Tuesday, 7 October 2014

भूमिका

भाग दुसरा


आम्ही जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी  मुंबईला परत आलो. भेटल्यानंतर प्रत्येकाचा प्रश्न असे कधीपासून ब्लॉगवर टाकतो आहेस? या वाक्याच्या शेवटी काहीवेळा प्रश्नचिन्ह काहीवेळा उदगारचिन्हही असे याची जाणीव मला होती. गणपतीत एका सुहृदांकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्या कॉलेजमध्ये   जाणा-या मुलाने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा असं वाटलं की काहीजण गांभीर्याने, खरोखरीच्या भावनेतून जर हा प्रश्न आपल्याला विचारत असतील तर आपण न लिहिणं हाही जरा अगोचरपणाचाच प्रकार होईल.

मला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं. मी ते मनापासून उपभोगतो. काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात, उलगडतात. हे समाधान मिळणं हा माझा सगळ्यात मोठा लाभ असतो (हल्लीच्या हिंदी वळणाच्या भाषेत उपलब्धी असते!).

या ब्लॉगच्या वाचकांची वर्गवारी मला जेव्हा दिसते तेव्हा आणखी एक गोष्ट ध्यानात येते की याद्वारे जगातील काही देशातील "आपल्या" माणसांपर्यंत आपण पोहोचत आहोत. यात युक्रेन, रशिया आहे त्याचप्रमाणे मलेशिया एमिरेटससारखे देशही आहेत. अमेरिका इंग्लंड आणि युरोपातील देशातूनही हे वाचलं जातं. म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे मराठीमध्ये लिहिलेलं वाचणारी लोकं जगभर आहेत. वाचणार कोण म्हणून हात आखडता घेण्याची खरोखर आवश्यकता नाही.

खूपजणानी या लिखाणाला ट्रॅव्हलॉग असं म्हटलं आहे. काही अंशी ते खरही आहे.  निमित्त प्रवासाचेच आहे. पण  भर मात्र  प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतोतो माझा आनंदच शब्दात पकडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे हे अनुभव प्रवासवर्णनावर कित्येकदा मात करतात.  इरावती कर्व्यांनी उत्खननादरम्यान मिळालेल्या एका स्त्रीच्या कवटीकडे बघू्न उद्गार काढले होते "तू ती मीच का ग?" त्याच धरतीवर  या परक्या ठिकाणी भेटणारी माणसं बघूनही मला तोच बंध तोच समान धागा जाणवतो. आपली संस्कृती किती मोठी हे म्हणताना आपण नकळत दुस-याला लहान करण्याच्या प्रयत्नात असतो. या माणसांना भेटताना जाणवणारी गोष्ट म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत. किंबहुना मानवी स्वभाव हा सारखाच असतो, व्यक्त होण्याच्या पद्धतीत काय तो बदल. मनामध्ये का होइना वैश्वकतेची बैठक तयार होण्याकरता या सगळ्याचा निश्चित सकारत्मक उपयोग होतो. 

गेल्या वेळी परदेशात असतानाच ऑस्ट्रिया, नेदरलॅन्डस आणि बार्सिलोना लिहून झालं होतं. ते स्वान्त सुखाय होतं. त्याचा ब्लॉग वगैरे करण्याचं, लिहित असताना काही डोक्यात नव्हतं. अर्थात ते करायचं ठरल्यानंतर अनुभवांती, सूचनांप्रमाणे त्यात बदल कसे होत गेले त्याचे तर तुम्ही साक्षीदारच आहात. यावेळी मात्र थोडी वेगळी परिस्थिती आहे. तिथे असताना लिहावं इतका आमचा मुक्काम मोठा नव्हता. इथे आल्यानंतर लिहिण्याकरता पोषक वातावरण नव्हतं. त्यामुळे थोडा वेळ घेऊन नंतर आत्मविश्वास वाटला तेव्हा पुनः ही सुरवात करत आहे. गेल्या वेळेप्रमाणे वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया ब्लॉगवरच लिहिल्या तर माझ्याप्रमाणेच इतरांपर्यंत आपली मतं पोहोचू शकतील. आणि महत्वाचं तुमच्या सूचनांचा निश्चितपणे विचारही होइल.  आठवड्याच्या मंगळवारी सकाळी तुम्हाला लेख वाचता यावा असा माझा प्रयत्न असेल, गेल्या वेळेप्रमाणेच.

भेटू या तर मंगळवारी!



No comments:

Post a Comment