस्पानिया स्टेशनला उतरलो आणि समोर FIRA Barcilona असा बाण दिसला. म्हटलं चला जाऊ असेच. तर एक मोठ्या चौकातल्या बिल्डिंगवर तो बोर्ड! हा चौक देखणा होता. फोटो काढले आणि कोणत्या दिशेने जाऊ या असा विचार करत समोर बघितले तर एक पॅलेससारखी सुंदर वास्तू. त्याच्याकडे जाणा-या रस्त्यावर दोन्ही बाजूला कारंजांच्या खुणा होत्या. वर एका उंच जागी मोठे कारंजे असावे असा अंदाज करत आम्ही त्या पॅलेसच्या दिशेने निघालो. जवळ जात असता उंची आणि पाय-यांचा अंदाज आला. बाप रे इतक्या पाय-या चढून वर जायचं? खरतर खूप दमायला झालं होतं. कॉफी घेऊ आणि मग जाऊ असं ठरवून तिथे असलेल्या स्टॉलवर गेलो.

MNAC Museu Nacional d'Art de Catalunya

स्पेनमध्ये कॉफी कपात मिळते! यात विशेष ते काय असं कदाचित वाटेल पण अमेरिकेच्या सवयी प्रमाणे तो भलामोठा ग्लास त्यातली ८-१० पुड्या साखर घालूनही कडवटपणा न सोडणारी आणि पिता पिता दमवणारी कॉफी माहीत असेल तर स्पेनमधल्या कपातील योग्य प्रमाणातील कॅपुचिनोचं महत्व कळेल. त्यातून आपल्याला सवय असते ती साखर आणि दूध घातलेल्या गरम कॉफीची. इथेसुद्धा दूध गरम असते आणि वर क्रीम घालतात त्याचा गोडवा असतो. त्यामुळे आपल्या प्रमाणात बसणारी अशी कॉफी पिण्याचं समाधान निश्चित मिळतं. कॉफीने रिफ्रेश होऊन आम्ही पाय-यांच्या दिशेने पाय वळवले तर काहीजण दुस-या बाजूने वर जाताना दिसले. अरे इथे तर एस्कलेटर दिसतो आहे मग श्रम का करायचे? अशा मला वाटतं ५-६ लेव्हल्स पार करून आणि मधल्या २५-३० पाय-या चढून वर पोहोचलो आणि थक्क झालो. समोरच्या बाजूला लांबवर दिसणारा तेव्हढ्याच उंचीचा डोंगर. म्हणजे आम्ही इतक्या उंचावरून बार्सिलोनाकडे पहात होतो. ग्रेट! उणीव एकच होती की आम्ही सोमवारी इथे होतो आणि कारंजे फक्त गुरूवार ते रविवार असे सुरू असणार होते. पण या गोष्टीचा विसर पडला तेच खूप चांगले झाले इतका सुंदर चौक आणि MNAC Museu Nacional d'Art de Catalunya ची पॅलेससारखी इमारत बघायची राहूनच गेली असती. (परतल्यावर टिअ‍ॅगो तर म्हणालासुद्धा आम्ही इतके वर्ष आहोत इथे पण अजून गेलो नाही त्या बाजूला)



रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि सूर्यही अस्ताला जाण्याच्या विचारात होता. दुपारी एकच्या सुमारापासून भिरभिरणारे आम्ही आता पुरेसे दमलो होतो, आता परतीच्या वाटेवर जायला हवे होते. मेट्रो पकडली आणि एकदम मनात विचार आला साडे नऊ तर वाजले आहेत तो टॉवर जर मिळाला तर पाहून घेऊ. जेवू आणि जाऊ घरी. मोनुमेंटाल स्टेशन येत होतं. आमच्या आधीचच स्टेशन. उतरलो.

वर रस्त्यावर आलो मात्र. निर्णय बदलला. रस्त्यावरचं वातावरण थंड झालेलं होतं. रात्रीची वेळ, रहदारी कमी झालेली आंणि कुठे शोधायचं हे माहीत नाही. बार्सिलोनाची ख्याती इंटरनेटवरील माहितीप्रमाणे तरी चांगली नव्हती. खरतर कोणत्याही मोठ्या शहरात जे अनुभवायला मिळतं तेच त्यातही होतं. श्रीशैल त्या साइटविषयी मी विचारलं असता म्हणाला होता हे खूपसं अमेरिकनांचं लिहिलेलं असतं आणि ते एक नंबरचे टरकू असतात. तुम्ही मुंबईत रहाता तसे रहा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. तरीही म्हटलं उगीच परीक्षा नको. परत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त रस्ता ओलांडून तिथे चाललेल्या अन्नछत्रात सामील झाल्यानंतर!. समोरचं हॉटेल बरं वाटलं. सगळा यंग क्राऊड होता. आम्हाला आता त्यांचा पायेया ओळखीचा झाला होता. पतातो ग्रॅशियासुद्धा. आणि हो त्यांची वाइनही मला आवडली होती. श्रीशैल म्हणाला तशी ती होममेड असावी. इथे या देशात हॉलंडच्या मानाने स्वस्तही होतं. जरा चैन करायला वाव मिळाला.
आवरून परत मेट्रो आणि घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते.

अपार्टमेंटच्या बिल्डिंगचा दिंडी दरवाजा जवळच्या किल्लीने उघडून आत आलो आणि लिफ्टने दुसरा मजला. समोर ४ नंबरचं अपार्टमेंट. दरवाजावरील कुलपाचा आणि किल्लीचा काही मेळ जमेना. असं कसं झालं? काही घोळ तर नसेल? मजला चुकला की काय? पण ४ नंबर तर बरोबरच आहे. आणि जिन्याने उतरताना नाही का मघा दुपारी दुसरा मजला मोजला होता. इतक्या उशीरा दरवाज्याची बेल वाजवणं अप्रशस्त वाटलं. नाइलाजाने खिशातला मोबाइल काढून टिऍगोला फोन लावला. त्याने कुठे आहात विचारले. म्हटलं Right in front of your door. फोन ठेवला. मधला अवधी खूप मोठा वाटला तरी. पाच मिनिटं तशीच गेली.  पण दरवाजा काही उघडला नाही.  कळेना, टिऍगोला दरवाजा उघडायला एवढा काय प्रॉब्लेम आहे. पुनः फोन पुनः तोच प्रश्न म्हटलं अरे फ्रंट डोअर उघड.  दरवाजा उघडल्याचा आवाज  आला. पण खालच्या मजल्यावर! म्हणून जिन्यावरून खाली बघितले. जिना उतरून खाली आलो आणि डोळेच फिरले माझे. तिथेही ४ नंबर! अरे बापरे केव्हढा घोळ झाला असता बेल वाजवली असती तर! पण मग कोणता खरा? . जाऊ दे ती वेळ नव्हती हा विचार करण्याची. त्याला दिलेल्या त्रासाने आम्ही कसनुसे झालो होतो..

आम्हाला आत घेऊन टिऍगोने गप्पांनाच सुरवात केली. आम्ही घातलेला गोंधळ बघून तो हसायला लागला. आम्ही शरमेने सॉरी म्हटल्यावर म्हणला कशाबद्दल? होतं असं कधी कधी. रात्रीचे अकरा म्हणजे फार नव्हेत. मी उशीरापर्यंत जागाच असतो. त्याला सहज विचारलं काय कन्फ्युजन काय होतं? एवढा वेळ लागला दरवाजा उघडायला?

तो म्हणाला मला वाटलं तुम्ही तुमच्या खोलीत आत आहात आणि आतून लॉक झालेला दरवाजा तुम्हाला उघडत नाही. मी किल्लीने तुमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे. तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही की तुम्ही बाहेर असाल. Sorry to keep you waiting!
आमचं हे तू सॉरी मी सॉरी खूप वेळ सुरू राहिलं असतं पण तो म्हणाला आता शांत झोपा तुम्ही. खूप दमले असाल. मला कल्पना नव्हती तुम्ही आजच एवढे फिरून याल! उद्या मी तुम्हाला कस आणि कुठे जायचं ते समजावून सांगेन. मॅप डाऊनलोड करून ठेवतो म्हणजे सोपं होइल.


पुनः एकदा इतक्या उशीरा त्याला उठवून त्रास दिल्याबद्दल सॉरी आणि मदतीबद्दल आभार मानून आम्ही आमच्या खोलीकडे वळलो तर पठ्ठ्या म्हणाला स्पेनमध्ये ११ म्हणजे उशीर नाही आणि तसाही मी उशीरापर्यंत जागा असतोच. आम्हाला हायसं वाटून आम्ही झोपायला आमच्या खोलीकडे वळलो. 


                                                                     भाग चौथा पुढील मंगळवारी