Monday, 17 November 2014

ITALY ROME (ROMA) II


इटली रोम (रोमा) (२)

रोममध्ये मेट्रो आहे आणि आमचं हॉटेल स्टेशनच्या अगदी जवळ त्यामुळे फारसं टेन्शन नव्हतं. सकाळी उठून बाहेर पडलो. जाताना हसनच्या दुकानात डोकावलो त्याला गुड मॉर्निंग घालू या म्हणून, पण दिसला नाही. संध्याकाळी भेटेल म्हणत आम्ही पुढे गेलो. स्टेशनवर आलो आणि तीन दिवसाचं तिकिट काढण्याकरता मशीनची बटणं दाबली. आमच्याकडे होत्या त्या १०० आणि ५० च्या नोटा टाकल्या आत. सुरवातीला वाटलं आमचं काहीतरी चुकतं आहे. नंतर बघितलं तर स्क्रीनवर सूचना येत होती २०च्या नोटा टाका म्हणून. १६ युरो प्रत्येकी म्हणजे ३२ रुपयाच्या सुट्ट्यांचा हिशोब त्या मशिनला जमत नसेल तर इथल्या माणसांमध्ये आणि मशीनमध्ये फरक नसावा! ( १.९६*८ हे साधे गणित पण हे आठ वेळा ती रक्कम मांडून दुकानात हिशोब करत असत त्याची आठवण झाली) आता या २०च्या नोटा कुठून आणू काही कळेना. मग आठवलं की न्यूजपेपर स्टॉलवर बस, मेट्रो सगळी तिकिटं मिळतात. पुनः वर आलो आणि स्टॉल शोधायला लागलो. मिळाला, जवळच होता. त्याला म्हटलं बाबा तीन दिवसांचं तिकिट हवं. तो म्हणाला माझ्याकडे फक्त दिवसाचीच तिकिटं आहेत. म्हटलं मग मला ५० सुट्टे दे. कोणतेही आढेवेढे न घेता त्याने पैसे काढून दिले आणि आम्ही तीन दिवसांच्या तिकिटानिशी गाडीमधे चढलो. (तीन दिवसाचं तिकिट हे एक दिवसाची तीन तिकिटं घेण्यापेक्षा स्वस्त असतं म्हणून हा आटापिटा!)

गर्दीची वेळ खरी, पण आज गाडी बदलायची नव्हती. त्यामुळे तसा प्रश्न नव्हता. शिवाय हात मोकळे होते, सामान नाही. तसेही इथल्या गर्दीला गर्दी म्हणायची ती इथल्या प्रमाणात. आपल्यासारखं खेटून उभं रहाणं नाही. अंतर राखून सगळे असतात त्यामुळे तसा आपल्याला प्रश्न नसतो. कलोझियम याच नावाचं स्टेशन आहे. बाहेर आलं की समोर  कलोझियम दिसतं. खूप गर्दी दिसत होती. कोणती गर्दी कशासाठी हा उलगडा करून घेइपर्यंत कित्येक लोक सरळ लाइन वगैरे न बघता पुढे जात होते. आम्ही खात्री करून घेतली आणि तिकिट काढण्याच्या लाइनमध्ये उभे राहिलो.


नागमोडी रांग अंत दिसत नाही.


साधारण चाळीस मिनिटानंतर तिकिट खिडक्या दिसायला लागल्या. आणखी दहा मिनिटानंतर आम्ही खिडकीवर पोहोचलो. तिकिट काढलं. गाइडकरता वेगळी व्यवस्था असेल असं वाटलं होतं पण ते तिकिटही त्याच खिडकीवर उपलब्ध होतं. तेही घेतलं आणि मग आमचा पुन्क्ट (punkt) म्हणजे इंग्लिश गाइडचा पॉइंट शोधून तिथे उभे राहिलो.


Punkt Meeting point for Guided Tours according to language


गाइडने एक पेजरसारखं काहीतरी दिलं. गाइड होती प्रसन्न आणि माहिती ब-यापैकी असावी असं दिसत होतं. ग्रूप २० २२ जणांचा. सगळ्यांना प्रत्यक्ष बोलणं ऐकू येणं कठीण तेव्हा ते प्लग्ज ती बोलत असताना कानात घातले की ऐकू येण्यासाठी तो पेजर. आपल्याकडे त्या गाइडचं बोलणं ऐकण्यासाठी त्याच्या जवळ रहाण्याची धडपड आठवली. कलोझिअमची माहिती वाचलेली निश्चित होती. पण मला अस नाही वाटत की गाइडविना आम्ही ते एन्जॉय करू शकलो असतो. तसे तर ते भग्नावशेष आहेत. काय बघायचं त्यात हा दृष्टिकोन असू शकतो. ती माहिती तशीही आपण नंतर विसरून जातो ही वस्तुस्थिती आहे पण तरीही ते बघताना त्या काळात इतकं भव्य बांधकाम उभारलं होतं या पेक्षा आणखी काही जाणण्याची इच्छा असेल तर गाइडला पर्याय नाही असं वाटतं.

खूप गोष्टी आपल्याला कल्पनेने साकाराव्या लागतात. तिथे एक भव्य असा रंगमंच (एरिना) आहे. सगळ्यात समोर राजाचं आसन असलेली जागा त्याच्यासमोरील बाजूस महत्वाच्या माणसांनी बसायची जागा आणि मग वरवर जाणारे स्टेडिअमसारखे थर हे माणसांच्या सामाजिक स्तराप्रमाणे. पण इथे सर्वसामान्यांनाही प्रवेश होता ही त्याची चांगली बाजू. इथे खेळ चालत, द्वंद्व होत, प्राण्यांबरोबरच्या झुंजी चालत. बळी दिल्यानंतर रक्ताचे पाट वहात, चिखल होई. या सगळ्याचा विविध प्रकारे चर खणून वगैरे निचरा करण्याची व्यवस्था तिथे होती. प्राणी आणताना त्याला एका फळीवर उभे करीत आणि दुस-या फळीवर त्याच्यापेक्षा जास्त वजन (मग तो दुसरा प्राणीही असे) दुस-या फळीवर ठेवून लिफ्ट करत. अशा खूप गोष्टी त्या गाइडकडून कळल्या. दुर्दैवाने अंतर्गत रचना या बघण्यासाठी खुल्या नाहीत त्यामुळे ते कल्पनाशक्तीवर सोडून दिलेलं आहे. आपण साधारण दुस-या किंवा तिस-या मजल्यावरून खाली डोकावून हे बघत असतो. पण तसही या सगळ्या इतिहास आणि कल्पना एकत्र गुंफुन तयार झालेल्या गोष्टीच आहेत. एक मात्र खरं की इतकं उंच बांधकाम, सर्वसमावेशक स्वरूपाचं, त्या काळात उभारणं, ज्यात काही हजार प्रजाजन एकाचवेळी बसू शकतील हे विस्मयकारक आहे. त्याचा उपयोग मात्र कैद्यांची द्वंद्व वगैरे मनोरंजनपर (?) कार्यक्रमांसाठी होत असे हे वाचून वाईट वाटलं. काही असो, हा इतिहास आहे आणि तो बदलणे शक्य नाही त्यापासून काही बोध घेता आला तरी पुरे. त्याची ही बाजू काळी आहे म्हणून ती झाकून ठेवावी असं या लोकांना वाटत नाही ही समाधानाची बाब!


कलोझिअम अंतर्भाग

कलोझियम हा एका मोठ्या कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. त्याच्या तिकिटात आपण कलोझिअम बरोबरच रोमन फोरम आणि प्लातिनिआ हिल्स या भागात त्याच तिकिटात हिंडू शकतो. रोमन फोरम हा एक प्रचंड विस्तार असलेला भग्नावशेषांचा भाग. ‘त्या इमारतींची रचना, विस्तार आणि त्या काळातलं आर्किटेक्चरल किंवा बांधकामाविषयक ज्ञान हे सर्वस्वी उच्च प्रतीचं आहे हे निश्चित. रोमन लोक खूप पुढारलेले होते वगैरे आपण ऐकलेलं असलं तरी त्याची पोहोच इथे आल्यावर कळते. असं असूनही एखादं साम्राज्य का विलयाला जात असेल? अर्थात याचा बोध आपण आपल्या इतिहासाच्या अभ्यासातूनही घेऊ शकतो. रोमन फोरमच्या इमारती खरोखरच छान आहेत. तुमची फक्त खूप पायपीट करण्याची तयारी हवी. जुनी मंदिरं आहेत अर्थात नंतर आलेल्या ख्रिस्ती धर्माने या सर्व गोष्टींमधलं त्यांना असलेलं Threat ओळखलं आणि अदूरदर्शी लोक जे करतात तेच त्यांनी केलं. नष्ट करा किंवा त्याची चर्च करा. आपल्याकडे जशा देवळांच्या मशिदी करण्यात धन्यता मानली गेली तीच वृत्ती वेगवेगळ्या पोपनीही दाखवली. जितका म्हणून लुटारूपणा करून स्वतःची साम्राज्ये उभारता आली तेवढी उभारली. अतिशय  -हस्वदृष्टीच्या या माणसांमुळे एका संस्कृतीचा संपूर्ण नाश झाला. ग्रीकांपासून चालत आलेली आणि रोमन साम्राज्यानेही आपली म्हटलेली देवळं हा भागच मोडीत निघाला. कदाचित काळ हा प्रवाही असतो असं त्यावर म्हटल जाईलही पण आपण यातून काय गमावतो किंवा काय गमावलं आहे हे आतातरी मानवाच्या लक्षात आलं तरी पुरे. माझ्या या वेदनेला अर्थातच बामियन बुद्धाची आणि तशाच खूप काही गोष्टींची पार्श्वभूमी आहे.

आम्ही बघत बघत निघालो होतो. शनीचं देऊळ Saturn Temple बघून आम्ही पुढे आलो. छान कमान होती त्यावरची नक्षी कॅमे-यात पकडण्याचा वेडा प्रयत्न मी करत होतो. तो अखेरीस सोडून दिला आणि छान बघत बसलो. या भग्नावशेषांचही तुमच्यावर एक प्रकारचं दडपण/ प्रेशर येतं. कदाचित म्हणूनही असेल पण आम्ही तिकडच्या दरवाजातून बाहेर पडलो. आणि खूप बरं वाटलं. मागच्या बाजूला एक नेहेमीप्रमाणेच विस्तृत असा चौक होता त्यात फुलांनी इटलीचा तिरंगा ( आपल्याप्रमाणेच रंग असल्यासारखा फक्त उभे पट्टे, इथेही आपल्यात आणि त्यांच्यात साम्य आहेच) होता. समोर पाय-या दिसत होत्या. चढून गेलो. पुतळे दिसले. जागोजागी लिहून ठेवलेलं होतं की हे सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे कृपया त्याचा आदर राखा. सगळेच वाचतात असे नाही. सगळे टूरिस्ट असतात त्यामुळे त्यांना जरा मजाही करायची असते. इथे येऊन विसावण्यासाठी या पाय-यांचा आधार वाटून कोणीही बसले की लगेच तिथले रखवालदार हटकत त्यांना. Not here म्हणून तिथून हटवत. त्या हटवण्यात कुठेही हिणवण्याचा भाग नव्हता, अरेरावी नव्हती, फक्त नियम नजरेस आणून देण्याचा भाग असे. हे मात्र निश्चितपणे युरोपातील वैशिष्ट्य म्हणायला हवे. आपल्याकडे वर्दीचा जो अंगभूत माज असतो तसा तो इथे अभावाने दिसतो.


                   <----------सैनिकांचे स्मृतिस्थळ                           
विस्तृत चौक आणि फुलांचा तिरंगा------------>

आम्ही बाहेर पडलो खरे पण कलोझियम आणि रोमन फोरमनंतर लगेचच प्लातिनिया हिल्सला जाणं अपेक्षित होतं. कोणीतरी म्हणालं होतं की इथून रोमचा सुंदर नजारा दिसतो. आम्ही गेलो पण नजारा वगैरे काही दिसला नाही. रोम ज्या सात टेकड्यांवर वसले आहे त्या सात टेकड्यांपैकी एक टेकडी इतकेच माझ्या लेखी त्याचे महत्व नोंदले गेले.

                                                                              to be contd.

टीप:- फोटो फीचर होण्याचा धोका टाळण्यासाठी रोमन फोरमचे फोटो इथे  देण्याचा मोह टाळला आहे.

Monday, 10 November 2014

ITALY ROME (ROMA) I

इटली रोम (रोमा)

तसं नेपल्स सेंट्रल स्टेशन टोलेडो स्टेशनपासून दूर नव्हतं. वेळही गर्दीची नव्हती त्यामुळे प्रश्न नव्हता. आम्ही मेट्रोमधून उतरून बाहेर आलो आणि सेंट्रल स्टेशनमध्ये गेलो. नंतर लक्षात आलं बाहेर पडायची काहीच आवश्यकता नव्हती. सबवे मधून दोन्ही जोडली असणारच. इथे इंडिकेटर्स व्यवस्थित होते गाडीची वेळ वगैरे वगैरे फक्त तपशीलात फरक होता. कोणतीही गाडी नेपल्स ते रोम अशी दिसत नव्हती. सगळ्या गाड्या नेपल्स ते मिलान पर्यंत धावणा-या. काय गोंधळ झाला असावा?  विचार करता करता सुचलं आपण बाकी गोष्टींकडे का लक्ष देत आहोत? आपल्याकडे गाडीचा नंबर आहे त्याप्रमाणे आपली गाडी कोणती ते बघायचं. रोम टर्मिनीला पोहोचल्यावर कळलं सगळ्या गाड्या मिलानपर्यंत जाणा-या असतात. पण इथलं प्रत्येक स्टेशनच  टर्मिनस आहे. येऊन पुनः उलट फिरून गाडी पुढे जात असावी.

गाडी हाय स्पीड वगैरे म्हणायची, म्हणजे ती तशी असतेच, पण आपल्याला त्या वेगाची आत जाणीव होत नाही. विमान कसं आपल्याला कित्येक वेळा स्तब्ध असल्याचा भास होतो! बाहेर रस्त्यावरून धावणा-या मोटारींना मागे टाकताना बघितल्यावर लक्षात येतो गाडीचा वेग. इटलीतली ही हाय स्पीडची सुधारणा अगदी अलिकडच्या काळातली. त्यांनी टप्प्याटप्प्याने सगळी प्रमुख शहरं अशी जोडली आहेत. आपल्या गप्पा बुलेट ट्रेनच्या पण अजून सुरवातही केली नाही!

रोमच्या टर्मिनीबद्दल खूप भीतीदायक वाचलं ऐकलं होतं. या परिसरात फार वेळ थांबणं हिताचं नाही इत्यादी. तसे अनुभव असतीलही लोकांचे. पण आपल्याकडे गर्दीत जो धोका संभवतो तितकाच तिथेही असावा. आम्ही मेट्रोचं तिकिट काढायला गेलो. मशिनवरून तिकिट घेतलं आणि प्लॅटफॉर्म कोणता ते बघायला लागलो. ऑरेंज लाइन होती स्टेशनचं नाव कामिलो फुरिओ चौथं किंवा पाचवं स्टेशन असावं टर्मिनीपासून. संध्याकाळचे सात वाजले असावेत आम्ही टर्मिनीला उतरलो तेव्हा. मेट्रोच्या त्या अनानिनाच्या (Anagnina g मात्र अनुच्चारित) दिशेने जाणा-या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता वळणार तर एक लोंढा अंगावर आला. आम्ही सामानासकट बाजूला. एस्कलेटरवर या गर्दीत पाय तरी कसा ठेवणार? आपल्या दादर किंवा त्याहीपेक्षा डोंबिवलीचा प्लॅटफॉर्म आठवा. तशी गर्दी प्लॅटफॉर्मच्या दिशेने चाल करून जाताना दिसली. वजा आपलं आक्रमण आणि ढकलाढकली. बहुधा दुस-या मार्गाची, ब्लू लाइनची गाडी आली असावी. हे टर्मिनी स्टेशन, तेव्हा गाडी बदलणे इथे कॉमन. गर्दी असणारच हे नंतर उमगलं. या अशा गर्दीमुळे पर्यटक भांबावून हे असलं काहीतरी नेटवर टाकत असावीत. पण हो, आपल्याकडे मधे जेव्हा मंगळसूत्र सरसकट चोरली जात तेव्हा बायका जसं ते तोंडात धरून गाडीत चढत, तसा इथे प्रत्येक बाईचा हात पर्सवर होता चुकलो पर्स बगलेत धरूनच बायका चालत होत्या. एकूण नेटवरील माहितीमध्ये अगदीच तथ्य नाही असं नसावं.

एक गाडी सोडल्यानंतरची गाडी जरा कमी गर्दीची होती. आमच्या स्टेशनवर उतरल्यावर हॉटेलही लगेच पाच मिनिटांवर मिळालं. या ट्रीपमध्ये हे एक बरं होतं शोधाशोध कमी होती. काऊंटरवरचा मुलगा छान बोलका होता. सिमोने नाव त्याचं. एकूण २२ खोल्या असलेलं ते टुमदार हॉटेल, आवडलंच. कमतरता म्हणावी तर ब्रेकफास्ट म्हणून फक्त कॉफी / चहा किंवा सॉफ्ट ड्रिंक आणि केक मिळणार होता पण ते ठीक होतं. २४ तासांचा अटेन्डन्स ही जमेची बाब. चावी त्यांच्याकडे देऊनच जायची याची त्यांनी एक छान जडशीळ की चेन देऊन तजवीज केली होती. इथल्या आमच्या वास्तव्यात काय काय बघणं शक्य आहे ते त्याच्याशी बोलून घेतलं. त्याने मॅप हातात ठेवले आणि कुठे कुठे जाणं हे मॅन्डेटरी आहे हे सांगितलं. त्याच्यापुढे प्रसिद्ध वाक्य. Rome was not built in a Day how can you expect that to be covered in two three days ऐकवलं. या लोकांचं शहरावर किती प्रेम असतं! त्यांची ती भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते जराही कसूर करत नाहीत.

जरा पाय मोकळे करायला, काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. तसं हे मोठं शहर त्यामुळे रहदारी, वर्दळ होती अर्थात आपल्याकडच्या तुलनेत खूप निवांतपणा होता. जवळपास काही खाऊन घ्यावं असं हॉटेल दिसेना. आमच्याकडे थर्मास नेहेमीच बरोबर असतो. गरम पाण्याची व्यवस्था असेल तर कुठेही चहाची प्री मिक्स सॅशे उपयोगी पडतात. इथे गरम पाण्याचा प्रश्न नव्हता तेव्हा आज काहीतरी फळं वगैरे खाऊन दिवस भागवायचा असं ठरवलं आणि त्यादृष्टीने दुकानं बघायला सुरवात केली. आमच्या बिल्डिंगशेजारीच दुकान होतं. आतला माणूस "आपला" वाटला. आत गेलो. तो त्याच्या कामात बीझी होता. आम्ही केळी बघितली तर जरा काळी वाटली. आम्हा दोघातच बोलणं सुरू होतं केळी चांगली वाटत नाहीत नको घेऊ या. बाकी फळं बघू. ते ऐकून तो पुढे आला हिंदीतून म्हणाला केळी चांगलीच आहेत. हे खाऊन बघा म्हणत एक केळं सोलून त्याने अर्ध मला, अर्ध उत्तराच्या हातावर ठेवलं. त्याचं खरच होतं आम्ही केळी घेतली. बाकी काय चांगलं आहे असं विचारल्यावर तो पुढे आला. एक सफरचंदासारखं दिसणारं पण चपटं फळ होतं. काहीतरी पेश्गा वगैरे म्हणाला, ते त्याने सोलून पुन्हा अर्ध अर्ध आम्हा दोघांना दिलं. उत्कृष्ट चव आणि अगदी रसाळ असं ते फळ आम्ही लगेच घेऊन टाकलं मग अशीच प्रत्येक फळाची ओळख झाली आणि तो बोलत बसला.  इथे येऊन त्याला ४-५ वर्ष झाली होती. ढाक्क्याकडचा तो. घरी आई वडील इतर भावंडं होती. इथे मोठा भाऊ ९ वर्षापूर्वी आला, त्याच्यामागून हा आला. इथली सगळी ही अशी प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणावीत अशी दुकानं या बांगलादेशींच्या ताब्यात आहेत. नाव विचारलं. त्याने सांगितलं  हसन. एकूणच त्याच्याशी बोलताना आम्हाला खूप बरं वाटत होतं. त्याच्या मनातला आपलेपणा आमच्यापर्यंत पोहोचत होता. बिल बनवताना त्याला म्हटलं अरे तू खायला घातलेल्या फळांचे पैसे त्यात जोडून घे. तो म्हणाला ती मी माझ्याकडून दिली होती, मला वाटलं म्हणून, त्याचे पैसे काय घ्यायचे तुमच्याकडून? आणि हो तो धंद्याचा भाग नव्हता, तुम्ही माझ्याकडून फळं घ्यावीत म्हणून मी दिली नाहीत खरोखर मनापासून द्यावीशी वाटली म्हणून तुम्हाला दिली. आम्ही त्याच्या म्हणण्याला मान दिला पिशवी उचलली आणि वर गेलो. आजच्या जेवणाची फारच छान व्यवस्था झाली होती.

घरी आल्यावर बाल्कनीत टाकलेल्या खुर्च्यांवर विसावलो. समोरच्या अपार्टमेंटमधली घरं संध्याकाळी जागी झालेली दिसत होती. वेगवेगळे वास दरवळत होते. कसले ते ओळखण्याइतकी त्या खाण्याची माहिती नाही याचं वाइट वाटलं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्येही प्रत्येक बाल्कनीत टेबलाभोवती दोन खुर्च्या मांडलेल्या दिसत होत्या. हळूहळू एका एका खुर्चीवर माणसे स्थानापन्न होत होती. वातावरणातला उन्हाळा. तीसच्या आसपासचं तापमान म्हणजे त्यांच्यासाठी खूप छान हवा. पण मग अर्थात पुरूष हाफ पॅन्ट्मध्ये आणि उघडे आणि बायका अर्धा गाऊन घालून ग्लास घेऊन बसलेल्या दिसत होत्या. जेवणाचाही बेत तिथेच असावा. आम्हाला त्या निरीक्षणात घालवायला फार वेळ नव्हता. उद्या कलोझियमपासून सुरवात करू असं ठरवून आम्ही आमचा तो दिवस संपवला.

                                                                                   to be contd.
p.s.


हे फोटो माझ्याकडून राहूनच गेले. नेपल्समधलं हे Via Toledo स्टेशन म्हणजे आर्ट गॅलेरीत आल्यासारखं वाटतं. वरच्या छताकडे बघत रहाणारी ही माणसं त्याची साक्ष देतील. या फोटोंविना नेपल्सचं वर्णन माझ्याकडून अपुरं राहिलं असतं म्हणून जरी रोमचा भाग असला तरी या स्टेशनपासून आमचा प्रवास सुरू झाल्याचा बादरायण संबंध जोडून ते इथे देण्याचा आगाऊपणा मी करत आहे.


Monday, 3 November 2014

ITALY NAPLES (NAPOLI) IV


इटली नेपल्स (४)

नेपल्सचा किनारा जवळ आल्यावर सगळे उठून खालच्या डेकवर आले. मोटारी आणि इतर वाहनं बाहेर पडायच्या आत सगळ्यांना बाहेर पडायचं होतं. तरी इथे कुठेही ढकला ढकली किंवा गोंधळ दिसला नाही. आपल्याकडची अनावश्यक अधीरता (anxiety) इथे अभावाने असावी!

मावळत्या सूर्यकिरणाने उजळून निघालेला नेपल्सचा समुद्रकिनारा.

आता घरी जाण्यात अर्थ नव्हता. तसे सात वाजून गेले होते. म्हणजे हातात वेळ कमीच होता. आमच्याकडे हॉलंडला जरी रात्री साडे नऊ दहापर्यंत उजेड असे तरी आता आम्ही दक्षिणेला आलो होतो त्यामुळे ती मर्यादा आता आठ साडेआठपर्यंत आली होती. असेच समुद्राच्या किना-याने जाऊ असं ठरवून चालत राहिलो. पण हा भाग निर्जन आणि गावात जाण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा सरळ परत फिरलो. उगीच दमण्यात अर्थ नव्हता. येताना एक रेस्टॉरंट दिसलं. पित्झा हा परिचित पदार्थ दिसल्यावर समाधान वाटलं. मग नेहेमीचा मंत्र नो फिश नो मीट नो एग्ज वगैरे जपला आणि तिथेच बसून खाऊन घेतलं. बील द्यायला गेलो तेव्हा त्यात किमतीच्या दुप्पट रक्कम. मी चक्रावलो आणि त्याला विचारलं की भाव एक दिसतो आहे आणि बिल दुप्पट. त्याने काय स्पष्टिकरण दिले ते माझ्या मतीपलीकडचे कारण ते इटालिअन मध्ये होते. शेवटी कमी केलेले परंतु लिखित भावापेक्षा जास्त बील देऊन हे लोक फसवणारे दिसतात अशी खूणगाठ बांधली. याला आणखी एक कारण होते. ब्रसेल्सला गेलो होतो त्यावेळी वाचलेल्या नेटवरील माहितीमध्ये इटालिअन जॉइंटसमध्ये खाण्यापूर्वी भावांची खात्री करून घ्या. ते नंतर तुमच्याकडून जास्त पैसे उकळतात असे म्हटले होते त्याची पार्श्वभूमी होती. घरी परतल्यावर श्रीशैलला फोनवर विचारलं. त्याचा प्रश्न, तुम्ही तिथे बसून खाल्लात का पित्झा? तर त्यांच्याकडे सर्विस चार्ज घेण्याची पद्धत आहे. त्याने अर्थात तुम्हाला आधी जास्त चार्ज लावला पण नंतर बरोबर घेतला असावा. शंका आली तर जरूर विचारत जा. उगीच तुमची तुम्ही स्पष्टीकरणं तयार करत बसू नका.

बरं म्हणून फोन ठेवला. आता रहाण्याच्या ठिकाणी बाकी काय काय व्यवस्था आहे ते बघायला सुरवात केली. ए सी आहे आणि चालू आहे हे त्या इंडिकेटरवरून कळत होतं पण गारवा जाणवत नव्हता. रिमोट अणि ए सी यांचा काही संबंध असेल असं वाटत तरी नव्हतं. शेवटी तो नाद सोडून मस्तपैकी दरवाजा कलता केला (खिडकी उघडणे हा आपला प्रकार इथे अभावाने दिसला. त्याऐवजी दरवाजा वरून आपल्या अंगावर कलता होतो.) आणि छान गारवा आत आला. इथल्या हवेचं हे एक वैशिष्ट्य आहे की रात्री तापमान खूप खाली असतं. काही ठिकाणी तर १२ ते १८ च्या दरम्यान.

बाहेर रस्त्यावर श्रीलंकन मुलांचा फुटबॉल रंगात आला होता. या ठिकाणी किंबहुना सगळ्या इटलीमध्ये श्रीलंकन आणि बांगला नागरीक मोठ्या संख्येने दिसतात हे आम्हाला नंतर प्रत्ययाला यायचं होतं.

दुस-या दिवशी सकाळी बाहेर कोणी असेल म्हणून डोकावलो पण सगळा थंडा कारभार. काल इथे असलेली सगळी माणसं कुठे गायब झाली होती कोण जाणे आणि शेवटपर्यंत ती आम्हाला दिसली नाहीतच. नेहेमीच्या प्रथेप्रमाणे टेबलवर किल्ल्या ठेवून आम्ही त्या जागेचा निरोप घेतला.

अर्थात त्याआधी फिरायला म्हणून बाहेर पडलो.  आमच्यापासून अगदी जवळ असलेले तोलेडो(Toledo) हे नेपल्स मेट्रोचे स्टेशन दिसले आणि हायस वाटलं कारण आम्हाला इथूनच गाडी पकडून नंतर सेंट्रल स्टेशनवरून दुपारी रोमची हाय स्पीड ट्रेन पकडायची होती. आपल्या पुण्याच्या लक्ष्मी रोडसारखा रस्ता. अर्थात इथे फुटपाथ होते आणि वाहतूकही व्यवस्थित होती. उगीच गलका कलकलाट वगैरे वजा जाता लक्ष्मी रोड म्हणू या. बघत बघत निघालो होतो. प्रचंड उंच आणि भव्य असे दिंडी दरवाजे असलेले वाड्यासारखे किंवा हवेलीसारखे बांधकाम. नुसते ते बघत फिरतानाही मनाला आनंद होइल असे वातावरण. चाललो होतो एवढ्यात मागून हाक आली सरजी. आम्ही दोघांनी चमकून बघितलं. आपल्यासारखा वाटणारा एकजण काहीसा घाईत आल्यासारखा. "मैं कभीसे देख रहा था कोई तो अपने जैसे लगते है इसलिए दौडके आगे आया. त्याच्या धाप लागण्याचं समर्थन करीत तो म्हणाला. पेशावरचा असलेला हा पठाण, आपल्या पठाणाच्या इमेजला साजेसा नव्हता. त्याचा मुलगा इथे आला मग सगळं कुटुंबच इथे आलं. तो मुलाबाळांसकट इथे रहात होता. कसं, काय, कुठून वगैरे चौकशा झाल्यावर आम्हाला गाइड करणं हे परमकर्तव्य असल्याप्रमाणे त्याने दोन तीन ठिकाणं सांगितली. वाटलं हा जाऊन आला असेल पण नाही. ऐकीव माहिती आमच्याकडे पास केली. आभार मानून, खूप बरं वाटलं वगैरे सांगत पुढे निघालो.

पुढे एक मोठी इमारत, लायब्ररीची होती. इमारत छान म्हणून आत डोकावलो. एकमेकांना काटकोनात छेदणारे दोन खूपच सुंदर पॅसेज आणि त्याच्या दोन तीन मजली उंच छतावर रंगवलेली / कोरलेली चित्र आणि पुतळे आम्ही बघत होतो. फोटो काढायला चांगली जागा होती. समोर कोणी दोघे पायाने बॉल सदृष काहीतरी एकमेकांकडे ढकलत खेळत होते. आमच्यातलं बोलणं ऐकून तो कानात डूल घातलेला पुरूष कैसी है मॉंजी म्हणून पुढे आला. एकूण अवतार काही ठीक वाटला नाही. त्याच्याबरोबरची बाई स्थानिक वाटत होती निदान आपली नव्हती. ती शांतपणे बाजूला उभी राहिली. त्याचे आजोबा उत्तर प्रदेशातून कराचीला गेले होते वगैरे सगळं झालं. नंतर जेव्हा इथली परिस्थिती खूप वाईट आहे वर तो आला तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फोटो काढायला सुरवात केली. तोपर्यंत त्याच्या "मॉं" ला खूण केली की आता पुरे. हे प्रकरण नंतर पैसे मागण्याकडे जाऊ शकेल याचा अंदाज आल्यावर काढता पाय घेण्यात शहाणपण होतं.

लायब्ररीचा कॉरिडॉर



तसेच पुढे जाऊन मग त्याला समांतर रस्त्याने परत फिरायचे असे ठरवून मागच्या रस्त्यावर गेलो. पण काही रस्ते आपल्या मनात शंका उत्पन्न करतात. कारणं काही असोत पण अशा वेळी रस्ता बदलणं शहाणपणाचं. आम्ही तेच केलं आणि मोठ्या रस्त्यावरून माघारीची वाट पकडली. आम्ही फिरत फिरत येत होतो तेव्हा लक्षात आलं की आपण रस्त्याच्या एकाच बाजूला गेलो. मग उलट्या बाजूला गेलो.

तिथे एक मोठा प्रशस्त चौक आमची वाट बघत होता. चहूबाजूच्या इमारतींनी वेढलेल्या त्या चौकाकडे निवांतपणे बघण्यात काही क्षण गेले.


तो चौक ओलांडला की समुद्राकडे जाणारा रस्ता त्यापलीकडे मग आपल्या मरीन ड्राइव्हसारखा रस्ता, समुद्राशी लगट करत जाणारा. थोडा वेळ तिथे हिंडून मग मागे फिरलो तर आठवलं की कालपासून समोर दिसणारा तो किल्ला आपली वाट बघतो आहे. 

 
आम्ही आत्ता वरच्या लेव्हलवर होतो. समुद्रापर्यंत जाऊन परत मागे फिरायचं म्हणजे अर्धा तास वाया जाणार. सरळ जिना उतरून मग खाली आलो आणि रस्ता ओलांडून किल्ल्याच्या जवळ गेलो. अगदी जवळ आहे कधीही जाऊ म्हणताना त्याच्याकडे दुर्लक्षच झालं होतं आणि आता तर निघायची वेळ जवळ येत होती. आम्ही गेलो तर आत जायला तिकिट होतं. आमच्या पहिल्याच काप्री ट्रीपने आम्हाला इतका गंडा घातला होता की अजून खर्च नको वाटला. सरळ अपार्टमेंटवर आलो आणि बॅगा उचलून बाहेर पडलो. काहीतरी खाऊन वेळेत नेपल्स सेंट्रलला पोहोचायचं होतं. या स्पीड ट्रेन्सचं हेच आवडत नाही मला. रिझर्वेशन त्या ठराविक गाडीपुरतं असतं त्यामुळे वेळेचं बंधन पाळायलाच हवं होतं.
                                                                                             समाप्त
                                                                                             पुढील मंगळवारी रोम