Monday 27 October 2014

ITALY NAPLES (NAPOLI) III

इटली नेपल्स (३)

आंम्ही ग्रोटो अझ्झुराची गुहा बघून आलो त्या छोट्या बोटीने परत फिरलो. उन्हाची तीव्रता आता सतावत होती. मला कान्हाची आठवण झाली. एकदा का वाघाचं दर्शन झालं की इतर प्राणी बघण्यात कोणालाच रस रहात नाही तसं मग मघा जाताना ज्या म्हणून गोष्टी औत्सुक्याने बघत एकमेकांना दाखवत होतो त्यांच्याकडे परतीच्या प्रवासात ढुंकूनही न पाहता आम्ही काप्रीच्या किना-याला लागलो.

पाच वाजण्याचा सुमार असावा. काप्री गावही सुंदर आहे असं ऐकलं होतं. आता आलोच आहोत तर चक्कर टाकू या म्हणून चौकशी केली. गावात म्हणजे सिटी सेंटरला जाण्याकरता बस आणि फ्युनिक्युलर असे पर्याय होते. दुसरा आम्हाला माहित नसलेला. भाषेची बोंब. त्यामुळे समोर दिसलेल्या बसमध्ये चढलो. खेळण्यातली वाटावी अशी छोटी बस, वळणा वळणाचे रस्ते, गिरक्या घेत घेत वर गेलो. उतरून जरा फिरावं म्हणून निघालो तर त्या सेंटरचा जीव एवढासा. परत फिरण्यापेक्षा छोट्या रस्त्यांवरून जाण्याचं ठरवलं. झाडांनी गच्च असा रस्ता, उंच, सखल साधारण आपल्या माथेरानची आठवण यावी



रस्त्यात गंध भरून राहिलेला. फुलं म्हणावीत तर तसा नैसर्गिकही वाटला नाही. दुकानांमध्ये आयुर्वेदिक चूर्ण वगैरे असावी असं काहीतरी दिसत होतं, पण हा वास वेगळाच होता. पुढे गेलो तर जरा वरच्या बाजूला उंचावर असा एक मोठा तांब्याचा बंब आणि उभट भांडं दिसलं. वाफ त्या उभट भांड्यातून नळ असलेल्या बंबात जाऊन गार होत असावी. त्या्तून थेंबथेंब पाणी पडत होतं. त्या पाण्याचा आणि या वासाचा काही संबंध होता का? इतका वेळ आम्ही त्या भांड्याच्या आकाराच्या प्रेमाने आंधळे झालो होतो बहुधा. कारण मागे स्वच्छ पाटी होती ANTICA OFFICIN DEL PROFUMO. अत्तराने सुगंधित केलेल्या रस्त्यावरून पूर्वीचे राजे रजवाडे जायचे अशी वर्णनं आपण वाचतो. आम्हालाही आज तसच वाटलं. पुढेही मग तसाच आणखी एक बंब दिसला. कारखाने असावेत बहुधा.



समुद्राची दुसरी बाजू दिसत होती. आरामात फिरता येण्यासारखा माहोल होता. पण नंतर असं वाटू लागलं की शेवटच्या फेरीपर्यंत इथे थांबण्याइतकं काय असेल? पुनः हवामानावर सगळं अवलंबून तर वेळेत परत फिरावं. आम्ही पोहोचलो होतो त्यापुढे संरक्षित भागच होता. म्हणजे तसही परतच फिरायचं होतं. तो सुगंध मनात साठवत आम्ही परत फिरलो. मघा पाहिलेल्या त्या पाट्या वाचताना, परफ्युमला प्रोफुमा म्हणताना, ज्ञानेश्वरीतल्या लडिवाळ शब्दांची आठवण झाली.

परतताना माझी फेरीची हौस मात्र पूर्ण झाली. दुमजली मोठी बोट. तिच्या पोटात तळमजल्यावर गाड्या स्कूटर्स वगैरे वाहनं व्यवस्थित उभी करून ठेवलेली. गाडीत कोणीही बसून रहायचं नाही हा नियम लिहिला होता आणि प्रत्येकजण तो पाळताना दिसत होते. गाडी पार्क करून बाजूच्या किंवा मागच्या जिन्याने वर जाऊन बसत होते. या बोटीच्या खिडक्या उघड्या नव्हत्या आणि काचा धुरकट होत्या त्यामुळे बाहेरचं दिसण्याची शक्यता नव्हती आणि इच्छाही. शांतपणे बसू म्हणून मधल्या गॅंगवेच्या जवळच आम्ही बसलो होतो. बोटीच्या मध्ये जिना आणि दोन्ही बाजूना माणसं बसलेली. थेटरप्रमाणे खुर्च्यांच्या ओळींमधे दोन ठिकाणी मोकळी जागा, येण्याजाण्याकरता. बसल्यानंतर काही वेळाने एक इटालिअन म्हाता-यांचा ग्रूप आला. सगळ्यांना एका ठिकाणी बसणं काही शक्य नव्हतं म्हणून विखरून बसल्या. पण बसल्या तिथून एकमेकींशी बोलणं सुरू होतं. इटालिअन भाषा बहुधा हळू बोलताच येत नसेल आणि त्यांच्याकडे स्मित याला पर्यायी शब्दच नसेल कारण कधीही गडगडाटी हसायचं, दिलखुलास

बोट सुरू झाल्यावर जरा स्थिरस्थावर झाल्यावर मग थोडं काही काही ऐकू येण्याजोगी शांतता अनुभवली. आम्ही जिन्याजवळच्या दारासमोरच बसलो होतो. तिथे एक मुलगी तिच्या हातात एक छोटं बाळ घेऊन उभी आणि ते बाळ बेंबीच्या देठापासून ठणाणा करत आहे असा पुढचा सीन सुरू झाला. सगळेच अस्वस्थ. तिच्या शेजारी असलेला तिचा बॉय फ्रेन्ड की नवरा हताशपणे त्या रडण्याकडे बघत काही न सुचल्यासारखा उभा होता. ती मुलगी कातावली होती. या बायकांनी ते रडणं ऐकलं होतं पण होइल बंद थोड्या वेळात म्हणून त्यांच्या गप्पा सुरू होत्या. बाळाने आता शेवटच्या पट्टीतला सूर लावला आणि त्या आजींचा संयम सुटला. सरळ तिच्याकडे गेल्या आणि त्यांनी ते मूल स्वतःकडे घेतलं. छातीशी धरून जोजवल्यावर तेही हळू हळू हुंदकत हुंदकत शांत झालं. त्या मुलाने निःश्वास टाकला असावा, त्याचं आणि त्याच्या आईचही टेन्शन संपलं. ती आजी संपूर्ण तासभर त्याला घेऊन उभी होती आणि तो तिचा नातू/ नातही निवांतपणे तिच्या हातात पहुडला होता.

त्या ग्रूपमधल्या दोघी बायका एक आमच्या शेजारी आणि एक पुढच्या रांगेत अशा बसल्या होत्या. आमच्या शेजारी बसलेल्या बाईला उत्तराशी बोलायची खूपच उबळ. काहीतरी ती सांगत होती उत्तरा हसून हो म्हणत होती. एवढ्यात तिने हातातलं फूल पर्समध्ये ठेवायला घेतलं. सायलीचं ते फूल बघून उत्तराने काहीतरी विचारलं तर लगेच या, जस्मिना जस्मिना म्हणून तिने ते तिला देऊनही टाकलं. पुनः हसण्याचा धबधबा. आम्हाला काही कळेना .तिच्याकडे बघितलं तर ती तिच्या मैत्रिणीला वरून पडणारं एसीचं पाणी आणि नको तिकडे झालेलं ओलं हसून दाखवत होती. या लोकांचा हा दिलखुलास स्वभाव प्रेमात पडावा असा आहे. भाषेची अडचण असेल पण समजण्याची नाही हे मात्र इथे चांगलच जाणवतं.

                                                                                   to be contd.
                   

Monday 20 October 2014

ITALY NAPLES (NAPOLI) II



इटली नेपल्स (२)

सुटलो ते थेट तिकिट खिडक्यांपाशी. इथे पुनः झटापट. हायड्रोफिल घेण्यापेक्षा फेरी घ्यावी ती जास्त reliable, वा-याच्या दृष्टीने आणि स्वस्त असते अशी माझी माहिती होती (म्हणजे मी इंटरनेटवर कुठेतरी वाचलं होतं) . इथे फेरीचा धक्का आणखी कुठेतरी होता. शोधणं हे आपल्या आवाक्यातलं नाही तेव्हा समोरचा पर्याय बरा म्हणून हायड्रोफिलची चौकशी केली तर ती होती दोन वाजतापर्याय नव्हता. तिकिटं घेतली आणि धक्क्यावर फिरायला लागलो. वेगवेगळ्या कंपन्या आणि त्यांच्या बोटी. गन्तव्य स्थानंही वेगवेगळी आणि ती सगळी टूरिस्ट डेस्टिनेशन्स म्हणजे अमाल्फी पालेर्मो वगैरे. आपली बोट कुठे लागणार हे कसं कळेल हा संभ्रम होता पण तिथे इंडिकेटर्स दिसले त्यावर कंपनीचं नाव आणि बोटीची वेळ दोन्ही होतं.

दीडच्या सुमारास आमच्या कंपनीची बोट लागली. पुढच्या काही सीटसवर न बसण्यासाठी दो-या बांधल्या होत्या. नंतर कळलं काल आमच्याबरोबर एअरपोर्टवरून आलेल्या बसमधले खूपजण सामान घेऊन थेट इथेच उतरले होते. तसेच जे कोणी असतील त्यांच्या सामानाकरता ती जागा मोकळी असणार होती. त्याच्या मागे खिडकीत आम्ही बसलो. अगदी दरवाजासमोर बसायला हवं होतं असं नंतर मनात येऊन गेलं खरं पण तोपर्यंत तिथे एक अर्धवस्त्रा आणि तिचा प्रियकर बसला होता. आणखी दोघं नंतर येऊन बसले. बोट सुरू झाली. तुफान वेग आणि भन्नाट वारा त्या अर्धवस्त्राने हळूच टॉवेल लपेटला आणि तेही अपुरं आहे म्हटल्यावर ती मुकाट मागे निघून गेली. आमचा निर्णय चुकून बरोबर ठरला होता. मागे टाकलेले नेपल्स समोर दिसत होतं. छान लांबलचक किनारा आणि त्या अंगाने वाढलेले शहर. फारशा उंच इमारती नाहीत. एकूण तसं फारसा प्रभाव टाकणारं नसलं तरी ठीक नक्कीच होतं.

साधारण ४० मिनिटं झाली असावीत. समोर काप्रीचा किनारा दिसू लागला होता. मध्यंतरी एक प्रचंड बहुमजली उंच असे जहाज दिसले. देखणे, त्याचा आब राखून त्याच्यापासून अंतरावरून लहान बोटी जात होत्या. आता वर्दळ वाढली होती आणि समोरच्या किना-यावरील घरं दिसू लागली होती. उतरलो आणि पुढचा शोध अझ्झुराकडे जाणा-या बोटीचा. ही लहान यांत्रिक बोट. त्याचा काऊंटर दिसला, तिकिट काढले आणि नावाड्याने इशारा करताच आत चढून बसलो. १५-२० जणं असतील. आपल्या घारापुरीसारखी छोटी बोट ती. हा समुद्र सुंदरच आहे. निळेशार पाणी. मोठ्या बोटी ते हायड्रोफिल, आपल्या गोव्याला असतात तशा मोटारी स्कूटर्स पोटात घेऊन जाणा-या फेरी (बोटी) वगैरे. काप्रीचा किनारा डावीकडे ठेवून डोंगराच्या आडोशाने आम्ही निघालो होतो. वाटेत आमच्यासारख्या असंख्य छोट्या बोटी परतताना दिसत होत्या. वीस पंचवीस मिनिटांनंतर आम्ही त्या ग्रोटो अझ्झुरापाशी पोहोचलो. तिथे ही भली मोठी वेटिंग लिस्ट होती. खूपशा बोटी थांबल्या होत्या आत गुहेत जाण्यासाठी.

त्या निसर्गनिर्मित गुहेत जाण्यासाठी छोटी होडकी होती. काहीमध्ये दोन काहीत चार, पाच अशा संख्येने, नावाडी आत जात होते आणि त्यांना घेऊन परतत होते. आमचा नंबर कधी लागणार होता देव जाणे. आमच्या बोटीत असलेले जपानी की फिलिपिनो की आणखी कोणीतरी छोट्या होडक्यात बसायचं या कल्पनेने अंगावरील कपड्यांचं ओझं कमी करू लागले. प्रत्येकाने बूट चपला काढल्या शॉर्टस किंवा पोहोण्यासारखा पोशाख असं सर्वसाधारण स्वरूप होतं. उत्तराच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह. मी म्हटलं समोरून त्या गुहेत जाऊन येणारी माणसं बघ. ती पूर्ण कपड्यात आहेत त्या अर्थी कपडे भिजणार नसावेत. ही यांचीच हौस दिसते आहे. त्यांना पुरी करू देत. चाळीस मिनिटांनंतर एक एक होडकं आमच्या बोटीपाशी येऊन दोघं दोघं, क्वचित चौघं असे जाऊ लागले. शेवटी आम्ही दोघं एक रशियन मुलगी आणि तिची गोड मुलगी असे शेवटच्या होडक्यात बसलो. आतापर्यंत हायड्रोफिलचे २०.५० युरो  नंतर छोट्या बोटीचे १३.५०युरो आणि आता गुहेत नेणा-या होडक्याचे ९ असे एकूण ४३ युरो खर्च झाले होते. टीप वेगळी द्यावी लागणार होती. पुनः नेपल्सला परत जाण्याचे तिकिट होतेच. अर्थात हे सगळं आता नजरेसमोर तरळून जात आहे. त्यावेळी नीलभूल आम्हाला सतावत होती.

आम्ही त्या छोट्या होडक्यात बसलोउत्तरा आणि ती रशियन या दोघी बायका एका बाजूला आणि मी समोरमाझ्या मागच्या उंच फळीवर नावाडी. गुहेचं दार आलं. नावाड्याने आम्हाला खाली सरकून जमिनीला समांतर होण्यासाठी सांगितलं आणि तो अंदाज घेऊ लागला. भरतीची वेळ होती.  पाणी जास्त. त्यामुळे गुहेचं तोंड आणखी अरूंद म्हणजे त्याची कसोटीच होती. पण लाट ओसरली अशी वाटल्याबरोबर त्याने बाजूच्या साखळीला धरत स्वतः जमिनीला समांतर होत होडी आत गुहेत ढकलली. त्यांचं ते गणित आणि कौशल्य वाखाणण्यासारखं. आत मिट्ट काळोख. Open eyes असे त्याने सांगितल्यावर प्रथम संपूर्ण काळोखाने भरलेल्या त्या गुहेतला पाण्यातला निळा रंग मनापर्यंत पोहोचला. बाहेरचा समुद्र काही कमी निळा नव्हता पण हा निळा रंग निश्चित वेगळा होता. कोणीतरी त्याचं वर्णन Divine, दैवी असं केल्याचं आठवतं. रंगाचं वर्णन शब्दात कसं करतात माहीत नाही. मी आपलं तो डोळ्यात आणि      कॅमे-यात साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात होतो. आत त्या गुहेत फारशी जागा नव्हती. एकापाठोपाठ येणा-या छोट्या बोटींची आत दाटी झाली होती.  आत येणारी प्रत्येक बोट शिस्तीत आत येऊन एका कडेला उभी रहात होती. साधारण दहा मिनिटे आत होतो. त्यातली पहिली दोन मिनिटे त्या काळोखाला सरावण्यात गेली असावीत नंतर अवाक होण्यात आणि डोळ्यात साठवून ठेवण्यात आणि फोटो काढण्यात वेळ कधी संपला ते कळायच्या आत आम्ही बाहेर आलो होतो. बाहेर वाट बघणा-या गर्दीलाही आत येण्याकरता जागा करून द्यायला हवीच होती.

                                                                    to be contd.                                                                                                                              
गेल्या वेळी एकही फोटो नाही अशी तक्रार खूपजणांनी केली. सर्वसाधारणपणे विषयाला धरून फोटो असावेत अस मला वाटतं. त्यामुळे गेल्या वेळी  ते दिले नाहीत. यावेळी दिलेले फोटो क्रमाने आहेत. पहिला गुहेच्या तोंडाशी आत जाण्याकरता असणा-या बोटीचा पण तरीही गुहेचं तोंड किती अरूंद याची कल्पना येत नाही. नंतरचे फोटो, शेवटचा सोडून, गुहेच्या आत असताना घेतलेले. जर स्लाइड शोमध्ये एकापाठोपाठ बघितले तर मला अभिप्रेत असणारी अनुभूती मिळू शकते.












Monday 13 October 2014

ITALY NAPLES (NAPOLI) I

इटली नेपल्स (१)

इटलीमधल्या नेपल्सपासून आम्ही सुरवात करणार होतो. का? श्रीशैलने तसं ठरवलं म्हणून! इटली हे त्याचं तसं आवडतं ठिकाण. पहायला आणि खायला भरपूर आणि स्वस्त. शाकाहारी पदार्थ युरोपात इतक्या प्रमाणात दुसरीकडे कुठे खाल्ले जात असतील असं वाटत नाही. आणि तसही त्याचं या देशात येणंही खूपदा झालं असल्याने त्याचं वाक्य प्रमाण मानायला हरकत नव्हती. हो, आणखी एक आणि महत्वाचं कारण होतं, आइंडहोवेनहून येणारी लो कॉस्ट फ्लाइटस नेपल्सकरता उपलब्ध होती. हे सारं मी त्या शहराचं महत्व कमी करण्यासाठी मात्र सांगत नाही. ही याची जास्तीची कारणं म्हणूया.

नेपल्सला विमानतळावर उतरल्यावर आम्ही Exit शोधत (!) निघालो. जिथे म्हणून बाण असे तिथे उलटा सरकता जिना. आम्हाला मग मजाच वाटायला लागली त्या शोधण्याची. अखेरीला जिथे खरोखरीची एक्झिट होती तिथे एक मस्त पडदा होता. का? त्यांनाच माहीत. आम्ही जवळ जाताच तो रंगीत काचरूपी पडदा बाजूला झाला आणि आम्हाला बाहेरचं दर्शन झालं. समोरच्या i (information) काऊंटरवर नेहेमीप्रमाणे चौकशी करावी म्हणून गेलो तिने व्यवस्थित तिच्या उजवीकडे बोट दाखवून अली बस, मॅकडोनाल्डजवळ वगैरे सांगितलं आणि एक जाडजूड पुस्तक हातात ठेवलं. माझं प्रश्नचिन्ह बघून म्हणाली Its free! आपली फुकट असेल तरच घेण्याच्या वृत्तीची ख्याती इथवर आहे की काय असा मनात विचार आला. आता सरळ बाहेर पडायचं तिने दाखवलेल्या दिशेने तर मला माझ्या उजव्या हाताला असलेला दरवाजा दिसला. बाहेर तर जायचं आहे इथून काय आणि तिथून काय असं म्हणत बाहेर पडलो. बस स्टॉप होता समोरच पण कोणीच नव्हतं तिथे. म्हणून काही लिहिलेलं आहे का बघायला गेलो तर सडकछाप तिघे बाजूला बसले होते त्यांनी इटालिअनमधून काहीतरी विचारल्यासारखं वाटलं. त्यांना म्हटलं नापोली? या या नापोली, अली बस असं म्हणून ते दूरवर हात दाखवते झाले. आम्ही पार्किंग लॉटमध्ये घुसलो होतो. तिथून बाहेर पडलो. रस्ता ओलांडला आणि आमच्या समोरून अली बस गेली. आता?

पण बसची फ्रिक्वेन्सी बरी असावी कारण नंतरची बस २०-२५ मिनिटांनी होती. चला पहिली लढाई जिंकलो असं म्हणत मी सामान आत घेणार तेव्हढ्यात तिथे विसावलेल्या ड्रायव्हरने सामानाच्या जागेकडे बोट दाखवले. त्याची आज्ञा शिरसावंद्य असे म्हणत सामान आत टाकून बसलो. सुदैवाने इथे तिकिटं ड्रायव्हरकडे मिळणार होती.

तासाभराचा रस्ता. तसं शहरासारखं शहर. ट्रॅम, खासगी गाड्या, टॅक्सी यांच्या गर्दीतून वाट काढत बस पुढे जात होती.म्युनिसिपालिया नापोली असं आमच्या स्टॉपचं नाव होतं. रस्त्यावरच्या पाट्यांकडे माझं लक्ष होतच. एका ठिकाणी समुद्राच्या कडेला बस थांबली आणि लोकं पटापट उतरू लागली. शेवटचा कि काय असं वाटून मी ड्रायव्हरला विचारणार एवढ्यात शेजारचा माणूस म्हणाला तुमचा स्टॉप पुढे आहे. आम्ही बसलो, बस सुरू झाली, एक गोल गिरकी घेऊन थांबली आणि तो म्हणाला हा तुमचा स्टॉप! म्हणजे काय कोण जाणे आम्ही उतरलो.

नकाशाचं आणि माझं प्रेमाचं नातं लक्षात घेऊन मग आम्ही तिथे उभ्या असणा-या पोलिसाला हाततला कागद दाखवला. यांचे उच्चार आपल्याला येत नाहीत घोटाळ्यात आणखी भर पडायला नको.अडाणी म्हटलं तरी चालेल पण गोंधळात आपल्याकडून भर नको म्हणून कागद दाखवणं बरं. त्याने समोरच्या दिशेने बोट दाखवलं. पलीकडे जा असं खुणेने सांगितलं एवढं कळलं. आम्ही निघालो. समोरच्या बाजूलाच एक पुरातन किल्ला होता. त्याच्या उजव्या बाजूला खोदून ठेवलेलं आणि मध्यातून एक तात्पुरता रस्ता माणसांना पलीकडे जायला. कडेने निघालो. म्युनिसिपल पोलिस असे पाठीवर लिहिलेले दोघे जण आमच्या पुढे चालत होते त्यांना पुनः एकवार कागद दाखवला. इंग्रजीची बोंब त्यामुळे खुणा आणि हातवारे हा आधार पण ते सारं आमच्यापर्यंत पोहोचत होतं हे नक्की. त्यांनी तीच दिशा दाखवली. आम्ही पुनः समोरचा रस्ता ओलांडला. आणखी एक टप्पा डेस्टिनेशन जवळ, असे म्हणत आपल्यासारख्या दिसणा-या एका बाईला पत्ता दाखवला तर ती म्हणाली. ती श्रीलंकन आहे. इटालिअन माणसाला दाखवा. बरं म्हणत पुढे जात होतो तर एक मुलगा आमच्याकडे आला तुम्ही दोमुसकडे, उच्चार करताना मात्र दोनंतर भलीमोठ्ठी गॅप घेऊन स ला स जोडायचा (Domus) कडे जाता आहात का तर चला मी घेऊन जातो असं म्हणत त्याने दिशा दाखवली. तिथे काम करणारा तो नेमका आम्हाला त्या कोप-यावर भेटावा हा योगायोग. सुरवात तरी चांगली झाली होती.

अपार्टमेंट उत्तम होतं. भिंती सजवलेल्या वगैरे तर होत्याच पण छान उजेड आणि बाल्कनी होती. संध्याकाळी किंवा रात्री निवांत बसता आलं असतं. वेळ फक्त कमी होता. झालं होतं असं की नेपल्सला एक दिवस पुरे असं डोक्यात ठेवून रिझर्वेशन केल्यावर लक्षात आलं की इथूनच काप्रीकरता बोटी सुटतात. त्यामुळे आता वेळेचं नियोजन अगदी आवश्यक होऊन बसलं होतं. यात श्रीशैलचा दोषही काही नव्हता कारण त्याने सगळं आम्हाला आधी विचारून मगच बुकिंग्ज केली होती. त्यावेळी ठीक आहे म्हणत आम्ही पुढच्या तयारीला लागलो. इथे आलो तेव्हा दुपारचे साडेबारा वाजले होते. सुदैवाने काप्रीच्या बोटी सुटतात तो धक्का समोरच पाच मिनिटात पोहोचण्याच्या अंतरावर. आम्ही बरोबर असलेला चहा घेतला आणि सुटलो....

                                                                              to be contd.               

Tuesday 7 October 2014

भूमिका

भाग दुसरा


आम्ही जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी  मुंबईला परत आलो. भेटल्यानंतर प्रत्येकाचा प्रश्न असे कधीपासून ब्लॉगवर टाकतो आहेस? या वाक्याच्या शेवटी काहीवेळा प्रश्नचिन्ह काहीवेळा उदगारचिन्हही असे याची जाणीव मला होती. गणपतीत एका सुहृदांकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्या कॉलेजमध्ये   जाणा-या मुलाने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा असं वाटलं की काहीजण गांभीर्याने, खरोखरीच्या भावनेतून जर हा प्रश्न आपल्याला विचारत असतील तर आपण न लिहिणं हाही जरा अगोचरपणाचाच प्रकार होईल.

मला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं. मी ते मनापासून उपभोगतो. काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात, उलगडतात. हे समाधान मिळणं हा माझा सगळ्यात मोठा लाभ असतो (हल्लीच्या हिंदी वळणाच्या भाषेत उपलब्धी असते!).

या ब्लॉगच्या वाचकांची वर्गवारी मला जेव्हा दिसते तेव्हा आणखी एक गोष्ट ध्यानात येते की याद्वारे जगातील काही देशातील "आपल्या" माणसांपर्यंत आपण पोहोचत आहोत. यात युक्रेन, रशिया आहे त्याचप्रमाणे मलेशिया एमिरेटससारखे देशही आहेत. अमेरिका इंग्लंड आणि युरोपातील देशातूनही हे वाचलं जातं. म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे मराठीमध्ये लिहिलेलं वाचणारी लोकं जगभर आहेत. वाचणार कोण म्हणून हात आखडता घेण्याची खरोखर आवश्यकता नाही.

खूपजणानी या लिखाणाला ट्रॅव्हलॉग असं म्हटलं आहे. काही अंशी ते खरही आहे.  निमित्त प्रवासाचेच आहे. पण  भर मात्र  प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतोतो माझा आनंदच शब्दात पकडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे हे अनुभव प्रवासवर्णनावर कित्येकदा मात करतात.  इरावती कर्व्यांनी उत्खननादरम्यान मिळालेल्या एका स्त्रीच्या कवटीकडे बघू्न उद्गार काढले होते "तू ती मीच का ग?" त्याच धरतीवर  या परक्या ठिकाणी भेटणारी माणसं बघूनही मला तोच बंध तोच समान धागा जाणवतो. आपली संस्कृती किती मोठी हे म्हणताना आपण नकळत दुस-याला लहान करण्याच्या प्रयत्नात असतो. या माणसांना भेटताना जाणवणारी गोष्ट म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत. किंबहुना मानवी स्वभाव हा सारखाच असतो, व्यक्त होण्याच्या पद्धतीत काय तो बदल. मनामध्ये का होइना वैश्वकतेची बैठक तयार होण्याकरता या सगळ्याचा निश्चित सकारत्मक उपयोग होतो. 

गेल्या वेळी परदेशात असतानाच ऑस्ट्रिया, नेदरलॅन्डस आणि बार्सिलोना लिहून झालं होतं. ते स्वान्त सुखाय होतं. त्याचा ब्लॉग वगैरे करण्याचं, लिहित असताना काही डोक्यात नव्हतं. अर्थात ते करायचं ठरल्यानंतर अनुभवांती, सूचनांप्रमाणे त्यात बदल कसे होत गेले त्याचे तर तुम्ही साक्षीदारच आहात. यावेळी मात्र थोडी वेगळी परिस्थिती आहे. तिथे असताना लिहावं इतका आमचा मुक्काम मोठा नव्हता. इथे आल्यानंतर लिहिण्याकरता पोषक वातावरण नव्हतं. त्यामुळे थोडा वेळ घेऊन नंतर आत्मविश्वास वाटला तेव्हा पुनः ही सुरवात करत आहे. गेल्या वेळेप्रमाणे वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया ब्लॉगवरच लिहिल्या तर माझ्याप्रमाणेच इतरांपर्यंत आपली मतं पोहोचू शकतील. आणि महत्वाचं तुमच्या सूचनांचा निश्चितपणे विचारही होइल.  आठवड्याच्या मंगळवारी सकाळी तुम्हाला लेख वाचता यावा असा माझा प्रयत्न असेल, गेल्या वेळेप्रमाणेच.

भेटू या तर मंगळवारी!