Monday 20 July 2015

SWITZERLAND LUCERNE


स्वित्झर्लंड ल्युसर्न

एंगेलबर्गहून निघालो आणि थोड्या वेळातच ल्युसर्न/ ल्युझर्नला (Lucerne/ Luzerne) पोहोचलो. नावांबाबतीत इथे गोंधळ होतो. इथली भाषा जर्मन आपण इंग्रजीतून जाणून घेतो. आपल्याकडे जसं शीवचं सायन होतं इंग्रजीत तोच प्रकार इथे होतो. शहर टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. छोटस गाव पण आल्प्सची पार्श्वभूमी आणि सुंदर असा विस्तीर्ण तलाव हे या शहराचं वैशिष्ट्य. त्यातून तसं हे टिटलिसच्या जवळ आहे त्यामुळे सोयीचं. आम्ही संध्याकाळी स्टेशनवर उतरून तलावाजवळ आलो तेव्हा तिथे अक्षरशः जत्रा होती. गर्दी म्हणावी इतकी लोकं या तळ्याकाठीच्या खाद्यास्वादासाठी जमलेली होती. काहीजणांचा जलविहार सुरू होता. एकूणच अगदी उत्फुल्ल वातावरण होतं. कंटाळा येण्याला अजिबातच वाव नव्हता. आम्ही त्या तळ्याच्या काठाकाठाने जात होतो. पण लक्षात आलं की त्याचा आवाका खूप मोठा आहे तेव्हा फेरी मारणं वगैरे शक्य नाही. आपल्याकडे असलेल्या तासा दोन तासाचा वापर करायचा तर मग इथल्या प्रसिद्ध पुलांपैकी बघता आले तर बघितले पाहिजेत. हो, अर्थातच यांच्या जुन्या भागातून चक्कर मारणंही आवडण्याजोगं. मग आमची टाइम मॅनेजमेंट सुरू झाली.



Alt stadt म्हणजे जुनं शहर. सुरवातीला युरोपात आल्यानंतर प्रत्येक शहरात बघण्यासारखं काय याचं उत्तर जुना भाग हे असे. मला मजा वाटे की काय ही लोकं जुनं जुनं जोंबाळून बसतात. आपल्याकडे सुद्धा हे फॉरिनर्स आले की त्यांना जुनी दिल्ली बघण्यात जास्त रस असतो. आता मात्र इतक्या ठिकाणचे जुने भाग बघितल्यानंतर त्याचं महत्व कळतं. जुन्या भागातला एकजिनसीपणा कळतो, त्यातला खानदानी आब कळतो. तिथे चकचकीतपणा नसतो पण एक ऐट असते. लोभस आत्ममग्नता असते. निश्चितच या गोष्टी मनाला भुरळ घालतात. विशेषतः या लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे त्यामुळे ते त्याला नूतनीकरणाच्या नावाखाली हिडिस आणि ओंगळ स्वरूप आणू देत नाहीत. या भागातले रस्ते अगदी छोटे असले तरी ते फरसबंदी असतात. कुठेही खड्डे आढळत नाहीत आणि इथल्या वाहनांना हॉर्न नावाचा अवयव नसतो आणि इथल्या प्रजेला शिस्त नावाची गोष्ट जनुकातच टोचल्यामुळे ते त्या छोट्या रस्त्याच्या कडेच्या अरूंद फुटपाथवरून खाली उतरून वाहनांना अडथळा आणत नाहीत. आम्ही हा सगळा माहोल खूप एंजॉय केला. पण अर्थात आज वेळेची खूपच कमतरता होती.

इथला प्रसिद्ध लाकडी पूल बघितला नाही तर मग आलो कशाला इथे हा प्रश्न पडावा. चॅपेल ब्रिज (Chapel Bridge) संपूर्ण लाकडाचं आच्छादन असलेला असा हा पूल चौदाव्या शतकातला सर्वात पुरातन पूल. कोणा नतद्रष्टाच्या सिगरेटमुळे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या या पुलाची पुनर्बांधणी अगदी अलीकडची म्हणजे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातली. पुलाच्या अंतर्भागातली सजावट अनेकविध चित्रकारांच्या पुरातन चित्रांनी केली आहे. ही चित्रं ऐतिहासिक घटना चित्रित करणारी आहेत. या पुलाच्या मध्यभागात एक अष्टकोनी टॉवर आहे. तो तेराव्या शतकातला आहे. पुलाच्या बाहेरील अंगाला लगटून असलेली फुलं आणि पाण्यातली बदकं यांनी आणलेला जिवंतपणा पुलाला राजस रूप प्रदान करतो. पुलावरून चालत पलीकडे जाणं आणि दूरवरून त्याच्याकडे टक लावून बघत बसणं दोन्ही अतिशय आल्हादक आहे.



आजचं फिरणं खूप झालं होतं, हाताशी वेळही कमी होता. आम्हाला परत जाऊन उद्या परतीच्या प्रवासाची तयारी करायची होती त्यामुळे इथे रेंगाळून चालणारं नव्हतं. पुढच्या वेळी आपण हा माऊंट टिटलिसचा भागच प्रामुख्याने करू असं श्रीशैलला सांगत आम्ही फ्रायबुर्गला जाण्याकरता स्टेशनकडे परतलो.

दुसर्‍या दिवशी परतीच्या (नेदरलॅंडसमधील आइंडहोवन येथील आमच्या घरी) मार्गात आम्हाला पुनः बर्नला येवून तिथून बाझलला यावयाचं होतं तिथे मग आम्हाला ती आमची ड्यूसेलडॉर्फपर्यंत नेणारी हाय स्पीड ट्रेन मिळणार होती. तिथून जर्मनीची बॉर्डर ओलांडून मग नेदरलॅंन्डसमध्ये येवून मग आमच्या आइंडहोवेनला येणारी गाडी! इतक्या या सव्यापसव्याला इथे थेट प्रवास म्हणतात!

आम्ही बाझलला आलो तेव्हा पुढच्या गाडीकरता थोडा वेळ होता. निघाल्यापासून तसं खाणं काही झालं नव्हतं. श्रीशैल म्हणाला इथे थोडं काहीतरी खायला मिळेल का बघू. आम्ही आपले गतानुगतिकासारखे त्याच्या मागोमाग. एका स्टॉलवरून खायला घेतल्यावर तो म्हणाला जरा पुढे जाऊ या. पुढे गेलो तर तिथे पाटी France आणि बाण दाखवला होता.



आम्ही चकीत नजरेने बघत होतो. बाझल हे स्टेशन फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे स्टेशन तीन देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे एका बाणाच्या रेषेत आपण देश ओलांडतो. तर या बाजूला हा फ्रान्स दुसरीकडे म्हणजे आम्ही आता जाणार होतो त्या बाजूला एकीकडचा बाण जर्मनी दुसरीकडे स्वित्झर्लंड. आपल्याला No Mans land ची सवय असणार्‍यांना हे पचवणं जरा कठीणच! देशांमधल्या जाऊ द्या, आपल्या राज्यांच्या सीमेवरसुद्धा नाके असतात!




या अशाच एका नाक्यावर मी आता उभा आहे. माझ्या मनाच्या! इथून पुढे बाकी कोणालाही प्रवेश नाही. थोडक्यात मी आता थांबणार आहे. पुनः भेट होइल ही आशा आणि इच्छा दोन्ही आहे पण...... तोपर्यंत Auf Wiedersehen! अगम्य भाषेतलं हे पुनः भेटू का? असं वाटणं स्वाभाविक आहे पण या बाझलमधे स्वित्झर्लंड काय किंवा जर्मनीची काय भाषा जर्मन आहे तेव्हा तिचा मान राखायला हवा

No comments:

Post a Comment