Monday, 2 September 2013

Austria Patsch (Innsbruck) II


पावसाने धारण केलेले रौद्र रूप, संपूर्ण रिकामी झालेली बस आणि तो हायवे! एखाद्या हॉरर चित्रपटातला प्रसंग.गांभीर्य वाढवणारा वगैरे वगैरे. इथे मात्र तसं काही घडणार नव्हतं. थोडा वेळ गेला. ड्रायव्हर त्याच्या समोरच्या आरशातून आमच्याकडेच बघत होता. त्याने खूण केली आणि बस रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. .

आम्ही उतरलो तो हमरस्ता होता. शेजारी एक हॉटेल वगळता दुसरं काहीच जवळपास दिसत नव्हते. वाहनांचा सुसाट वेग, भणाणता वारा, हातात पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्र्या आणि सामान अशा जाम्यानिम्यानिशी आम्ही रस्त्याच्या कडेला उभे! त्या हॉटेलमधे जाऊन चौकशी करायला श्रीशैल गेला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गूगलवर सर्च मारल्यावर उतरण्याचं ठिकाण बरोबर आहे हे जरी कळलं तरी तसेच पुढे जाण्याकरता ते दाखवत होतं. या हायवे वरून दोन्ही बाजूंनी वेगात जाणा-या गाड्यांबरोबर छत्र्या आणि सामान सांभाळत चालणे केवळ अशक्य होते. तरी श्रीशैल म्हणतो आहे तर जाऊ म्हणून थोडे गेल्यानंतर त्याच्याच लक्षात त्याचं वैय्यर्थ आले आणि मग त्याने शेवटचा उपाय, जो खरातर सुरवातीलाच वापरला तर उपयोगात जास्त येतो, फोन! तो लावला. अगदी निघतेवेळी बुकिंग केले होते त्यामुळे पत्ता हातात होता तरी फोन नंबर घाईत घेतला तो त्या साइटचा निघाला. त्यांनी १० मिनिटात फोन करा सांगितले. त्याप्रमाणे संपर्क साधल्यावर आम्ही जिथे उतरणार होतो तो फोन नंबर मिळाला. आम्ही बसमधून जिथे उतरलो होतो त्यापासून थोडे पुढे एक रस्ता गावात जात होता त्या रस्त्यावर पहिलेच घर होते.

घराचं नाव Wiesen Hof. घर जुने, शेतात असावे तसे. दोन मजली होते. आतापर्यंतच्या आमच्या सगळ्या अपार्टमेटसमधलं हे डावं. कदाचित एकूण वातावरण असं ढगाळ, पावसाळी झाल्यानंतर आम्ही इथे आल्यावर आमची थकलेली मनं हे इम्प्रेशन घेऊन आली असतील. पण एकूण प्रसन्नपणाची कमतरता वाटली खरी. तसं खरं अपार्टमेंटमध्ये आवश्यक त्या सगळ्या गोष्टी होत्या, कमतरता होती ती वातावरणाची आणि त्याला पर्याय कोणाचाच नव्हता. थोडा वेळ कंटाळत इकडे तिकडे करून झालं. इथे एक बाल्कनी होती उघडली तर पाऊस, वा-याचा हा झोत आत आला. तसच दार बंद केलं. थोडा वेळ गेला. चैन पडे ना. पुनः दार उघडलं तर वारा नव्हता.पावसाची रिपरिप सुरूच होती. बाहेर आलो. लांबवर पसरलेली शेतं. मघा आम्ही आलो तो हायवे दूरवर दिसत होता. लांब खालच्या बाजूला एका चर्चचं टोक दिसलं. भोवती घरांची कौलं. हे घर गावाबाहेरचं शेवटचं. त्यातून त्याला जवळपास शेजार कोणी नाही त्यामुळे फारच केविलवाणं वाटत होतं.




घराची मालकिण कुठे ते बघत होतो. आम्ही आलो तेव्हा स्वागताला पुढे आली होती नंतर कोणत्या खोलीत गडप झाली तेच कळलं नाही. आपले गावाकडचे वाडे जसे भूलभुलैय्या असतात त्याची आठवण झाली. तिला भेटून गावात खाण्यापिण्याची व्यवस्था काय होऊ शकेल असं विचारलं तर म्हणाली हा ऑफ सीझन आहे त्यामुळे एखाद दुसरं हॉटेल यापलिकडे काही सोय नाही गावात. तुम्ही रस्त्याने सरळ गेलात की एक ड्रॅगनचं चित्र दिसेल. ते हॉटेल उघडं असतं. तिथे चांगलं फूड मिळेल. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे या सगळ्या अपार्टमेंटसची व्यवस्था बघणा-या त्या घरातल्या गृहिणी होत्या. त्यांना कामचलाऊ का होईना इंग्रजी येत होतं.

आम्ही निघालो. तसेही या पावसात ना कुठे फिरता येणार ना कसली मजा मग निदान लवकर जेवण आटोपून घेऊ. उद्याचं फ्लाइटही लवकरचं आहे तेव्हा झोपून जाता येईल. असा विचार करून तिथून बाहेर पडलो. गावासारखं गाव ते. रमतगमत रस्त्याने जात होतो, थोडा वेळ गेला आणि अचानक वातावरणात बदल झाला. थोडसं उघडलं होतं. पाऊस होता पण रिमझिम होती. त्रासदायक नाही. गाव तसं सुस्त.पावसामुळे असेल कदाचित पण चहल पहल नव्हतीच. कदाचित शहरात गेले असतील.





ड्रॅगनचा उभा मोठा फलक दिसला. आत गेलो तर एकदम लाऊड म्युझिक. लोकं पीत बसली होती. आतला काळोख सुंदर मोठ्या झुंबरांनी उजळून टाकला होता. आम्ही त्या गोंधळापासून लांब खिडकीपाशी गेलो. बाहेर खाली उतरत गेलेलं गाव, मघा बघितलं ते चर्च आणि काय काय. कसं आपण इतकं बोअर झालो होतो मघाशी? पाऊस आहे म्हणून कॅमेरा घेतला नाही ही चूक केली असं मनात येईपर्यंत "मी पटकन जाऊन कॅमेरा घेऊन येतो" असं म्हणून श्रीशैल निघाला लगेच, पण आम्ही त्याला थांबवलं. एकतर तसं हे खूप लांब. घर निदान २० मिनिटांवर तरी होतं. ऑर्डर देऊन टेबलावर पदार्थ यायला अर्धा तास तरी लागलाच असता त्यामुळे त्याने ऑर्डर दिली आणि तो बाहेर पडला. इतक्या छोट्या गावात इतकं छान हॉटेल कसं चालत असेल? कोण येणार इथे स्कीइंग सीझनशिवाय? या प्रश्नांचं उत्तर दोन चिनी मुली येऊन पुढच्या टेबलाशी बसल्या त्यात मिळालं. आणखी दोन जोडपीही आली. म्हणजे तसा प्रश्न नसावा. खाण्याचे पदार्थ आले आम्ही सुरवात करत होतो तोपर्यंत श्रीशैलही आला.


फोटो वगैरेना सुरवात झाल्यावर पुनः पूर्वीचाच momentum आला. तेच ठिकाण, तेच वातावरण आता इतकं काही उदासवाणं वगैरे नाही, आपल्याच मनाचे खेळ सगळे असं वाटू लागलं. इथे तिथे फिरलो. उद्या बस कुठे मिळेल त्या स्टॉपचा शोध घेतला. तिथल्या टाइमटेबलमधली आम्हाला सोयीची बस बघितली. घरी आलो. आमच्या मालकिणीला नाश्त्याची वेळ सांगणं गरजेचं होतं. उद्याचा नाश्ता मालकिणबाई काय देणार हा विचार अर्थातच मनात येऊन गेला कारण तो खाऊन नंतरच मग एअरपोर्टकरता बस पकडायची होती आणि विमानात काहीही खायला मिळणार नव्हत,# म्हणजे दामदुप्पट पैसे मोजल्याशिवाय.! पण अर्थात त्याची चिंता नव्हती कारण यावेळी आम्ही आमच्या घरच्या (!) एअरपोर्ट्वर उतरणार होतो. त्यामुळे एअरपोर्टवर उतरून घरी पोहोचण्यासाठीचा रेल्वेचा कंटाळवाणा प्रवास नव्हता. मन प्रसन्न असलं की असे मुद्दे पण पॉझिटिव्ह वाटायला लागतात याची गंमत वाटता वाटता आजच्या दिवसातल्या शिणवट्याला मग वाट करून दिली आणि मनातली उदासी मागे टाकत छान झोपून गेलो.


# Low cost flights
या संकल्पनेत खाणे पिणे या गोष्टींना फाटा दिलेला असतो.

Monday, 26 August 2013

Austria Patsch (Innsbruck) I



झरव्हिलग्रॅटनचं स्वप्न संपून आम्ही सिलियनला सत्यात आलो. आमच्या यजमानांनी टॅक्सीने सिलियनला सोडून आम्हाला उपकृत केले आणि ते निघून गेले, बदल्यात आणखी आठवणी देऊन. आमचं सामान उतरताच पुनः येण्याचं आमंत्रण देण्यास ते विसरले नाहीत. कामामुळे स्टेशनवर गाडीच्या वेळेच्या खूप आधी आणून सोडावं लागल्याबद्दल त्यांनी पुनः एकवार सॉरी म्हटलं. आम्हालाच कानकोंडं झालं. झटक्यात निरोप घेऊन पाठ फिरवून गाडीत बसून ते निघूनही गेले. त्यांना भाड्यापोटी किती पैसे देऊ एव्हढं विचारण्याचीसुद्धा पचारिकता दाखवणं हा त्यांच्या आतिथ्यशीलतेचा अपमान झाला असता जणु काही. एकापरीने आम्हालाही बरं वाटलं. त्यांनी आतापर्यंत अगदी घरच्या माणसासारखंच तर आम्हाला वागवलं होतं. मन भरून आल्यासारखं झालं. आजही समोरच्या आकाशात ते ग्लायडर्स दिसत होते पण एकतर त्यात आता नाविन्य राहिलं नव्हतं आणि आता खरतर पुढे इन्सब्रुकला परत जाण्याचे वेध लागले होते. यावेळी शहरात न रहाता आम्ही ज्या इग्लस गावाच्या प्रेमात पडलो होतो त्यापासून पुढे जवळच अपार्टमेंट घेतले होते, तिथे रहाणार होतो. प्रत्येक वेळी नवीन अनुभव हे सूत्र असले प्रवासाचे की प्रवासही चैतन्यमय होतो.

इटलीच्या मरीन्सच्या(*) प्रश्नामुळे यावेळी आम्ही इटलीवजी ऑस्ट्रियाला आलो. पण इटलीला ते मान्य नसावे. सिलियनला आम्ही खूप लवकर स्टेशनवर आलो होतो. गाडी साडेबाराची. त्या गाडीपर्यंत मग थांबायचे तरी कशाकरता असा विचार केला. आधी ठरवल्याप्रमाणे वेळ काढण्यासाठी तिथल्या सिटी सेंटरमध्ये जायचं नाही हे ठरवलं. श्रीशैल गाडीची चौकशी करायला काऊंटरवर गेला इथे एक बरं असतं त्यांना म्हणजे काऊंटरवरच्या माणसांना सविस्तर बोलायला वेळ आणि इच्छा दोन्ही असतं. साडेबाराच्या आधी ११.१० वाजताच्या गाडीने जर तुम्ही गेलात तर इटलीतील सॅन कॅन्डिडो/ इन्निशेन तिथून फोर्तेझा/ फ्रान्झेनफेस्ट आणि मग युरोसिटी पकडून व्हेनिसहून म्युनिचला जाणा-या गाडीने इन्सब्रुकला जाता येइल. सविस्तर समजावून सांगतानाचे शब्द मी नोट केले. संभाषण संपवून श्रीशैल परतल्यानंतर तो म्हणाला कितीही टाळलं जरी तरी आपण इटलीत जाऊनच पुढे जाणार आहोत. म्हणजे तुमचे पाय इटलीला लागणार आहेत कारण ऑस्ट्रियाची बॉर्डर क्रॉस करून, इटलीत जाऊन मग आपल्याला DB OEEB Euro City मिळणार आहे. अगाध आहे! आम्ही या योगायोगाने आश्चर्यचकीत झालो. आपल्याकडे कोकणातून कोल्हापूरला जाताना कर्नाटकात शिरून जावं लागतं त्याचीही आठवण झाली.

सिलियनची गाडी छोटी, दोन डब्यांचीच. रुळावरच उभे आहोत असा तो प्लॅटफॉर्म. गाडीने सिलियन सोडलं तेव्हा "पुनरागमनाय च" असं म्हटलं असेल का? किती शक्य ते माहीत नाही पण इच्छा मात्र जरूर आहे. सॅन कॅन्डिडो आलं. या दोन दोन नाव असणा-या स्टेशनांची मला गम्मत वाटते. कोणतं नाव प्रचारात असेल? अर्थात ही दोन वेगळ्या भाषेतली दोन वेगळी नावं आहेत हे नंतर कळलं. तर इटलीमधल्या सॅन कॅन्डिडोला आलो आणि तिथून पुढे फोर्तेझाला जाणारी ट्रेन घेतली. गर्दी होती पण जागा न मिळण्याचा प्रश्न नव्हता. आम्ही २० मिनिटांच्या प्रवासानंतर इटलीमधील फोर्तेझाला पोहोचलो. फोर्ट म्हणजे किल्ला, तटबंदी या अर्थाने गावाला दिलेले हे नाव. ऑस्ट्रियन राजानेच अठराव्या शतकात हे भक्कम तटबंदीचं काम केलं होतं. प्लॅटफॉर्म पूर्ण ओलांडला कारण दुस-या बाजूला डॉइश भान (Deutsch Bahn) असण्याची शक्यता होती. समोर एक रेल्वे कर्मचारी आल्यावर त्याच्याशी इंग्रजीतून संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याने आम्हाला "बाहेरचा दरवाजा दाखवला." त्याचा बहुधा आम्ही तिकिट खिडकी शोधत आहोत असा समज झाला असावा, त्याने दिशा दाखवली ती एक्झिटची होती, इतकच. भन्नाट वारा आणि पाऊस यांच्या मा-यात प्लॅटफॉर्मवर उघड्यावर शेड नसताना सामानासकट उभं रहायची माझी अजिबात इच्छा नव्हती. आम्ही सामान उचलून एक्झिटच्या दिशेने गेलो. तिथे बंद वातावरणात खूप लोकं गाडीची वाट बघत बसली होती. म्हणजे निदान गाडी या प्लॅटफॉर्मवरच येत असावी. आत आल्यानंतर कुडकुडणे थोडेसे कमी झाल्यासारखे वाटले. इटलीत होतो तरी गाडी डॉइश भान होती त्यामुळे ती वेळेत असण्याला पर्याय नव्हता.(#) इटली मागे पडून ऑस्ट्रियात कधी शिरलो ते कळलंही नाही. तशाही या सीमारेषा माणसाने निर्माण केलेल्या. युरोपातील देशांनी निदान त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न तरी केला आहे. आपले काय़? असा विचार मनात अस्वस्थपणाच फक्त घेऊन येतो.

इन्सब्रुक दुपारी अडीचच्या सुमारास आले. भूक तर खूप लागली होती. वाटेतल्या खाण्यावर भागवणे जमलेच नसते. श्रीशैलच्या डोक्यात एकदा लवकर मुक्कामाला पोहोचू नंतर बघू असं होतं पण पावसाचा जोर होता. जाणार त्या ठिकाणी काय आणि कसं असेल कोणी सांगावं? असा विचार करून आम्ही काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून स्टेशनच्या समोरील फुटपाथकरता क्रॉस केला. छत्री काढू या, नको असं म्हणत असताना भिजणा-या कपड्यांपेक्षा भिजलेली छत्री सांभाळणं परवडेल म्हणून छत्र्या उघडल्या. इथे बघावं त्या हॉटेलवर केबाप (Kebap= कबाब) असं लिहिलेलं होतं त्यावरून ते कोणाचं असावं ते ध्वनित होत होतं म्हणून श्रीशैल ती हॉटेल्स टाळत होता. (धर्माकरता वगैरे नाही पण शाकाहाराची शक्यता कमी म्हणून) पण दुसरा पर्याय नाही म्हटल्यावर एका अशाच इटरीमध्ये गेलो. कबाब वगैरे असतील पण फक्त तेवढेच नव्हते. सॅन्डविचेस मिळाली. ती खात बसलो होतो तर दहा पंधरा विद्यार्थ्यांचं एक टोळकं आलं. हिंदीमधे गप्पा चालल्या होत्या. अशा परक्या ठिकाणी आपली (?) भाषा कायला बरं वाटतं खरं. आमच्याकडे बघून प्रत्येकजण हॅलो किंवा मान हलवून अथवा नुसते हसून पुढे गेले.

गेल्या वेळेप्रमाणे डे तिकिट काढू असं श्रीशैल म्हणाला खरा पण ते फुकटच गेले कारण एकतर ते विमानतळाकडे जाणा-या बसमध्ये दुस-या दिवशी चालणार नव्हते आणि आम्ही आज जिथे जाणार होतो ते पात्श (patsch) त्यांच्या सिटी बस कक्षेत येत नव्हते. थोडसं विषयांतर. पात्श या जर्मन शब्दाचा अर्थ प्रहार असा आहे. आमच्या बाबतीत तो अक्षरशः खरा ठरला! वेगळे तिकिट काढून आम्ही बसमध्ये बसलो. बसचा प्रवास छान होता. इन्सब्रुक शहर तसे ओळखीचे. जुन्या शहरातून (Old Town) जाताना आपण इथे आलो होतो, हे आपण बघितले होते वगैरे सगळं बोलून होत होते. नंतर शहराबाहेर पडून बसने डोंगर चढायला सुरवात केली. हळू हळू शहराच्या खुणा मागे पडत होत्या. खाली दूरवर शहरातील रस्ते, इमारती लहान होत गेल्या. डोंगर चढायला सुरवात केल्यावर आतापर्यंत साधारण वाटणारा पाऊस रौद्र रूप धारण करू लागला. एक एक करत प्रवासी उतरून गेले आणि आम्ही तिघच बसमध्ये उरलो. आपलं ठिकाण येणार कधी याची आता मात्र थोडीशी काळजी वाटू लागली होती.

                                                                                                                                                                                                                                                                     (उर्वरीत भाग पुढील लेखात)



                           


*         फेब्रुवारी २०१२ मधे  इटलीच्या दोन मरीन्सना केरळच्या किना-यावर दोन कोळ्यांना ठार        मारल्य़ाप्रकरणी इट्लीच्या सरकारने घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेची पार्श्वभूमी आहे.

#            इटली हे शिस्त आणि वक्तशीरपणा याबाबतीत आपल्यासारखे (पण आपल्यापेक्षा बरे) असे राष्ट्र. जर्मनी मात्र याच्या बरोबर उलट. हे उल्लेख युरोपात कित्येकवेळा येतात.





Monday, 19 August 2013

Austria Zel Am See II

दुसरा दिवस उजाडला तो ढगांचं आवरण घेऊनच. मनात पाल चुकचुकली. फुकट तर नाही ना जाणार दिवस पावसामुळे? इथे घरात बसून रहायचं म्हणजे शिक्षाच होती. बाल्कनीत बसून छान चहा घेतला. कुडकुडत होतो पण आत बसवेना. थोड्या वेळाने होत्याचं नव्हतं झालं. स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश आणि समोर हिमचादर ओढलेला तो आल्प्स. कदाचित आम्हाला तो नव्याने पडलेला बर्फ दाखवण्यासाठी हा खेळ असावा. आल्हाददायक वातावरणात (=कुडकुडत) आम्ही आमचा मोर्चा वळवला शिखराच्या दिशेने. वाटेत एक रोप वे स्टेशन होतं. दरवाजा उघडा दिसला आम्ही शिरलो आत. अगदी आत गेल्यावर एक माणूस होता त्याच्याकडे चौकशी केली पण रोपवे मेन्टेनन्स सुरू होता. सुरवात जूनच्या १५ तारखेपासून होणार होती. या रोप वे. त्यांचा स्कीइंगचा सीझन असतो. दूर शिखराजवळ घसरगुंडीसारखे माळ असतात. एरवी, म्हणजे बर्फ नसते तेव्हा तिथे छान हिरवळ दिसते, ते स्कीइंग ग्राऊंड. या रोप वेमधे बसून किंवा कधी कधी रोप चेअर्स असतात म्हणजे बंदिस्त नाहीत त्याऐवजी फक्त खुर्चीत बसायचं, अर्थात पट्टे बांधलेले पण आपल्याला चहूकडे अगदी खालीसुद्धा बघता येतं अशी मोकळी खुर्ची. तर अशा या वाहनातून वर डोंगरावर पोहोचायचं. उतरल्या क्षणी स्कीइंगला सुरवात करायची. एवढा उतार असतो की त्यावर क्षणाची उसंत न मिळता घसरत खाली यायचं या कल्पनेनेच हबकून जायला होतं. याचेही कठीण, खडतर, सोपे असे प्रकार असतात, त्याचं ट्रेनिंगही इथे मिळतं. इन्सब्रुक आणि आसपासच्या या सगळ्या भागात हिवाळ्यात स्कीइंगचा मोठा सीझन असतो, इतका की इथे हॉटेल्स, अपार्टमेंटसमध्ये जागा मिळणं मुश्किल होतं.


तर हे सगळं कून होतो आता त्या ठिकाणी पायी चढून जायचं होतं. इथेही wandering paths आणि त्यांच्या ग्रेडस आहेतच. जागोजागी बोर्ड्स आहेत. आम्ही असाच एक रस्ता निवडला. वाटेत खूप ठिकाणी गोठलेला बर्फ होता, उ्न्हाने वितळणारा. त्याच्यावर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करून थोडसं घसरून घेतलं फोटो काढले आणि निघालो. तसा आज दिवस हातात होता पण पुनः इथेही पावसाची शक्यता गृहित धरावी लागते. निम्म्याहून अधिक उंचीवर आम्ही पोहोचलो होतो. प्रत्येक वेळी शेजारचं शिखर आपल्या एवढ्या उंचीवर तर आहे म्हणजे माथ्यावर आलोच असं वाटत राही. दाट झाडीमधून दिसणारं आकाश बघितलं की आपल्या मनाचा कौल बरोबर आहे असही वाटे आणि आता पुढची १५ मिनिटे नाहीतर परत असं म्हणत म्हणत आम्ही खूप दूरवर आलो पण माथा काही दिसे ना. बर्फाच्छादित शिखरे जी दूरवरून दिसतात ती तशीच असतील की तिथेही साठलेल्या बर्फाचे असेच आपण इथे बघत आहोत तसेच साठे असतील? आणि जे आपण इथे बघत आहोत तेच तिथे बघायचे तर उरलेले कष्ट सार्थकी लागतील का? श्रीशैलच्या मनाविरुद्ध त्याला परतीच्या प्रवासासाठी राजी केलं. वाटेत मघाशी एक ओढा ओलांडला होता. बर्फाचंच पाणी ते. बूट काढून त्यात पाय टाकताना संवेदना बधिर झाल्या होत्या. आता पाणी आणि जोर वाढलासा वाटला. वर माथ्यावर पाऊस झाला आणि पूर आला तर? कल्पनासुद्धा ग्रेट आणि घाबरवणारी होती. पुनः बूट काढून पाय पाण्यात टाकताना ब्रम्हाण्ड आठवलं पण पर्याय नव्हता.

पलीकडे आलो आणि तिघेही निवांत बसलो. कान्हाच्या जंगलातला तो आदिवासी गाईड सांगत होता ते आठवलं. कोणतंही जंगल कधीही शांत नसतं. प्रत्येकाला त्याचा त्याचा एक आवाज असतो. असा हा आवाज ऎकत आम्ही कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर टेकलो. इथून पुढे आम्ही टप्प्यात होतो. बसून वरच्या झाडीचा अनुभव आठवणं झालं. या ठिकाणी फोटो काढले तरी त्याची खोली त्या फोटोत उतरत नाही आपण किती उंचीवर पोहोचलो ते आपल्या डोळ्यात साठवणं हा एकच पर्याय. याविषयी सगळ्यांचं एकमत झालं. वरती बघितलेल्या त्या रोप वे स्टेशनच्या बाहेरचा उतार बघून स्कीइंगचा थरार काय असेल याची कल्पना आली. नदीच्या किंवा समुद्राच्या सोडाच पण स्वीमिंग पूलच्या पाण्यात काठावरून फेकून दिल्यावर कसं वाटते असेल? तोच अनुभव की! किती जण धडपडत असतील किती जणांना लागत असेल आणि किती जखमी होत असतील या कल्पनेनेच हबकायला झालं. नंतर श्रीशैलचा ऑस्ट्रियन मित्र क्रिस घरी आला होता तेव्हा त्याने Air ambulance ने किती तरी वेळा जखमींना हलवावे लागते त्याच्या कथा सांगितल्या होत्या! ढग गोळा होत होते. या थंडीत पावसाचा मारा सहन करणं कठीण आणि ओले कपडे वाळणं त्याहून मुश्कील म्हणून सरळ आम्ही आमच्या "घरी" येऊन पोहोचलो. घरी उबदार तर असणारच होतं शिवाय चहाची लज्जत अनुभवण्याचं स्वर्गसुख होतं. तेही कष्टाविना फक्त गरम पाण्याच्या उपलब्धतेतून!


पावसाने हुलकावणीच दिली. अर्थात खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. संध्याकाळी पुनः बाहेर पडून सी, हो त्या तलावावर फिरायला. थंडीत, हा यांचा वसंत ऋतु असून, पाण्यात उतरण्याचं साहस करणं शक्य नव्हतं आणि आपल्याप्रमाणे मनात आलं आणि पाय बुडवून बसलं अशी कुठे शक्यताही नव्हती. तिथे पोहोण्याची वेगळी व्यवस्था होती, अर्थातच पैसे मोजून आणि ती १५ जून नंतरच उघडणार होती.

सिटी सेंटरमध्ये मनसोक्त फिरलो. अन्तोनस इंडियन हॉटेल असं एका ठिकाणी दिसलं त्याबरोबरीने इटालिअन वगैरे नावं होती, म्हटल कदाचित आपला गोव्याकडचा असेल.
पण दुस-या पाटीवर केबाप होतं म्हणजे नेहेमीप्रमाणे भूल होती. उगीचच इंडिश-चायनीश असं लिहून आकर्षित करायचं दुसरं काय. तिथल्या फार्मसीमध्ये गेलो. प्रवासात बसून मांडीवर रॅशेस आले होते. कदाचित फूड अ‍ॅलर्जीही असण्याची शक्यता होती. आम्ही क्रीम्सची वर्णनं वाचत होतो इतक्यात एक पोरगेलसा तरूण मुलगा पुढे आला May I help you म्हणत. त्याने आधी रंग कसा आहे, ओले की कोरडे वगैरे प्रश्न विचारले आणि मग दोन क्रीम्स दिली.एक जर काही इन्फेक्शन असेल तर दुसरं अ‍ॅन्टी इन्फ्लमेटरी.बोलता बोलता त्याचं लक्ष गेलं हाताच्या फुटलेल्यास्कीनवर त्याच्याकरता काही देऊ का म्हणून त्याने विचारलं. त्याच्या निरीक्षण आणि विक्री कौशल्याचं कॊतुक वाटलं. अर्थात अंग फुटण्यावर काही नको होतं. त्याला तसं म्हटलं आणि विचारलं इतकं चांगलं इंग्रजी कसं येत बाबा तुला. तर तो म्हणला मी Nano Technology मध्ये MS करून आता व्हेकेशनमध्ये फार्मसीमध्ये काम करतो आहे. इन्सब्रुकला शिक्षण झालं त्य़ामुळे इंग्रजी चांगलं आहे. भारताविषयीच्या त्याच्या चौकशा संपल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो. स्पार आणि बिल्ला या दोन्ही दुकानातून आवश्यक वस्तू घेऊन एका हॉटेलमध्ये भरपेट खाऊन घरी परतलो. उद्या इथून निघून आल्प्सच्या कुशीत (म्हणजे आतापर्यंत कुठे आहोत?) जायच होतं.