Tuesday, 11 February 2014

नृसिंह

नृसिंह

"तू नृसिंहाच मंदिर बघितल आहेस का?” कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर माझा मित्र मला विचारत होता.

मला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारून हा माझी परीक्षा बघत मजा बघत आहे की काय? (हे माझं नेहेमीचच संशयखोर मन.)  खर होतं असं की साईबाबा, दत्त, शंकर, गणपती वगैरे लोकप्रिय(?) देवांचा प्रश्न नसतो ते भेटतात अधून मधून पण नृसिंहाच मंदिर पाहिल्याच काही मला आठवत नव्हत.

अशा कठीण प्रसंगी कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर न देता प्रतिप्रश्न केला की समोरचा माणूस थंडावतो निदान गोंधळतो म्हणून त्याला विचारल "कुठे जवळच आहे का?”

"हो, इथून इस्लामपूर, तिकडून ३५-४० मिनिटांचा रस्ता.”
किलोमीटरमधल्या अंतरापेक्षा वेळेच गणित चटकन माझ्या डोक्यात शिरतं. एरवी रस्त्याची स्थिती, घाट वगैरे गोष्टींमुळे अंतराच आणि वेळेच गणित माझ्या डोक्यात काही उलगडत नाही त्यापेक्षा गावंढळ वाटला तरी हा मार्ग मला पत्करतो.

मी होकार भरला आणि आम्ही मार्गस्थ झालो. गाडी इस्लामपूरच्या दिशेने चालू लागली आणि मित्राचं सामान्य ज्ञान आणखी जागृत झालं. “ आणखी एक आठवल! अरे समर्थांच्या अकरा मारूतींमधला एक, वाटेत बहे नावाच गाव आहे तिकडे आहे....” मी दुर्लक्ष केलं पुढच पुढे, आधी नृसिंह बघू या.

गाडी देवळापाशी थांबली आणि आम्ही उतरलो. कमानीतून आत गेल्यावर एक बाई बसल्या होत्या त्यांना विचारल मंदिरात कस जायच? त्यानी सरळ दिशेला बोट दाखवल तेवढ्यात एका माणसाने दुस-या दिशेला भुयाराकडे असा फलक होता तिकडे लक्ष वेधल.

बरोब्बर भुयारातूनच जायच"
स्मृती जागृत झालेला माझा मित्र म्हणाला आणि आम्ही भुयाराच्या दिशेने निघालो. तसा अंधुक प्रकाश. खाली उतरत जाणा-या पाय-या. दोन मजले खाली उतरलो आणि पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला. बाहेरची कृष्णामाई बहुधा नृसिंहाला आंघोळ घालायला आत येत असावी.

पुढे गेलो तर समोर ५-७ फुटी घडीव मूर्ती! षोडषोपचारे स्नान सुरू होतं. त्यामुळे मूर्ती मूळ स्वरूपात वस्त्रालंकारविरहित बघता आली. हिरण्यकश्यपूला नृसिंहाने मारलेल आहे. नृसिंहाच ते हिस्त्र स्वरूप! डोळ्यात अंगार आहे. एका दगडातली ती चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती! मांडीवर हिरण्यकश्यपू मेलेला आहे. त्याचा रेखीव चेहेरा आणि चेह-यावरील शांत भाव!

कुठेतरी वाचल्याच आठवल की रावणानेसुद्धा रामाच्या पवित्र हातून मरण याव अशी इच्छा प्रकट केली होती. तसच तर नसेल? आपल्या संस्कृतीतला हा राक्षसांना सुसंस्कृतपणा बहाल करण्याचा भाव खूप आतपर्यंत पोहोचतो. रावणाला  ब्राह्मण्यत्व देऊन नाही का माणसातल असुरपण आणि असुरातलं माणूसपण दाखवल आहे!

तर तो शांतपणे पहुडलेला हिरण्यकश्यपू खूप छान वाटत होता. अगदी याचसाठी केला होता अट्टाहास असा!
.
गाभा-यातल्या त्या एवढ्याशा जागेत आम्ही एका कोप-यात उभे होतो. शनिवार असल्याने बहेच्या मारूतीच्या दर्शनाला येणारी माणसं पट्दिशी येऊन नमस्कार करून जमेल तेवढ पुण्य गाठीशी बांधून जाण्याच्या लगबगीत होती. त्याना मूर्ती, तिचं सौंदर्य याच्याशी काहीच देणघेण नव्हतं. त्यामुळे आम्ही निवांत होतो.

आता स्नान विधी आटोपून तो पोरगेलसा गुरूजी मूर्तीला कद नेसवत होता. तो जरीचा केशरी लाल कद अगदी साजरा दिसत होता.  तेवढ्यात माझी नजर त्या नृसिंहाच्या डोळ्याकडे गेली. त्यातला अंगार कमी झाला का? असं कसं शक्य आहे? की हा नजरबंदीचा खेळ होता? मी माझ्या मित्राला टोकल पण तो भक्तीभावाने तल्लीन होऊन पूजा पहात होता. अस काही जाणवण फारच पलीकडचं होतं. मी जाऊ दे म्हणून परत मूर्तीवर नजर लावली. कद नेसवून झाल्यावर रेशमी उपरण खांद्यावर आलं. नंतर मग पुरूषभर लांबीचे हार, चाफ्याची कंठी, जास्वंद तुळशी, काय नी काय. ती मूर्ती मग त्यात गायबच झाली.

हे सार ओळखून की काय मग त्या गृहस्थ दिसणा-या नृसिंहाच्या मूर्तीला चाफ्याच्या पाकळ्य़ांच्या मिशा लावल्या, नंतर चांदीचे डोळे त्या डोळ्यांना लाल भडक असे मणी, हातांच्या मुठी सगळं, सगळं करून मूर्तीचं ते रौद्र रूप परत मिळवण्याचा एक क्षीण प्रयत्न केला गेला. -याच अंशी तो यशस्वीसुद्धा झाला पण माझ्या डोळ्यासमोरचं मूर्तीचं ते निजरूप जाईना.

सगळं साग्रसंगीत पार पडलं. आरती झाली. आता तिथे उभे रहाण्याचं काहीच कारण उरलं नव्हतं.

बाहेर पडून जिने चढून वर आलो. लहान मुलांच्या बागडण्याचा आवाज येत होता. त्यापाठोपाठ त्यांच्या पालकांचा आवाज! मुलांना शिस्तीच्या नावाखाली ओरडण्याचा कार्यक्रम सुरू होता. "देवाच्या दारी विसावा आणि पुनर्जन्म नसावा!” हे आठवून तिथे जरा विसावलो. भवतालच्या वातावरणापासून दूर जाण्याकरता डोळे मिटले. नजरेसमोर मूर्तीचं ते निजरूप, अनलंकृत, रौद्र पण मोहून टाकणारं, नजर खिळवून ठेवणारं. त्यापाठोपाठ लगेचच अलंकार ल्यायलेलं, साजरं दिसणारं पण काहीतरी खूप महत्वाचं, आतलं असं हरवलेलं साजरं रूप.

डोळ्यांपुढे ती बागडणारी, स्वैर, खेळण्याची इच्छा असणारी मुलंच आली एकदम. आणि नंतर त्यांना ओरडणारे, त्यांना शिस्त(?) लावणारे त्यांचे पालक!

अरे आपण पिढ्यान पिढ्या हेच तर करत आहोत. मुलांना शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांचं निजरूपच नष्ट करून त्यांना पूर्ण पालटवून टाकायच. मग आपल्या मनातला आकार देण्याचा वांझोटा प्रयत्न करायचा. मूळ रूप हरवतं ते हरवतं कायमचच. पण आम्ही मात्र आमच्या मनाप्रमाणे संस्कार(!) करून कस घडवल आपल्या मुलांना याचं वृथा समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवून भरून पावतो.

7 comments:

 1. पुनर्भेटीचा आनंद आहे. असंच दिसामाजी काही तरी लिहावे. ही अपेक्षा. महाराष्ट्रातील अनवट वाटा / स्थळांचा धांडोळा घेत जा

  ReplyDelete
 2. अप्रतिम. अशा आणखी रूपकांचा शोध घ्यायला हवा.

  ReplyDelete
 3. nice article !

  Dr.Asmita Phadke

  ReplyDelete
 4. अप्रतिम ! विचार पटला . मुलांचे निजरूप जपायला हवे यात दुमत नाहीच. फक्त कसे व किती मात्रेत हा प्रश्न आहे. ह्याचा नेमका उलगडा होईपर्यंत मुले मोठी होऊन जातील असे वाटते.
  मुलांचे निजरूप जपल्यानेच त्यांची खऱ्या अर्थाने वाढ होईल . इतकेच नाही तर काही मोठ्या माणसांचे " आम्ही कसे घडलो " यासंबंधीचे अनुभव वाचले तर असे लक्षात येते की योग्य वेळी पतंगाला योग्य मात्रेत ढील दिली की जसा तो वरवर चढत जातो तद्वतच त्यांच्या पालकांनी त्यांना वाढवले आहे. पण तुमच्या लेखाने विचार करायला भाग पाडले हे नक्की .
  आणखी एक ! अंतराचे गणित तुमच्यासारखेच मलाही किलोमीटर पेक्षा वेळेच्या माध्यमातून जास्त कळते. त्यामुळे माझाच अनुभव वाचत आहे असे वाटले.

  ReplyDelete
 5. sarang charankar
  Feb 13
  Anand,

  Really a good article. that place is known as KOLE NARSINGPUR, just 10 kms from Islampur and our KUL DAIVAT.
  We had been there for so many times but u had so many minute observations which were noticed by us but not given so serious thoughts about it. recently this temple is rennovated and now in 10 steps u can reach the basement, i.e.main idol of Nrusinh, which is 450 yrs old. Another pecularity of the river, no drought or water scarcity till this date in that area.

  Your style of writing is wonderful and many thanks for ur nice article.

  Sarang

  ReplyDelete
 6. madhavi kulkarni
  15.02.2014
  blog var reply cha prayatn punha ekda fail gela.atahi marathi karu shakle nahi.anyway, lekh changla watla pan shevat muddam relate kelyasarkha watla. tyat kahi chukiche nasunhi. lekhache nijroop thode haravlech! likhanatli sahajta tu evena estbish keli ahes, ashay ani shevathi titkach sahaj asava ani he tula sangitle pahije ase watle. keep it up.

  ReplyDelete