Monday, 1 December 2014

ITALY VATICAN I

व्हॅटिकन (१)
व्हॅटिकनला जायचं तर सकाळी जितकं लवकर जाता येइल तितकं बरं. खूप गर्दी असते. तासनतास रांगेत उभं रहाण्याची तयारी ठेवा हे सगळे उपदेश ऐकून होतो. आम्ही "आमच्या" लवकर बाहेर पडलो. म्हटल्याप्रमाणे हसन दुकानात होता बघून हायस वाटलं. केळी, त्याचे ते पेश्गा, घेतले. हे किंडर ब्रॅन्डचे छोटे केक्स प्रसिद्ध आहेत बरोबर ठेवा. असं म्हणत खूप खरेदी झाली. आवश्यकही असावी. आठवण झाली पाण्याची कारण प्रत्येकाने तेही सुचवून ठेवलं होतं. खरतर आतापर्यंत इटलीमध्ये आम्ही पाण्याच्या बाटलीवर खर्च केला नव्हता. इटलीतलं नळाचं पाणी पिण्याचंच असतं आणि बाटलीपेक्षा ते जास्त भरवशाचं, कारण बाटल्या ब-याचवेळी बोगस असतात, हे आम्हाला माहित होतं. पण व्हॅटिकनला फाऊंटन वगैरे नाहीत तेव्हा पाणी घेऊन जा हेही मी कुठेतरी वाचलं होतं. हसन म्हणाला तुम्ही पाणी घेण्यापेक्षा हा अ‍ॅपल आणि पेश्गाचा रस आहे तो न्या. खूप वेळ उभं राहून दमायला होतं. पाण्यापेक्षा हे बरं. आम्ही ती बाटली घेऊन बाहेर पडलो.

गाडीला गर्दी खूप होती पण व्हॅटीकनचं स्टेशन आमच्या या ऑरेंज लाइनवरच असल्याने टर्मिनीला गाडी बदलण्याची आवश्यकता नव्हती. टर्मिनीला आम्हा दोघांना बसायलाही मिळालं. आधीच्या ओत्ताव्हिआनो- सान पिएत्रो स्टेशनला उतरलात तर नदीच्या कडेने रस्ता छान आहे वगैरे वाचलं होतं म्हणून गाडीतून उतरलो. स्टेशनबाहेर पडण्यापूर्वी पुनः विचार केला, चालत जाताना उशीर झाला तर? त्यापेक्षा पुढच्या गाडीने व्हॅटिकनच्याच सिप्रो- म्युझी व्हॅटिकनी स्टेशनवर उतरू म्हणजे प्रश्न येणार नाही. आणि हा निर्णय बरोबर ठरला. खरोखरच उतरल्यानंतर विचारायची गरजच पडत नाही कारण सगळे उतरणारे त्या एकाच दिशेने जात असतात.

बाहेर रस्त्यावर पावला पावलांवर लोक उभे. म्हटलं तर मार्गदर्शन म्हटलं तर धंदा. तुम्हाला तिकिटं मिळवून देतो, फक्त इतके यूरो द्या. डायरेक्ट आत प्रवेश. कशाला उगीच तीन चार तास वाया घालवता रांगेत? असे इमोशनल ब्लॅकमेलिंग करणारे ते हितचिंतक पटवापटवी करायला बघत होते. आपला माणूस दिसला की भाषेच्या माध्यमातून त्याच्या पोटात शिरू पहात होते. आपले (=बांगलादेशी) दिसणारे हिंदीचा आधार घेत संवाद साधत होते. नेहेमीचच पर्यटन क्षेत्र किंवा तीर्थक्षेत्री असावं अशा वातावरणात आम्ही होतो. प्रत्येकाला हो हो करत पुढे निसटत निघालो.

व्हॅटिकन हा स्वतंत्र (!) देश आहे. ही फॉर्टिफाइड सिटी आहे. चारी बाजूने कडक बंदोबस्त असलेली तटबंदी. इथे राज्य फक्त पोपचे. त्याच्या आज्ञा प्रमाण मानल्या जातात. त्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. तर अशा एका कमानीखालून गेल्यानंतर एका मोठ्या चौकातली एक भलीमोठी रांग बघितली आणि आम्हीही उभे राहिलो. मला तर हाच सगळ्याचा एन्ट्रन्स वाटला होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही प्रवेश करण्यापर्यंत मजल मारली. वाटलं चला पोहोचलो. उगीच लोकं वाट्टेल ते लिहितात! किती पैसे द्यायचे आता तिकिटासाठी ते तिकडे पुढे गेल्यावर कळेल असे म्हणत आम्ही पुढे गेलो. तपासणी झाली आणि आत जाण्यासाठी लोक चालले होते त्यांच्यामागून गेलो. तर तिथे लॉकर्स दिसत होते. तिकिट खिडक्या होत्या. म्हटलं चौकशी करू या. तर त्या खिडक्या होत्या सिस्टिन चॅपेल आणि व्हॅटिकन म्युझियम तसेच डोम चढून जाण्याच्या तिकिटांसाठी. म्हणजे आम्ही आता चुकीच्या ठिकाणी आलो होतो. वस्तुस्थिती ही होती की आम्ही लावलेली ही रांग सेंट पीटर बॅसिलिकाची. इथे प्रवेशाकरता पैसे लागत नाहीत पण जिथे पैसे देऊन प्रवेश आहे त्याची म्हणजे सिस्टिन चॅपेल आणि म्युझिअमची तिकिटं मात्र इथे विकली जातात.

आम्ही बॅसिलिका बघायला गेलो. नेहेमीप्रमाणेच अति भव्य, उंच असं छत असणारी बॅसिलिका संगमरवराच्या वापराने फार सुंदर दिसते. संगमरवराचे प्रकारही विविध आढळतात. हे मी फक्त जमिनीविषयी सांगत आहे. छतापर्यंतच्या ख्रिस्ताच्या आयुष्यातील प्रसंगावरच्या चित्रांविषयी किंवा मूर्तींविषयी बोलायची आवश्यकताच नाही. अप्रतिम, व्य दिव्य असं सगळं काही. त्या सगळ्या भिंतींवरचा एकही कोपरा सोडलेला नव्हता. चित्रं किंवा कोरीव काम यांनी त्या भिंती, ते छत सारं काही सजलेलं होतं.
खूप काही ज्याविषयी बोललं जातं तो मायकेल एंजेलोचा पिएता बघितला. असं म्हणतात की क्रूसावरून उतरवलेल्या आपल्या मुलाला, ख्रिस्ताला मांडीवर घेऊन बसलेली मेरी आणि तो मृत देह यांच्यातला दृष्टोत्पत्तीस पडणारा संवाद हे या कलाकृतीचं वैशिष्ट्य आहे. आम्ही कलावंत म्हणून आंधळे आणि भक्तिभाव म्हणावा तर तो कुठून असणार? त्यामुळे इतर मूर्तींप्रमाणेच ती कलाकृती बघितली आणि पुढे गेलो. एरवी कोणतेही चर्च, चॅपेल, बॅसिलिका जशी नेटकी सुंदर आणि संपन्न असते त्यात ही आणखी उजवी आहे इतकं आमच्यापर्यंत पोहोचलं.


मायकेल एंजेलो : पिएता

बाहेर पडताना, इथे पाटी आहे की इथून बाहेर पडल्यानंतर पुनः आत प्रवेश नाही. म्हणजे आत यायचं असेल तर रांगेचं सव्यापसव्य करणे आवश्यक आहे. तर तिथे असलेल्या खिडक्यांवर चौकशी केली तेव्हा कळलं की ठराविक वेळेचं तिकिट जर तुम्ही घेतलं तर इतके युरो जास्त पण तुम्हाला त्या वेळी रांगेत उभे रहावे लागणार नाही. रांगेचा तसाही धसका होताच. शिवाय सकाळी स्टेशनबाहेर पडल्यानंतर रस्त्यात ते लोक ५० पासून १०० युरोपर्यंत पैसे सांगत होते तसे इकडे नव्हते. नेहेमीच्या तिकिटापेक्षा ५ किंवा १० युरो जास्त होते. आम्ही दुपारी एकच्या वेळेचं उपल्ब्ध असलेले तिकिट घेतलं.


आता जरा निवांतपणा होता. अर्धा एक तास मधे मोकळा होता. जवळच्या खाण्याच्या वस्तू, चहा यांची आठवण झाली. अर्धा तास आधी आम्ही त्या सिस्टिन चॅपेलच्या रांगेकरता असलेल्या प्रवेशद्वाराकडे पोहोचलो. हातात तिकिट ठेवून आम्ही एक वाजण्याची वाट बघत असता दारावरच्या एका माणसाने खुणेने बोलावलं. तुम्ही आत जाऊ शकता, थांबण्याची आवश्यकता नाही म्हटल्यावर आत शिरलो.

                                                                 भाग दुसरा पुढील मंगळवारी   

2 comments:

  1. सहजसुंदर लिखाण

    ReplyDelete
  2. भाषा एवढी ओघवती आहे की पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. लिखाणातील प्रसंगाशी समरूप व्हायला होते.

    ReplyDelete