Monday, 6 April 2015

SWITZERLAND ZERMATT MATTERHORN (I)

स्वित्झर्लंड : झरमॅट मॅटरहॉर्न (१)

आम्ही झरमॅटला उतरलो तेव्हा स्टेशनमधे काहीसा काळोख होता. हे शेवटचे स्टेशन त्यामुळे रहदारीला मर्यादा पडत असावी . गाडीबरोबर निघून जाणार्‍या गर्दीबरोबरच स्टेशनही निवांतपणा अनुभवतं.  थोडावेळ प्लॅटफॉर्मवर उभे होतो तेवढ्या वेळात गेलेल्या गर्दीनंतरचा स्टेशनचा निवांतपणा आम्हीही अनुभवला. 

नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे जगभराच्या विविध भाषांमध्ये केलेलं प्रवाशांचं स्वागत. हिंदीमधलं सुस्वागतम वाचून जरा आपलेपणा वाटला खरा. तिथे लॉकर सुविधा आहेत का याची चौकशी करून आलेल्या श्रीशैलबरोबर आम्ही  बाहेर पडलो. स्टेशनबाहेर समोरच काटकोनात आणखी कोणतीतरी रेल्वे होती. आता माझ्यावर कसलीच जबाबदारी नव्हती त्यामुळे कोणती, काय बघायचे कष्टही मी घेतले नाहीत. सरळ रस्त्याला लागलो. 

चिंचोळा रस्ता, वाहनं फक्त इको फ्रेंडली म्हणजे बॅटरीवर चालणारी. रहदारी कमी कारण कार फ्री झोन. तरीही व्यवस्थित फुटपाथवरून चालणारे लोक. दोन्ही बाजूने फक्त आणि फक्त रहायची हॉटेल्स, रेस्तरॉं किंवा सुवेनिअर्सची दुकानं. स्विस नाइफचे असंख्य प्रकार लटकवलेले. आम्हाला त्याच रस्त्याने हॉटेलपर्यंत  जायचं होतं. स्टेशनहॉर्न असं त्या हॉटेलचं नाव. आरामात पुढे जात असता रस्त्याला मोरी असते तशी लागली. पाण्याचा ओहोळ खालून झुळझुळताना दिसला. आम्ही दोघे तिकडे बघत असताना श्रीशैलने आमचं लक्ष समोर वेधलं.




समोर तो उभा होता. पांढरे शुभ्र पंख पसरून. ध्यानस्थ! एकटक, नजरबंदी झाल्यासारखा दिसणारा. मॅटरहॉर्न नाव त्याचं आणि आपण त्याला भेटणार आहोत उद्या. आमच्या मार्गदर्शकाने(!) आठवण दिली. आतापर्यंत आम्ही अगदी हा सिमल्याचा मॉल रोड किंवा मनालीमधला रस्ता दिसतो वगैरे बोलत जात होतो त्यात एकदमच ट्विस्ट येऊन गेला त्याच्या दर्शनाने. पण त्याच्यात आत्ता गुंतायला वेळ नव्हता. आधी हॉटेलवर जाणं महत्वाचं होतं त्या दिशेने आम्ही कूच करते जालो!

मघा म्हटलं तसं खरोखरच आपल्याकडल्या हिल स्टेशनची प्रकर्षाने आठवण होत होती. आमच हॉटेल म्हणजे खाली रेस्तरॉं आणि वर आपल्याकडे लॉज असतं त्या प्रकारचं अर्थात ते तिथल्या वातावरणाला साजेसं फक्त रचनेची कल्पना यावी म्हणून स्पष्ट केलं. बॅगा टाकल्या की निघालं असाच एकूण आमचा खाक्या असतो प्रत्येक वेळी. आजतर तसे उशीराच पोहोचलो होतो. अपवाद कसा असणार? इतर ठिकाणांपेक्षा इथे गर्दी खूपच होती. आपले लोकही खूप दिसत होते. आम्हाला डोसा कुठे मिळतो ते शोधणारं एक आंध्रातलं नवीन लग्न झालेलं जोडपंही भेटलं! पुन्हा मागे वळून स्टेशनवर जाण्यात काही अर्थ नव्हता. हे गाव तसं छोटं त्यामुळे मग गल्ल्या बोळ, दुकानं हे सगळं फिरून घेतलं.

दुसर्‍या दिवशी जायच होतं मॅटरहॉर्न बघायला. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि पुनः डेस्टिनेशनइतकाच तिथवरचा प्रवास रोमांचक. काल तसा त्याला बघितला ते दूरदर्शन होतं. दुरून डोंगर साजरे म्हणतात पण हे बर्फाच्छादित शिखरं असलेले पर्वत ऋषीमुनींप्रमाणे वाटतात. दराराही, आदरही आणि त्यांच्या प्रत्येक दर्शनात काहीतरी नव्याने सापडतं, हा निदान हिमालयातल्या शिखरांबाबतचा माझा अनुभव. आज आल्प्समधली शिखरं बघताना हा अनुभव ताडून पहायची संधी मिळणार होती.

सुदैवाने सकाळी हवा, आकाशवाणीच्या भाषेत, स्वच्छ आणि सूर्यप्रकाशयुक्त(?) होती. ढगाळ हवामान हा इथे शाप असतो. पर्यटकांच्या दृष्टीने तर फारच. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम तर ते बदलू शकत नाहीत आणि ढगाळ वातावरणात काय कप्पाळ ती शिखरं दिसणार? आम्ही आमच्या नशिबाला स्वच्छ हवामानाकरता धन्यवाद दिले.

काल झरमॅटच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा बाहेर पडल्यावर समोरच गॉर्नरग्राट बाह्न (Gornergrat Bahn) अशी पाटी बघितली होती. त्याच गाडीतून आम्ही मॅर्टरहॉर्न बघायला जाणार होतो. आतापर्यंतच्या आमच्या गाड्या फार सुंदर होत्या. ही गाडी सुंदर म्हणावी अशी नव्हती. रंग लाल. कदाचित बर्फ पडत असता उठून दिसावा म्हणून हा रंग घेत असावेत. तरीही आमची सेंट मॉरित्झची गाडी निश्चितच देखणी होती. यावेळी एक गोष्ट नजरेत आली की वर दोन पेंटोग्राफ होते आणि दोन रूळांमध्ये एक आणखी रूळासारखं काहीतरी दिसत होतं (magnatic?). ही पर्वतीय रेल्वे. चार हजार फुटांपासून ते चौदा हजार फुटांचा पल्ला गाठणारी. एकूणच हा चढ कठीण त्यात पुन्हा आत्ता नसला तरी हिमवर्षावातसुद्धा ही सुरू असणार त्याकरता कदाचित काही सोय असू शकते.

स्त्रीचं सौंदर्य बोहोल्यावर उठून दिसतं अशा प्रकारची एक म्हण (निदान समजूत तरी) आहे. गाडीच्या सौंदर्याबाबत ती जेव्हा झोकदार वळण घेते तेव्हा तिचा डौल बघावा. या गाडीला तर उंच पूल, बोगदे, अतिशय कठीण, उभे चढ, तीव्र उतार आणि वळणं यांच नुसतं वरदान लाभलेलं आहे.




संपूर्ण प्रवासात आपण कंटाळायला वावच नाही. आणि त्यातही खाली दूरवर धूसर होत जाणारं झरमॅट आणि दूरवर ध्यानस्थ बसलेला तो मॅटरहॉर्न म्हणजे नजरबंदीच असते. मार्गावरची स्टेशनं ही मुख्यत्वे पर्यटकांच्या सोयीकरताच आहेत. स्कीइंग करणारे, हायकर्स किंवा अगदी नुसते पर्यटकही, या सगळ्यांना या मधल्या स्टेशनवरून कुठे केबल कार पकडायची असते कुठे हायकिंगला जायच असतं. आम्ही मात्र या गाडीने थेट वरपर्यंत म्हणजे गॉर्नरग्राट स्टेशनपर्यंत गेलो. वर एक हॉटेल आहे, नेहेमीप्रमाणेच! स्टेशनचा परिसर सुंदरच आहे. परिसराची संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणारा बोर्ड समोरच आहे. आम्ही तिथल्या पुलावरून बघत असताना खाली दूरवर गाडी वर येताना दिसत होती. गाडीत बसल्यानंतर आपल्याला मार्गातला खडतरपणा कळत नाही तो असा दूरवरून चांगला कळतो. ती गाडी वर येइपर्यंत मग आम्ही तिथेच उभे राहिलो. शेवटच्या टप्प्यातली तिची ती वळणं अगदी दृष्ट लागण्याइतकी सुंदर होती. पण असे इथेच उभे राहून चालणार नव्हते. मॅटरहॉर्न समोर खुणावत होता. 






                                                                            दुसरा भाग पुढील मंगळवारी

एक सूचना वारंवार करण्यात येत होती की फोटो मोठ्या आकारातच दिसावेत. यावेळेपासून ती अमलात आणत आहे. पूर्वीचे फोटोसुद्धा मोठ्या आकारात दिसावेत अशी व्यवस्था केली आहे. हा फरक कसा वाटला ते जरूर कळवा. 

ITALY VENEZIA (VENICE ) IV


इटली वेनेझिया (व्हेनिस) (४)

गांधी नावाबरोबर त्याने विचारलं How is Sonia Gandhi and her son? माझं उत्तर काय असावं ते निश्चित होत नव्हतं. मग म्हटलं तुला कोणत्या दृष्टीतून उत्तर हवं आहे? म्हणाला आम्ही ऐकतो की Right wing fanatics are taking over and Sonia is losing to them. Is it correct? And if it is correct is it in the interest of India? माझा अभिमन्यू होणार बहुतेक असं वाटत असताना मी त्याला म्हटलं कोणताही बदल हा त्रासदायक असेल असं वाटून खूपदा आपण तो नाकारतो. पण त्यात सुधारणेची आशा पण असू शकते. मुळात टीव्ही चॅनेल्स जे म्हणतात की Right wing fanatics हे चुकीचे आहे. (उत्तरा माझ्याकडे बघतच राहिली, हा माणूस चक्क मोदींची बाजू घेतो आहे!) आमच्याकडे फॅनेटिक्स नाहीत. विचार वेगळे आहेत. त्या वेगळेपणाचा विरोध करताना मग अशी लेबलं लावली की सोपी असतात म्हणून हे सगळं. तसही सोनिया आणि राहुल गांधी आणि त्यांची कॉंग्रेस यांनी १० वर्ष राज्य केलं. खूप चांगल्या, तशा खूप वाईटही गोष्टी घडल्या. आता जर कोणी म्हणालं की बदल हवा तर त्याला काय हरकत आहे? इतकच, बाकी काही नाही. मला कसरत बर्‍यापैकी जमली असावी असं क्रिस्तिआनोच्या चेहे-यावरील भाव बघून तरी वाटलं. माझं आणि मोदींचं सख्य नाही (म्हणण्यापेक्षा मला त्यांची चाल कधीच भरवशाची वाटली नाही) आणि कॉंग्रेसशी वाकडं नाही पण परदेशात जाऊन आपणच आपले वाभाडे काढणं पटलं नाही खरं! उद्या कदाचित जो माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे (तसे आज ते आहेतही) त्याच्या विरूद्ध परदेशात आपण काही बोलणं हे मला कधीच पटलं नसतं.

मी आपली त्याच्याकडे बेलरुस्कानीची चौकशी केली. म्हणाला एक नंबरचा चोर माणूस ( हा या लोकांचा नितळपणा मला आवडतो. कोणताही मुखवटा नाही) पण काही वेळा कामं न करणार्‍यापेक्षा चोरही परवडतो. आताचे आमचे लोक तसे आहेत. आता आमच्या मरीन्सनी तुमच्याकडे गोंधळ घातला. आमचं सरकार ढिम्म!. मी म्हटलं अरे पण त्यांनी माणसं मारली आमची. त्याने मला थांबवलं. म्हणाला मला पूर्ण बोलू दे. आमच्याकडे निदर्शनं झाली सरकारविरूद्ध ते त्यांनी दखलसुद्धा घेतली नाही म्हणून!. त्यांना सोडवा असं इथेही म्हटलं जात नव्हतं. आमचं म्हणणं इतकच होतं की जर त्यांनी खून केला असेल तर त्यांना शिक्षा भोगू दे पण ते आपले आहेत हे तरी तुम्ही म्हणा ना. गप्प का रहाता? आपल्या देशाच्या नागरिकांवर काय संकट आलं आहे हे विचारा तरी! हा विषय इतका नाजूक की न बोलणं बरं म्हणून मी गप्प राहिलो.

विषय बदलण्याकरता मग म्हटलं अरे. आम्ही आलो ते फ्लोरेन्सहून One of the most beautiful part of Tuscany! असं डॅनिअल म्हणाला होता. वाटेत लागलं ते बोलोना (Bologna) खूप सुंदर आहे असं माझा मुलगा म्हणाला. तुमचा भाग कोणता? “ आम्ही वेनेशिअन आहोत. आमच्यासारखे आतिथ्यशील तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. (इटली हा एकसंध देश नव्हता. इथेही आपल्याप्रमाणेच वेगवेगळी राज्य होती. त्या प्रत्येक भागाला स्वतःची अस्मिता आहे असं या लोकाबरोबर बोलताना प्रकर्षाने जाणवतं. एक मात्र, सगळे आपल्या भागावर मनापासून प्रेम करतात आणि ते मोकळेपणाने व्यक्तही करतात. ) इथे आमचं बेटावरचं आयुष्य तसं खडतर होतं. आमचंही घर व्हेनिसमध्ये आहे. पण आता तिथे रहाणं कठीण आहे. बेटावरच्या रहाण्यात तसे खूप प्रश्न, अडचणी आहेत शिवाय टूरिस्टमुळे महागाई इतकी आहे की इथे बाहेर (बेटाबाहेर, उपनगरात) रहाणंच सोयीचं पडतं."

तुम्ही इथून कुठे जाणार पुढे? म्हटलं इथून मिलान आणि मग सेंट मॉरित्झ!. :ओह! स्वित्झर्लंड! खूप शहाणे समजतात ते (स्विस लोक) स्वतःला. त्यांचं सगळं पिक्चर परफेक्ट असतं. कुठेही इकडे तिकडे चालत नाही. त्यांच्या दृष्टीने आम्ही uncivilised, गावंढळ माणसं. आम्ही मोकळेपणाने बोलतो, मोठ्याने बोलतो, हसतो हे त्यांना गावंढळ वाटतं. पण आम्ही मनापासून जगतो. आमचं घर चित्रातल्याप्रमाणे दिसणार नाही, माणसं कदाचित त्यांच्या सुसंस्कृतपणाच्या व्याख्येत बसणार नाहीत पण आम्हाला त्याची पर्वा नाही. We enjoy thoroughly. आम्ही आयुष्य रसरसून जगतो. आयुष्याकडे बघण्याची किती वेगवेगळी दृष्टी असू शकते ते या अशा संभाषणातून पदोपदी जाणवत राहतं. लेकुरे उदंड झाली मध्ये नाही का मूल नसलेला नायक म्हणतो "घर विस्कटुन टाकावं" त्याची आठवण झाली. सगळ्याच वेळी आखीव रेखीव सगळच बघत बसण्यातही एक प्रकारची मोनोटोनी, एकारलेपण असतं !

माणसांवरून निघालं म्हणून त्याला म्हटलं आमच्याकडे सगळ्या प्रकारचं हवामान आहे. तशीच वेगवेगळ्या वंशाची माणसं आहेत. हिमालयातली लोकं खूप गोरी आहेत तशी दक्षिणेतली लोकं खूप काळी आहेत. दक्षिण म्हणजे चेन्नई आणि बंगलोर का असं त्याने विचारल्यावर मी थक्क झालो. तो गोव्याला, मुंबईला आणि कलकत्त्यालाही गेला होता. पूर्वेकडली आमची लोकं मंगोल वंशातली आहेत. त्यामुळे काश्मिरपासून ते राजस्थानातील वाळवंट आणि केरळचा विषुववृत्तीय प्रदेश अशी सगळी व्हरायटी आमच्याकडे आहे.


भिंतीवर एक छान छोट्या मुलीचा फोटो होता. मला वाटलं होतं, असेल त्याची मुलगी वगैरे पण थेट विचारणं गैर दिसलं असतं. उत्तराने विचारूनच टाकलं. फोटो सुंदर आहे. फोटो की चित्र? म्हणाला माझी आई आहे. लहानपणचा तिचा फोटो मोठा करून घेतला. मला खूप आवडतो. आमच्याकडे माझे वडील उत्तरेकडचे आणि आई दक्षिणेतली त्यामुळे ती रंगाने कमी गोरी. मीसुद्धा तिच्यासारखा आहे. ( त्याचा रंग आमच्यापेक्षा गोरा आणि हा म्हणतो आहे तिच्यासारखा त्याचा रंग कमी आहे. मग आम्ही?) माझा भाऊ मात्र चांगलाच गोरा आहे. किती सहजपणे हे लोक वैयक्तिक माहिती देतात त्याचं आश्चर्य वाटतं. हा मोकळेपणा जर स्वित्झर्लंडच्या दृष्टीने असंस्कृत किंवा गावंढळपणा असेल तर मला ही असंस्कृत लोकंच आवडतील निश्चितपणे! 

रात्र खूप झाली होती. रंगलेल्या गप्पांमधून उठून जाणं जिवावर आलं होतं पण उद्या लवकर बाहेर पडून उरलेला भाग बघायचा होता. आम्ही त्याचा त्या दिवसापुरता  निरोप घेतला. 

                                                                                   उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

ही माणसं कलासक्त आहेत का? असावीतच म्हणूनच तर  इतक्या कलात्मक पद्धतीने या खाण्याच्या वस्तू त्यांनी मांडलेल्या दिसतात






SWITZERLAND ST MORITZ (III)


स्वित्झर्लंड (सेंट मॉरित्झ) (३)


सेलेरिना स्टाझ स्टेशनवर आम्ही उतरलो. उतरून कोणत्या दिशेला जायचं हा प्रश्नच नव्हता कारण रेल्वे लाइनला चिकटून एका बाजूला डोंगरच होता. रस्त्यावर गेलो आणि एक माणूस दिसला. हातातला कागद त्याला दाखवला. सुदैवाने इंग्रजी जाणणारा होता. मलाही त्याच बाजूला जायचं आहे म्हणाला. आमच्या हॉटेलच्या आधीच्या चौकापर्यंत आम्ही बरोबर गेलो तिथे त्याने आम्हाला ते दाखवले आणि स्वतः उजव्या बाजूला वळला. लांबवर चर्चचं टोक दिसत होतं. म्हणजे तो गावाच्या दिशेने पुढे गेला. युरोपातला हा अनौपचारीकपणा मला खूपदा अनुभवायला मिळाला. खूप जवळ येतील असही नाही पण तुम्हाला हवी असलेली मदत देण्यात कुचराई नाही. हा मला या लोकांचा मोठा गुण वाटला.

हॉटेलमधे आलो आणि श्रीशैलला आठवण झाली आज वर्ल्ड कप फायनल, फुटबॉलची! आम्ही येणार आणि आपण बरोबर प्रवास करायचा आहे या नादात बुकिंग करताना लक्षात न आल्यामुळे ही चूक त्याच्या हातून झाली असणार! नाहीतर फुटबॉलचा त्यांच्या आइंडहोवनमधला थरार सोडून तो आमच्याबरोबर आला नसता. त्याने हॉटेलमध्ये स्क्रीन आहे का विचारल्यावर रिसेप्शनिस्टने हो सांगितलं . थोडासा सुटकेचा निश्वास टाकून आम्ही फिरायला लगेचच बाहेर पडलो.

फिरायला म्हणजे कुठे हा तसा प्रश्नच होता. वातावरण क्षणात येते सरसर शिरवे असं. या थंडीत उगीच भिजायला नको ही आमची कटकट. आणि आत्तापासून घरात बसायला आलो आहोत का हा त्याचा प्रश्न. 

बाहेर पडल्यानंतर ढग दूर झाल्यावर वातावरणातही प्रसन्नता आली. रस्त्यावर सगळीकडे व्यवस्थित पाट्या होत्या. सेंट मॉरित्झला जायचं तर दोन रस्ते दिसत होते. एक गावातून जाणारा आणि दुसरा रेल्वेच्या कडेकडेने, डोंगर उताराला चिकटून जाणारा, पायवाटच असावी असा. गावात जाण्यात काहीच मतलब नव्हता. आम्ही मग डोंगराच्या कडेने जाणार्‍या रस्त्याकडे वळलो.







चला! रमत गमत जाऊ. तीन साडे तीन किलोमीटर तर आहे असं म्हणून आम्ही सुरवात केली. रस्ता अगदी सुनसान. छान वाटत होतं. फक्त श्रीशैलचं सगळं लक्ष घड्याळाकडे होतं. दोन गोष्टी होत्या. एकदा मॅच सुरू झाली की मग सगळं गाव त्यात बुडून जाणार अगदी खाण्याचीसुद्धा पंचाइत होइल आणि दुसरं म्हणजे जर्मनी अर्जेंटिना दोन्ही तुल्यबळ तेव्हा पहिल्यापासून मॅच बघायला हवी. त्यातून स्वित्झर्लंडची एक भाषा जर्मनसुद्धा आहे त्यामुळे त्यांचा सॉफ्ट कॉर्नर जर्मनीकडे असेल. जर अर्जेंटिना जिंकले तर काय प्रतिक्रिया असेल ती इंटरेस्टिंग असेल नक्की असे सगळे विचार त्या अस्वस्थतेमागे होते.

सेंट मॉरित्झ आलं. एक प्रचंड मोठा तलाव, डोंगराच्या कुशीत विसावलेला. दुसर्‍या बाजूला स्टेशन. जरा चढावावर मग गाव. दूरवर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर. पण एकूणच वातावरण झोपाळलेलं. एकतर पावसाची शक्यता वाटत होती. ढगाळ वातावरण, त्यामुळे अनुत्साह असेल पण एकंदरीतच जिवंतपणाचं कोणतही लक्षण दिसलं नाही. फुटपाथवर मधे एक झाडाच खोड होतं. पोखरून त्यात सुंदर फुलांची झाडं लावली होती.




व्हेनिसच्या आमच्या क्रिस्तिआनोच्या बोलण्याची आठवण झाली. सगळं एकदम पिक्चर परफेक्ट होतं. समोरचा रस्ता फार सुंदर होता. रशियन लोकांसारखे सरळ रेषा आखल्यासारखे रस्ते शहरात शोभत नाहीत त्यांना वळण असेल तर उठून दिसतं. अशा तर्‍हेचं काहीतरी अफगाणिस्तानातल्या रस्तेबांधणीसंदर्भात लिहिताना फिरोझ रानडे यांनी लिहिलं होतं. त्याची आठवण करून देइल असं इथलं हे झोकदार वळण म्हणजे एखाद्या लहान मुलीने घेतलेली गिरकी होती. बघत रहावी अशी! एखादं चित्र बघावं तसं ते व्यवस्थित मांडलेलं, सजवलेलं टिपिकल गाव बघून आम्ही परत निघालो.




वाटेत पावसाने गाठू नये हीच फक्त इच्छा होती. डोंगराळ भाग म्हटला की ट्रेल कधीच सरळ नसतो. तसा तो इथेही नव्हता. उंच सखल अशा रस्त्याने येता येता पावसाच्य़ा एका जोरदार सरीने आम्हाला झाडाच्या आश्रयाला आणलच. सुदैवाने फार परीक्षा न बघता थांबलाही लगेच. पण वातावरणात फरक नव्हता. म्हणजे हा पूर्णविराम नसून अर्धविरामच होता. आम्ही पाय उचलले. आता थंडीबरोबरच ओल्या कपड्यांमुळे हुडहुडी होती पण कसा कोण जाणे हवेत एक प्रकारचा उबदारपणा आला होता. त्यामुळे विशेष त्रास न होता आम्ही आठच्या सुमाराला हॉटेलवर गेलो. जरा ताजेतवाने होऊन जेवायला जाण्याकरता बाहेर पडू म्हणून निघालो आणि मग श्रीशैलची चलबिचल सुरू झाली.

गावात जरा दूर ते रेस्टॉरंट होतं. एक अगदी छोटा स्क्रीन तिथे होता त्यामुळे जेवता जेवता मॅच बघू हे शक्य नव्हतं. आणि तसही तिथे क्राऊड नव्हता त्यामुळे आरडा ओरड, चिडणं ही मजा आली नसती. मग त्याचा निर्णय झाला. निवांत जेवण आणि सरळ परत हॉटेलवर. तिथे सेकन्ड हाफ आरामात बघू. द्विधा मनस्थिती दोन्हीमधला आनंद हिरावून घेते. जिवाला स्वस्थता लाभल्यानंतर मग जेवणातही निवांतपणा आला. जेवून परत फिरलो. मघा वाटेत लागलेला चर्च टॉवर वगैरे नेहेमीची वैशिष्ट्य टिपत परतलो तेव्हा मॅचचा उत्तरार्ध सुरू होणार होता. हॉटेलमध्ये मोठा स्क्रीन असेल असं एकूण त्या रिसेप्शनिस्टच्या बोलण्यावरून वाटलं होतं तर आमच्या खोलीप्रमाणेच तिथेही टीव्हीच होता. मग तिथे सगळ्यांसोबत बसण्याचा उत्साहच एकदम मावळला. आम्ही आपले निवांत खोलीवर जाऊन मॅच बघत बसलो. जर्मनीच्या जिंकण्याचा आनंद लॉबीमध्ये साजरा केला जात होता. बाहेर मात्र थंडी म्हणून की त्यांचा स्वतःचा देश नसल्या कारणाने असेल पण विजयाच्या आनंदाचं वातावरण काही दिसलं नाही. अशा वेळी फटाके वगैरे वाजवायला या लोकांना शिकवलेलं नसावं!

इतक्या आतुरतेने वाट पाहिलेल्या त्या सामन्याने आणि त्या थंड त्रयस्थपणाने आमची एकूण निराशाच झाली. पण या निराशेचा आमच्यावर परिणाम होऊन द्यायलाही आम्हाला अवसर नव्हता. उद्या सकाळी लवकर उठून ग्लेशियर एक्सप्रेसने झरमॅटला जायचं होतं. रात्र बरीच झाली होती त्यामुळे स्वित्झर्लंडमधला पहिला दिवस आम्ही उद्याच्या ग्लेशियर एक्सप्रेसची स्वप्नं बघत रात्रीच्या स्वाधीन करून झोपेच्या आधीन झालो.



p.s. / ता. क.    एखाद्या लेखाबाबत असं लिहितात का? मला माहित नाही. पण तसही प्रत्येकवेळी आपण पुराणातले दाखले शोधत गतानुगतिक का व्हायचं? नवीन वाटा शोधताना एखादी जुनी वाट हरवते, निसटूनही जाते. हे लेख लिहिताना  माझ्याकडे कोणतीही नोंद किंवा आधार नसतो.  यावेळी हा वेगळा प्रयोग मी करून बघत आहे. गेल्या सत्रात म्हणजे जेव्हा मी ऑस्ट्रिया आणि बार्सिलोनाविषयी लिहिलं होतं तेव्हा  मी प्रवासाहून परतल्यानंतर लगेचच सारे अनुभव  लिहून काढले होते. यावेळी मात्र मी हा नवीन प्रयोग केला. मनात होतं आपण जर तेच पुनः जगू शकलो तर? आणि खरोखर तो प्रवास मला तुमच्या सोबत उलगडत गेला. काही गोष्टी निश्चितपणे निसटून गेल्या आहेत. त्या अशा नंतर उफाळून वर येतात आणि मला जाब विचारतात की त्यांच्यात काय कमी होतं म्हणून मी त्यांना अडगळीत टाकल? मी त्यांची अगदी मनापासून क्षमा मागितली आणि सांगितलं की असं जेव्हा केव्हा होइल तेव्हा चुकीची दुरूस्ती असं एक प्रकरण असावं तसं मी हे लिहून काढेन आजचा हा तसा पहिला प्रयत्न.

सेंट मॉरित्झ प्रवासाविषयी लिहिताना किती बघितलं किती नाही हे मी आधी म्हटलं आहेच. त्यातल्या अनेक सौंदर्यस्थळापैकी एक महत्वाचं मी पार ठेवूनच दिलं. म्हणजे ते महत्वाचं म्हणून बाजूला ठेवलेलं तुम्हाला द्यायलाच विसरलो. गाडीतून बाहेर बघायची प्रत्येकाची ऊर्मी थोडी कमी झाल्यावर आम्ही जरा विसावलो होतो. मी गाडीच्या जाण्याच्या उलट्या दिशेला बसलो  होतो आणि श्रीशैल उत्तरा माझ्या समोर. एकदम डोळे विस्फारतात तसे झाले त्यांचे! शेजारच्या त्या जपानी जोडप्याने त्यावेळी  जो आवाज केला त्याला मी शब्दात पकडू शकत नाही हे दुर्दैव. मी मान वळवली. हे सारं लिहिण्याकरता लागलेला वेळही जास्त आहे. निमिषार्ध कशाला म्हणतात ते अशावेळी कळतं. तर समोर जे काही होतं त्याचा फोटो आम्ही माहितीपत्रकात पाहिला होता. त्यांनी त्याला via duct (त्यांच्या उच्चाराप्रमाणे व्हिआ डक्ट = पूल ) म्हटलं होतं आणि खरोखरच ते  दृष्य अप्रतिम होतं. 




प्रत्येकवेळी आपल्याकडलं उदाहरण आठवतच पण त्याला इलाज नाही. लांज्याहून रत्नागिरीला एस टी ने निघालो होतो. ती राजमार्गाने न जाता  कोणत्यातरी गावामार्गे म्हणजे व्हाया जाणारी एस टी आहे हे आम्हाला तिकिट काढल्यावर कळलं म्हणून मनातल्या मनात आम्ही नाराजही झालो होतो पण....... त्या एस टी ने आम्हाला कोकण रेल्वेवरचा अति सुंदर पूल दाखवला होता.  पुलावरून धडधडत जाणार्‍या गाडीसकट. आपल्याकडे पर्यटनाची दृष्टी नाही ते आम्हाला इथे येऊन कळलं. हे असे स्पॉटस या लोकांनी व्यवस्थित मार्केट केले आहेत आपल्याला ते माहितच नाहीत. इतक्या वेळा कोकण रेल्वेने प्रवास करूनही तो पूल आम्हाला  दिसणार नव्हताच त्याकरता दूरवरचा रस्ताच कामी येणार होता तो त्या व्हाया ..... रत्नागिरी एसटीने आम्हाला दाखवला!


                                                   इति सेंट मॉरित्झ. पुढील मंगळवारी ग्लेशियर एक्सप्रेस