Monday 22 December 2014

ITALY VATICAN IV


व्हॅटिकन (४)
अजून निम्मा जिना उतरणे बाकी होते. पण आता आम्ही खूप प्रसन्न होतोअसं कोणी भेटलं की खूप उत्साह येतो. खाली आलो आणि बघितलं तर आता मात्र बॅसिलिकाला आत जाण्याकरता फारशी गर्दी नव्हती. तो पिएता पुनः बघू या का? तसाही हातात वेळ होता

पुनः बॅसिलिकामधे आत जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. इतका वेळ लक्षात न आलेली गोष्ट आता उलगडली. एका बाईला आत प्रवेश नाही म्हणून दारातच अडवलं. ती कारण विचारत होती तेव्हा त्या माणसाने सगळ्या ठिकाणी लिहिलेल्या एका सूचनेकडे तिचं लक्ष वेधलं. You should be properly dressed. ती त्यांच्या दृष्टीने व्यवस्थित म्हणजे हाफ पॅन्ट आणि टी शर्ट्मध्ये होती. अशा लोकांसाठी मग धंदेवाल्यांनी बाहेर सोय ठेवलेली आहे. सकाळी खूप मुली/ बायका इथे उन्हाळा असल्याकारणाने आखूड कपड्यात आल्या होत्या. त्यांनी रांगेत असतानाच अंगावर ओढणीसारखं किंवा टॉवेल ओढून घेतला होता, आणि तो त्यांच्या  proper dress च्या व्याख्येत बसत  होता.

पिएताच्या पुनर्दर्शनातही आम्हाला त्या शिल्पाचं सामर्थ्य दृष्टोत्पत्तीस आलं नाही तेव्हा आम्ही तो नाद सोडून दिला. एक चक्कर मारू या पुनः म्हणून तीनही कॉरिडॉर्स हिंडताना जिना दिसला. वर जावं की नाही या विचारात होतो पण म्हटलं जाऊन तर बघू. वर गेलो पण डोमची मजा इथे नव्हती. तसाही बॅसिलिकाचा तो घुमट हा बंद होता. वरून फक्त खाली फिरणारी माणसं दिसत होती. वर काही चित्र होती भिंतींवर पण त्यात काही वैशिष्ट्य म्हणावं असं नव्हतं. मुकाट्याने खाली उतरलो.



आधी म्हटलं त्याप्रमाणे  व्हॅटिकन हे स्वतंत्र राष्ट्र आहे. अर्थात सगळ्या व्यवस्था त्यांच्या स्वतःच्या आहेत. इथे त्यांचं पोस्टही आहे. प्रत्येकजण आत जाऊन स्वतःचा पत्ता लिहिलेलं पाकीट पोस्टात टाकताना दिसत होता. फक्त गंमत की भक्तीभाव? पोपच जाणे!

बाहेर आलो. कुठे जायचं? परतीच्या मार्गात ती नदी, तो किल्ला सगळं खुणावत होतं. तसा आता वेळही हाताशी होताच त्यामुळे ती काळजी नव्हती. डोमवरून बघताना दिशांचा साधारण अंदाज (!) आला होता त्याप्रमाणे निघालो. पूल बघितला होता त्याच्या खालून जाताना बाजूने वेगात जाणा-या गाड्या आणि अरूंद पायवाट यामुळे जरासं भीतीदायक म्हणण्यापेक्षा दडपण आल्यासारखं वाटत होतं. पुढे गेलो आणि नदी सामोरी आली. पाणी काही स्वच्छ म्हणावं असं नव्हतं पण आमचं लक्ष त्यापेक्षा त्यात तयार झालेल्या एका छोट्या बेटाने वेधून घेतलं. एकच झाड, विस्तार असलेलं आणि थोडी मोकळी जागा भोवताली. सुबक साजरं असं ते बेट पाहून मन प्रसन्न होत होतं. पुढे गेल्यावर पूल होता नदीवर. त्याच्या मध्यावरचे पुतळे बघितल्यावर पॅरीसच्या पुलाची आठवण झाली. अर्थात पॅरीसचा तो सुबकपणा आणि कलादृष्टी वजा जाता. तसे हे पुतळे ओबडधोबडच वाटले. पण या लोकांची कलासक्ती दिसत रहाते ठायी ठायी एवढ मात्र खरं!






पूल ओलांडल्यानंतर किल्ला. बाहेरून आम्ही बघत होतो. किल्ला पुरातन त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण. पण त्याला एका ठिकाणी लावलेल्या काचा विरूप करून टाकत होत्या. आत जायच? हा प्रश्न जेव्हा आमच्यापैकी कोणाच्याही मनात येतो तेव्हा त्याचं उत्तर अर्थात नकारार्थीच असतं कारण जायचं असेल तर आपण त्याची चर्चा कशाला करणार? तरीही प्रवेशद्वारापर्यंत गेलो. आत जायला तिकिट होतं. आता डोम चढून बॅसिलिकामधला तो घुमट चढून पुनः किल्ल्यात वर चढून जाण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही नव्हती. तिकिट देऊन कोण दमणूक करून घेईल असं म्हणत आम्ही बाहेर पडलो.

बाहेरच्या अंगाला दुकानांची रांग होती. गणपती राम-सीतेपासूनचे देव, वेगवेगळ्या भेटवस्तू तिथे दिसत होत्या. आता त्यामधला रस संपला असला तरी नवीन काही आहे का म्हणून बघत चाललो होतो. दुकानं ही प्रामुख्याने इतरेजनांची असावीत कारण तिथे काळे, आपले (= बांगलादेशी किंवा श्रीलंकन) विक्रेते दिसत होते. पुस्तकांचीही दुकानं होती पण ती अर्थातच इटालिअन भाषेतली पुस्तकं. चित्र बघून पुढे जात होतो.

आता परत फिरायला हवं असं घोकत होतो पण उलट फिरून मेट्रोला जायला कंटाळा आला होता. असेच पुढे जाऊ या कुठे तरी स्टेशन लागेलच म्हणत पुढे पुढे निघालो होतो आणि असं वाटलं की हा भाग ओळखीचा आहे. आता इथे कुठे ओळखीचा भाग असणार? आपण काल गेलो त्यापासून हे खूप दूर नाही का असं म्हणत असता लक्षात आलं की  काल आपण त्रेवी फाऊंटन शोधत असता चुकून गेलो होतो तो हा भाग आहे. मग मी मुद्दाम नकाशा बघितला तर खरच की आम्ही नदी ओलांडली तेव्हा या इथल्या पट्ट्यात आलो. आधी नकाशा नीट न बघितल्याचा परिणाम! संध्याकाळ झाली होती, काल याच वेळी आम्ही स्पॅनिश स्टेप्सला होतो. पुनः पाय-या चढून जाऊ या का? पुनः तेच नको म्हणत मग बार्बेरीनी स्टेशनच्या दिशेने चालत निघालो.


उद्याच्या परतण्याचं सावट मनावर होतं. रोममधले हे दिवस छान होते. आलो तेव्हा जाणवत असलेला उन्हाळा, पावसाच्या शिडकाव्यानंतर निवळून गारव्याची सुखद जाणीव होती. उद्या इथून निघायचं तेव्हा हसन नसला तर? खरतर इतका प्रश्न पडण्यासारखं काय होतं त्यात? दुकानातला एक विक्रेता, तोही मुळात आपलाच मुक्कम ज्या शहरात पूर्ण तीन दिवसही नाही अशा ठिकाणचा. पण हे सगळे व्यवहारी मनाला पटणारे तपशील अंतर्मनाला कसे पटतील? जाताना नकळत आमचं लक्ष गेलच दुकानाकडे. होताच तो तिथे. आज तर काही विकत घेण्याचा प्रश्न नव्हता. त्यालाही ते माहीत होतच की. पण तरीही एकीकडे काम सुरू ठेवत ( दुकान बंद करण्याची आवरासावर सुरू होती) तो बोलत होता. मला तसं चांगलं हिंदी बोलता येत नाही समजतं सगळं. तरीही .... असं म्हणून तो थांबला. इथे येऊन मला पाच वर्ष होतील आता. माझा भाऊ नऊ वर्षांपूर्वी आला होता. इतक्या वर्षात तो घरी जाऊ शकला नव्हता. आता त्याचे कागद तयार झाले आहेत. (म्हणजे त्याचं रहाणं आता अधिकृत झालं असावं.) तो आता तिकडे (बांगला देशला) गेला आहे. मला वाटतं मी पण पुढच्या वर्षी जाऊ शकेन (कायदेशीर बंधनांमूळे ) . पण एक सांगू का? मला तुमच्याकडे बघून खूप बरं वाटलं. तुम्ही दोघे बरोबर फिरता, एकमेकांशी बोलता, आमच्याकडे हे असं नसतं. माझे वडील म्हणजे मिलिटरी आहेत. ते आले की आई घाबरून गप्पच होते. तिला त्यांच्यासमोर बोलताच येत नाही इतकी त्यांची भीती (खरतर दहशत) आहे. मी त्याला म्हटलं, हसन तुझं लग्न झालं आहे का रे? तर लाजला, म्हणाला, नाही. मग त्याला सांगितलं कि निदान वडीलांची जी गोष्ट तुला बरोबर नाही असं वाटतं ती निदान तू तरी तुझ्या आयुष्यात करू नकोस. हसला आणि म्हणाला सही है.   

                                                                                    इति व्हॅटिकन 
                                                                                    पुढच्या मंगळवारी फ्लोरेन्स     

तळटीप : मी अंधेरी ब्रॅन्चमधे काम करत असताना मिसेस अरान्हा नावाच्या एक कस्टमर माझ्या आधी त्या जागेवर काम करणा-या मेन्डोन्सा नावाच्या मॅनेजरला शोधत आल्या होत्या.  व्हॅटिकनहून त्यांनी आणलेलं "होली वॉटर" त्यांना मेन्डोन्साना द्यायचं होतं. ती आठवण ठेवून मलाही आमच्या लुडा, मिशेल जेरी या मैत्रिणी आणि अर्नेस्ट या मित्राकरता ते घेऊन येण्याची इच्छा होती. पण......... अर्थात या सगळ्यांची मला तिथे प्रकर्षाने आठवण मात्र झाली. त्यांच्या पापलपर्यंत (पोपना पापल म्हणतात, जवळिकीने) नक्कीच ती आठवण पोहोचली असेल!               

1 comment: