Saturday 29 September 2018

SLOVENIA : PIRAN


पिरान


दुसऱ्या दिवसाची सकाळ. बाहेर बघतो तर समोरचं मैदान गायब! आकाशातले पांढरे ढग जमिनीवर अवतरले होते. काही म्हणजे काही दिसत नव्हतं. पुलंच्या अपूर्वाई मधल्या लंडनच्या धुक्याच्या वर्णनाची आठवण झाली. बाहेर तापमान होत ९ डिग्री. आज काय? हा आता प्रश्न होता. शहर तसं लहान आहे. आपण शेवटच्या दिवशी पुनः इथे येणार आहोतच त्यावेळी जर बघायला काही नसेल तर आणखी बोअर होईल त्यापेक्षा आज आपण पिरान नावाचा बीच आहे, आहे जरा लांब, पण बसने जाता येतं. तिथे दिवसही मजेत जाईल. श्रीशैलने असं म्हटल्यावर मग इथल्या किल्ल्याचा बेत रहित करून आम्ही पिरानला जाण्यासाठी निघायचं ठरवलं. आता टॅक्सीला फोन करू आणि निघू म्हणून फोन लावला तर अगम्य भाषेत सुरवात झाली. इंग्रजीतून बोलण्याची विनंती केली तर कालच्याप्रमाणे फोन कट केला. पुनः फोन लावला आणि तशीच सुरवात फक्त यावेळी कोणी बाई होती (कालचीच होती का? न कळे) आणि तिला इंग्रजी निदान कळत असावे. तिने पत्ता काय विचारलं. आता पुनः कालचाच प्रश्न. पत्ता हातात होता पण उच्चार? तिला स्पेलिंग सांगावं तर आपण a म्हणावं तर ती e समजणार आकड्यांचाही तोच घोळ. तिला मोबाईल नंबर विचारला. तिने सांगितला आणि इंग्रजीमध्ये कन्फर्म केला. दहा मिनिटात टॅक्सी दारात हजार झाली. त्याला पत्ता सांगताना आता प्रश्न नव्हता कारण स्टेशन आणि बस स्टॉप हे शब्द त्यानेही ऐकलेले असावेत!

बस अगदी वेळेत शिस्तशीर सुटली. रस्ता उत्तम, आजूबाजूला झाडांचं आच्छादन, दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर बर्फ होतं का? आम्ही आमच्यात वाद घालत असताना एक डोंगर अगदी जवळ आला तेव्हा जाणवलं हे चुनखडीचे डोंगर आहेत. जिथे खणला आहे तिथे ते पांढरे दिसतात आणि दुरून बर्फाचा आभास निर्माण करतात. एक मात्र, हा मागास (?) देश पण इथे त्या रस्त्याजवळच्या डोंगरांना जाळ्या बसवून वाहतूक सुरक्षित केली होती. ही लक्षणं मागासपणाची असतील तर आपल्याकडे नसलेल्या जाळ्या आणि देवाच्या भरवशावर टाकलेली माणसं या स्थितीला आपण कोणत्या श्रेणीत घालायचं?

पिरान येण्याआधीपासून दूरवर समुद्र दिसायला लागला होता. निळंशार पाणी हे आता अप्रूप न वाटण्याजोगी गोष्ट झाली होती का? सायकलवरून त्या डोंगराळ भागात हौशी पर्यटक दिसत होते. मधेच कुठे प्रोमेनेड आणि समुद्रस्नानाची सोय अशा जागा होत्या. पिरान आलं. अगदी अरुंद रस्त्यावरून एका अशक्य चिंचोळ्या गल्लीत यु टर्न घेऊन बस थांबली.

आम्ही सकाळी निघालो तेव्हा तापमान होतं ९ डिग्री. अर्थात अंगात स्वेटर होता. खाली उतरलो तर २३ डिग्री! कुठे लपवायचं याला? असं वैतागून म्हणत त्याला कमरेला गुंडाळलं आणि पुढे आलो.

एका बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला दूरवर एक किल्ला आणि उंचावर एक चर्च. आम्ही इथे दिवसाच्या ट्रीपला आलो आहोत याचं भान राखून आता ठरवायला हवं होतं. किल्ला तसा दूर आणि चढावर होता. समुद्र आम्हाला खुणावत होता आणि ते चर्च शहराच्या विहंगम दर्शनाकरिता उत्तम वाटत होतं. येताना आत्ता समुद्राचं दर्शन झालं होतं तरी एकतरी चक्कर म्हणून फिरून घेतलं. इथे पुळण नाही. त्यामुळे रस्ता आणि समुद्र यामध्ये त्यांनी चालण्याकरता रस्ता तयार केला आहे. काही जण समुद्र स्नानोत्तर उन्हात पहुडले होते. आम्ही बोटी वगैरे नेहेमीप्रमाणे बघून फोटो काढून चर्चच्या दिशेने निघालो. एक छान विस्तृत चौक लागला. तिथे सिटी सेन्टर असावं. निवांत बसायला आलेली लोकं, प्रवासी आणि पलीकडे असलेला इन्फर्मेशन किऑस्क यामुळे खूप लोकं दिसत होती.

अशा या माहोलमध्ये खरं आकर्षण असत ते लहान मुलांचं. छोटी, अगदी दोन तीन वर्षांची ही गोरी, ब्लॉन्ड मुलं, मुली इतकी उत्साही असतात की त्यांच्या निरीक्षणात आपल्यामध्ये उत्साहाची भरणी होते, थकवा निघून जातो. इथे मुलं चालायला लागली की छोटी सायकल आणून देतात. पॅडल नसलेली ती सायकल मुलं तोल सावरत दोन्ही पाय मारून चालवतात तेव्हा त्यांच्यावर नजर खिळली जाते. मग त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढायला त्यांचे आई बाबाच नव्हे तर आमच्यासारखे पर्यटकही मोबाईल/ कॅमेरा घेऊन सरसावतात.





आम्ही चौक ओलांडून पुढे निघालो. चर्च बघण्यात फारसा रस नव्हता. पण त्याची लोकेशन फार छान होती. इथून गाव नजरेच्या टप्प्यात होतं. छान दिसत होतं. मला तर आपल्या उत्तरेतल्या गाव/ शहरांची आठवण झाली. उतरत्या छपरांची, लालबुंद कौलं घातलेली ती एकाला एक खेटून असलेली घरं, एखाद्या घरावरची एकांतातली, आपल्याकडे बरसाती असावी तशी अरुंद- उभट खोली.








इथे वर असलेल्या या आवारात फोटो सेशन सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये रंगलेली होती. एका बाजूला एक जोडपं, तो, त्याच्या जरा रावडी वाटावा अशा कुत्र्यासोबत आणि ती, तिच्या उंदरासारखं तोंड असलेल्या अगदी किरट्या अशा दोन कुत्र्यांसह आपापल्या "बाळाचं" कौतुक करण्यात गुंग होते. तिला एकदम लहर आली आणि तिने तिचा फोटो काढायला नवऱ्याला फर्मावलं. तो बिचारा एका हाताने त्या रावडीला सांभाळण्याची कसरत करत तिचे फोटो काढू लागला.


आता दोन रस्ते होते. एक समुद्राची कड घेऊन डोंगराला पाठीशी घालत त्यामधून जाणारा अगदी अरुंद, चिंचोळा रस्ता, फारशी रहदारी नसलेला. आणि दुसरा आलो तो, परतीचा. आम्ही जरा पुढे जाऊन तरी बघू म्हणून निघालो. इथे निवांतपणा होता. पुळण इथेही नव्हती. होता तो खडकाळ समुद्रकिनारा. पण या निवांतपणाचा आस्वाद घेत काही कुटुंबं, जोडपी समुद्रस्नानाचा आनंद घेत होती. जाताना त्या अशा अरुंद रस्त्यावरूनही, उतार चढाची पर्वा न करता जाणारे बाईकस्वार म्हणजे सायकलवाले अचंबित करत होते. इथे त्या खडकांमधले दगड गोळा करून लगोऱ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. खूप जणांना त्या रचतानाही आम्ही पाहिलं. त्याचं महत्व मात्र कळलं नाही. असेच पुढे जात किती पुढे आलो त्याचं भान आल्यावर आता जरा वर जाऊन दुसऱ्या मार्गाने परत फिरावं म्हणून निघालो खरे पण अगदी उभा चढ याशिवाय काही नव्हतं. कदाचित आम्ही या मार्गाने परत पोहोचलो असतो पण खूप दमछाक आणि लांबच्या रस्त्याने. आज आम्हाला परतीची बस पकडायची होती तेव्हा ते परवडलं नसतं. आलो त्या मार्गाने जाणं बरं म्हणून माघार घेतली.

   चर्चच्या टेरेस वरून दूरवर उंचावर दिसणारा किल्ला, समुद्राला लगटून डोंगराला फटकून       जाणारा चिंचोळा रस्ता 

बसला वेळ होता पण लोक थांबलेले दिसले. कदाचित गर्दीही होत असेल. नंतरच्या बसने परतायला उशीर आणि इथे आणखी थांबून साध्य काहीच होणार नाही म्हणून मग तिथेच थांबलो. एक बस लुब्लिआनाहून येऊन थांबली. सगळे त्या समोर रांगेत उभे राहिले. ड्रायव्हरने पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. त्याचा डबा खाऊन झाला असावा. पुनः तो दरवाजापाशी आला. मागे गेला. आता सगळ्यांचा पेशन्स संपत आला होता. बस सुटायला तीन चार मिनिटांचा अवधी, बसवर पाटीही आहे मग हा वेळ का काढतो आहे ते कळेना. शेवटी एक मिनिट असताना त्या महाशयांनी दरवाजा उघडला आणि घोषणा केली ही बस नाही पलीकडची बस निघण्याच्या तयारीत आहे.

सगळे अवाक! पण भांडायला वेळ नव्हता. आम्ही त्या दुसऱ्या बसच्या दिशेने पळत गेलो. या ड्रायव्हरचा आता संताप झाला होता. त्याला उगीचच या उशिरा आलेल्या प्रवाशांमुळे उशीर होणार होता. त्याची अगम्य बडबड त्यात सुट्टे देणार नाही असा पुकारा इत्यादी सगळ्या गोंधळात बस निघाली. आपल्याकडेच असा गोंधळ असतो असं नाही तर हे लोकही असं वागू शकतात या समाधानात आम्ही लुब्लिआनला पोहोचलो.

आयत्या वेळी आपलेच आधीचे निर्णय कसे फिरवावे लागतात आणि सगळ्याच गोष्टींचं नियोजन कागदावर आखल्याप्रमाणे प्रत्यक्षात येणं शक्य नसतं याचे हे धडे होते. आजचा दिवस या लुब्लिआनामध्ये उगवला तो ९ डिग्री सेल्सिअस हवामान घेऊनआधीचा इथेच दिवस घालवायचा निर्णय बदलून गेलो पिरानला आम्ही निघताना मारे जॅकेट घालून पिरानला पोहोचलो तर तिथे २३ डिग्री! अंगात जॅकेट काय ठेवणार? त्याचं ओझं दिवसभर वागवावं लागलं. तरीही आजचा दिवस मात्र छान गेला होता आणि आता उद्याच्या दृष्टीने आपण तयारी करू या असं ठरवत आम्ही दिवसाचा निरोप घेतला. मनावर कोरलं गेलं ते सगळ्या बाजूने समुद्राने वेढलेलं, वेढलेलं?, खरं म्हणजे समुद्राच्या कुशीत पहुडलेलं टुमदार पिरान.




                            






Wednesday 19 September 2018

SLOVENIA : LJUBLJANA



लुब्लिआना


विमानतळाबाहेर शहरात जाण्याकरता बसचा थांबा होता. पण बसची वेळ अजून उशिराची होती. आणि त्या अगोदर आम्हाला भाड्याने घेण्याच्या गाडीची चौकशी करायची होती. त्या कंपन्यांची ऑफिसं अजून उघडायची आहेत तर निदान समोरच्या बर्फाच्छादित शिखरांचे फोटो तर घेऊ या म्हणून आम्ही मुख्य रस्त्याच्या बाजूला गेलो. "आपण नंतर येणार तेव्हा काढू या फोटो”, मी उगीचच माझी चालवून बघायचा निष्फळ प्रयत्न केला. याला उत्तराचा ठाम नकार. "आत्ता शिखरं छान बर्फाच्छादित दिसत आहेत, आत्ता लगेच फोटो. नंतर कोणी सांगा!” हा भरवसा हवेविषयीचा होता. आज उन्हात तळपणारी ही शिखरं उद्या पावसाळी हवेत झाकोळली जातील नाहीतर बर्फ वितळून मातकट होतील! याचा व्यत्यासही असू शकतो की पाऊस पडून कोवळं बर्फ अधिक मोहक दिसेल. ण तस झालंच तर पुनः फोटो काढायला कसली हरकत असणार आहे? हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवाच. तेव्हा फोटो सेशन उरकून घेतलं. आणि हो, नंतरच्या सगळ्या वेळी ढगाळ वातावरणातल्या त्या शिखरांच्या भेटीमध्ये ती शिखरं अतिशय केविलवाणेपणे आमच्याकडे बघतानाही आम्हाला बघावी लागली.




लुब्लिआना राजधानीचं शहर खरं तरी सं ते लहानच आहे, पण सुबक आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. हा देश म्हणजे मुळात ऑस्ट्रिअन आणि नंतर ऑस्ट्रो-हन्गेरीअन साम्राज्याचा भाग. दुसऱ्या महायुद्धातील झळांनी याला कम्युनिस्ट युगोस्लावियाचा प्रांत बनवला. लुब्लिआना ही त्या प्रांताची राजधानी. असून असून किती जीव असणार तिचा? आता हे देश स्वतंत्र झाल्यावर मात्र त्यांची झपाट्याने वाटचाल सुरु आहे. आणि अर्थातच त्या अंगाने राजधानीचीसुद्धा. छोटंसं, व्यक्तिमत्व नसलेलं स्टेशन! रस्ते मात्र चांगले आहेत आणि मुख्य रस्ते प्रशस्तही.

आम्ही राहणार असलेल्या अपार्टमेंटचा शोध तसा सोपा होता. मुख्य रस्त्यापासून तसं ते जवळच होतं. मालक आम्ही फोन केल्यावर ताबडतोब चावी देण्याकरता स्वतः आला. (सर्वसाधारणपणे मालक चावी विवक्षित ठिकाणी ठेवून देतात व फोन किंवा ई मेलवरून त्याची कल्पना देतात.) आतिथ्य आणि मेहमान नवाजी दोनही गोष्टी त्याच्याकडे होत्या आणि भाषेचा अडसर कुठेही अडथळा आणत नव्हता. त्याच्याकडे आमच्यासाठी स्लीपर्स आणि छत्र्यांची सोय होती. त्याने दूध आणि पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. तिथे आवश्यक वस्तू म्हणजे मीठ, मिरपूड वगैरे तर होत्याच आधीपासून. एकूण सगळं दाखवल्यानंतर म्हणाला काही गैरसोय असेल तर सांगा. आम्ही धन्य ! जागा सोडताना चावी पोस्ट बॉक्स मध्ये टाकायची होती त्यामुळे पुनः भेट झाली नसती. तो गेला आणि जागेचा परिसर बघून घेतला. समोर मोठं मैदान आणि अर्थात हिरवळ. त्या पलीकडे मोठा रस्ता.

जाताना आमचा मालक मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. इथे तुम्ही बसपेक्षा टॅक्सीने फिरा, स्वस्त पडेल. बसचं तिकीट ४ युरो आणि टॅक्सीचा दर प्रति किलो मीटर १.९५ त्यामुळे जवळच्या अंतराकरता बसचे १२ युरो घालवण्यापेक्षा ३ ते ५ युरोमध्ये तिघे टॅक्सीने आरामात जाऊ शकत होतो.

अर्थात टॅक्सीने फिरणं वाटलं तितकं सोपं नव्हतं. फोन केला तर भाषेचा प्रश्न. इंग्रजीमध्ये बोलायला सुरवात केल्यावर पलीकडून सरळ फोन ठेवूनच दिला. पुनः केला तर कोणी बाई होती. कदाचित तिला इंग्रजी थोडं येत असावं. पण तोही भ्रमच ठरला. अर्थात तिचाही दोष नव्हता. पत्ता सांगताना आपण अल्फाबेट्स सांगणार ते इंग्रजीमधे, तिला ते कळणार कसे? त्यांचा A म्हणजे आ असतो आणि e म्हणजे ए अशी सगळी प्रमेयं कोण सोडवणार? तिला मोबाईल नंबर विचारल्यावर तिने त्यांच्या भाषेतले (ही स्लोवेनिअन भाषा रशियन भाषेच्या जवळपासची आहे असं मी वाचलं आहे ) आकडे सांगितले आणि सुदैवाने ते श्रीशैलला कळले. मग एसेमेस पाठवल्यावर टॅक्सी हजर झाली. त्यांच्या भाषेतले उच्चार आपल्याला कळणे थोडेसे कठीणच जाते. पण टॅक्सीबाबत मिळालेली ही माहिती आम्हाला राजधानीतल्या या आमच्या दोन दिवसांमध्ये खूप उपयोगाची ठरली.


युरोपात शहरात हिंडणे म्हणजे त्यांचं ओल्ड टाऊन बघणे आणि सिटी सेन्टरला भेट देणे!. छोट्या गल्ल्या बोळ तसेच्या तसेच ठेवून त्यांनी त्या ओल्ड टाऊनचं सौन्दर्य राखलं आहे. अर्थात हे तर युरोपमधील या सगळ्याच देशात दिसून येतं. फिरत असता एक गल्लीसारखी दिसली. तिथे शिरलो तर ती कलाकारांचीच गल्ली निघाली. बिल्डींगभर रंगवलेली ग्राफिटी, काही ठिकाणी उटपटांग वाटाव्यात अशा रचना. म्हणजे एका घराच्या माडीवर सायकलचं एकच चाक लटकवलेलं, कुठे भुताचे मोठमोठे कट आउट्स, पण एकूण वातावरणातच कला ठासून भरलेली. फोटो काढत असता कोणीतरी काहीतरी बोलत आहे आणि ते आपल्याकरता आहे असं वाटलं. खरतर त्या अंधाऱ्या गॅलेरीतलं आम्हाला काही दिसत नव्हतं पण तिथे एक बोर्ड होता. This is not zoo . No photographs of human . पुढे आल्यावर श्रीशैल म्हणाला चरसी/ ड्रग्जवाले होते.










आम्ही रमत गमत फिरत होतो. शहराचा एकूण मोहरा नेहेमीप्रमाणेच सुंदर साजरा होता.गावात नदी होती नदीवर पूल होते आणि त्या नदीच्या दोन्ही काठानी माणसांनी ओसंडून वाहणारी रेस्टॉरंटस होती. शहरातली शांतता इथे लोप पावली होती. सगळे धमाल मूड साजरा करायला आल्यासारखे होते. पुलांवर नेहेमीप्रमाणे प्रेमाला लॉक करणारी कुलुपं होती. आणि त्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये दोन बाजूंना लावलेल्या दोऱ्यांना बूट लटकवलेले दिसत होते. युरोपमध्ये खूप ठिकाणी आढळणाऱ्या या गोष्टीचं महत्व मात्र मला अद्याप कळू शकलेलं नाही.


इथला एक पूल खास आहे असं वाचलं होतं. या शहराच्या उभारणीत ज्याचा मोठा हात आहे त्या आर्किटेक्टने ( Jože Plečnik त्याचं नाव ) इथे नदीवर एकापुढे एक, जोडलेले असे तीन पूल (Tromostovje (Triple Bridge) बांधलेले आहेत. आम्ही तिथे रेंगाळलो खरे पण त्याचा फोटो घेणं काही शक्य नव्हतं कारण वरून उंचावरून फोटो घेऊनच ते शक्य झालं असतं. संध्याकाळच्या त्या निवांत वेळी पुलावरची गर्दी आणि आकाशातील बदलणारे मोहक रंग यांच्या भुलावणीला बळी पडणं अधिक स्वाभाविक होतं. खूपसे फोटो काढले, नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंटमधल्या वाफाळत्या (? इथे हे सुख मात्र क्वचितच मिळणार ) कॉफीचा आस्वाद, वाहत्या नदीच्या साक्षीने, घुटके घेत पिण्यातलं सुख उपभोगून आम्ही निघालो.                   






Sunday 9 September 2018

SLOVENIA I





तुमचं यावेळी कुठे जायचं हे ठरलं नसेल तर आपण स्लोवेनियाला जाऊ या. श्रीशैलने थेट हल्ला केला होता. आजवर आईला कुठे जावं असं वाटतं वगैरे विचारणारा हा, असा थेट सगळं ठरवून का सांगत आहे? पण खरंतर आमच्या डोक्यात या अशा आड सिझनला म्हणजे पुनः गेल्या वेळेप्रमाणे सप्टेंबर महिन्यात, न जाता स्प्रिंग किंवा समर मध्ये जावं असं  होतं, त्यामुळे बेसावध पकडल्यासारखं झालं होतं. विचार करू म्हटलं तर कसला हा प्रश्न! अशावेळी सन्मान्य हो म्हणणं हा राजमान्य मार्ग आम्ही पत्करला.

स्लोव्हेनिया म्हणजे स्लोव्हाकिया ना? झेकोस्लोवाकियाचा भाग, असं मी थोडं माझं knowledge पाजळण्याचा प्रयत्न केला, तोही व्यर्थ गेला. एक कटाक्ष टाकून काय मूर्ख आहे,( हे माझ्या मनातलं, कारण हे फोनवरचं बोलणं, व्हिडीओ कॉल थोडाच होता!) त्याने सांगितलं, पूर्वीचा युगोस्लाव्हिया. सुंदर देश आहे. अजून फार टूरिस्टीक झाला नाही. लेक ब्लेड वगळता अंतर्भागात कोणी फारसे जात नाहीत, त्यामुळे आताच जाण्यात मजा आहे. तुम्हाला आवडेल.

चला म्हणजे आमची आवडही यानेच ठरवलेली दिसते असं म्हणत आम्ही तिकडे कुठे जाणार आहोत ती नावं सांग असं त्याला सांगितलं. कारण खरोखरच लेक ब्लेड म्हणजे स्लोव्हेनिया अशी आम्हीही वर्तमानपत्रातल्या यात्रा कंपनीच्या जाहिरातीतल्या माहिती (?) वरून कल्पना केली होती. त्याने दोन तीन नावं पाठवलीLjubljana Soca आणि Logar valley आमची उच्चारापासून बोंब. पुनः त्यालाच विचारणं आलं( त्या आधी इथे एक गंमत सांगितलीच पाहिजे. आम्ही नंतर रेंट केलेल्या गाडीतल्या जीपीएस काकुंचाही बहुधा आमच्यासारखा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांना कोणी श्रीशैल भेटला नव्हता त्यामुळे प्रत्येकवेळी अवघडून त्या लुजबुजीयाना असा काहीतरी विचित्र उच्चार करत होत्या.)  पहिलं लुब्लिआना, ती त्यांची राजधानी आणि नंतरच्या सोका आणि लोगार या दोन्ही valley. आपण अगदी दऱ्याखोऱ्यात राहणार आहोत त्यामुळे भरपूर चालणं होईल आणि तुम्ही रमालही तिथे चांगले.

हा त्याचा अंदाज मात्र शंभर टक्के खरा होता. निसर्गाच्या सान्निध्यात खूप चालणं असेल तर आम्ही खुश होतो हा आजपर्यंतचा अनुभव. इथेही तसाच अनुभव यावा ही इच्छा.

ऍमस्टरडॅम ते लुब्लिआना हे १ तास ४० मिनिटांचं फ्लाईट. अर्थात ते होतं सकाळी साडेसहा वाजता. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीची शेवटची ट्रेन पकडून स्किपोल विमानतळ गाठला. हो, इथे ट्रेन्स रात्रभर सुरु नसतात. त्यांची सकाळही आपल्याप्रमाणे चार वगैरे वाजता होत नाही! रात्र कशी जाणार किंवा विमानतळावर वेळ कसा जाईल हा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. येणारी जाणारी माणसं , त्यांचे विभ्रम, भाषेच्या छटा, लहान मुलं तर आपलं भान हरवून टाकतात. या सगळ्यात झोपेची आठवणही होत नाही.

साडेसहाचं विमान म्हणजे अर्धा तास तरी आधी विमानात जायचं, म्हणजे साधारण साडेचार पाचच्या सुमाराला सिक्युरिटी चेक. तो होऊन आत गेलो. आज आकाश निरभ्र होतं. आकाशातून इथले, नेदरलँड्समधले रस्ते, पाण्यातून जाणाऱ्या बोटी हे सगळं आणि शिवाय शेतं आणि कुरणं बघायला मजा येते. आणि जर तो एप्रिल मे चा हंगाम असेल तर ट्युलिप्सचा नजारा खूपच देखणा दिसतो. आता सप्टेंबरमधे ही अशी शेतं बघण्याची काही मजा नाही. पण वरून ते ग्रीन हाऊसच्या पांढऱ्या प्लास्टिक आवरणातून पिवळा प्रकाश फेकणारे दिवे मात्र लक्ष वेधून घेणारे असतात. असाच बाहेर बघत असताना कधी नभ मेघांनी आक्रमिले ते कळलं नाही.

समोर दिसणारा ढगांचा पांढरा रंग किती भेसूर दिसतो. आपलं विमान तो भेदून पुनः जमिनीपर्यंत कसं पोहोचेल याची एक सततची हुरहूर मनाला लागून राहते.

फ्लाईट एक तास चाळीस मिनिटांचं म्हणजे आता जवळ आलं लुब्लिआना असं म्हणत आहे तोपर्यंत घोषणा झाली दहा मिनिटात आपण आल्प्स पार करू. घोषणा ठीक पण बाहेरच्या ढगांचं काय करायचं? त्यांचे तर थरांवर थर दिसत होते. पण आमचं नशीब जोरावर असावं. काहीतरी बर्फासारखं लांबवर दिसलं. भास असेल म्हणून सोडून दिलं तर सगळीकडेच त्या ढगांवर डोकं काढून आल्प्स आमच्याकडे पाहत होता. जवळ गेल्यावर मग फार ताणून न धरता त्याने आपलं सारं वैभव आमच्यापुढे खुलं केलं. आल्प्स तसा याआधी ऑस्ट्रिया स्वित्झर्लण्ड या ठिकाणी भेटला होता. पण आपल्याला नेहेमी भेटणारा आवडता मित्र पुनः पुन्हा भेटला तर होणारा आनंद द्विगुणितच होतो. आल्प्सचं हे विहंगम दर्शन अधिक मोहक होतं.

विमान उतरलं आणि टॅक्सी करत वळण घेऊन पुढे आलं तर समोर विमानतळाच्या इमारतीच्या दिशेने आणखी बर्फाच्छादित शिखरं ! म्हणजे इथेही आपल्याला बर्फाळलेले डोंगर बघायला मिळणार तर. हो, इथेही हा आहे आल्प्सच पण हा ज्युलिअन आल्प्स. मोठ्या आल्प्सचा धाकटा भाऊ. छोटा आहे ना !

हा विमानतळ राजधानीचा खरा पण हा नवस्वतंत्र, छोटासा देश. इथे आंतरराष्ट्रीय फ्लाईटस कितीशी असतील? कदाचित म्हणूनही अजून हा तसाच छोटा राहिला असेल ! बाहेर आलो आणि आपल्या गोवा किंवा औरंगाबादच्या विमानतळाची आठवण झाली

                                                                                                   (पुढील मजकूर 20 सप्टेंबर)       



टीप :फोटो नक्कीच देणार आहे. मला याची जाणीव निश्चित आहे की निसर्गाचं वर्णन करायला शब्द तोकडे पडतात. त्यांना फोटोची साथ मिळाली तर शब्दांना उठाव मिळतो. हे जरी खरं असलं तरी इथे दिले जाणारे फोटो हे पूरक असायला हवे असं माझं पहिल्यापासून ठरलं आहे, धोरण म्हणू या हवं तर. त्यामुळे इथे फोटो अप्रस्तुत ठरले असते. पुढील भागापासून त्याशिवाय पर्याय कुठे आहे? )

#SLOVENIA