Monday 12 January 2015

ITALY FIRENZE (FLORENCE) III


इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (३)


फ्लोरेन्समधला दुओमो अतिशय प्रसिद्ध आहे असं ऐकून होतो आणि बघायची उत्सुकताही होती. त्याचं वर्णनही It is as huge and beautiful that won't be ever missed. It is centrally located and visible from anywhere असं म्हटलं होतं. सुंदर आणि भव्य वास्तू म्हटल्यावर आमची कल्पना मोकळ्यावर असणार, पण गल्ल्याबोळांच्या त्या जंजाळात एका छोट्या गल्लीतून पुढे गेलो तर हा समोर.

दुओमो सुंदर आहे यात प्रश्न नाही पण त्याची जागा अगदीच चुकली आहे. इतक्या दाटीवाटीत आहे की धड एका नजरेत तो समोर येऊ नये. खूप कलाकुसर आहे. आम्ही संध्याकाळी बघत होतो, पावसाळी वातावरणाचा परिणाम आमच्या मूडवर झाला होता का? अगदी अशक्य म्हणता येणार नाही. त्याचा अपेक्षित प्रभाव आमच्यावर पडला नाही हे खरं. तरीही त्याच्या बांधणीला, कलाकुसरीला दाद द्यावी लागत होती. मग असं मनाशी ठरवलं की ठीक आहे आत्ता आपण सभोवती फेरी मारू या आणि उद्या नीट बघू या. जमतील तेवढे फोटो, खरतर तुकड्या तुकड्यात त्याला सामावता येणारच नव्हतं, काढले आणि निघालो. तुम्हाला निदान माहिती होते हा इंटरनेटचा फायदा म्हणायचा की तुमचं मत बनण्याची क्षमता त्या माहितीमध्ये असते आणि. मग काही वेळा भ्रमनिरास होण्याचीही शक्यता निर्माण होते हा तोटा म्हणायचा? उद्या काय ते बघू असं म्हणून निघालो खरं.


ढगााळ वातावरणातला दुओमो कोणत्याही बाजूने एका नजरेत न येणारा




थोड्याशा नाराजीने आम्ही पुढे निघालो आणि मग ठरवलं की आता एका दिशेने जायचं. जे समोर येईल ते बघायचं. असं म्हणत पुढे गेलो ते एका भव्य चौकात पोहोचलो. आमचा थोडासा खप्पा मूड एकदमच पालटून गेला. खूप लोकं आहेत, सभोवारच्या इमारती प्रेक्षणीय आहेत आणि त्याहीपेक्षा खुले (Open Museum) संग्रहालय असावे तसा माहोल

पुतळे जागोजाग उभे आहेत. त्यांच्या सौष्ठवाचं वर्णन करावं की पोपच्या देशात ही नग्नता खपवून घेतली गेली याचं समाधान मानावं हेच कळत नव्हतं. या (शिल्पकलेतलं) प्रांतातलं काहीच कळत नाही आणि माहितीही नाही तेव्हा बरोबरच्या माहितीचा आधार घेतला. एखाद्या खरोखरच्या ग्रेट कलाकृतीनी आपण भारावून जायला त्यातलं काही कळायलाच लागतं असं नाही याचा प्रत्यय आला. मायकेल ऍन्जेलोच्या सुप्रसिद्ध डेव्हिड हर्क्युलिस या कलाकृतींच्या या प्रतिकृती होत्या. आणि ते नेपच्युनचे कारंजे

नेपच्युनचे कारंजे व हर्क्युलिस (प्रतिकृती)


सौंदर्य ठायी ठायी भरून राहिलेला तो सिग्नोरिया चौक (Piazza della Signoria) त्यातली ती वेचिओ बिल्डिंग (Vecchio) . त्यातले ते पुतळे. आपल्याला मूर्तीकलेतलं कळायला हवं होतं निदान ग्रीक/ रोमन मायथॉलॉजीतल्या कथांची तरी माहिती हवी होती हे प्रकर्षाने जाणवलं.

सगळ्यात उजवीकडे अाहे ते Rape of Sabine women                                                                                 
आता तिथे एक Rape of Sabine women या नावाचं सुंदर शिल्प आहे. एका पुरूषाला पायाखाली दडपून एका स्त्रीला विळखा घातलेला पुरूष असे तपशील सांगायचे म्हटले तर. मग यात रेप कुठे? त्यामागची कथा माहित नसेल तर अर्थबोध होणार नाही. पूर्वीच्या काळी रोमन लोक शेजारच्या सबिने कुटुंबाच्या (की जात/ समूह मी इथे माहितीमधला family/ clan या शब्दावरून हा अंदाज बांधला आहे) स्त्रीला पळवून आणत. यातील Rape इंग्रजीमधील सध्याच्या अर्थाचा नाही. जबरदस्ती या अर्थाने वापरल्या गेलेल्या शब्दामध्ये त्या काळात बलात्कार ही शेड नव्हती. मघा उल्लेख केला ते नेपच्युन फाऊंटनसुद्धा त्याच्या कथेसकट समजून घेताना मग त्यातल्या वेगळ्या पुतळ्यांचा एकत्रित शिल्पापर्यंतचा प्रवास उलगडतो. Ercole and Centaur या शिल्पाने असेच बुचकळ्यात टाकले होते. यातील Ercole म्हणजे हर्क्युलिस आणि सेंटॉर म्हणजे धड घोड्याचे असा माणूस हे समजल्यावर तो पुतळा उलगडला. कथा वगैरे जाऊ दे पण निदान आपण समोर बघतो ते काय आहे हे तरी कळायला हवेच. एका पुतळ्याच्या हातात एक शिर आहे त्यातून रक्त सांडते आहे.



मेडुसा नावाच्या बाईचं हे शिर. ती चेटकिण वगैरे वर्गातली असावी पण ज्याने हे हातात धरले आहे तो कोवळा मुलगा वाटतो. त्याच्या चेहे-यावरचे भावही कुठलाच रौद्रभाव दाखवत नाहीत. जाऊ दे. त्या कथा पूर्णपणे काही माहित नाहीत म्हणून असावं. आपला कृष्ण नाही का ऐन लढाईतसुद्धा सौम्य सात्विक भाव चेहे-यावर वागवत असतो!



आम्ही खूप वेळ इथे रमलो होतो. उत्फुल्ल असं ते वातावरण म्हणजे फ्लोरेन्समधलं चैतन्य असावं असं वाटत होतं. इथे या सिग्नोरिया चौकात प्रसिद्ध असं उफिझी (Uffizi) म्युझियम आहे. आमच्या ज्ञान आणि समज पातळीची परीक्षा वेळोवेळी झालेली असल्याकारणाने आम्ही म्युझियम कितीही प्रसिद्ध असली तरी त्यापासून दूर रहाण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे! निदान प्रवेश फीचे पैसे तरी वाचतात! कितीही वेळ त्या तिथे बसून काढता येणं शक्य असलं तरी शहर हिंडायचं तर सूर्यास्ताच्या आधीच शक्य होतं. त्या तिथल्या खजिन्याला तिथेच मागे ठेवून आम्ही तिथून निघालो.

खरतर इथून मागे पोन्टे वेचिओ ब्रिज जवळ पण माहितीपत्रक बघायचं नाही म्हटल्यावर आम्हाला ती वाट कशी दिसणार? आम्ही त्याला बायपास करून नदीकडेने पुढे निघालो. काही वेळा तरी असे निर्णय खूप चांगले ठरतात. नदीच्या दोन्ही अंगाला समांतर असे रस्ते आहेत. पूर्व पश्चिम वाहणारी नदी त्यामुळे सूर्य आता आम्हाला सामोरा होता. आम्हाला नदीवरचे असलेले एकूण सहा सात पूल मागे टाकून नंतरच्या पुलावरून पलीकडे जायचं होतं. समोरच्या बाजूला रंगीबेरंगी इमारती. त्यांच्यामागे हिरवी रांग असावी अशी झाडांची दाटी असलेली टेकडी. आणि उत्कृष्ट कॅमेरामनने आताच्या भाषेत सिनेमाटोग्राफरने झोत टाकावा तसा कोन साधून टाकलेला मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचा प्रकाश. नदी जशी पूर्व पश्चिमेचा कोन साधून होती तसा तो सूर्य आणि त्या उजळलेल्या रंगीबेरंगी इमारती. कोणत्याही शिल्पापेक्षा हे समोरचं दृष्य अवर्णनीय होतं. मला फक्त कविता आठवली

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे ओढुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी......



मघा चुकून चुकलेला तो वेचिओ पूल आता लांबून त्या उन्हात लखलखताना दिसत होता. एका सरळ रेषेतली ती नदी, ओळीत मांडलेले ते पूल, नदीचा तो दुसरा काठ हे नजरेत साठवून ठेवताना आम्हाला पश्चिमेकडे जाताना उलट वळून सारखे मागे पहावे लागत होते, किंबहुना खूपदा नजरबंदीच अशी होती की थांबून अनिमिष पहात रहावं किंवा उलट चालत रहावं.

आम्हाला शाकाहार हवा हे आमच्या यजमानांना म्हणजे डॅनिअलला सांगितल्यावर त्याने आम्हाला खुणा सांगून जे हॉटेल सुचवलं होतं त्याची पाटी बघून आम्ही खूष झालो. पुढे गेलो तर त्याला भलं मोठ्ठं कुलुप! तसेच मग परतीच्या दिशेने निघालो. आम्ही शहराच्या एका टोकाला होतो. हे इटली आहे, हॉलंड नाही याची मनाला सतत जाणीव होती. डॅनिअलने जरी आम्हाला आश्वस्त केलं असलं तरी मनात कुठेतरी खोलवर असुरक्षिततेची ती भावना असतेच. त्यातून तसा हा रेसिडेन्शिअल भाग वाटत होता म्हणजे रहदारी नाही आणि फारशी हॉटेल्स असण्याची शक्यता नव्हती. पण पर्याय नव्हता. तसेच निघालो. पब्ज आणि बार उघडे होते. एखादा पित्झेरिया तरी मिळावा म्हणजे हा शोध संपेल असं वाटत होतं. अर्थात पित्झेरिया ( फक्त पित्झा मिळतो खूपदा तुकडे मिळतात त्यामुळे वेगवेगळे प्रकार खाता येतात) नाही पण एका रेस्टॉरंटमध्ये आम्हाला खायला मात्र मिळालं.

दुसरा दिवस सकाळी फ्लोरेन्स फिरून दुपारच्या गाडीने व्हेनिस गाठायचं होतं. चालण्याबाबत मी काय किंवा उत्तरा काय आम्ही दोघेही भक्कम आहोत. स्पीड आणि अंतर दोन्हीचा प्रश्न नसतो पण इथे उन्हाळ्याचा परिणाम जाणवत होता. विश्रांतीची गरज होती आणि या सुंदरशा घरातल्या निवांतपणाने आम्हाला ती मिळाली. दुस-या दिवसाकरता ताजे तवाने होऊन आमच्या इथल्या दुस-या दिवसाची सुरवात झाली.

                                                                            उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी


1 comment:

  1. सुंदर ओघवता वृतांत.चकरावून टाकणारा.आपणा दोघांच्या उत्साहाची कमाल आहे.

    ReplyDelete