Monday 8 December 2014

ITALY VATICAN II

व्हॅटिकन (२)
जरा बाहेरून या पॅलेशियल बिल्डिंग्ज बघू म्हणून आम्ही मोकळ्या अंगणात गेलो. चौसोपी वाडा असावा तशी चहूअंगाने इमारत आणि मधे मोकळी जागा. तिथे एक झाडाचा ( देवदार वगैरे) कोन असतो तशा प्रकारचं काहीतरी आणि दोन बाजूला हिरवे मोर. सगळीकडे लॉन आणि दुस-या एका ठिकाणी मॉडर्न आर्ट म्हणावी असं धातूचं काहीतरी. उगीच इकडे आलो असं एकूण चित्र. थोडा वेळ थांबून आत गेलो.





आत ही जत्रा. तसही म्हणे व्हॅटिकनला कायमच गर्दी असते. त्यात हा समर हॉलिडे त्यामुळे ओसंडून वहाणारी गर्दी. आम्ही आपले कुठून सुरवात करावी या संभ्रमात. हातातल्या कागदात मी डोकावून पहात होतो दिशा ठरवण्याच्या दृष्टीने. पण तसा काही निर्णय होत नव्हता. असं म्हणतात की या दोन्ही गोष्टी, म्हणजे हे सिस्टिन चॅपेल आणि व्हॅटिकन म्युझियम नीटपणे (?) बघण्यासाठी कित्येक दिवस लागतील.! आमच्याकडे याकरता नव्हता वेळ आणि पेशन्सही. आम्ही आपले कलाकुसरीने भरून टाकलेल्या भिंती, छत आणि काही ठिकाणी तर जमीनही पहात होतो. सगळीकडे पेंटिंग्ज, सगळीकडे मूर्ती, बायबलमधले प्रसंग वगैरे वगैरे. खूप छान इत्यादी.


जमिनीवरील मोझॅक चित्र

देखण्या कलात्मक मूर्ती



प्रत्येक गोष्ट प्रमाणात असेल तरच त्याचा आस्वाद व्यवस्थितपणे घेता येतो हे अर्थशास्त्रातलं तत्व! इथेही ते तंतोतंत लागू पडत होतं. खूप सुंदर अशा या सगळ्या गोष्टी एकापाठोपाठ बघत असता आधी काय पाहिलं होतं हेही विसरून जायला होतं. अति गोड जेवणानंतर आपली काय हालत लागते? तशीच ही गत.

म्हणजे तसे लक्षात राहिलेल्या काही गोष्टी सांगायच्या तर मधेच एका हॉलमध्ये एक अतिशय भव्य असं बेसिन आहे. हे नीरोचं, रोम जळत असता फिडल वाजवणारा राजा आठवतो आहे ना, तोच तो! आता यात तो तोंड कसा धूत असेल आंघोळ करत असेल का असले विचार मनात न आणता ते बघायचं आणि वा छान म्हणायचं हे शक्य आहे का? बरं तो काही करू दे, या म्युझियममध्ये ते पोपला कशाकरता हवं? हे असले प्रश्न या ठिकाणी जागोजागी पडतात.

एक पुरूषाचं धड (Torso) आहे. ते मायकेल ऍंजेलोने बनवलेलं आहे म्हणे आणि ती प्रमाणं ही नंतर मूर्ती बनवण्याकरता योग्य (देखणेपणाकरता) समजली गेली. मूर्तीकलेतलं मला काही कळत नाही पण ते धड पुरूषाचं प्रमाणबद्ध शरीर म्हणून आताच्या संकल्पनेत काही पटत नाही.



भिंतींवर आणि छतावर रंगवलेली सगळीच चित्र छान आहेत. विशेषतः त्यातील रंग. इतक्या वर्षानंतरही इतके सुंदर दिसणारे हे टिकावू रंग कशापासून बनवले असतील हा प्रश्न नक्की मनात येतो. आज ती चित्र बघताना आपली मोडणारी मान लक्षात घेता त्या काळात कलाकारांनी किती कष्ट घेतले असावेत याची कल्पना येते.



पण हे सगळं बघताना एक प्रकारची विषण्णता, एक प्रकारची चीडही मनात दाटून येते. किती हव्यास आहे हा! एका धर्माच्या रक्षकाचा (!) हा महाल म्हणायचा. त्याला हा सगळीकडून दिसेल चांगलं ते स्वतःकडे ठेवण्याचा, ओरबाडून आणून ठेवण्याचा, अट्टाहास का? अपरिग्रह हा साधू संतांचा गुण म्हणायचा तर त्या कसोटीवर त्या काळातले पोप कुठे बसतात? मला तरी एखाद्या राजाने लुटून आणलेला खजिना बघत आहोत असच पदोपदी जाणवत होतं आणि नंतर व्हॅटिकनविषयी वाचलेल्या गोष्टींमध्ये त्याचा उल्लेख आल्यावर तर मनात उद्वेगच जास्त दाटून आला. या माणसाने (म्हणजे त्या त्या काळात जो कोणी पोप असेल तो) रोम आणि आसपासच्या परिसरातली प्राचीन ग्रीक देवतांची देवळं तर सोडली नाहीतच पण कॉन्स्टन्टिनोपॉल(आताचं इस्तंबूल), इजिप्तसारख्या देशातूनही दिसेल ते आणून इथे भरलं आहे. एकीकडे त्या प्राचीन संस्कृतीचा नाश केल्याचा राग आणि दुसरीकडे निदान त्या इथे जपून ठेवल्याबद्धलची कृतज्ञता अशी संमिश्र भावना त्या वस्तू बघताना मनात तयार होत होती

तसाही म्युझियम्स बघण्याचा आमचा उत्साह दांडगाच म्हणायचा! आम्ही पॅरिसमध्ये लुव्र बघितलं. त्यानंतर पॅरिसमधली आणखी दोन तीन म्युझियम्स तिकिट काढून बघितली आणि ठरवलं होतं की आपल्याला त्यात गम्य नाही. तरीही यावेळी श्रीशैलच्या आग्रहाला बळी (?) पडून तिकडे वळलो. निराशा नव्हे पण समाधान झालं असं काही वाटलं नाही हे निश्चित. ऐश्वर्याचा सोस बघताना ज्या माणसाच्या नावाने हा धर्म स्थापन झाला त्याच्या आत्म्याला याविषयी काय वाटत असेल हेच मनात घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे व्हॅटिकन हा स्वतंत्र देश आहे तेव्हा त्याचे पोलिस वगैरे पण आहेत. त्या रक्षकांचा जाता जाता फोटो काढला (मला माहित नव्हतं की त्याला परवानगी नाही). त्यांच्या अवताराकडे बघून त्यांचं रक्षण कोण करणार हाच विचार मनात आला. अतिशय विदुषकी पेहेराव होता त्यांचा. हो इथे आणखी एक सांगायलाच हवं. आम्ही फोटो काढला म्हणून आक्षेप घेतला, कदाचित तो नियमही असेल त्यांचा, पण बॅसिलिकामधून बाहेर पडताना जे रक्षक होते त्यांच्यासमवेत उभं राहून गोरी लोकं मात्र फोटोंची हौस भागवत होती. नियम कदाचित माणसागणिक बदलत असावेत!

जाऊ दे असं म्हणत आम्ही बाहेर आलो. अजून एक महत्वाचं आणि कष्टाचं काम बाकी होतं.

                                                                                        भाग तिसरा  पुढील मंगळवारी         

        

No comments:

Post a Comment