Monday 24 November 2014

ITALY ROME (ROMA) III

इटली रोम (रोमा) (३)

खरतर खूप दमायला झालं होतं. थोड्या विश्रांतीची आवश्यकता होती आणि ती त्या हिलवर निश्चित मिळाली होती. कुठेतरी वाचलं होतं की इथून स्पॅनिश स्टेप्स, त्रेवी फाऊंटन आदी ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅम सोयीची आहे. आम्ही चौकशी केली. हो, इथे लोकांकडे चौकशी केलेली त्यांना चालते त्यामुळे आम्ही निःसंकोचपणे त्यांना विचारत असू. पण कोणालाच अशी काही माहिती नव्हती. त्यांनी आम्हाला माहित असलेली माहितीच पुनः सांगितली. त्याप्रमाणे मेट्रो पकडून आम्ही बार्बेरिनी स्टेशनवर उतरलो आणि चालायला लागलो. या चालण्यातली एक गंमत सांगायलाच हवी. इटली आपल्याप्रमाणेच आहे, अतिशय बेशिस्त, हॉर्न्स वाजत असतात, लोकं कुठेही रस्ता ओलांडतात, सिग्नल वगैरे काही बघत नाहीत वगैरे ऐकलं वाचलं होतं. इथे आल्यावर वाटलं इटली जर आपल्याप्रमाणे असेल म्हणजे आपण जर याबाबतीत त्यांच्याप्रमाणे असू तर मला खरोखरच चालेल. म्हणजे लोकं सिग्नलशिवाय रस्ता ओलांडतात हे जरी खरं असलं तरी येणा-या मोटारी पादचा-यांचा मान राखतात. आपल्याकडची हॉर्न संस्कृती शांतता झोन वगैरे निर्माण करायला लावण्याइतकी वाईट आहे. आपल्यामधे असलेला हॉर्नच्या उपयोगातला उर्मटपणा / अरेरावी मला इथे दिसली नाही. इथे त्यांच्याकडे तारतम्य दिसते. आणि तसेही सर्वसाधारणपणे सिग्नलला उभी असणारी माणसे हा इथे अपवाद नाही, युरोपच्या एकूण शिस्तप्रिय प्रतिमेपुढे इटली थोडी कमी इतकच. त्यांच्याविषयी प्रवादच जास्त आहेत.

तर स्टेशनला उतरून बाहेर आलो. लांब आहे, चालायला लागणार वगैरे ऐकलेल होतं. आमच्यापुढेच एक जोडपं चाललं होतं. त्यांनी कोणालातरी त्रेवी कुठे विचारल्यासारखं ऐकू आलं. त्यामुळे आम्हीही सरळ ती दिशा धरली. पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे गल्ल्या बोळातून फिरताना दिसत होते. त्यामुळे इथे ब-याच गोष्टी सापडतील याविषयी वाद नव्हता. बरं या गल्ल्याही कशा, तर छान फरसबंदी म्हणाव्या अशा. दगडी पेव्हर ब्लॉक्सच ते पण भक्कम. रमत गमत चालण्य़ाचाही आनंद लुटावा, ठिकठिकाणचे रस्त्यावर असणारे विक्रेते न्याहाळत जावं असं वातावरण. या टेहळणीत अनपेक्षितपणे काही सुंदर गोष्टी दिसतात. त्यातल्याच काही दुकानातल्या   लाकडी वस्तू, बघत रहाव्या अशा!




पॅन्थिऑन याच भागात आहे हे माहीत होतं पण काय कोण जाणे आमच्या नजरेस काहीच पडत नव्हतं. म्हणजे चर्चेस बघितली, कारंजीही बघितली पण ती ही नव्हेत इतकं तर कळत होतच आम्हाला. एका गल्लीत काहीतरी लाइन दिसली पण तिथे तर सगळं झाकून ठेवलेलं दिसत होत मग रांग कसली? म्हणून पुढे झालो तर ते त्रेवी फाऊंटन होतं. सध्या दुरुस्तीकरता बंद आहे हे सिमोने काल म्हणाला होता त्याची आठवण झाली. ( I am afraid you may not be able to see Trevi. Some repairs are under way इति सिमोने, हा आमचा हॉटेलमधला अटेन्डन्ट) हे खूप सुंदर आहे असं म्हणतात. इथे नाणं टाकल्यावर इच्छा पूर्ण होते. एकदा नाणं टाकलं की प्रेम जमतं, दुस-यांदा लग्न आणि तिस-या वेळी घटस्फोट हे वाचलेलं आठवलं. तसही भारतातलं नाणं आत्ता माझ्याकडे नव्हतं आणि युरो टाकले तर मग खाणार काय? तेही रांगेत उभे राहून नाणं टाकून कोणाचं प्रेम / लग्न किंवा घटस्फोट मिळवायचा होता? आम्ही काढता पाय घेतला.

मघा येताना एक काहीही आकर्षक नसलेलं असं चर्चसारखं काहीतरी बघितलं होतं. आत जाऊन पाहू तरी म्हणून आत गेलो. बाहेर कोणतीही पाटी नाही. आकर्षक म्हणावं असं काहीच नाही तरी इतकी लोकं का जाताहेत हा एकच निकष मनात धरून आत गेलो अणि चकितच झालो. हे पॅन्थिऑन होतं



बाहेरून अनाकर्षक वाटणारं पॅन्थिऑन

वर छताच्या ठिकाणी आकाशाकडे तोंड केलेलं एक मोकळं आकाशाबरोबर थेट संवाद करणारं भलमोठं विवर म्हणावं असंभिंतींवरची चित्रं  नेहेमीप्रमाणेच ग्रेट वगैरेपण या रचनेमागचं उद्दिष्ट मात्र कळलं नाहीपावसाच्या पाण्याचा निचरा कसा होत असेलवगैरे अनेक प्रश्न मनात निर्माण झालेएक वेगळं काहीतरी बघितलं इतकच समाधान घेऊन बाहेर पडलो. (नंतर विलास आणि पद्मजा या आर्किटेक्ट मित्रांबरोबर बोलताना "या सगळ्यांनी आम्हाला आर्किटेक्चरल हिस्ट्रीमध्ये खूप छळलं आहे" ऐकलं तेव्हा आम्हाला आमच्या या शोधयात्रेतल्या छळाची (?) आठवण झाली.)






आता आपल्या हिशोबाने संध्याकाळ उलटून रात्र झाली होती. आठ वाजत होते. परतायला हवं होतं पण आज स्पॅनिश स्टेप्स बघितल्याशिवाय जायचं नाही हेही पक्क होतं शिवाय हीच वेळ त्यांना भेट देण्याची. निवांतपणे पाय-यांवर बसलेले लोक ही त्याची ओळख. या लोकांना खरतर कसलही टूरिस्ट डेस्टिनेशन करता येतं हे पटलं. आपल्याकडे टेकडीवर जाण्याकरता पाय-या असतात तशा पाय-या, थोड्याशा आर्टिस्टिक वगैरे, त्यांच्या हिशोबातली गर्दी, आपल्याकडे ज्या गोष्टीपासून आपण कायम दूर पळतो, निवांतपणा शोधतो तीच गोष्ट यांचा यूएसपी. तशी लोकं होती, खरतर हा जुलै महिना म्हणजे म्हणे ओसंडून वाहणारी गर्दी असते तस काही चित्र नव्हतं. आम्हीही काही क्षण विसावलो. नंतर सगळ्या पाय-या चढून वर गेलो. पण इमारतींच्या भाऊगर्दीत तसं उंचावरून दिसणारं शहर वगैरे दिसणं शक्य नव्हतं


स्पॅनिश स्टेप्स


जरा इथे तिथे हिंडलो. पुनः त्या बार्बेरिनी मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाण्याचं अगदी जिवावर आलं होतं. तोच आम्हाला मेट्रोचा M दिसला. हे बार्बेरिनीच्या पुढचं स्पॅग्ना स्टेशन. आमचीच ऑरेंज लाइन होती. त्यामुळे गाडी टर्मिनीला बदलणे वगैरे भानगड नव्हती. सगळ्या पाय-या चढून वर गेल्याचं सार्थक झालं.

परतीच्या वाटेवर आमच्या घराजवळ एक पित्झेरिया उघडा दिसला. आतमध्ये दोघंजण खात बसले होते. काऊंटरवरच्या बाईने आस्थेने चौकशी केली आणि नवे आहोत म्हटल्यावर शाकाहारीमधले तिच्याकडे असलेले मोझोरिला, मार्गारिट्टा, याव्यतिरिक्त फक्त बटाट्याचे काप घातलेला प्रकार दाखवला आणि म्हणाली की प्रत्येकाचा एक तुकडा देते मग ठरवा. प्रत्येकी चार असे आठ तुकडे वजन करून तिने आमच्याकडे दिले आणि बसून घ्यायला सांगितलं. खरतर तिकडे एकूण चारच स्टुलं होती. तीही अगदी जवळ जवळ. कुठे बसणार असा प्रश्नच होता. पण त्या माणसाने माझं झालच आहे म्हणून जागा करून दिली आणि आमचं सुखेनैव जेवण झालं.

परतताना हसन दुकानात दिसला. बंद करायच्या तयारीत होता. उद्या व्हॅटिकनला जाणार म्हटल्यावर आस्थेने बरोबर फळं वगैरे घेऊन जा म्हणाला. त्याला म्हटलं बाबा आज सकाळी तर नव्हतास तू. तेव्हा उद्या नक्की असेन असं आश्वासन तरी दिलं. बघू असलाच तर ठीक नाहीतर इतर कु्ठूनतरी घेऊन जायला हवं. काल भेट झालेला हा मुलगा, पण त्याच्या वागण्याने, सौजन्याने किती आपलेपणा निर्माण करून ठेवला आहे त्याने!

                                                                                                 समाप्त
                                                                                                 पुढच्या मंगळवारी व्हॅटिकन                                           

Monday 17 November 2014

ITALY ROME (ROMA) II


इटली रोम (रोमा) (२)

रोममध्ये मेट्रो आहे आणि आमचं हॉटेल स्टेशनच्या अगदी जवळ त्यामुळे फारसं टेन्शन नव्हतं. सकाळी उठून बाहेर पडलो. जाताना हसनच्या दुकानात डोकावलो त्याला गुड मॉर्निंग घालू या म्हणून, पण दिसला नाही. संध्याकाळी भेटेल म्हणत आम्ही पुढे गेलो. स्टेशनवर आलो आणि तीन दिवसाचं तिकिट काढण्याकरता मशीनची बटणं दाबली. आमच्याकडे होत्या त्या १०० आणि ५० च्या नोटा टाकल्या आत. सुरवातीला वाटलं आमचं काहीतरी चुकतं आहे. नंतर बघितलं तर स्क्रीनवर सूचना येत होती २०च्या नोटा टाका म्हणून. १६ युरो प्रत्येकी म्हणजे ३२ रुपयाच्या सुट्ट्यांचा हिशोब त्या मशिनला जमत नसेल तर इथल्या माणसांमध्ये आणि मशीनमध्ये फरक नसावा! ( .९६*८ हे साधे गणित पण हे आठ वेळा ती रक्कम मांडून दुकानात हिशोब करत असत त्याची आठवण झाली) आता या २०च्या नोटा कुठून आणू काही कळेना. मग आठवलं की न्यूजपेपर स्टॉलवर बस, मेट्रो सगळी तिकिटं मिळतात. पुनः वर आलो आणि स्टॉल शोधायला लागलो. मिळाला, जवळच होता. त्याला म्हटलं बाबा तीन दिवसांचं तिकिट हवं. तो म्हणाला माझ्याकडे फक्त दिवसाचीच तिकिटं आहेत. म्हटलं मग मला ५० सुट्टे दे. कोणतेही आढेवेढे न घेता त्याने पैसे काढून दिले आणि आम्ही तीन दिवसांच्या तिकिटानिशी गाडीमधे चढलो(तीन दिवसाचं तिकिट हे एक दिवसाची तीन तिकिटं घेण्यापेक्षा स्वस्त असतं म्हणून हा आटापिटा!)

गर्दीची वेळ खरी, पण आज गाडी बदलायची नव्हती. त्यामुळे तसा प्रश्न नव्हता. शिवाय हात मोकळे होते, सामान नाही. तसेही इथल्या गर्दीला गर्दी म्हणायची ती इथल्या प्रमाणात. आपल्यासारखं खेटून उभं रहाणं नाही. अंतर राखून सगळे असतात त्यामुळे तसा आपल्याला प्रश्न नसतो. कलोझियम याच नावाचं स्टेशन आहे. बाहेर आलं की समोर  कलोझियम दिसतं. खूप गर्दी दिसत होती. कोणती गर्दी कशासाठी हा उलगडा करून घेइपर्यंत कित्येक लोक सरळ लाइन वगैरे न बघता पुढे जात होते. आम्ही खात्री करून घेतली आणि तिकिट काढण्याच्या लाइनमध्ये उभे राहिलो.


नागमोडी रांग अंत दिसत नाही.


साधारण चाळीस मिनिटानंतर तिकिट खिडक्या दिसायला लागल्या. आणखी दहा मिनिटानंतर आम्ही खिडकीवर पोहोचलो. तिकिट काढलं. गाइडकरता वेगळी व्यवस्था असेल असं वाटलं होतं पण ते तिकिटही त्याच खिडकीवर उपलब्ध होतं. तेही घेतलं आणि मग आमचा पुन्क्ट (punkt) म्हणजे इंग्लिश गाइडचा पॉइंट शोधून तिथे उभे राहिलो.


Punkt Meeting point for Guided Tours according to language


गाइडने एक पेजरसारखं काहीतरी दिलं. गाइड होती प्रसन्न आणि माहिती ब-यापैकी असावी असं दिसत होतं. ग्रूप २० २२ जणांचा. सगळ्यांना प्रत्यक्ष बोलणं ऐकू येणं कठीण तेव्हा ते प्लग्ज ती बोलत असताना कानात घातले की ऐकू येण्यासाठी तो पेजर. आपल्याकडे त्या गाइडचं बोलणं ऐकण्यासाठी त्याच्या जवळ रहाण्याची धडपड आठवली. कलोझिअमची माहिती वाचलेली निश्चित होती. पण मला अस नाही वाटत की गाइडविना आम्ही ते एन्जॉय करू शकलो असतो. तसे तर ते भग्नावशेष आहेत. काय बघायचं त्यात हा दृष्टिकोन असू शकतो. ती माहिती तशीही आपण नंतर विसरून जातो ही वस्तुस्थिती आहे पण तरीही ते बघताना त्या काळात इतकं भव्य बांधकाम उभारलं होतं या पेक्षा आणखी काही जाणण्याची इच्छा असेल तर गाइडला पर्याय नाही असं वाटतं.

खूप गोष्टी आपल्याला कल्पनेने साकाराव्या लागतात. तिथे एक भव्य असा रंगमंच (एरिना) आहे. सगळ्यात समोर राजाचं आसन असलेली जागा त्याच्यासमोरील बाजूस महत्वाच्या माणसांनी बसायची जागा आणि मग वरवर जाणारे स्टेडिअमसारखे थर हे माणसांच्या सामाजिक स्तराप्रमाणे. पण इथे सर्वसामान्यांनाही प्रवेश होता ही त्याची चांगली बाजू. इथे खेळ चालत, द्वंद्व होत, प्राण्यांबरोबरच्या झुंजी चालत. बळी दिल्यानंतर रक्ताचे पाट वहात, चिखल होई. या सगळ्याचा विविध प्रकारे चर खणून वगैरे निचरा करण्याची व्यवस्था तिथे होती. प्राणी आणताना त्याला एका फळीवर उभे करीत आणि दुस-या फळीवर त्याच्यापेक्षा जास्त वजन (मग तो दुसरा प्राणीही असे) दुस-या फळीवर ठेवून लिफ्ट करत. अशा खूप गोष्टी त्या गाइडकडून कळल्या. दुर्दैवाने अंतर्गत रचना या बघण्यासाठी खुल्या नाहीत त्यामुळे ते कल्पनाशक्तीवर सोडून दिलेलं आहे. आपण साधारण दुस-या किंवा तिस-या मजल्यावरून खाली डोकावून हे बघत असतो. पण तसही या सगळ्या इतिहास आणि कल्पना एकत्र गुंफुन तयार झालेल्या गोष्टीच आहेत. एक मात्र खरं की इतकं उंच बांधकाम, सर्वसमावेशक स्वरूपाचं, त्या काळात उभारणं, ज्यात काही हजार प्रजाजन एकाचवेळी बसू शकतील हे विस्मयकारक आहे. त्याचा उपयोग मात्र कैद्यांची द्वंद्व वगैरे मनोरंजनपर (?) कार्यक्रमांसाठी होत असे हे वाचून वाईट वाटलं. काही असो, हा इतिहास आहे आणि तो बदलणे शक्य नाही त्यापासून काही बोध घेता आला तरी पुरे. त्याची ही बाजू काळी आहे म्हणून ती झाकून ठेवावी असं या लोकांना वाटत नाही ही समाधानाची बाब!


कलोझिअम अंतर्भाग

कलोझियम हा एका मोठ्या कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. त्याच्या तिकिटात आपण कलोझिअम बरोबरच रोमन फोरम आणि प्लातिनिआ हिल्स या भागात त्याच तिकिटात हिंडू शकतो. रोमन फोरम हा एक प्रचंड विस्तार असलेला भग्नावशेषांचा भाग. ‘त्या इमारतींची रचना, विस्तार आणि त्या काळातलं आर्किटेक्चरल किंवा बांधकामाविषयक ज्ञान हे सर्वस्वी उच्च प्रतीचं आहे हे निश्चित. रोमन लोक खूप पुढारलेले होते वगैरे आपण ऐकलेलं असलं तरी त्याची पोहोच इथे आल्यावर कळते. असं असूनही एखादं साम्राज्य का विलयाला जात असेल? अर्थात याचा बोध आपण आपल्या इतिहासाच्या अभ्यासातूनही घेऊ शकतो. रोमन फोरमच्या इमारती खरोखरच छान आहेत. तुमची फक्त खूप पायपीट करण्याची तयारी हवी. जुनी मंदिरं आहेत अर्थात नंतर आलेल्या ख्रिस्ती धर्माने या सर्व गोष्टींमधलं त्यांना असलेलं Threat ओळखलं आणि अदूरदर्शी लोक जे करतात तेच त्यांनी केलं. नष्ट करा किंवा त्याची चर्च करा. आपल्याकडे जशा देवळांच्या मशिदी करण्यात धन्यता मानली गेली तीच वृत्ती वेगवेगळ्या पोपनीही दाखवली. जितका म्हणून लुटारूपणा करून स्वतःची साम्राज्ये उभारता आली तेवढी उभारली. अतिशय  -हस्वदृष्टीच्या या माणसांमुळे एका संस्कृतीचा संपूर्ण नाश झाला. ग्रीकांपासून चालत आलेली आणि रोमन साम्राज्यानेही आपली म्हटलेली देवळं हा भागच मोडीत निघाला. कदाचित काळ हा प्रवाही असतो असं त्यावर म्हटल जाईलही पण आपण यातून काय गमावतो किंवा काय गमावलं आहे हे आतातरी मानवाच्या लक्षात आलं तरी पुरे. माझ्या या वेदनेला अर्थातच बामियन बुद्धाची आणि तशाच खूप काही गोष्टींची पार्श्वभूमी आहे.

आम्ही बघत बघत निघालो होतो. शनीचं देऊळ Saturn Temple बघून आम्ही पुढे आलो. छान कमान होती त्यावरची नक्षी कॅमे-यात पकडण्याचा वेडा प्रयत्न मी करत होतो. तो अखेरीस सोडून दिला आणि छान बघत बसलो. या भग्नावशेषांचही तुमच्यावर एक प्रकारचं दडपण/ प्रेशर येतं. कदाचित म्हणूनही असेल पण आम्ही तिकडच्या दरवाजातून बाहेर पडलो. आणि खूप बरं वाटलं. मागच्या बाजूला एक नेहेमीप्रमाणेच विस्तृत असा चौक होता त्यात फुलांनी इटलीचा तिरंगा ( आपल्याप्रमाणेच रंग असल्यासारखा फक्त उभे पट्टे, इथेही आपल्यात आणि त्यांच्यात साम्य आहेच) होता. समोर पाय-या दिसत होत्या. चढून गेलो. पुतळे दिसले. जागोजागी लिहून ठेवलेलं होतं की हे सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे कृपया त्याचा आदर राखा. सगळेच वाचतात असे नाही. सगळे टूरिस्ट असतात त्यामुळे त्यांना जरा मजाही करायची असते. इथे येऊन विसावण्यासाठी या पाय-यांचा आधार वाटून कोणीही बसले की लगेच तिथले रखवालदार हटकत त्यांना. Not here म्हणून तिथून हटवत. त्या हटवण्यात कुठेही हिणवण्याचा भाग नव्हता, अरेरावी नव्हती, फक्त नियम नजरेस आणून देण्याचा भाग असे. हे मात्र निश्चितपणे युरोपातील वैशिष्ट्य म्हणायला हवे. आपल्याकडे वर्दीचा जो अंगभूत माज असतो तसा तो इथे अभावाने दिसतो.


                   <----------सैनिकांचे स्मृतिस्थळ                           
विस्तृत चौक आणि फुलांचा तिरंगा------------>

आम्ही बाहेर पडलो खरे पण कलोझियम आणि रोमन फोरमनंतर लगेचच प्लातिनिया हिल्सला जाणं अपेक्षित होतं. कोणीतरी म्हणालं होतं की इथून रोमचा सुंदर नजारा दिसतो. आम्ही गेलो पण नजारा वगैरे काही दिसला नाही. रोम ज्या सात टेकड्यांवर वसले आहे त्या सात टेकड्यांपैकी एक टेकडी इतकेच माझ्या लेखी त्याचे महत्व नोंदले गेले.

                                                                              to be contd.

टीप:- फोटो फीचर होण्याचा धोका टाळण्यासाठी रोमन फोरमचे फोटो इथे  देण्याचा मोह टाळला आहे.

Monday 10 November 2014

ITALY ROME (ROMA) I

इटली रोम (रोमा)

तसं नेपल्स सेंट्रल स्टेशन टोलेडो स्टेशनपासून दूर नव्हतं. वेळही गर्दीची नव्हती त्यामुळे प्रश्न नव्हता. आम्ही मेट्रोमधून उतरून बाहेर आलो आणि सेंट्रल स्टेशनमध्ये गेलो. नंतर लक्षात आलं बाहेर पडायची काहीच आवश्यकता नव्हती. सबवे मधून दोन्ही जोडली असणारच. इथे इंडिकेटर्स व्यवस्थित होते गाडीची वेळ वगैरे वगैरे फक्त तपशीलात फरक होता. कोणतीही गाडी नेपल्स ते रोम अशी दिसत नव्हती. सगळ्या गाड्या नेपल्स ते मिलान पर्यंत धावणा-या. काय गोंधळ झाला असावा?  विचार करता करता सुचलं आपण बाकी गोष्टींकडे का लक्ष देत आहोत? आपल्याकडे गाडीचा नंबर आहे त्याप्रमाणे आपली गाडी कोणती ते बघायचं. रोम टर्मिनीला पोहोचल्यावर कळलं सगळ्या गाड्या मिलानपर्यंत जाणा-या असतात. पण इथलं प्रत्येक स्टेशनच  टर्मिनस आहे. येऊन पुनः उलट फिरून गाडी पुढे जात असावी.

गाडी हाय स्पीड वगैरे म्हणायची, म्हणजे ती तशी असतेच, पण आपल्याला त्या वेगाची आत जाणीव होत नाही. विमान कसं आपल्याला कित्येक वेळा स्तब्ध असल्याचा भास होतो! बाहेर रस्त्यावरून धावणा-या मोटारींना मागे टाकताना बघितल्यावर लक्षात येतो गाडीचा वेग. इटलीतली ही हाय स्पीडची सुधारणा अगदी अलिकडच्या काळातली. त्यांनी टप्प्याटप्प्याने सगळी प्रमुख शहरं अशी जोडली आहेत. आपल्या गप्पा बुलेट ट्रेनच्या पण अजून सुरवातही केली नाही!

रोमच्या टर्मिनीबद्दल खूप भीतीदायक वाचलं ऐकलं होतं. या परिसरात फार वेळ थांबणं हिताचं नाही इत्यादी. तसे अनुभव असतीलही लोकांचे. पण आपल्याकडे गर्दीत जो धोका संभवतो तितकाच तिथेही असावा. आम्ही मेट्रोचं तिकिट काढायला गेलो. मशिनवरून तिकिट घेतलं आणि प्लॅटफॉर्म कोणता ते बघायला लागलो. ऑरेंज लाइन होती स्टेशनचं नाव कामिलो फुरिओ चौथं किंवा पाचवं स्टेशन असावं टर्मिनीपासून. संध्याकाळचे सात वाजले असावेत आम्ही टर्मिनीला उतरलो तेव्हा. मेट्रोच्या त्या अनानिनाच्या (Anagnina g मात्र अनुच्चारित) दिशेने जाणा-या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता वळणार तर एक लोंढा अंगावर आला. आम्ही सामानासकट बाजूला. एस्कलेटरवर या गर्दीत पाय तरी कसा ठेवणार? आपल्या दादर किंवा त्याहीपेक्षा डोंबिवलीचा प्लॅटफॉर्म आठवा. तशी गर्दी प्लॅटफॉर्मच्या दिशेने चाल करून जाताना दिसली. वजा आपलं आक्रमण आणि ढकलाढकली. बहुधा दुस-या मार्गाची, ब्लू लाइनची गाडी आली असावी. हे टर्मिनी स्टेशन, तेव्हा गाडी बदलणे इथे कॉमन. गर्दी असणारच हे नंतर उमगलं. या अशा गर्दीमुळे पर्यटक भांबावून हे असलं काहीतरी नेटवर टाकत असावीत. पण हो, आपल्याकडे मधे जेव्हा मंगळसूत्र सरसकट चोरली जात तेव्हा बायका जसं ते तोंडात धरून गाडीत चढत, तसा इथे प्रत्येक बाईचा हात पर्सवर होता चुकलो पर्स बगलेत धरूनच बायका चालत होत्या. एकूण नेटवरील माहितीमध्ये अगदीच तथ्य नाही असं नसावं.

एक गाडी सोडल्यानंतरची गाडी जरा कमी गर्दीची होती. आमच्या स्टेशनवर उतरल्यावर हॉटेलही लगेच पाच मिनिटांवर मिळालं. या ट्रीपमध्ये हे एक बरं होतं शोधाशोध कमी होती. काऊंटरवरचा मुलगा छान बोलका होता. सिमोने नाव त्याचं. एकूण २२ खोल्या असलेलं ते टुमदार हॉटेल, आवडलंच. कमतरता म्हणावी तर ब्रेकफास्ट म्हणून फक्त कॉफी / चहा किंवा सॉफ्ट ड्रिंक आणि केक मिळणार होता पण ते ठीक होतं. २४ तासांचा अटेन्डन्स ही जमेची बाब. चावी त्यांच्याकडे देऊनच जायची याची त्यांनी एक छान जडशीळ की चेन देऊन तजवीज केली होती. इथल्या आमच्या वास्तव्यात काय काय बघणं शक्य आहे ते त्याच्याशी बोलून घेतलं. त्याने मॅप हातात ठेवले आणि कुठे कुठे जाणं हे मॅन्डेटरी आहे हे सांगितलं. त्याच्यापुढे प्रसिद्ध वाक्य. Rome was not built in a Day how can you expect that to be covered in two three days ऐकवलं. या लोकांचं शहरावर किती प्रेम असतं! त्यांची ती भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते जराही कसूर करत नाहीत.

जरा पाय मोकळे करायला, काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. तसं हे मोठं शहर त्यामुळे रहदारी, वर्दळ होती अर्थात आपल्याकडच्या तुलनेत खूप निवांतपणा होता. जवळपास काही खाऊन घ्यावं असं हॉटेल दिसेना. आमच्याकडे थर्मास नेहेमीच बरोबर असतो. गरम पाण्याची व्यवस्था असेल तर कुठेही चहाची प्री मिक्स सॅशे उपयोगी पडतात. इथे गरम पाण्याचा प्रश्न नव्हता तेव्हा आज काहीतरी फळं वगैरे खाऊन दिवस भागवायचा असं ठरवलं आणि त्यादृष्टीने दुकानं बघायला सुरवात केली. आमच्या बिल्डिंगशेजारीच दुकान होतं. आतला माणूस "आपला" वाटला. आत गेलो. तो त्याच्या कामात बीझी होता. आम्ही केळी बघितली तर जरा काळी वाटलीआम्हा दोघातच बोलणं सुरू होतं केळी चांगली वाटत नाहीत नको घेऊ या. बाकी फळं बघू. ते ऐकून तो पुढे आला हिंदीतून म्हणाला केळी चांगलीच आहेत. हे खाऊन बघा म्हणत एक केळं सोलून त्याने अर्ध मला, अर्ध उत्तराच्या हातावर ठेवलं. त्याचं खरच होतं आम्ही केळी घेतली. बाकी काय चांगलं आहे असं विचारल्यावर तो पुढे आला. एक सफरचंदासारखं दिसणारं पण चपटं फळ होतं. काहीतरी पेश्गा वगैरे म्हणाला, ते त्याने सोलून पुन्हा अर्ध अर्ध आम्हा दोघांना दिलं. उत्कृष्ट चव आणि अगदी रसाळ असं ते फळ आम्ही लगेच घेऊन टाकलं मग अशीच प्रत्येक फळाची ओळख झाली आणि तो बोलत बसला.  इथे येऊन त्याला -५ वर्ष झाली होती. ढाक्क्याकडचा तो. घरी आई वडील इतर भावंडं होती. इथे मोठा भाऊ ९ वर्षापूर्वी आला, त्याच्यामागून हा आला. इथली सगळी ही अशी प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणावीत अशी दुकानं या बांगलादेशींच्या ताब्यात आहेत. नाव विचारलं. त्याने सांगितलं  हसन. एकूणच त्याच्याशी बोलताना आम्हाला खूप बरं वाटत होतं. त्याच्या मनातला आपलेपणा आमच्यापर्यंत पोहोचत होता. बिल बनवताना त्याला म्हटलं अरे तू खायला घातलेल्या फळांचे पैसे त्यात जोडून घे. तो म्हणाला ती मी माझ्याकडून दिली होती, मला वाटलं म्हणून, त्याचे पैसे काय घ्यायचे तुमच्याकडून? आणि हो तो धंद्याचा भाग नव्हता, तुम्ही माझ्याकडून फळं घ्यावीत म्हणून मी दिली नाहीत खरोखर मनापासून द्यावीशी वाटली म्हणून तुम्हाला दिली. आम्ही त्याच्या म्हणण्याला मान दिला पिशवी उचलली आणि वर गेलो. आजच्या जेवणाची फारच छान व्यवस्था झाली होती.

घरी आल्यावर बाल्कनीत टाकलेल्या खुर्च्यांवर विसावलो. समोरच्या अपार्टमेंटमधली घरं संध्याकाळी जागी झालेली दिसत होती. वेगवेगळे वास दरवळत होते. कसले ते ओळखण्याइतकी त्या खाण्याची माहिती नाही याचं वाइट वाटलं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्येही प्रत्येक बाल्कनीत टेबलाभोवती दोन खुर्च्या मांडलेल्या दिसत होत्या. हळूहळू एका एका खुर्चीवर माणसे स्थानापन्न होत होती. वातावरणातला उन्हाळा. तीसच्या आसपासचं तापमान म्हणजे त्यांच्यासाठी खूप छान हवा. पण मग अर्थात पुरूष हाफ पॅन्ट्मध्ये आणि उघडे आणि बायका अर्धा गाऊन घालून ग्लास घेऊन बसलेल्या दिसत होत्या. जेवणाचाही बेत तिथेच असावा. आम्हाला त्या निरीक्षणात घालवायला फार वेळ नव्हता. उद्या कलोझियमपासून सुरवात करू असं ठरवून आम्ही आमचा तो दिवस संपवला.

                                                                                   to be contd.
p.s.


हे फोटो माझ्याकडून राहूनच गेले. नेपल्समधलं हे Via Toledo स्टेशन म्हणजे आर्ट गॅलेरीत आल्यासारखं वाटतं. वरच्या छताकडे बघत रहाणारी ही माणसं त्याची साक्ष देतील. या फोटोंविना नेपल्सचं वर्णन माझ्याकडून अपुरं राहिलं असतं म्हणून जरी रोमचा भाग असला तरी या स्टेशनपासून आमचा प्रवास सुरू झाल्याचा बादरायण संबंध जोडून ते इथे देण्याचा आगाऊपणा मी करत आहे.