Monday, 3 November 2014

ITALY NAPLES (NAPOLI) IV


इटली नेपल्स (४)

नेपल्सचा किनारा जवळ आल्यावर सगळे उठून खालच्या डेकवर आले. मोटारी आणि इतर वाहनं बाहेर पडायच्या आत सगळ्यांना बाहेर पडायचं होतं. तरी इथे कुठेही ढकला ढकली किंवा गोंधळ दिसला नाही. आपल्याकडची अनावश्यक अधीरता (anxiety) इथे अभावाने असावी!

मावळत्या सूर्यकिरणाने उजळून निघालेला नेपल्सचा समुद्रकिनारा.

आता घरी जाण्यात अर्थ नव्हता. तसे सात वाजून गेले होते. म्हणजे हातात वेळ कमीच होता. आमच्याकडे हॉलंडला जरी रात्री साडे नऊ दहापर्यंत उजेड असे तरी आता आम्ही दक्षिणेला आलो होतो त्यामुळे ती मर्यादा आता आठ साडेआठपर्यंत आली होती. असेच समुद्राच्या किना-याने जाऊ असं ठरवून चालत राहिलो. पण हा भाग निर्जन आणि गावात जाण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा सरळ परत फिरलो. उगीच दमण्यात अर्थ नव्हता. येताना एक रेस्टॉरंट दिसलं. पित्झा हा परिचित पदार्थ दिसल्यावर समाधान वाटलं. मग नेहेमीचा मंत्र नो फिश नो मीट नो एग्ज वगैरे जपला आणि तिथेच बसून खाऊन घेतलं. बील द्यायला गेलो तेव्हा त्यात किमतीच्या दुप्पट रक्कम. मी चक्रावलो आणि त्याला विचारलं की भाव एक दिसतो आहे आणि बिल दुप्पट. त्याने काय स्पष्टिकरण दिले ते माझ्या मतीपलीकडचे कारण ते इटालिअन मध्ये होते. शेवटी कमी केलेले परंतु लिखित भावापेक्षा जास्त बील देऊन हे लोक फसवणारे दिसतात अशी खूणगाठ बांधली. याला आणखी एक कारण होते. ब्रसेल्सला गेलो होतो त्यावेळी वाचलेल्या नेटवरील माहितीमध्ये इटालिअन जॉइंटसमध्ये खाण्यापूर्वी भावांची खात्री करून घ्या. ते नंतर तुमच्याकडून जास्त पैसे उकळतात असे म्हटले होते त्याची पार्श्वभूमी होती. घरी परतल्यावर श्रीशैलला फोनवर विचारलं. त्याचा प्रश्न, तुम्ही तिथे बसून खाल्लात का पित्झा? तर त्यांच्याकडे सर्विस चार्ज घेण्याची पद्धत आहे. त्याने अर्थात तुम्हाला आधी जास्त चार्ज लावला पण नंतर बरोबर घेतला असावा. शंका आली तर जरूर विचारत जा. उगीच तुमची तुम्ही स्पष्टीकरणं तयार करत बसू नका.

बरं म्हणून फोन ठेवला. आता रहाण्याच्या ठिकाणी बाकी काय काय व्यवस्था आहे ते बघायला सुरवात केली. ए सी आहे आणि चालू आहे हे त्या इंडिकेटरवरून कळत होतं पण गारवा जाणवत नव्हता. रिमोट अणि ए सी यांचा काही संबंध असेल असं वाटत तरी नव्हतं. शेवटी तो नाद सोडून मस्तपैकी दरवाजा कलता केला (खिडकी उघडणे हा आपला प्रकार इथे अभावाने दिसला. त्याऐवजी दरवाजा वरून आपल्या अंगावर कलता होतो.) आणि छान गारवा आत आला. इथल्या हवेचं हे एक वैशिष्ट्य आहे की रात्री तापमान खूप खाली असतं. काही ठिकाणी तर १२ ते १८ च्या दरम्यान.

बाहेर रस्त्यावर श्रीलंकन मुलांचा फुटबॉल रंगात आला होता. या ठिकाणी किंबहुना सगळ्या इटलीमध्ये श्रीलंकन आणि बांगला नागरीक मोठ्या संख्येने दिसतात हे आम्हाला नंतर प्रत्ययाला यायचं होतं.

दुस-या दिवशी सकाळी बाहेर कोणी असेल म्हणून डोकावलो पण सगळा थंडा कारभार. काल इथे असलेली सगळी माणसं कुठे गायब झाली होती कोण जाणे आणि शेवटपर्यंत ती आम्हाला दिसली नाहीतच. नेहेमीच्या प्रथेप्रमाणे टेबलवर किल्ल्या ठेवून आम्ही त्या जागेचा निरोप घेतला.

अर्थात त्याआधी फिरायला म्हणून बाहेर पडलो.  आमच्यापासून अगदी जवळ असलेले तोलेडो(Toledo) हे नेपल्स मेट्रोचे स्टेशन दिसले आणि हायस वाटलं कारण आम्हाला इथूनच गाडी पकडून नंतर सेंट्रल स्टेशनवरून दुपारी रोमची हाय स्पीड ट्रेन पकडायची होती. आपल्या पुण्याच्या लक्ष्मी रोडसारखा रस्ता. अर्थात इथे फुटपाथ होते आणि वाहतूकही व्यवस्थित होती. उगीच गलका कलकलाट वगैरे वजा जाता लक्ष्मी रोड म्हणू या. बघत बघत निघालो होतो. प्रचंड उंच आणि भव्य असे दिंडी दरवाजे असलेले वाड्यासारखे किंवा हवेलीसारखे बांधकाम. नुसते ते बघत फिरतानाही मनाला आनंद होइल असे वातावरण. चाललो होतो एवढ्यात मागून हाक आली सरजी. आम्ही दोघांनी चमकून बघितलं. आपल्यासारखा वाटणारा एकजण काहीसा घाईत आल्यासारखा. "मैं कभीसे देख रहा था कोई तो अपने जैसे लगते है इसलिए दौडके आगे आया. त्याच्या धाप लागण्याचं समर्थन करीत तो म्हणाला. पेशावरचा असलेला हा पठाण, आपल्या पठाणाच्या इमेजला साजेसा नव्हता. त्याचा मुलगा इथे आला मग सगळं कुटुंबच इथे आलं. तो मुलाबाळांसकट इथे रहात होता. कसं, काय, कुठून वगैरे चौकशा झाल्यावर आम्हाला गाइड करणं हे परमकर्तव्य असल्याप्रमाणे त्याने दोन तीन ठिकाणं सांगितली. वाटलं हा जाऊन आला असेल पण नाही. ऐकीव माहिती आमच्याकडे पास केली. आभार मानून, खूप बरं वाटलं वगैरे सांगत पुढे निघालो.

पुढे एक मोठी इमारत, लायब्ररीची होती. इमारत छान म्हणून आत डोकावलो. एकमेकांना काटकोनात छेदणारे दोन खूपच सुंदर पॅसेज आणि त्याच्या दोन तीन मजली उंच छतावर रंगवलेली / कोरलेली चित्र आणि पुतळे आम्ही बघत होतो. फोटो काढायला चांगली जागा होती. समोर कोणी दोघे पायाने बॉल सदृष काहीतरी एकमेकांकडे ढकलत खेळत होते. आमच्यातलं बोलणं ऐकून तो कानात डूल घातलेला पुरूष कैसी है मॉंजी म्हणून पुढे आला. एकूण अवतार काही ठीक वाटला नाही. त्याच्याबरोबरची बाई स्थानिक वाटत होती निदान आपली नव्हती. ती शांतपणे बाजूला उभी राहिली. त्याचे आजोबा उत्तर प्रदेशातून कराचीला गेले होते वगैरे सगळं झालं. नंतर जेव्हा इथली परिस्थिती खूप वाईट आहे वर तो आला तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फोटो काढायला सुरवात केली. तोपर्यंत त्याच्या "मॉं" ला खूण केली की आता पुरे. हे प्रकरण नंतर पैसे मागण्याकडे जाऊ शकेल याचा अंदाज आल्यावर काढता पाय घेण्यात शहाणपण होतं.

लायब्ररीचा कॉरिडॉरतसेच पुढे जाऊन मग त्याला समांतर रस्त्याने परत फिरायचे असे ठरवून मागच्या रस्त्यावर गेलो. पण काही रस्ते आपल्या मनात शंका उत्पन्न करतात. कारणं काही असोत पण अशा वेळी रस्ता बदलणं शहाणपणाचं. आम्ही तेच केलं आणि मोठ्या रस्त्यावरून माघारीची वाट पकडली. आम्ही फिरत फिरत येत होतो तेव्हा लक्षात आलं की आपण रस्त्याच्या एकाच बाजूला गेलो. मग उलट्या बाजूला गेलो.

तिथे एक मोठा प्रशस्त चौक आमची वाट बघत होता. चहूबाजूच्या इमारतींनी वेढलेल्या त्या चौकाकडे निवांतपणे बघण्यात काही क्षण गेले.


तो चौक ओलांडला की समुद्राकडे जाणारा रस्ता त्यापलीकडे मग आपल्या मरीन ड्राइव्हसारखा रस्ता, समुद्राशी लगट करत जाणारा. थोडा वेळ तिथे हिंडून मग मागे फिरलो तर आठवलं की कालपासून समोर दिसणारा तो किल्ला आपली वाट बघतो आहे

 
आम्ही आत्ता वरच्या लेव्हलवर होतोसमुद्रापर्यंत जाऊन परत मागे फिरायचं म्हणजे अर्धा तास वाया जाणारसरळ जिना उतरून मग खाली आलो आणि रस्ता ओलांडून किल्ल्याच्या जवळ गेलोअगदी जवळ आहे कधीही जाऊ म्हणताना त्याच्याकडे दुर्लक्षच झालं होतं आणि आता तर निघायची वेळ जवळ येत होतीआम्ही गेलो तर आत जायला तिकिट होतंआमच्या पहिल्याच काप्री ट्रीपने आम्हाला इतका गंडा घातला होता की अजून खर्च नको वाटलासरळ अपार्टमेंटवर आलो आणि बॅगा उचलून बाहेर पडलोकाहीतरी खाऊन वेळेत नेपल्स सेंट्रलला पोहोचायचं होतंया स्पीड ट्रेन्सचं हेच आवडत नाही मलारिझर्वेशन त्या ठराविक गाडीपुरतं असतं त्यामुळे वेळेचं बंधन पाळायलाच हवं होतं.
                                                                                             समाप्त
                                                                                             पुढील मंगळवारी रोम   

3 comments:

 1. आनंद, तू शब्दांचा खेळ खूपच छान करतोस - " आपल्याकडची अनावश्यक अधीरता इथे अभावानेच आढळते." वा!
  प्रसंग जिवंत करण्याचं तुझं कौशल्य वादातीत आहे.
  पुढील भागाची वाट बघतेय.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! पुढच्या वेळी प्रतिसाद कोणाचा हे कळलं तर आणखी आनंद होइल.

   Delete
 2. आनंद,
  याच क्षणाची वाट पहात होतो. मागच्या वेळेस आपण भेटलो तेव्हा महत्प्रयासाने जिभेच्या टोकावरले प्रश्न गिळून टाकले.
  तू रोमबद्दल कधीतरी लिहिशीलच या आशेवर थांबलो होतो.
  तू लिहिल्यामुळे आमचंच पुन्हा ते क्षण जगल्याच समाधान.
  सलग ४ दिवस रोमच्या दगडी रस्त्यांवरून पायी फिरून त्या २००० वर्षांपूर्वीच्या एका समृद्ध संस्कृतीच्या खुणा पुन्हा पुन्हा पहात होतो तेव्हा जाणवलं नाही. पण परत आल्यावर मानवाच्या कल्पनाशक्तीची ती क्षमता, प्रत्येक दगडातून कोरलेल्या ( कधी कधी विना आकारसुद्धा ) शिल्पांमधून सारखी डोकावत असते.
  असो.
  तुझा अनुभव काय हे वाचायला मला नक्की आवडेल.
  वात पहातो.
  प्रवीण

  ReplyDelete