Monday, 10 November 2014

ITALY ROME (ROMA) I

इटली रोम (रोमा)

तसं नेपल्स सेंट्रल स्टेशन टोलेडो स्टेशनपासून दूर नव्हतं. वेळही गर्दीची नव्हती त्यामुळे प्रश्न नव्हता. आम्ही मेट्रोमधून उतरून बाहेर आलो आणि सेंट्रल स्टेशनमध्ये गेलो. नंतर लक्षात आलं बाहेर पडायची काहीच आवश्यकता नव्हती. सबवे मधून दोन्ही जोडली असणारच. इथे इंडिकेटर्स व्यवस्थित होते गाडीची वेळ वगैरे वगैरे फक्त तपशीलात फरक होता. कोणतीही गाडी नेपल्स ते रोम अशी दिसत नव्हती. सगळ्या गाड्या नेपल्स ते मिलान पर्यंत धावणा-या. काय गोंधळ झाला असावा?  विचार करता करता सुचलं आपण बाकी गोष्टींकडे का लक्ष देत आहोत? आपल्याकडे गाडीचा नंबर आहे त्याप्रमाणे आपली गाडी कोणती ते बघायचं. रोम टर्मिनीला पोहोचल्यावर कळलं सगळ्या गाड्या मिलानपर्यंत जाणा-या असतात. पण इथलं प्रत्येक स्टेशनच  टर्मिनस आहे. येऊन पुनः उलट फिरून गाडी पुढे जात असावी.

गाडी हाय स्पीड वगैरे म्हणायची, म्हणजे ती तशी असतेच, पण आपल्याला त्या वेगाची आत जाणीव होत नाही. विमान कसं आपल्याला कित्येक वेळा स्तब्ध असल्याचा भास होतो! बाहेर रस्त्यावरून धावणा-या मोटारींना मागे टाकताना बघितल्यावर लक्षात येतो गाडीचा वेग. इटलीतली ही हाय स्पीडची सुधारणा अगदी अलिकडच्या काळातली. त्यांनी टप्प्याटप्प्याने सगळी प्रमुख शहरं अशी जोडली आहेत. आपल्या गप्पा बुलेट ट्रेनच्या पण अजून सुरवातही केली नाही!

रोमच्या टर्मिनीबद्दल खूप भीतीदायक वाचलं ऐकलं होतं. या परिसरात फार वेळ थांबणं हिताचं नाही इत्यादी. तसे अनुभव असतीलही लोकांचे. पण आपल्याकडे गर्दीत जो धोका संभवतो तितकाच तिथेही असावा. आम्ही मेट्रोचं तिकिट काढायला गेलो. मशिनवरून तिकिट घेतलं आणि प्लॅटफॉर्म कोणता ते बघायला लागलो. ऑरेंज लाइन होती स्टेशनचं नाव कामिलो फुरिओ चौथं किंवा पाचवं स्टेशन असावं टर्मिनीपासून. संध्याकाळचे सात वाजले असावेत आम्ही टर्मिनीला उतरलो तेव्हा. मेट्रोच्या त्या अनानिनाच्या (Anagnina g मात्र अनुच्चारित) दिशेने जाणा-या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता वळणार तर एक लोंढा अंगावर आला. आम्ही सामानासकट बाजूला. एस्कलेटरवर या गर्दीत पाय तरी कसा ठेवणार? आपल्या दादर किंवा त्याहीपेक्षा डोंबिवलीचा प्लॅटफॉर्म आठवा. तशी गर्दी प्लॅटफॉर्मच्या दिशेने चाल करून जाताना दिसली. वजा आपलं आक्रमण आणि ढकलाढकली. बहुधा दुस-या मार्गाची, ब्लू लाइनची गाडी आली असावी. हे टर्मिनी स्टेशन, तेव्हा गाडी बदलणे इथे कॉमन. गर्दी असणारच हे नंतर उमगलं. या अशा गर्दीमुळे पर्यटक भांबावून हे असलं काहीतरी नेटवर टाकत असावीत. पण हो, आपल्याकडे मधे जेव्हा मंगळसूत्र सरसकट चोरली जात तेव्हा बायका जसं ते तोंडात धरून गाडीत चढत, तसा इथे प्रत्येक बाईचा हात पर्सवर होता चुकलो पर्स बगलेत धरूनच बायका चालत होत्या. एकूण नेटवरील माहितीमध्ये अगदीच तथ्य नाही असं नसावं.

एक गाडी सोडल्यानंतरची गाडी जरा कमी गर्दीची होती. आमच्या स्टेशनवर उतरल्यावर हॉटेलही लगेच पाच मिनिटांवर मिळालं. या ट्रीपमध्ये हे एक बरं होतं शोधाशोध कमी होती. काऊंटरवरचा मुलगा छान बोलका होता. सिमोने नाव त्याचं. एकूण २२ खोल्या असलेलं ते टुमदार हॉटेल, आवडलंच. कमतरता म्हणावी तर ब्रेकफास्ट म्हणून फक्त कॉफी / चहा किंवा सॉफ्ट ड्रिंक आणि केक मिळणार होता पण ते ठीक होतं. २४ तासांचा अटेन्डन्स ही जमेची बाब. चावी त्यांच्याकडे देऊनच जायची याची त्यांनी एक छान जडशीळ की चेन देऊन तजवीज केली होती. इथल्या आमच्या वास्तव्यात काय काय बघणं शक्य आहे ते त्याच्याशी बोलून घेतलं. त्याने मॅप हातात ठेवले आणि कुठे कुठे जाणं हे मॅन्डेटरी आहे हे सांगितलं. त्याच्यापुढे प्रसिद्ध वाक्य. Rome was not built in a Day how can you expect that to be covered in two three days ऐकवलं. या लोकांचं शहरावर किती प्रेम असतं! त्यांची ती भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते जराही कसूर करत नाहीत.

जरा पाय मोकळे करायला, काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. तसं हे मोठं शहर त्यामुळे रहदारी, वर्दळ होती अर्थात आपल्याकडच्या तुलनेत खूप निवांतपणा होता. जवळपास काही खाऊन घ्यावं असं हॉटेल दिसेना. आमच्याकडे थर्मास नेहेमीच बरोबर असतो. गरम पाण्याची व्यवस्था असेल तर कुठेही चहाची प्री मिक्स सॅशे उपयोगी पडतात. इथे गरम पाण्याचा प्रश्न नव्हता तेव्हा आज काहीतरी फळं वगैरे खाऊन दिवस भागवायचा असं ठरवलं आणि त्यादृष्टीने दुकानं बघायला सुरवात केली. आमच्या बिल्डिंगशेजारीच दुकान होतं. आतला माणूस "आपला" वाटला. आत गेलो. तो त्याच्या कामात बीझी होता. आम्ही केळी बघितली तर जरा काळी वाटलीआम्हा दोघातच बोलणं सुरू होतं केळी चांगली वाटत नाहीत नको घेऊ या. बाकी फळं बघू. ते ऐकून तो पुढे आला हिंदीतून म्हणाला केळी चांगलीच आहेत. हे खाऊन बघा म्हणत एक केळं सोलून त्याने अर्ध मला, अर्ध उत्तराच्या हातावर ठेवलं. त्याचं खरच होतं आम्ही केळी घेतली. बाकी काय चांगलं आहे असं विचारल्यावर तो पुढे आला. एक सफरचंदासारखं दिसणारं पण चपटं फळ होतं. काहीतरी पेश्गा वगैरे म्हणाला, ते त्याने सोलून पुन्हा अर्ध अर्ध आम्हा दोघांना दिलं. उत्कृष्ट चव आणि अगदी रसाळ असं ते फळ आम्ही लगेच घेऊन टाकलं मग अशीच प्रत्येक फळाची ओळख झाली आणि तो बोलत बसला.  इथे येऊन त्याला -५ वर्ष झाली होती. ढाक्क्याकडचा तो. घरी आई वडील इतर भावंडं होती. इथे मोठा भाऊ ९ वर्षापूर्वी आला, त्याच्यामागून हा आला. इथली सगळी ही अशी प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणावीत अशी दुकानं या बांगलादेशींच्या ताब्यात आहेत. नाव विचारलं. त्याने सांगितलं  हसन. एकूणच त्याच्याशी बोलताना आम्हाला खूप बरं वाटत होतं. त्याच्या मनातला आपलेपणा आमच्यापर्यंत पोहोचत होता. बिल बनवताना त्याला म्हटलं अरे तू खायला घातलेल्या फळांचे पैसे त्यात जोडून घे. तो म्हणाला ती मी माझ्याकडून दिली होती, मला वाटलं म्हणून, त्याचे पैसे काय घ्यायचे तुमच्याकडून? आणि हो तो धंद्याचा भाग नव्हता, तुम्ही माझ्याकडून फळं घ्यावीत म्हणून मी दिली नाहीत खरोखर मनापासून द्यावीशी वाटली म्हणून तुम्हाला दिली. आम्ही त्याच्या म्हणण्याला मान दिला पिशवी उचलली आणि वर गेलो. आजच्या जेवणाची फारच छान व्यवस्था झाली होती.

घरी आल्यावर बाल्कनीत टाकलेल्या खुर्च्यांवर विसावलो. समोरच्या अपार्टमेंटमधली घरं संध्याकाळी जागी झालेली दिसत होती. वेगवेगळे वास दरवळत होते. कसले ते ओळखण्याइतकी त्या खाण्याची माहिती नाही याचं वाइट वाटलं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्येही प्रत्येक बाल्कनीत टेबलाभोवती दोन खुर्च्या मांडलेल्या दिसत होत्या. हळूहळू एका एका खुर्चीवर माणसे स्थानापन्न होत होती. वातावरणातला उन्हाळा. तीसच्या आसपासचं तापमान म्हणजे त्यांच्यासाठी खूप छान हवा. पण मग अर्थात पुरूष हाफ पॅन्ट्मध्ये आणि उघडे आणि बायका अर्धा गाऊन घालून ग्लास घेऊन बसलेल्या दिसत होत्या. जेवणाचाही बेत तिथेच असावा. आम्हाला त्या निरीक्षणात घालवायला फार वेळ नव्हता. उद्या कलोझियमपासून सुरवात करू असं ठरवून आम्ही आमचा तो दिवस संपवला.

                                                                                   to be contd.
p.s.


हे फोटो माझ्याकडून राहूनच गेले. नेपल्समधलं हे Via Toledo स्टेशन म्हणजे आर्ट गॅलेरीत आल्यासारखं वाटतं. वरच्या छताकडे बघत रहाणारी ही माणसं त्याची साक्ष देतील. या फोटोंविना नेपल्सचं वर्णन माझ्याकडून अपुरं राहिलं असतं म्हणून जरी रोमचा भाग असला तरी या स्टेशनपासून आमचा प्रवास सुरू झाल्याचा बादरायण संबंध जोडून ते इथे देण्याचा आगाऊपणा मी करत आहे.


1 comment:

  1. नेहमीप्रमाणे रंजक आणि ओघवते

    ReplyDelete