Monday 29 December 2014

ITALY FIRENZE (FLORENCE) I

इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (१)

रोममधला मुक्काम संपणार याचं वाईट वाटत असतानाच श्रीशैलच्या आवडत्या टस्कनीला भेट द्यायची उत्सुकता मनात होती. मुंबईच्या माणसाला ट्रेनचं सान्निध्य असल्यावर एक निवांतपणा असतो. सकाळी ९.२०ची गाडी आहे. वेळेत निघा. हाय स्पीडचं रिझर्वेशन फक्त त्याच गाडी पुरतं असतं. नाहीतर सगळीकडे थांबत जावं लागेल इत्यादी सूचनांचा कल्लोळ मनात होता. पण एकतर आम्ही रोमच्या फुरिओ कामिलो स्टेशनच्या अगदी जवळ रहात होतो आणि तसं हे रोमच्या टर्मिनीपासूनचं सहावं स्टेशन. त्यामुळे वेळेचं अजिबात दडपण वगैरे नव्हतं. निवांतपणे निघालो आणि टर्मिनीला आलो. तिथल्या भूमिगत भूलभुलैय्यात मात्र क्षणभर का होईना गरगरायला झालं. पण हाती वेळ होता त्यामुळे फारसं काही बिघडलं नाही.

गाडी इंडिकेटरवर लागण्याची वाट बघत होतो. काही मुली, बायका गळ्यात कंडक्टर टाइप पर्स तिरकी अडकवलेली, लगबगीने हिंडत होत्या. कोणाला काही मदत हवी का ते विचारत होत्या. खरतर ट्रेन इतालिया या कंपनीच्या काऊंटर्सवर व्यवस्थित माहिती मिळत असता या बायका अशा का फिरतात आणि त्या स्वतःहून विचारत असता लोकं मात्र त्यांच्याकडे का दुर्लक्ष करतात ते कळे ना. आम्हाला मदत नको होती त्यामुळे आपल्याला काय त्याचं म्हणून दुर्लक्ष केलं.

आमची गाडी लागली आणि आम्ही निवांत जाऊन बसलो. टस्कनी हा इटलीचा समृद्ध प्रदेश. ऑलिव्ह आणि द्राक्ष यांच्या बागा वाटेत जागोजाग दिसत होत्या. एकूण संपन्नतेची लक्षणं सांगावी लागत नाहीत हे खरं.

सांता मारिया फिरेन्झ हे शेवटचं स्टेशन त्यामुळे उतरण्याची लगबग नव्हती. फिरेन्झ हे इटलीतील या शहराचं प्रचलित नाव. सांता मारिया हा त्या गावाचा संत. इटलीत असा प्रत्येक गावाचा एक एक संत असतो. त्याच्या नावाने चर्च असतेइथे हे चर्च अगदी स्टेशनजवळ म्हणून कदाचित त्याचे नाव स्टेशनला जोडले असावे.

आम्हाला बाहेर येऊन बस पकडायची होती. स्टॉपचं नाव Stazione Pensillina, तो कुठे असेल त्याचा अंदाज घेत उभा होतो तेव्हा आधी तो बुक स्टॉल दिसला. इटलीत बस, मेट्रो इ तिकिटं या अशा स्टॉलवर मिळतात, ती घेतली आणि स्टॉप शोधायला लागलो. थोडं पुढे गेल्यावर तिथे ट्रेन इतालियाचाच एक माणूस गळ्यात कंडक्टरची असते तशी पिशवी लटकावून उभा होता. आम्ही हातातला कागद त्याला दाखवला. त्याने इटालिअनमधे आम्हाला काहीतरी सांगितले आणि तोरे गल्लीला ("Torre Galli") जाणा-या बसचा ६ नंबर इंग्रजीत सांगितला. त्याच स्टॉपवर बस येणार होती आणि ती पुढच्या ११ मिनिटात येईल असं स्टॉपवरचा इंडिकेटर सांगत होता.

बस आली. सर्वसाधारणपणे बसमध्ये इंडिकेटर असतो आणि अनाउन्समेंटही त्यामुळे ऐकून समजले नाही तरी समोर बघून कळतं. पण इटलीचा अपवादाने नियम सिद्ध करण्यावर गाढ विश्वास आहे त्यामुळे इंडिकेटर असला तरी तो ते चालू ठेवण्याचे कष्ट सर्वसामान्यपणे घेत नाहीत. कानात प्राण आणून मग त्या घोषणा ऐकणं आलं. आमच्या यजमानांच्या सूचनांप्रमाणे साधारण ६ मिनिटांनी येणा-या Fonderia 01 इथे आम्हाला उतरायचं होतं. बसने नदी ओलांडली आणि ती उजवीकडे वळली. आमचे कान अनाउन्समेंटकडे आणि डोळे घड्याळाकडे होते. सुदैवाने आम्हाला ती अनाउन्समेंट कळली आणि आम्ही उतरलो. तसा पुढचा रस्ताही फारसा कठीण नव्हता. निवांत वाटणरी गल्ली पार करून पुनः लागलेल्या मोठ्या रस्त्यावरचं ते २६/a नंबर असलेलं घर, अपार्टमेंट होतं. आम्ही पुढे होणार इतक्यात मागून एक अतिशय हॅन्डसम, उंच, गोरा, धिप्पाड तरूण आला आणि त्याने हॅलो केलं. मी डॅनिअल, आताच जरा प्रोव्हिजन्स आणायला खाली उतरलो होतो. Welcome in our Tuscany. दुस-या मजल्यावरचा त्यांचा तीन बेडरूमचा फ्लॅट. त्यातील एक त्याने आम्हाला दिली होती. आणखी एकात रहाणारा कोणी मंगोल चेहे-याचा इसम नंतर आम्हाला दिसला होता.

डॅनियल मृदू व्यक्तिमत्वाचा, व्यवस्थित इंग्रजी बोलत होता. श्रीशैलबरोबरच्या पत्रव्यवहाराचा उल्लेख करून त्याने आमची चौकशी केली आम्ही मुंबईत कुठे असतो तिथे B & B म्हणजे Bed and Breakfast ची सोय कशी असते ते विचारलं. फारशी नसावी या माझ्या vague comment वर उतारा म्हणून त्याने साइटवर जाऊन किती ठिकाणी मुंबईत अशी ओपनिंग्ज आहेत ते दाखवलं. त्यापुढे जाऊन त्यातली conveniently located किती आहेत याचीही चौकशी त्याने केली. मला गंमत वाटली. या बोलण्या दरम्यान आमचे पासपोर्ट घेऊन नोंदी करणं, आमच्याकडून सिटी टॅक्सचे पैसे घेऊन त्याची पावती देणं वगैरे सर्व त्याने पार पाडलं होतं. तुम्हाला चहा किंवा कॉफी आवडेल का असं विचारल्याबरोबर माझं हो आलं. त्यांच्याकडची इटालिअन कॉफी चांगली असते हा माझा अनुभव. त्याने दूध, साखर कशी हवी ते विचारलं आणि कपात दूध ओतलं. आम्ही आपले शांतपणे त्याच्या त्या हालचाली बघत तिथेच डायनिंग टेबलवर बसलो होतो. कॉफी कपात ओतून झाली आणि नंतर तो म्हणाला, इथे साधारणपणे आपल्याला किती दूध हवे ते प्रत्येकाने ओतणा-याला सांगायचे असते, नाहीतर ओतणारा माणूस थांब सांगेपर्यंत थांबत नाही. शिकलेला हा नवा धडा आम्ही नोंद करून ठेवला.

आतून झाडू वगैरे घेऊन एक किरकोळ, बुटकी, सामान्य दिसणारी बाई बाहेर आली. ही क्लारा, याने तिचं नाव सांगून ओळख करून दिली. कदाचित कामाला असावी त्याच्याकडे. आम्ही सामान घेऊन आमच्या खोलीत गेलो तेव्हा पाठोपाठ तो आला. दरवाजे खिडक्या कशा उघडतात, बंद कशा करायच्या हे सांगितलं. शॉवरविषयीच्या सूचना दिल्या आणि शेवटी महत्वाचं म्हणजे टॉयलेट. मेकॅनिकल आहे त्यामुळे जर त्यात टॉयलेट पेपर व्यतिरिक्त काही टाकलं तर ते ब्लॉक होतं हे सांगायला तो विसरला नाही. या सूचना लिहिलेल्याही होत्या पण त्याच्या अनुभवाप्रमाणे नंतर बोलण्यापेक्षा आधी सांगावं म्हणजे समोरचा माणूसही काळजी घेतो असं असावं.

हा आमचा टस्कनी प्रांत अतिशय सुंदर आहे. मला माहित आहे की तुमच्याकडे एकच दिवस आहे आणि त्यातही तुम्ही पिसाला जाऊन येण्याचही ठरवलं आहे. तरीही इथे पुनः कधी आलात तर नक्की खूप वेळ घेऊन या. जरी आम्ही इटलीचा भाग असलो तरी आम्ही खूप वेगळे आहोत. आमचं कल्चर, आमची भाषा, आमचं खाणं हे इतर भागांपेक्षा खूप वेगळं आहे. इथलं निसर्गसौन्दर्यही खास असं आहे. हे सारं बोलताना तो मला सेल्स टॉक देत नव्हता, तर ते त्याच्या आतून येत होतं.

हा गृहस्थ चांगला शिकलेला आणि हे काय करतो आहे असा प्रश्न मनात होता पण सभ्यपणा मला ते विचारू देत नव्हता. कदाचित माझ्या मनातलं ते वाचूनच की काय त्याने आपणहून सांगितलं असावं. हा फ्लॅट माझा आणि माझ्या बहिणीचा. माझे वडील असेपर्यंत ही तुम्हाला दिलेली, त्यांची बेडरूम होती आणि या समोरच्या दोन माझी आणि बहिणीची. तिथे कॉमन टॉयलेट आहे. वडिलांनंतर आम्ही दोघांनी ठरवलं एकाने नोकरी करायची आणि एकाने हे B & B सांभाळायचे. म्हणजे घराचा उपयोगही होइल. ती नोकरी करते, मी घरून काम करतो. आणि ही तुम्हाला दिलेली व आमच्या शेजारची बेडरूम भाड्याने देतो. इथे वर्षभर टूरिस्ट येतात आणि त्यांना हॉटेलपेक्षा या व्यवस्था आवडतात. मी सुद्धा हे छान एन्जॉय करतो आहे. हे बोलणं होत असताना क्लारा आता गॅसवर काहीतरी ठेवून स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली दिसली. शिराळं दिसलं म्हणून त्याला त्याचं इटालिअन नाव विचारलं तर म्हणाला ज़ुकिनी (zucchini) . कदाचित आमच्या डोळ्यातलं क्लाराविषयीचं प्रश्नचिन्ह वाचून की काय त्याने खुलासा केला, ही त्याची मैत्रीण, इथेच त्याच्याबरोबर रहाते आणि त्याला मदतही करते! एवढं सगळं झाल्यावर तो त्याच्या कामाला वळला.

तसा आमचा प्रवास सुखाचा झाला होता. कॉफी घेऊन लगेच निघणं आवश्यक होतं. आम्ही थोडसं हट्टानेच इटलीच्या श्रीशैलने तयार केलेल्या मूळ प्लॅनमध्ये दोन गोष्टी आमच्या मनाप्रमाणे  घुसडल्या होत्या. त्यातली पहिली होती काप्री- ब्लू ग्रोट्टो, जिच्यामुळे आम्हाला मूळ रिझर्वेशनमध्ये काही फरक करावा लागला नव्हता. पण फ्लोरेन्सला ठेवलेल्या एका दिवसातच, आम्ही पिसाला जाणार म्हटल्यावर, मग  दुस-या दिवशीच्या सकाळच्या व्हेनिसला जाण्यावर प्रश्नचिन्ह आलं. शेवटी श्रीशैलला ट्रेन रिझर्व्हेशन बदलणं भाग पडलं. सकाळच्या ९.३० च्या व्हेनिसच्या गाडीची तिकिटं बदलून मग दुपारी अडीचच्या गाडीचं रिझर्वेशन केलं जेणेकरून आम्हाला फ्लोरेन्स बघायलाही पुरेसा वेळ मिळावा.


त्यामुळे आता आम्हाला ताबडतोब निघून स्टेशनवर पिसाला जाणारी गाडी पकडणं भाग होतं.

                                                                      भाग दुसरा पुढील मंगळवारी


No comments:

Post a Comment