Tuesday, 9 October 2018

SLOVENIA : POSTOJNA JAMA



Postojna Jama 

आज लोगार व्हॅली कडे जाण्यासाठी निघायचं होतं. इथून पुढे आम्ही जिथे जिथे राहणार त्या अगदी छोट्याशा गावांमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या बाबत बोंब होती. त्यामुळे गाडी भाड्याने घ्यायची ठरलं होतं. श्रीशैलच्या ड्रायविंगचा अनुभव गेल्या वर्षी स्कॉटलंडला घेतला होता. पण तो सरळ रस्त्यावरच्या चालवण्याचा. इथे घाटातले वळणाचे, अरुंद आणि धोकादायक रस्ते असणार होते. मनात धाकधूक असते आणि ती बोलून दाखवायची नसते. ही पथ्यं पाळावीच लागतात नाहीतर चालवणाऱ्या व्यक्तीचा मनोभंग होण्याची शक्यता.

घरातून निघताना पुनश्च टॅक्सी प्रकरण. पण आता आम्हाला तिळा उघड हा मंत्र सापडला होता. टॅक्सी आली. त्याला आम्ही बस स्टॉपवर घ्यायला सांगितली तर त्यानेच आपणहून विचारलं, कुठे जाणार? एअरपोर्ट म्हटल्यावर म्हणाला कशाला बस हवी? मी सोडतो ना २० युरोमध्ये! अगदी आंधळा मागतो एक तसा प्रकार झाला. अर्थात ही सोय फक्त फोनवरून बुक केलेल्या टॅक्सींना आहे. जर तुम्ही रस्त्यावर उभ्या टॅक्सीत बसला असाल तर मात्र रेट वेगळा.

आम्ही एअरपोर्टला जाऊन गाडी घेतली तो सकाळी साडेदहाचा सुमार. यांच्या नियमाप्रमाणे चोवीस तासाचा दिवस याप्रमाणे तीन दिवसानंतर साडे दहाच्या आत गाडी परत करायला हवी. सूट फक्त अर्ध्या तासाची. त्यानंतर मग एक दिवसाचा आकार, अधिक इन्शुरन्स आणि काँट्रॅकट न पाळल्याबद्दल दंड असे पैसे भरावे लागतील. सगळं ऐकून मला धडकी भरली कारण आम्ही जाणार ते अंतर किलो मीटरच्या हिशोबात आवाक्यात दिसत असलं तरी रस्त्यांच्या बाबत काहीच माहिती उपलब्ध नव्हती. श्रीशैल मात्र हल्लीच्या भाषेत कूल होता.

Postojna Jama

एअरपोर्ट वर गाडी घेतली आणि निघालो. नेहेमीप्रमाणे माझं रस्त्याकडे लक्ष नव्हतं, (यात नेहेमीप्रमाणे याच्यापुढे स्वल्पविराम हवा पण तो चुकून राहून गेला असेल असं आपल्याला वाटत असेल तर ती गैरसमजूत आहे, ते लक्ष नव्हतं याचं विशेषण आहे याची कृपया नोंद घ्यावी!!!) पुढे बसणाऱ्याची जबाबदारी वगैरे कर्तव्य माहित असली तरीही. थोड्या वेळाने पाट्या वाचताना लक्षात आलं अरे हा तर कालचा पिरानचाच रस्ता! सगळ्या खाणाखुणा पाठ झाल्यासारख्या होत्या. एका ठिकाणी काम सुरु होत त्यामुळे अर्धा रस्ता बंद होता. वाहनं हळू जात होती. टोल जवळ आल्यावर पुनः वेग मंदावत होता. गाडीतील जीपीएस सतत बदलत्या वेग मर्यादेची आठवण करून देत होतं. पण चालवणारे त्याकडे दुर्लक्ष करत शंभरावर वेगाने जात होतेच. आमचा "चालक" ही अपवाद नव्हता. पण वाहतुकीला एक शिस्त होती आणि त्यामुळे तो वेगही आश्वस्त करणारा होता.

जेमतेम ७५ किलोमीटरचा रस्ता. वाटेतले अडथळे आणि काही भागातला अरुंद रस्ता वगळता असलेला हाय वे यामुळे आम्ही कधी पोहोचलो ते कळलं नाही.


आधी या जामा, याचा 'उच्चार यामा करायचा कारण यांचा J हा Y सारखा असतो, या शब्दाचा स्लोवेनियन भाषेतला अर्थ, Caves किंवा गुहा. या निसर्गनिर्मित गुहा आहेत. इथे चुनखडीचा दगड खूप आढळतो. पाण्याच्या प्रवाहाने काही ठिकाणी हे खडक फोडून विविध आकार तयार झाले आहेत. अशा पुष्कळ गुहा या देशात आहेत, त्यातली ही मोठी आणि महत्वाची गुहा. 


पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. आपण जातो तो स्वागताला बाग बगीचा आहे, पाण्यावर चालणारी पाणचक्की आहे वगैरे. पायऱ्या चढून जाण्याचे कष्ट घेऊन आपण तिकीट काउंटरवर पोहोचल्यावर आपल्याला इतर कष्ट काहीच नाहीत. तिकीट काढायचं आणि प्रवेशद्वारावर जायचं. तिकिटावर वेळ लिहिलेली असते. तिथे गेल्यावर तुम्हाला भाषेचा पर्याय विचारला जातो. प्रत्येक भाषेची वेगळी रांग असते. स्लोवेनियन, इटालियन, जर्मन, इंग्रजी अशा रांगांमध्ये ढकलाढकली न करता उभे राहण्याची जबाबदारी आपली. आत सोडताना भाषावार आत सोडतात. सगळ्या गुहेत आपण एका ट्रेनमधून फिरतो. इतक्या वेड्यावाकड्या ठिकाणी ही सोय फारच भारी वाटते. तिकीटाची रक्कम बघून मी श्रीशैलला म्हटलं फारच महाग वाटत आहे , जाणं इतकं आवश्यक आहे का, त्यावर तो फक्त हसला. अर्थात इकडे आलो ते त्याचा काहीतरी पूर्वाभ्यास असल्याखेरीज नाही हे मलाही पूर्ण माहित आहे तरीही..... (जित्याची खोड, दुसरं काय म्हणणार !)

रांग शांत आहे पण एवढ्यात काही माणसं घोळक्याने एकदम पुढे येऊन उभे राहतात. चेहेरा मंगोल म्हणजे चीन जपान असा कोणतातरी देश. या माणसांबद्दलचा आमचा हा पहिला अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी एक प्रकारची नकारात्मक भावना वाढायला मदत होते आहे. अर्थात कोणीही काही बोलत नाही. हेसुद्धा या युरोपीय लोकांचे वैशिष्ट्य म्हणायचे का, अशी शंका जरूर येते.

भाषावार आत सोडण्यामागले तत्व कळते. गाडी म्हणजे दोन माणसं बसू शकतील अशा एकामागे एक असलेल्या सीट्स. प्रत्येक भाषेची वेगळी गाडी. ती क्रमाक्रमाने काही वेळ मध्ये ठेवून सोडतात. अर्थातच उघडी, छप्पर नाही अशा त्या गाडीत बसताना जत्रेत बसल्यासारखं वाटतं. गाडी आहे मात्र विजेवर चालणारी. प्रदूषण नियंत्रणाचा प्रयत्न असावा. या गुहा एकाला एक लागून, काही ठिकाणी मध्ये दरीने विभागलेल्या अशा आहेत. त्या सलग नाहीत. अर्थात या आमच्या ट्रीपमध्ये आम्हाला दिसणार आहेत त्या गुहा सलग नसल्या तरी जोडलेल्या आहेत.

पिवेक ही नदी. तिच्या जोरदार प्रवाहाने खडक फोडून तयार केलेले आकृतिबंध हे या गुहांचं स्वरूप. निसर्ग हा जगातला सगळ्यात मोठा कलाकार आहे ही आमची या स्लोव्हेनिया प्रवासाची थीम ठरावी असे प्रत्येक टप्प्यावर आम्हाला जाणवत होते. आजच्या दिवसात त्याची शिल्पकारीमधली गती तो आम्हाला आत्ता दाखवणार होता.


गाडी झोकदार वळण घेत पाण्याचा प्रवाह ओलांडून आत शिरली आणि सगळ्या लोकांच्या जॅकेटच्या चेन्स वर ओढल्या गेल्या. बाहेरच्या तुलनेत एकदम थंडाव्याची लहर आली. त्या धांदलीत मग कॅमेरे निघाले, मोबाईल सुरु झाले. फ्लॅश नको ही सूचना वारंवार देऊनही फ्लॅशचा प्रकाश आणि गाईडच्या सूचना ऐकू येत होत्या.




आत्ता आम्ही बघत होतो तो ट्रेलर होता. पण तोच इतका भारी होता की मघाचा तिकिटाच्या रक्कमेबद्दलचा माझा आक्षेप कुठल्या कुठे निघून गेला. गाडी पुढे जात असताना डावीकडे बघू की उजवीकडे बघू हे कळत नव्हतं. आत इतक्या ठिकाणी त्यांनी दिव्यांची उत्तम व्यवस्था केली आहे की कुठेही काळोख नाही, प्रकाश आहे पण भगभगीत नाही उलट त्या वातावरणातली गूढता गडद करणारा प्रकाश खूप सुखावह वाटला. सगळ्या गुहाभर फिरून गाडी आम्हाला प्रवेशद्वाराशी परत आणून सोडणार अशी माझी समजूत!

पण काही वेळानंतर गाडी एका ठिकाणी थांबली. गाईडने सगळ्यांना एकत्र करून सूचना दिली. इथून पुढे ज्यांना चढाचा त्रास असेल त्यानी डाव्या बाजूने चालत जाऊन स्टेशनवर थांबावं. तिथून परतण्याच्या गाडीची सोय आहे. बाकीचे इथून वर जातील. काहीसा निसरडा असा तो चढ, पण रेलिंग्स आहेत, पुरेसा उजेड आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे काय या उत्सुकतेत भर घालणारा माहोल आहे. आमच्यातले कित्येक वयस्क ज्यांच्या हातात काठी होती तेही थांबून परतण्याचा वेडेपणा करू शकले नाहीत.

पाण्याच्या प्रवाहाने हे चुनखडीचे खडक छतापासून तोडले नाहीत, तर त्यांना जमिनीतून वेगवेगळ्या आकारात अलग केलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी जमिनीवर उभे असलेले विविध आकाराचे कोरीव स्तंभ तर काही ठिकाणी छतापासून लोंबणाऱ्या त्या विविध आकृती! कॅमेऱ्यात किंवा व्हिडिओमध्ये टिपल्या जाणं केवळ अशक्य आहे असं ते सौंदर्य . ती प्रत्यक्ष बघायची आणि अनुभवायची गोष्ट आहे. प्रत्येक माणूस, तरीही लोभ मोह यापासून दूर न जाऊ शकलेला माणूस, पुनः पुनः त्याच मोहात फसत फोटोचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एका क्षणानंतर मी त्यापासून दूर गेलो आणि फक्त डोळ्यामध्ये जितकं साठवता येईल तितकं साठवण्याचा प्रयत्न करत राहिलो.

गाईडची माहिती देणं सुरु होत. या गुहांचा शोध लागला तो अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी. पण या ठिकाणी पोहोचणं हे काही सोइची गोष्ट नव्हती.प्रथम तर ओढावी लागणारी गाडीच होती. नंतर मग डिझेलचं, विजेचं इंजिन असे टप्पे घेत ही आजची सुधारणा. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी या गुहांमध्ये स्फोटकांचा साठा ठेवला होता. तो जाळून नष्ट केला तेव्हा या निसर्गशिल्पांची खूप हानी झाली. इथे बांधलेल्या पुलाला रशियन पूल म्हणतात कारण तो रशियन युद्धकैद्यांच्या कडून बांधून घेतलेला आहे. या चुनखडीच्या डोंगरात सर्वत्र पांढरा रंग आहे पण मधूनच ती शिल्पं काळी दिसतात. हे माणसाचं कर्तृत्व! कितीही नको सांगितलं तरी त्या शिल्पांना हात लावण्याचा लोभ काही माणसं आवरू शकत नाहीत आणि त्या स्पर्शाने लगेच ते काळं पडतं. काही ठिकाणी लाल आणि ग्रे रंगही दिसतो तो त्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोह किंवा मँगेनीज धातूच्या अस्तित्वामुळे.

गाईडची माहिती ऐकता ऐकता आम्ही पुढे सरकत होतो. एका ठिकाणी तिने निरोप घेतला आणि आम्हाला कुठे जमायचे आहे ते सांगून ती निघून गेली. या देशात इंग्रजीचा तसा संबंध नाही पण व्यवस्थितपणे ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचत होती. भाषेचं तिचं ज्ञान आणि हातात असलेला लाऊड स्पीकर दोन्ही उत्तम होते. विचारलेल्या शंकांना उत्तर मिळत होती. गाईड हे प्रशिक्षित माणसाचं काम आहे ही जाणीव आपल्याकडेही आली तर, हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

उरलेला भाग रमत गमत फिरून आम्ही पुनः त्या स्थानकापाशी आलो. आता आम्हाला बाग बगीच्यामध्ये रस उरला नव्हता. हे असं आम्ही किती म्हटलं तरी आम्हाला बाहेर आल्यावर आठवण झाली इथला राजवाडा बघायचा राहिला आहे अजून! आभाळ भरून आलं होतं. आता घाई करण्याची आवश्यकता होती.


राजवाडा डोंगराच्या घळीत बांधला आहे. इतक्या दुर्गम भागातलं ते बांधकाम अचंबित करणारं आहे. आम्हाला अर्थातच आत जाण्यात रस आणि वेळ नव्हता आणि पावसाचा रंग बघून पुढचा टप्पा लवकर गाठण्याची उत्कंठा स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी पुनः कधीतरी या नेहेमीच्या आश्वासनावर पुढे निघालो. 



फोटोवरून कल्पना येणं कठीण असं जरी म्हटलं तरी ते द्यायचा लोभ आवरत नाही.






  


Saturday, 29 September 2018

SLOVENIA : PIRAN


पिरान


दुसऱ्या दिवसाची सकाळ. बाहेर बघतो तर समोरचं मैदान गायब! आकाशातले पांढरे ढग जमिनीवर अवतरले होते. काही म्हणजे काही दिसत नव्हतं. पुलंच्या अपूर्वाई मधल्या लंडनच्या धुक्याच्या वर्णनाची आठवण झाली. बाहेर तापमान होत ९ डिग्री. आज काय? हा आता प्रश्न होता. शहर तसं लहान आहे. आपण शेवटच्या दिवशी पुनः इथे येणार आहोतच त्यावेळी जर बघायला काही नसेल तर आणखी बोअर होईल त्यापेक्षा आज आपण पिरान नावाचा बीच आहे, आहे जरा लांब, पण बसने जाता येतं. तिथे दिवसही मजेत जाईल. श्रीशैलने असं म्हटल्यावर मग इथल्या किल्ल्याचा बेत रहित करून आम्ही पिरानला जाण्यासाठी निघायचं ठरवलं. आता टॅक्सीला फोन करू आणि निघू म्हणून फोन लावला तर अगम्य भाषेत सुरवात झाली. इंग्रजीतून बोलण्याची विनंती केली तर कालच्याप्रमाणे फोन कट केला. पुनः फोन लावला आणि तशीच सुरवात फक्त यावेळी कोणी बाई होती (कालचीच होती का? न कळे) आणि तिला इंग्रजी निदान कळत असावे. तिने पत्ता काय विचारलं. आता पुनः कालचाच प्रश्न. पत्ता हातात होता पण उच्चार? तिला स्पेलिंग सांगावं तर आपण a म्हणावं तर ती e समजणार आकड्यांचाही तोच घोळ. तिला मोबाईल नंबर विचारला. तिने सांगितला आणि इंग्रजीमध्ये कन्फर्म केला. दहा मिनिटात टॅक्सी दारात हजार झाली. त्याला पत्ता सांगताना आता प्रश्न नव्हता कारण स्टेशन आणि बस स्टॉप हे शब्द त्यानेही ऐकलेले असावेत!

बस अगदी वेळेत शिस्तशीर सुटली. रस्ता उत्तम, आजूबाजूला झाडांचं आच्छादन, दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर बर्फ होतं का? आम्ही आमच्यात वाद घालत असताना एक डोंगर अगदी जवळ आला तेव्हा जाणवलं हे चुनखडीचे डोंगर आहेत. जिथे खणला आहे तिथे ते पांढरे दिसतात आणि दुरून बर्फाचा आभास निर्माण करतात. एक मात्र, हा मागास (?) देश पण इथे त्या रस्त्याजवळच्या डोंगरांना जाळ्या बसवून वाहतूक सुरक्षित केली होती. ही लक्षणं मागासपणाची असतील तर आपल्याकडे नसलेल्या जाळ्या आणि देवाच्या भरवशावर टाकलेली माणसं या स्थितीला आपण कोणत्या श्रेणीत घालायचं?

पिरान येण्याआधीपासून दूरवर समुद्र दिसायला लागला होता. निळंशार पाणी हे आता अप्रूप न वाटण्याजोगी गोष्ट झाली होती का? सायकलवरून त्या डोंगराळ भागात हौशी पर्यटक दिसत होते. मधेच कुठे प्रोमेनेड आणि समुद्रस्नानाची सोय अशा जागा होत्या. पिरान आलं. अगदी अरुंद रस्त्यावरून एका अशक्य चिंचोळ्या गल्लीत यु टर्न घेऊन बस थांबली.

आम्ही सकाळी निघालो तेव्हा तापमान होतं ९ डिग्री. अर्थात अंगात स्वेटर होता. खाली उतरलो तर २३ डिग्री! कुठे लपवायचं याला? असं वैतागून म्हणत त्याला कमरेला गुंडाळलं आणि पुढे आलो.

एका बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला दूरवर एक किल्ला आणि उंचावर एक चर्च. आम्ही इथे दिवसाच्या ट्रीपला आलो आहोत याचं भान राखून आता ठरवायला हवं होतं. किल्ला तसा दूर आणि चढावर होता. समुद्र आम्हाला खुणावत होता आणि ते चर्च शहराच्या विहंगम दर्शनाकरिता उत्तम वाटत होतं. येताना आत्ता समुद्राचं दर्शन झालं होतं तरी एकतरी चक्कर म्हणून फिरून घेतलं. इथे पुळण नाही. त्यामुळे रस्ता आणि समुद्र यामध्ये त्यांनी चालण्याकरता रस्ता तयार केला आहे. काही जण समुद्र स्नानोत्तर उन्हात पहुडले होते. आम्ही बोटी वगैरे नेहेमीप्रमाणे बघून फोटो काढून चर्चच्या दिशेने निघालो. एक छान विस्तृत चौक लागला. तिथे सिटी सेन्टर असावं. निवांत बसायला आलेली लोकं, प्रवासी आणि पलीकडे असलेला इन्फर्मेशन किऑस्क यामुळे खूप लोकं दिसत होती.

अशा या माहोलमध्ये खरं आकर्षण असत ते लहान मुलांचं. छोटी, अगदी दोन तीन वर्षांची ही गोरी, ब्लॉन्ड मुलं, मुली इतकी उत्साही असतात की त्यांच्या निरीक्षणात आपल्यामध्ये उत्साहाची भरणी होते, थकवा निघून जातो. इथे मुलं चालायला लागली की छोटी सायकल आणून देतात. पॅडल नसलेली ती सायकल मुलं तोल सावरत दोन्ही पाय मारून चालवतात तेव्हा त्यांच्यावर नजर खिळली जाते. मग त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढायला त्यांचे आई बाबाच नव्हे तर आमच्यासारखे पर्यटकही मोबाईल/ कॅमेरा घेऊन सरसावतात.





आम्ही चौक ओलांडून पुढे निघालो. चर्च बघण्यात फारसा रस नव्हता. पण त्याची लोकेशन फार छान होती. इथून गाव नजरेच्या टप्प्यात होतं. छानच दिसत होतं. मला तर आपल्या उत्तरेतल्या गाव/ शहरांची आठवण झाली. उतरत्या छपरांची, लालबुंद कौलं घातलेली ती एकाला एक खेटून असलेली घरं, एखाद्या घरावरची एकांतातली, आपल्याकडे बरसाती असावी तशी अरुंद- उभट खोली.. 








इथे वर असलेल्या या आवारात फोटो सेशन सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये रंगलेली होती. एका बाजूला एक जोडपं, तो, त्याच्या जरा रावडी वाटावा अशा कुत्र्यासोबत आणि ती, तिच्या उंदरासारखं तोंड असलेल्या अगदी किरट्या अशा दोन कुत्र्यांसह आपापल्या "बाळाचं" कौतुक करण्यात गुंग होते. तिला एकदम लहर आली आणि तिने तिचा फोटो काढायला नवऱ्याला फर्मावलं. तो बिचारा एका हाताने त्या रावडीला सांभाळण्याची कसरत करत तिचे फोटो काढू लागला.


आता दोन रस्ते होते. एक समुद्राची कड घेऊन डोंगराला पाठीशी घालत त्यामधून जाणारा अगदी अरुंद, चिंचोळा रस्ता, फारशी रहदारी नसलेला. आणि दुसरा आलो तो, परतीचा. आम्ही जरा पुढे जाऊन तरी बघू म्हणून निघालो. इथे निवांतपणा होता. पुळण इथेही नव्हती. होता तो खडकाळ समुद्रकिनारा. पण या निवांतपणाचा आस्वाद घेत काही कुटुंबं, जोडपी समुद्रस्नानाचा आनंद घेत होती. जाताना त्या अशा अरुंद रस्त्यावरूनही, उतार चढाची पर्वा न करता जाणारे बाईकस्वार म्हणजे सायकलवाले अचंबित करत होते. इथे त्या खडकांमधले दगड गोळा करून लगोऱ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. खूप जणांना त्या रचतानाही आम्ही पाहिलं. त्याचं महत्व मात्र कळलं नाही. असेच पुढे जात किती पुढे आलो त्याचं भान आल्यावर आता जरा वर जाऊन दुसऱ्या मार्गाने परत फिरावं म्हणून निघालो खरे पण अगदी उभा चढ याशिवाय काही नव्हतं. कदाचित आम्ही या मार्गाने परत पोहोचलो असतो पण खूप दमछाक आणि लांबच्या रस्त्याने. आज आम्हाला परतीची बस पकडायची होती तेव्हा ते परवडलं नसतं. आलो त्या मार्गाने जाणं बरं म्हणून माघार घेतली.

   चर्चच्या टेरेस वरून दूरवर उंचावर दिसणारा किल्ला, समुद्राला लगटून डोंगराला फटकून       जाणारा चिंचोळा रस्ता 

बसला वेळ होता पण लोक थांबलेले दिसले. कदाचित गर्दीही होत असेल. नंतरच्या बसने परतायला उशीर आणि इथे आणखी थांबून साध्य काहीच होणार नाही म्हणून मग तिथेच थांबलो. एक बस लुब्लिआनाहून येऊन थांबली. सगळे त्या समोर रांगेत उभे राहिले. ड्रायव्हरने पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. त्याचा डबा खाऊन झाला असावा. पुनः तो दरवाजापाशी आला. मागे गेला. आता सगळ्यांचा पेशन्स संपत आला होता. बस सुटायला तीन चार मिनिटांचा अवधी, बसवर पाटीही आहे मग हा वेळ का काढतो आहे ते कळेना. शेवटी एक मिनिट असताना त्या महाशयांनी दरवाजा उघडला आणि घोषणा केली ही बस नाही पलीकडची बस निघण्याच्या तयारीत आहे.

सगळे अवाक! पण भांडायला वेळ नव्हता. आम्ही त्या दुसऱ्या बसच्या दिशेने पळत गेलो. या ड्रायव्हरचा आता संताप झाला होता. त्याला उगीचच या उशिरा आलेल्या प्रवाशांमुळे उशीर होणार होता. त्याची अगम्य बडबड त्यात सुट्टे देणार नाही असा पुकारा इत्यादी सगळ्या गोंधळात बस निघाली. आपल्याकडेच असा गोंधळ असतो असं नाही तर हे लोकही असं वागू शकतात या समाधानात आम्ही लुब्लिआनला पोहोचलो.

आयत्या वेळी आपलेच आधीचे निर्णय कसे फिरवावे लागतात आणि सगळ्याच गोष्टींचं नियोजन कागदावर आखल्याप्रमाणे प्रत्यक्षात येणं शक्य नसतं याचे हे धडे होते. आजचा दिवस या लुब्लिआनामध्ये उगवला तो ९ डिग्री सेल्सिअस हवामान घेऊन. आधीचा इथेच दिवस घालवायचा निर्णय बदलून गेलो पिरानला!  आम्ही निघताना मारे जॅकेट घालून पिरानला पोहोचलो तर तिथे २३ डिग्री! अंगात जॅकेट काय ठेवणार? त्याचं ओझं दिवसभर वागवावं लागलं. तरीही आजचा दिवस मात्र छान गेला होता आणि आता उद्याच्या दृष्टीने आपण तयारी करू या असं ठरवत आम्ही दिवसाचा निरोप घेतला. मनावर कोरलं गेलं ते सगळ्या बाजूने समुद्राने वेढलेलं, वेढलेलं?, खरं म्हणजे समुद्राच्या कुशीत पहुडलेलं टुमदार पिरान.




                            






Wednesday, 19 September 2018

SLOVENIA : LJUBLJANA



लुब्लिआना


विमानतळाबाहेरच शहरात जाण्याकरता बसचा थांबा होता. पण बसची वेळ अजून उशिराची होती. आणि त्या अगोदर आम्हाला भाड्याने घेण्याच्या गाडीची चौकशी करायची होती. त्या कंपन्यांची ऑफिसं अजून उघडायची आहेत तर निदान समोरच्या बर्फाच्छादित शिखरांचे फोटो तर घेऊ या म्हणून आम्ही मुख्य रस्त्याच्या बाजूला गेलो. "आपण नंतर येणार तेव्हा काढू या फोटो”, मी उगीचच माझी चालवून बघायचा निष्फळ प्रयत्न केला. याला उत्तराचा ठाम नकार. "आत्ता शिखरं छान बर्फाच्छादित दिसत आहेत, आत्ता लगेच फोटो. नंतर कोणी सांगा!” हा भरवसा हवेविषयीचा होता. आज उन्हात तळपणारी ही शिखरं उद्या पावसाळी हवेत झाकोळली जातील नाहीतर बर्फ वितळून मातकट होतील! याचा व्यत्यासही असू शकतो की पाऊस पडून कोवळं बर्फ अधिक मोहक दिसेल. पण तस झालंच तर पुनः फोटो काढायला कसली हरकत असणार आहे? हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवाच. तेव्हा फोटो सेशन उरकून घेतलं. आणि हो, नंतरच्या सगळ्या वेळी ढगाळ वातावरणातल्या त्या शिखरांच्या भेटीमध्ये ती शिखरं अतिशय केविलवाणेपणे आमच्याकडे बघतानाही आम्हाला बघावी लागली.




लुब्लिआना राजधानीचं शहर खरं तरी तसं ते लहानच आहे, पण सुबक आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. हा देश म्हणजे मुळात ऑस्ट्रिअन आणि नंतर ऑस्ट्रो-हन्गेरीअन साम्राज्याचा भाग. दुसऱ्या महायुद्धातील झळांनी याला कम्युनिस्ट युगोस्लावियाचा प्रांत बनवला. लुब्लिआना ही त्या प्रांताची राजधानी. असून असून किती जीव असणार तिचा? आता हे देश स्वतंत्र झाल्यावर मात्र त्यांची झपाट्याने वाटचाल सुरु आहे. आणि अर्थातच त्या अंगाने राजधानीचीसुद्धा. छोटंसं, व्यक्तिमत्व नसलेलं स्टेशन! रस्ते मात्र चांगले आहेत आणि मुख्य रस्ते प्रशस्तही.

आम्ही राहणार असलेल्या अपार्टमेंटचा शोध तसा सोपा होता. मुख्य रस्त्यापासून तसं ते जवळच होतं. मालक आम्ही फोन केल्यावर ताबडतोब चावी देण्याकरता स्वतः आला. (सर्वसाधारणपणे मालक चावी विवक्षित ठिकाणी ठेवून देतात व फोन किंवा ई मेलवरून त्याची कल्पना देतात.) आतिथ्य आणि मेहमान नवाजी दोनही गोष्टी त्याच्याकडे होत्या आणि भाषेचा अडसर कुठेही अडथळा आणत नव्हता. त्याच्याकडे आमच्यासाठी स्लीपर्स आणि छत्र्यांची सोय होती. त्याने दूध आणि पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. तिथे आवश्यक वस्तू म्हणजे मीठ, मिरपूड वगैरे तर होत्याच आधीपासून. एकूण सगळं दाखवल्यानंतर म्हणाला काही गैरसोय असेल तर सांगा. आम्ही धन्य ! जागा सोडताना चावी पोस्ट बॉक्स मध्ये टाकायची होती त्यामुळे पुनः भेट झाली नसती. तो गेला आणि जागेचा परिसर बघून घेतला. समोर मोठं मैदान आणि अर्थात हिरवळ. त्या पलीकडे मोठा रस्ता.

जाताना आमचा मालक मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. इथे तुम्ही बसपेक्षा टॅक्सीने फिरा, स्वस्त पडेल. बसचं तिकीट ४ युरो आणि टॅक्सीचा दर प्रति किलो मीटर १.९५ त्यामुळे जवळच्या अंतराकरता बसचे १२ युरो घालवण्यापेक्षा ३ ते ५ युरोमध्ये तिघे टॅक्सीने आरामात जाऊ शकत होतो.

अर्थात टॅक्सीने फिरणं वाटलं तितकं सोपं नव्हतं. फोन केला तर भाषेचा प्रश्न. इंग्रजीमध्ये बोलायला सुरवात केल्यावर पलीकडून सरळ फोन ठेवूनच दिला. पुनः केला तर कोणी बाई होती. कदाचित तिला इंग्रजी थोडं येत असावं. पण तोही भ्रमच ठरला. अर्थात तिचाही दोष नव्हता. पत्ता सांगताना आपण अल्फाबेट्स सांगणार ते इंग्रजीमधे, तिला ते कळणार कसे? त्यांचा A म्हणजे आ असतो आणि e म्हणजे ए अशी सगळी प्रमेयं कोण सोडवणार? तिला मोबाईल नंबर विचारल्यावर तिने त्यांच्या भाषेतले (ही स्लोवेनिअन भाषा रशियन भाषेच्या जवळपासची आहे असं मी वाचलं आहे ) आकडे सांगितले आणि सुदैवाने ते श्रीशैलला कळले. मग एसेमेस पाठवल्यावर टॅक्सी हजर झाली. त्यांच्या भाषेतले उच्चार आपल्याला कळणे थोडेसे कठीणच जाते. पण टॅक्सीबाबत मिळालेली ही माहिती आम्हाला राजधानीतल्या या आमच्या दोन दिवसांमध्ये खूप उपयोगाची ठरली.


युरोपात शहरात हिंडणे म्हणजे त्यांचं ओल्ड टाऊन बघणे आणि सिटी सेन्टरला भेट देणे!. छोट्या गल्ल्या बोळ तसेच्या तसेच ठेवून त्यांनी त्या ओल्ड टाऊनचं सौन्दर्य राखलं आहे. अर्थात हे तर युरोपमधील या सगळ्याच देशात दिसून येतं. फिरत असता एक गल्लीसारखी दिसली. तिथे शिरलो तर ती कलाकारांचीच गल्ली निघाली. बिल्डींगभर रंगवलेली ग्राफिटी, काही ठिकाणी उटपटांग वाटाव्यात अशा रचना. म्हणजे एका घराच्या माडीवर सायकलचं एकच चाक लटकवलेलं, कुठे भुताचे मोठमोठे कट आउट्स, पण एकूण वातावरणातच कला ठासून भरलेली. फोटो काढत असता कोणीतरी काहीतरी बोलत आहे आणि ते आपल्याकरता आहे असं वाटलं. खरतर त्या अंधाऱ्या गॅलेरीतलं आम्हाला काही दिसत नव्हतं पण तिथे एक बोर्ड होता. This is not zoo . No photographs of human . पुढे आल्यावर श्रीशैल म्हणाला चरसी/ ड्रग्जवाले होते.










आम्ही रमत गमत फिरत होतो. शहराचा एकूण मोहरा नेहेमीप्रमाणेच सुंदर साजरा होता.गावात नदी होती नदीवर पूल होते आणि त्या नदीच्या दोन्ही काठानी माणसांनी ओसंडून वाहणारी रेस्टॉरंटस होती. शहरातली शांतता इथे लोप पावली होती. सगळे धमाल मूड साजरा करायला आल्यासारखे होते. पुलांवर नेहेमीप्रमाणे प्रेमाला लॉक करणारी कुलुपं होती. आणि त्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये दोन बाजूंना लावलेल्या दोऱ्यांना बूट लटकवलेले दिसत होते. युरोपमध्ये खूप ठिकाणी आढळणाऱ्या या गोष्टीचं महत्व मात्र मला अद्याप कळू शकलेलं नाही.


इथला एक पूल खास आहे असं वाचलं होतं. या शहराच्या उभारणीत ज्याचा मोठा हात आहे त्या आर्किटेक्टने ( Jože Plečnik त्याचं नाव ) इथे नदीवर एकापुढे एक, जोडलेले असे तीन पूल (Tromostovje (Triple Bridge) बांधलेले आहेत. आम्ही तिथे रेंगाळलो खरे पण त्याचा फोटो घेणं काही शक्य नव्हतं कारण वरून उंचावरून फोटो घेऊनच ते शक्य झालं असतं. संध्याकाळच्या त्या निवांत वेळी पुलावरची गर्दी आणि आकाशातील बदलणारे मोहक रंग यांच्या भुलावणीला बळी पडणं अधिक स्वाभाविक होतं. खूपसे फोटो काढले, नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंटमधल्या वाफाळत्या (? इथे हे सुख मात्र क्वचितच मिळणार ) कॉफीचा आस्वाद, वाहत्या नदीच्या साक्षीने, घुटके घेत पिण्यातलं सुख उपभोगून आम्ही निघालो.