Monday 12 August 2013

Austria Zel Am See I


इन्स्ब्रुकहून निघून आम्हाला पोहोचायचे होते झेल आम सी (Zel Am See) या गावी. इन्सब्रुक हे मोठे शहर. सर्व सुखसुविधांनी युक्त असे. आताचे हे अगदीच छोटे गाव असणार होते. आमचा प्रवास साधारण २-३ तीन तासांचा. गाडीचा वेग अर्थातच चांगला होता. इन्सब्रुकहून OEBB या ऑस्ट्रियन रेल्वेने झेल आम सीला जाता येते. प्रथम युरो स्टारने व्योरगल Wörgal स्टेशन आणि तिथून झेल आम सी. व्योरगलपर्यंत त्यांची स्पीड ट्रेन होती. त्यानंतर आपली लोकल, पासिंजर जी म्हणाल ती, वजा आपला स्पीड आणि गैरव्यवस्था. दोन किंवा तीन डब्यांची ही गाडी, त्यात स्क्रीन आणि घोषणा दोन्ही असतात. गाडीचा वेग स्क्रीनवर कळतो, बाहेरचे तापमान कळते. यात स्वच्छतागृह असते, ते स्वच्छ असते, त्यात पाणी (गरम आणि गार दोन्ही) आणि टॉयलेट रोल असतो. या सा-याची जो कोणी व्यवस्था ठेवत असेल त्याला मानलं पाहिजे कारण आम्हाला एकूण प्रवासात एकदाही रोल नाही किंवा पाणी नाही असं आढळलं नाही. तर गाडी व्योरगलला आल्यावर बदलली आणि लगेच लक्षात आलं आता काहीतरी वेगळं दिसणार आहे. नेहेमीच्या मार्गापासून फटकून जाणारा असा मार्ग, एकच लाइन, कारण वाटच तशी अगदी अरूंद, रानावनातून जाणारी. एका बाजूला दरी तरी किंवा डोंगराची भिंत तरी. नदीची सोबत होती. दूरवर वेडा वाकडा रस्ताही लपंडाव खेळत जंगलात नाहीसा होत मधेच सामोरा येत होता. नजर खिळवून ठेवणारा हा प्रवास आणि तेव्हढ्यात दूरवर आल्प्सची बर्फाच्छादित शिखरं दिसली आणि अंगावर काटा उभा राहिला. अभिजात सौंदर्य म्हणतात ते असे अचानक सामोरे आले.

एक विस्तीर्ण तलाव डावीकडे दिसू लागल्यावर श्रीशैल म्हणाला चला, आलं स्टेशन आणि लगेच अनाउन्समेंटही झाली. See हा तलाव या अर्थीच वापरलेला जर्मन शब्द. हा अल्पाइन तलाव. अल्पाइन म्हणजे आल्प्समधल्या पाण्यापासून तयार झालेला. स्टेशन अगदी छोटसच. स्टेशन लहानस म्हटलं तरी लिफ्टसह सगळ्या सुविधा होत्या. जिन्याच्या ठिकाणी सायकलकरता उतारही होता. रेल्वेस्टेशनला लागून एका बाजूला तो विस्तीर्ण असा जलाशय आणि उजव्या बाजूला टाऊन. टाऊन कसलं आपली खेडी तरी लोकसंख्येने याच्यापेक्षा जास्त असतील. पण इन्सब्रुकनंतर इथे आल्यावर शहर आणि गाव किंवा फारतर तालुक्याचं ठिकाण असावं असं गाव यातला फरक कळत होता. बाहेर बसेस उभ्या होत्या. तिथे चौकशी केली पण कोणाला तसं नीटपणे सांगता येईना. मग नेहेमीचा पर्याय शोधला. शोधायची गरज अर्थातच नसते कारण स्टेशनातून बाहेर पडताच तो दिसतो. i हे information चे चिन्ह ठळकपणे दिसते. सिटी सेंटर जवळच होते आणि तिथेच हे इन्फर्मेशन सेंटरही. ऑफिसमधे आमच्या आधी आलेली माणसे काउंटरवर दिसत होती, त्यांचं झाल्यावर जाऊ म्हणून आम्ही मागे उभे राहिलो तोवर एक बाई पुढे आली आणि तिने विचारायला सुरवात केली. पत्ता बघितल्यावर नकाशा समोर ठेवला आणि त्या घराची, आम्ही जे अपाटमेंट बुक केले होते, त्याची दिशा, अंतर दाखवले. एकूण २०-२५ मिनिटाची चाल असेल आणि बसने गेलात तर पुढच्या चौकात पोस्टाजवळ बस मिळेल पण अर्ध्या तासाची फ़्रिक्वन्सी आहे त्यामुळे वाट बघण्यापेक्षा चालत जाणं श्रेयस्कर हे ही तिने सांगितलं.

आम्ही त्या पोस्टाच्या चौकात आलो आणि बसचा विचार सोडून चालायला लागलो. शांत पहुडलेला रस्ता, दोन्ही बाजूने घरं पण तशी फारशी जाग नसलेली, तुरळक अंगणात काम करणारी मंडळी. एका ठिकाणी घर उतरवायचं, हो, पाडायचं काम चालू होतं. असं सारं बघत रमत गमत निघालो. समोर आल्प्सची शिखरं अगदी हाकेच्या अंतरावर होती. सामान टाकू काहीतरी खाऊन घेऊ आणि लगेच डोंगरावर जाऊ हा विचार प्रत्येकाच्या मनात आला. त्याला छेद अर्थातच स्टेशनला उतरल्यावर दिसलेला "सी" होता. ठीक आहे नंतर ठरवू म्हणून निघालो. २०-२५ मिनिटे म्हणताना सामान जवळ आहे त्याचा विचार केला नव्हता. शिवाय या डोंगरी लोकांची २० मिनिटे, आपली किती हा ही मनात न आलेला विचार. रस्ता सरळ म्हटला तरी चढ होताच. सावकाश, न दमता जायचं ठरवून पुढे गेल्यानंतर ओळखीच्या खुणा दिसू लागल्या. त्यांनी सांगितलेल्या खुणेपर्यंत आलो. मुख्य़ रस्त्याची साथ सोडून एक रस्ता आणखी चढ घेऊन वर जात होता. कच्चा रस्ता. दुतर्फा असलेली सुंदर छोटी घरं, त्याभोवतालची बाग असं निरखून बघत असता एक दुमजली काळ्या रंगाचं घर दिसलं, Haus Opitz. घरामागे फक्त डोंगर आणि घनदाट जंगल. या घरापुढे एक घर सोडून बाकी काही दिसत नव्हतं. पुढे डोंगराची आणखी चढण फक्त! घराला दोन नाही तीन मजले होते.

बेल वाजावली पण उत्तर नाही. प्रश्नार्थक नजरेने आम्ही श्रीशैलकडे बघत होतो. तो नेहेमीप्रमाणेच कूल होता. त्याने शांतपणे फोन लावला आणि पलीकडून त्याला सांगितलं गेलं, तिथेच बसा आम्ही १० मिनिटात पोहोचतो. दुकानातच आहोत. आम्ही घरासमोरच्या बागेत विसावलो. सांगितल्याप्रमाणे एक बाई ड्राइव्ह करत असलेली गाडी दाराशी थांबली. Wish करून एक गृहस्थ त्यातून उतरला. बाई गाडी गराजमधे ठेवायला गेली तोपर्यंत तो आमच्याशी बोलत होता. बाईने काहीतरी त्याला विचारले. एकूण टोनवरून बाईच्या स्वभावाप्रमाणे "बाहेरच काय उभे करून ठेवले आहेत त्यांना" असे विचारले असावे. त्याने काहीतरी उत्तर दिले बहुधा "चाव्या कोणाकडे आहेत?” अशा स्वरुपाचं काहीतरी! (आपल्या विचारांप्रमाणेच आपण दुस-याची पारख करतो!) त्याबरोबर लांबूनच जुडगा फेकून ती मोकळी झाली. त्याने दरवाजा उघडला आणि आम्ही धन्य झालो. मसाल्याच्या अगदी सुंदर वासाने आमचं स्वागत झालं. इन्सब्रुकला सिटी सेंटर मध्ये फिरताना मसाल्याच्या रिंग्स बघितल्या होत्या त्यांचा उपयोग इथे केला होता. फारच प्रसन्न स्वागत झाले. आम्हाला तिस-या मजल्यावरची खोली दिली होती. बाहेर एक बेड आणि किचन आतल्या बाजूला डबल बेड असलेली खोली. बाकी व्यवस्था नेहेमीप्रमाणे चोख होती. या घराला मागल्या बाजूला बाल्कनी होती. मागल्या बाजूला कुठे म्हणून निराश होण्याआधीच तीमधून दिसणरं जंगल, त्यातली पायवाट आणि धबधब्याची गाज याने आम्ही खूष झालो. बेडरूममधून खिडकीतून बघितले तर समोरच्या घरातील मुलांसाठीची घसरगुंडी वगैरे दिसलीच पण एक छोटा पोहोण्याचा तलाव, जमिनीच्या वर लाकडाने बांधलेला दिसला. प्लॅस्टिक शीटने झाकून ठेवलेला. श्रीशैल खालच्या मजल्यावर घरमालकांकडे जाऊन [पैसे देणे वगैरे सोपस्कार उरकून वर येईपर्यंत आमचे निरीक्षण आटोपले.

तसा उशीरच झाला होता. पोटा पाण्याकडे बघण्याची आवश्यकता होती. मुख्य म्हणजे थंडीपासूनचं संरक्षण म्हणजे चहाची नितांत गरज होती. परदेशातला मोठा प्रश्न म्हणजे चहा मिळणे. यावेळी आमचा प्रश्न गिरनार चहाने सोडवला होता. येण्यापूर्वी दादरला त्या दुकानात गेलो तर तयार चहाची जाहिरात दिसली. चौकशी केली तर त्यांनी सांगितलं पावडर आहे फक्त गरम पाण्यात टाकली की चहा तयार! साखर दूध काहीच नको. इथे आम्हाला किचन होते म्हटल्यावर गरम पाण्याचा प्रश्न नव्हता. चहाचे चारही म्हणजे मसाला, गवती चहा, आलं आणि केशर असे प्रकार आमच्या बरोबर होते त्यामुळे यावेळी खरच चैन होती. चहा घेऊन आम्ही बाहेर निघणार एव्हढ्यात दारावर टकटक झाली. त्या बाईने श्रीशैलला जरा खाली येता का म्हणून रिक्वेस्ट केली. कदाचित काहीतरी राहिलं असावं असं म्हणेपर्यंत तो वर आला. तिने चुकून त्याच्याकडून जास्त पैसे घेतले होते, हिशेबातली चूक, ते परत देण्यासाठी आमंत्रण होते. Great! जी गोष्ट आमच्या लक्षात येण्यासारखीही नव्हती ती लक्षात येताच तिने ताबडतोब दिलगिरी व्यक्त करून सुधारली होती.

बाहेर आलो आणि खेटून उभ्या असलेल्या डोंगराच्या दिशेने आमचे पाय वळले. इथे प्रत्येक ठिकाणी पाट्या दिसत होत्या. पायवाटांवर दिशा दाखवल्या होत्या. वेळ होती दुपार टळून गेल्याची म्हणजे फार वेळ हाती नव्हता. तर डोंगर वाटेने झेल आम सी पर्यंत ४० मिनिटांच्या दाखवलेल्या रस्त्याने निघू या असं ठरवून निघालो. या पाट्यांवर लाल काळ्या अशा रंगांनी रेषा दाखवल्या आहेत. त्या मार्ग सोपा ते खडतर कसा ते (उदा काळ्या रंगाची रेष अतिशय खडतर मार्ग दाखवते) दर्शवतात. दाट झाडी, इथेही अर्थातच देवदार, पाइनची लागवड. पायवाट अरूंद असली तरी व्यवस्थित होती. रमत गमत जाण्यासारखी. एकदम थबकलो. वेडावणारा गंध! या जंगलात? इथे तर फक्त रंगांची उधळण करणारी वासरहित फुले असतात हा समज. अनपेक्षित एखादा जुना मित्र भेटावा तसा हा गंध! न्यूयॉर्कच्या एका रस्त्यात असाच अचानक भेटला होता. जवळच पांढ-या फुलांचे घोस असलेले झाड होते. जवळ जाऊन बघितले. अंदाज बरोबर होता. घमघमाटाने त्यानेच आम्हाला आवतण दिले होते. नंतर तशी खूप झाडं भेटली पण हे पहिलेच म्हणून त्याची आठवण कॅमे-यात बंदिस्त झाली.

४० मिनिटे म्हटले तरी खूप वळणा वाकणाचा तो रस्ता खूपदा खाली वर करत पुढे जात आम्हाला हुलकावण्या देत होता. दूरवर जलाशयाचं अथांग पाणी त्याच्या लोभस निळ्या रंगाने खुणावत असताना आम्हाला घरं दिसू लागली आणि दहा मिनिटात आम्ही त्या सी च्या तीरावर पोहोचलो. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची तर तीन कि. मी पेक्षा जास्त विस्तार असलेला हा विस्तीर्ण तलाव. मधेच दमायला झालं तर बोटीतून परत यायची सोय. अशा सुविधा इथे आहेत, अर्थात सीझनमधे. निवांत जलाशयाकडे आणि त्यातल्या विहार करणा-या राजहंसांकडे पहात बसलो. समोर आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे, चहुकडून तलावाला कवेत घेणारी. आमच्या मागे रेल्वे स्टेशन त्याच्या पलीकडे गाव आणि त्यापलीकडे पुनः आल्प्स! दूरवरून एक सुंदर लाल रंगाचा ठिपका जवळ येत होता डौलदारपणे. OEBB, इथल्या रेल्वे कंपनीचं नाव, ची गाडी झोकात येत होती. या निसर्गात सहजपणे मिसळून जावी तशी. संध्याकाळ होऊन गेली होती. म्हणजे आठ वाजले होते आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता. सिटी सेंटरमधली दुकानं बंद होऊनही तास उलटले होते. आता जाग होती ती फक्त पब्ज आणि बार्स यांची. तशी हॉटेल्सही सुरू होती पण तुरळकपणे. परतायला हवं होतं म्हणून निघालो.





फोटोकरता या लिंकवर क्लिक करा

                                                                                                                                ( to be continued)

2 comments:

  1. Beautiful, as if I am travelling with you. Your writing has ability to take the reader there with you.

    ReplyDelete
  2. आनंदा ,
    झेल आम सी (भाग १) ही तितकाच सुंदर.
    विलास

    ReplyDelete