Monday, 12 November 2018

SLOVENIA : SOCA VALLEY via BOHINJ

आता सरळ सोका व्हॅली असं आम्ही म्हणेपर्यंत इथून जाताना थोडं डी टूर करून एक तलाव आहे आणि तो फारसा दूरही नाही. अशी प्रस्तावना झाली तेव्हा ओळखलं की आमचं फायनल डेस्टिनेशन अजून खूप दूर आहे आणि तिथे पोहोचायला अजून खूप वेळ आहे. जरी आम्ही आमच्या रुटवरच गाडी घेतली होती तरी मध्ये फुटलेला फाटा मात्र कच्चा रस्ता असलेला होता. जीपीएस आम्हाला मार्ग दाखवत होतं. रस्त्यावरच्या पाट्याही दिसत होत्या. पण रस्ता इतका अरुंद, त्यात आमच्या पुढे एक बस होती. बसचा फायदा हा की समोरून वाहन येत नसे. त्यामुळे अगदी हळू आम्ही निघालो होतो. एका गावातल्या रस्त्यावर तर समोरासमोर आलेल्या बसने उद्भवलेला प्रश्न समोरच्याने माघार घेऊन सोडवला होता. पण इतकं सारं असलं तरी आम्हाला हवा असलेला बोहिंज तलाव दिसण्याचं चिन्ह नव्हतं. अचानक रस्ता जरासा रुंद झाला तेव्हा आशा पल्लवित झाल्या. एक पूल ओलांडला आणि गाडी तलावाशेजारी पार्क करून आम्ही उतरलो.लेक ब्लेडसारखं भाग्य (?) याला नाही. त्यामुळे तसा हा निवांत आहे. दूरवर दिसणारे डोंगर, इथे नेहेमी दिसणारे अर्ध्यावर आलेले पांढरे ढगांचे पुंजके आणि क्षितिजापार आहे असा वाटणारा विस्तार असा हा बोहिंज. इथे आलो नसतो तर...... हा विचार मनात आला. खरंतर काहीच फरक पडणार नव्हता. आम्ही या सौन्दर्याला मुकलो असतो. लेक ब्लेड बघितल्यावर....... या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. पण लोकांच्या झुंडी नसलेला हा शांत तलाव, आहे हिमनदीपासून तयार झालेला, म्हणजे glacial lake आहे. इथला निवांतपणा तुमच्या आतपर्यंत पोहोचतो. हा Triglav Natioanal Park चा भाग आहे . म्हणजेच त्याच्या कोंदणात हे सौन्दर्य वसलेलं आहे.
सोका व्हॅली झाडलेस-झाबके

आता मात्र सरळ मुक्कामाला पोहोचायचं! हे कानावर जरी पडलं तरी मधेच कसलीतरी आठवण आल्यासारखं करून इथे मधेच अमुक आहे तेवढं बघून पुढे जाऊ असं तर हा म्हणणार नाही ना ही धास्ती कायम मनात होती. त्याला कारणही तसच होत. कुठेही जाण्यापूर्वी त्या देशाबद्दल आणि एकूणच तिथल्या बघावयाच्या गोष्टींबद्दल श्रीशैल जमेल तेवढी माहिती गोळा करतो. पण ही माहिती जुजबी, यात्रा कंपनीची नसते. याबाबतचे विविध ब्लॉग्ज, फोटो अशासारख्या गोष्टी त्याने नजरेखालून घातलेल्या असतात. ही याची चांगली सवय. पण..... कुठेही कसलीही नोंद घेऊन ठेवायची सवय नाही. सगळा भरवसा स्मरणशक्तीवर. कदाचित त्याच्या डोक्यात खूप गोष्टी असतात पण आम्हाला माहित नसतात. त्याचं एक कारण म्हणजे आमचं मन पूर्वग्रहदूषित असू नये हा त्याचा उद्देश !. पण यात होतं काय की आयत्या वेळी मग त्याला रस्त्यावरच्या नावाच्या पाट्यांवरून आठवण होते अरे हे खूप छान आहे इथे जाऊन मग पुढे जाऊ. हा प्रकार नॅचरल ब्रिज बाबत झाला होता. यात अनपेक्षित पण सुखद धक्काही असतो आणि काही वेळा अगदी ठरीव, पूर्ण प्लॅनिंग करून बंधनात राहिल्यासारखं एक एक टिक मार्क करत जाण्यातही मजा वाटत नसते. तर ते जाऊ द्या. आम्ही मार्गस्थ झालो!

आता झाडलंस- झाबके. टोलमीन हे जवळचं शहर. ते जीपीएस वर दिसत होतं म्हणजे निदान तिथवर तरी प्रश्न नसावा असं मानून आम्ही चाललो. रस्ता इथवर अधून मधून डोंगरातला, वळणांचा असला तरी मुख्य मार्ग होता त्यामुळे फारसा त्रास नव्हता. टोलमीनला आलो आणि आम्हाला झाडलंसची पाटी दिसली. हायसं वाटलं एकदम. पण अजून मुक्काम यायचा होता. रस्ता ओलांडून श्रीशैलने गाडी उजवीकडे घेऊन झपकन डाव्या रस्त्याला घेतली तर समोर पुढचा एकदम शार्प बेंड. रस्ता गावातून जाणारा, चढाचा. लागून असलेली घरं आणि अरुंद रस्त्यावर समोरून कोणी आलं तर बाजूला घेण्यासाठी जागा नाही. आमचं सुदैव की इथल्या प्रत्येक अवघड जागी आम्हाला सुखेनैव जात आलं, समोरून कोणी न येता. झाडलंस हे पायथ्यालगतचं गाव. आम्हाला जायचं होतं ते झाबकेला. पुढे जात राहिलो. डोंगरावरचा चढाचा रस्ता. आता अर्थातच वळणा वळणाचा, अरुंद आणि टोकदार वळणं असलेला. इथे घरं अगदीच एक एकटी आणि दूरवर. एकदाचं आमचं डेस्टिनेशन आलं आणि जीव भांड्यात पडला.

आमच्या अपार्टमेंटच्या मालकीण बाई स्वागताला आल्या. आमचा पहिला प्रश्न गाडी कुठे लावायची. इथेच दारात असं त्यांनी सांगितलं खरं पण तिथे विचित्र उतार होता. मग जाऊ दे इथे नको तिथे समोरच्या बाजूला थोडी आत पार्क कर असं ती म्हणाली. जेमतेम एक-दीड गाडीचा अरुंद रस्ता. इथे गाडी वळवणं अशक्य मग पुढे जा तिथे ते सव्यापसव्य करा. समोर दरी मागे डोंगर वगैरे आणि फिरवून आणा. घरात आलो आणि सगळा शीण गेला. या सौन्दर्याच्या प्रेमात पडायचं खरं, पण इथवर येईपर्यंत धाकधुक जी असते तिचा ताणही येतो. समोरासमोरच जुळी वाटावी अशी दोन घरं, या बाईंची. एका घरात आम्ही. घराला मागे बाल्कनी, मागच्या बाजूने हा पहिला मजला, पुढच्या बाजूने तळमजला. मागे दरीत उतरत जाणारा डोंगराचा भाग. समोर असाच डोंगर आणि अशीच विरळ घरं. या इथे बहुधा अपार्टमेंटची जबाबदारी बायकांची. त्यात नवऱ्याचा सहभाग फारसा दिसला नाही. त्याचा मधमाशा पालन व्यवसाय. घरात गुरं होती. थोडीशी उतारावरच्या जमिनीतली शेतीही.
घर प्रसन्न होतं. चहुबाजूने फुलं दिसत होती आणि मुख्य म्हणजे या गावात आम्ही सूर्य बघितलाभारतात राहून नको करणाऱ्या याच सूर्याची आम्ही किती आतुरतेने वाट बघत होतो याचं आम्हालाच मग आश्चर्य वाटायला लागलं. घराचा प्रसन्नपणा आमच्या आतपर्यंत पोहोचला, त्याला जोड मिळाली स्वच्छ, निरभ्र अशा वातावरणाची. घरभर फिरून होत आहे तोवर मालकीणबाई हजर झाल्या. सोबत एका ट्रेमध्ये छोट्या ग्लासमध्ये वाईन, त्याच्या तळात असलेल्या, आम्हाला आतापर्यंत परिचित झालेल्या बेरीज आणि दूध व घरचा मध. आपल्याकडे म्हणतात तसं थोडसंच दिलं आहे हो, हे वाक्यही. कुठेही गेलं तरी माणूस सारखाच हे पदोपदी प्रत्ययाला येतं. हे दिल्यानंतर मग तिने आमचा प्रोग्रॅम काय त्याची चौकशी केली.

त्यांच्या घरी दूध मिळू शकेल पण एकदिवस आधी सांगावं लागेल कारण बाई घरातलं सगळं आटोपून नोकरी करत होत्या, त्यामुळे सकाळी त्यांची गडबड असे. कोणतीही मदत लागली तरी सांगा हे ही सांगून झालं. संध्याकाळ उतरू लागली होती. "तरीही जर तुम्हाला उत्साह असेल तर असेच सरळ रस्त्याने पुढे जायला हरकत नाही. चांगला व्यायाम होईल." असा सल्ला देऊन त्या बाहेर पडल्या.

सोबत आणलेल्या पावाकरता हा मध उपयोगी पडेल हे आधी जाणवलं. आमच्या सोबत चहाचे सॅशे असतात त्यामुळे चहाचा प्रश्न पडत नाही. सगळा शीण त्या चहात बुडवून आम्ही चालत बाहेर पडलो.

अगदी अरुंद रस्ता. तुरळक घरं आणि क्वचितच समोर आलेली एखादी व्यक्ती. बाकी इतका उभा पहाड सोबतीला आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी खोल दरी , हिवाळ्याआधी रंग उत्सव साजरा करणारी झाडं, या सगळ्यामध्ये आम्हाला एकटेपणाची जाणीव होण्याची काहीच शक्यता नव्हती. आम्ही पुढे गेलो तर वळणावर समोरून येणाऱ्या आमच्या मालकीणबाई आणि बरोबर त्यांची वीस बावीस वर्षाची मुलगी. "आम्ही संध्याकाळी दोघी बाहेर पडून चालून येतो, तेवढाच व्यायाम. एरवी कामापुढे हे शक्य नसतं." असं हसतमुखाने सांगून त्या निघाल्या. मुलगी मतिमंद होती. त्यामुळे तर ही जबाबदारी त्यांच्यावरच पडत असावी.

परत येताना परसदारं बघत येत होतोरस्त्याच्या एका बाजूला उतार आणि दुसऱ्या बाजूला चढ. तसं खडतर आयुष्य. घरापुढच्या गाड्याही कशा पार्क करत असाव्यात हा प्रश्न पडेल असे उतार किंवा चढ. एका ठिकाणी कोणीतरी आमच्याकडे बघत आहे असा भास झाला. पण तो भास नव्हता. कुंपणापलीकडच्या गवतामध्ये एक मेंढा होता. दयनीय स्वरात ओरडून आमचं लक्ष वेधून घेत होता. आमच्या दिशेने कुंपणाकडे येतं होता.

पूर्ण अंधार होण्याआधी घरी परतायला हवं होतं. त्यामुळे फारसे कुठे न रेंगाळत परत फिरलो. घरात आलो आणि हीटरची आठवण झाली. रात्री थंडीचा कडाका असणार होता. म्हणजे कदाचित हीटरची गरज भासू शकली असती. पण इथे कुठेच तशी बटणं दिसली नाहीत. त्यामुळे बाईंना शेजारच्या घरी जाऊन त्रास देणं आलं. त्रास वाटला तरी काही गोष्टींना पर्याय नसतो. दार ठोठावून विचारलं तर हसतमुखाने त्यांनी सांगितलं, दोन्ही घरांचा कंट्रोल त्यांच्याकडेच होता आणि त्या रात्री तो सुरु करणार होत्या.

                        पुढील भाग येत्या मंगळवारी.

यातील सर्व फोटो श्रीशैल पत्की 

वि.सू. 
येथील प्रतिक्रिया आणि मला वैयक्तिक रित्या आलेल्या मेलमधे व प्रत्यक्ष प्रतिक्रियांमध्ये या वर्णनाच्या प्रभावीपणात फोटोंचा अतिशय महत्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे जे सर्वार्थाने खरं आहे. त्या अनुषंगाने एक सूचना अशी आली की फोटो क्रेडिट्स देण्यात यावी. श्रेय हे ज्याचं त्याला मिळायला हवं हे मलाही पूर्णपणे पटतं. यास्तव या लेखापासून तो उल्लेख येथे करत आहे.  Monday, 5 November 2018

SLOVENIA : LAKE BLED


दीपावली शुभचिंतन 


पॅनोरामिक रूटने निराशा केली हे खरं पण तरीही आम्ही धुक्यातलं सौंदर्य बघितलं ते अप्रतिम होतं. परतीच्या वाटेवर मग त्याचीच चर्चा सुरु होती. तसही याप्रकारचं धुकं आमच्या दोघांच्या पाहण्यात नव्हतं. ऐकली होती ती अपूर्वाई सारख्या पुस्तकातली वर्णनं पण अनुभवाची गोष्टच वेगळी. धुक्यालाही एक वास असतो, गंध असतो, शब्दात कसा वर्णायचा? तो तर स्वतःच प्रचीती घेण्याचा विषय. ती संधी आम्हाला त्या रूटने दिली त्याबद्दल त्याचे शतशः आभार मानून आम्ही सोलकावाला उतरलो.

घरकी मुर्गी तसं या गावाचं झालं. लोगारस्का डोलीनाला जाण्याचं, पॅनोरामिक रूटचा पायथा ही त्याची ओळख ! आम्ही त्याच्याकडे स्वतंत्रपणे बघितलं नाही याचा पश्चात्ताप झाला असता पण थोडक्यात वाचलो! साविन्या नदीला छेद देत तिला हरवण्याच्या थाटात रोबानोव कोट कडून आलेला रस्ता नंतर मात्र या नदीच्या इतका प्रेमात पडला आहे की तिची साथ तो क्वचितच सोडतो. पुढे आल्यानंतरची लागणारी खिंड दोघांना अलग करू पाहते पण हे पठ्ठे प्रेमवीर नंतर पुनः जवळ येतात. स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवूनही साहचर्य कसं टिकवावं याचा हा उत्तम वस्तुपाठ!

युरोपात ख्रिश्चन धर्म सर्वदूर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण जावं तिथे प्रत्येक देशात त्यांच्या चर्चची बांधणी मात्र वेगळी आणि खास असते. सोलकावा चर्चही अपवाद कसा असेल? एका छोट्याशा उंचवट्यावर असलेलं ते पांढरेधोप चर्च नजर खेचून घेणारं आहे.

त्याच्या समोरचा रस्ता ओलांडल्यावरचा पूलही निवांत आणि आत्ममग्न असा. या गावाचा निरोप घेताना त्यामुळे काहीसं जडच गेलं. पण या आधी म्हटलं त्याप्रमाणे या अशा प्रवासातही आपल्याला "गुंतायचे नाही" हा धडा वारंवार गिरवावा लागतोच. त्याप्रमाणे आम्ही मग लेक ब्लेडकडे निघालो.


ज्याला आपण टूरिस्टीक म्हणतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे लेक ब्लेड. किंबहुना स्लोवेनिआ माहित नसणं शक्य आहे पण लेक ब्लेड माहित असतं. हे कर्तृत्व निःसंशय आपल्याकडल्या यात्रा कंपन्यांचं. पण आपल्याकडे होतं काय की त्या लेखांमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातीमध्ये असतं त्यापलीकडे त्या देशात काही असूच शकत नाही या श्रद्धेने यात्रेकरू  (श्रद्धा आली म्हणजे यात्रेकरूच म्हणणं क्रमप्राप्त आहे ) मग हिरीरीने मतं मांडत सुटतात. लेक ब्लेड हे तसं नावारूपाला आलेलं ठिकाण. आहे सुंदर. आपल्याकडून थेट स्लोवेनियाला विमान सेवा नाही म्हणून मग शेजारच्या क्रोएशियात किंवा बेलग्रेड करून असे एक दिवस इथे येतात आणि स्लोव्हेनिया बघितल्याच्या आनंदात परततात. आम्हालाही असाच एक ग्रुप भेटला. चौकशी करताना त्यांच्या "किती दिवस राहणार तुम्ही" या प्रश्नाच्या उत्तरात दहा दिवस म्हटल्यावर अचंबित नजरेने "एवढं आहे काय या देशात?” असं त्यांनी विचारलं. आम्हीही तसं विशेष काही नाही, आम्ही आपले जरा इथे दऱ्या खोऱ्यातून फिरतो आहोत म्हटल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.

ढगाळ हवामानाने आमचा इथेही पाठपुरावा केला. इथला विस्तीर्ण तलाव, त्यातलं ते अतिशय देखणं चर्च, काठावरची तितकीच सुंदर रंगी बेरंगी झाडं आणि या सगळ्यावर पहारा देण्याकरताच जणू इथे ठाकला आहे असा तो किल्ला. स्वच्छ उन्हात हे सारं कॅमेऱ्यात टिपायला किती मजा येईल हे स्वप्नरंजनच राहिलं.


या शहरात आमचं अपार्टमेंट तलावापासून हाकेच्या अंतरावर पण गल्लीत होत. आम्हाला तो (तलाव) दिसत होता आणि नव्हताही. एका चिंचोळ्या गल्लीतून इतक्या विस्तीर्ण तलावाला बघायचं आमच्या जीवावर आलं. पोहोचलो ते संध्याकाळच्या सुमारास, पण उजेड असेतो. त्यामुळे मग वेळ न घालवता बाहेर पडणं हा आमचा पहिला अजेंडा होता. पण.........

गाडी वळवून त्या गल्लीत घेतल्यानंतर आमचा घरमालक आमच्या स्वागतालाच आला. कारणही तसच होत. अगदी आडनिड्या जागेत गाडी पार्क करायची होती. उतार, चढ अशी विचित्र जागा. शेजारी गाड्या उभ्या आणि त्यात तिला बसवायची हे सव्यापसव्य होत. मदतीकरता तो धावून आला होता. ते पार पाडून आम्ही सामान टाकलं, जागेचा ताबा घेतला पण हा पठ्ठ्या गप्पांच्या मूडमध्ये. होताही देखणा, उंचापुरा. घर दाखवलं आणि आलोच म्हणून नाहीसा झाला. येताना हातात छोटा ट्रे, त्यात तीन छोटे बिस्कीट पॅक्स आणि तीन खेळण्यातले असावेत असे लहान ग्लास, त्यात सुंदर किरमिजी लाल रंगाची होममेड वाईन. तळाला काहीतरी दिसत होत, त्या ब्लु किंवा ब्लॅक बेरीज असाव्यात. हे वेलकम ड्रिंक. या भागात कदाचित ही पद्धत असावी कारण आत्तापर्यंत कोणीच आम्हाला वाईन दिली नव्हती.

आम्ही निरोप घेऊन निघालो ते थेट तलावाकडे. पायी हिंडलात तर पाय भरून येतील अशी व्याप्ती. तलावाकाठाने रस्ता. एका ठिकाणी असलेली खिंड म्हणजे तिथून फक्त गाड्या जातील. पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खिंड आणि तलाव या मधून वाट काढलेली. एरवी मात्र व्यवस्थित फुटपाथ आहेत. रमत गमत चालायला इथल्यासारखं सुख नाही. तलावात दिसणारं  छोटसं  बेट आणि त्यावरच्या झाडीमध्ये लपणार नाही असं इथल्या पद्धतीचं सुरेख, पांढर धोप, सरळ उंच नजर वेधून घेणार चर्च. आम्हाला त्या चर्चमध्ये जाण्यात वेळ कमी आणि म्हणून अजिबातच रस नव्हता.काठावरच्या झाडांनी आता त्यांचे "रंग" दाखवायला सुरवात केली होती. समोरचा किल्ल्याकडे जाणारा रस्ता खुणावत होता पण काळोखाच्या सावल्या उतरत असताना वर जाण्यात काहीच हशील नाही असं मत पडलं.

या ठिकाणी अगदी उत्तम असं भारतीय रेस्टोरंट आहे. मालक आणि वेटर्स गोरे असले तरी गेल्या पंचवीस वर्षांपासून तिथे असलेला भारतीय शेफ आहे. गर्दीमुळे त्याला भेटता आलं नाही हा भाग वेगळा पण त्याच्या हाताला चव होती. केशराचा भरपूर वापर केलेला पुलाव आणि त्याआधीच्या भाज्या यांनी मन प्रसन्न झालं. खूप दिवसांनी आपलं आणि सुग्रास अन्न मिळालं होतं त्यामुळे त्याची गोडी अधिक होती.

दुसऱ्या दिवशी मग आटपून आम्ही गाडी घेऊनच बाहेर पडलो. एकतर किल्ल्यापर्यंत पायी जाण्या येण्यात वेळ गेला असता आणि आम्हाला आणखी एका ठिकाणी जाऊन मुख्य मुक्कामाला पोहोचायचे होते. किल्ल्याजवळ पायथ्याशी पार्किंग आणि टॉयलेटस (आपल्याकडे याची वानवा असते म्हणून हे कौतुकाचं) भरपूर होती. चढ म्हणावा असा नाही त्यामुळे दमणूक नाही. वर जाताना वेगवेगळ्या कोनातून आपल्याकडे बघणारा तलाव मात्र फार देखणा!

दाराशी तिकीट काउंटर. १० युरोचं  तिकीट. किल्ला असा काही प्रेक्षणीय आहे असं फोटोवरून किंवा बाहेरून वाटत नाही. त्यामानाने ही रक्कम जास्त वाटते. पण यावर श्रीशैलचं म्हणणं पटलं, इतका खर्च करून आल्यावर तसेच परत फिरण्याने काय साध्य होणार आहे? तेव्हा बघू या आणि परत जाऊ या. आम्ही आत गेलो तर ही जत्रा तिथे ! यात्रा कंपन्यांचं हे आवडतं ठिकाण आहे त्यामुळे कायमच इथे गर्दी असते.

किल्ला अगदीच यथातथा आहे. आवर्जून बघण्यासारखं काही नाही. पण , इथून दिसणारा तलाव, ते चर्च आणि सारा परिसर ! पैशाकडे बघून मागे फिरणं किती महागात पडलं असतं  त्याचा अंदाज आला. गर्दीमुळे जरी वाट बघायला लागत होती तरी आम्ही शांतपणे त्या लोकांना पुढे जायला देऊन निवांतपणे नंतर फोटो काढत होतो. या सगळ्यात वेळ मात्र जास्त गेला.

खाली आलो आणि आता निघू या असं म्हणताना आमच्या कालच्या बोलण्याची आठवण झाली. आपण या तलावाला गाडीतून का होईना एक फेरी मारू या. मग गाडी वळवून पुढे नेली तर तिथे बदकाबरोबर राजहंस दिसले. फ़ोटोकरता थांबायचं तर रस्ता अरुंद, गाडी पार्किंगमध्ये टाकण्याला पर्याय नाही. पण इथे त्याचे रेटस अवाच्या सव्वा. कारण हे दिवसाचं पार्किंग. आत घेतलेली गाडी पुनः बाहेर काढायला अवसर न देता, वाटेतला चिखल, कालच्या पावसामुळे झालेला, तुडवत अटेंडंट बाई आमच्याकडे आलीतिने पावती फाडण्याआधी तिला मग सांगितलं की आम्हाला फक्त समोर जाऊन फोटो काढायचे होते. पुढे काही बोलायला अवसर न देता ती म्हणाली, ओके, काहीच प्रश्न नाही, पण फार वेळ लावू नका.

माणसावर असलेला विश्वास या देशांमध्ये टिकून आहे. सर्वसाधारणपणे माणसं खरं बोलतात यावर त्यांचा विश्वास आहे कारण आपल्यासारखं पदोपदी फसवणूक करणारी माणसं तिथे नसावीत. आम्हीही दिल्या सवलतीचा गैरफायदा न घेता तिथून पुढे निघालो. पुढचा भाग टेकडीसारखा, चढाचा. तलाव मधेच दिसेनासा होई त्या झाडामुळे. एका ठिकाणी गाडी थांबवून उतरलो. आता आम्ही उंचावरून त्याला बघत होतो. तलावासारखा तलाव त्यात काय बघायचं, इथून तिथून काय वेगळा दिसणार का? या वाक्याची आठवण झाली. कदाचित बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असेल पण निदान आपल्याला तरी तो कॅलिडोस्कोपिक वाटतो आणि हे आपलं भाग्य आहे हे जाणवलं !

इथे येणं हे काही ठरवलेलं नव्हतं. सहज चक्कर मारायची तलावाला म्हणून आम्ही निघालो आणि इथे पोहोचलो. कोणत्याही गावाची भेट ही तिथलं रेल्वे स्टेशन (आणि आपल्याकडे एस टी स्टॅन्ड) बघितल्याशिवाय पुरी होत नाही असं म्हणतात. गावाचं महत्व, संस्कृती यांचा प्रत्यय इथे येतो असं म्हणतात.! यावेळी गाडीतून (कारमधून) हिंडताना विसरच पडला होता या गोष्टीचा. पण आम्हाला पडला तरी सुप्त इच्छा शक्ती जागृत असावी. तिने आम्हाला त्या छोट्याशा, डोंगरात असलेल्या आणि तिथून पुढे कुठेच न जाणाऱ्या (? की असं वाटायला लावणाऱ्या ) रेल्वे स्टेशनला आणून सोडलं होतं.आता इथे फार रमण्यात अर्थ नव्हता. पण तरीही इथला कावा पिऊन पुढे जाऊ असा विचार करून आम्ही कावा कॅफे मध्ये गेलो. या कावाचा काश्मिरी कावाशी संबंध नाही कळल्यावर वाईटही वाटले पण या कावाने म्हणजे कॉफीने त्या सरदावलेल्या थंड हवेत जान आणली.

                (आपली भेट पुढील मंगळवारी)Monday, 29 October 2018

SLOVENIA : ROBANOV KOT (LOGAR VALLEY)


रोबानोव कोटचं हे हॉटेल सुंदर होतं. खोलीला दोन बाजूला टेरेस होती त्यामुळे आत्ता जरी काही दिसत नसलं तरी उद्या छान व्हयू मिळण्याची शक्यता होती. आत्ता खाली दूरवरून कानावर येणारी पाण्याची झुळझुळ मात्र कानाला सुखवत होती. दिवसभराच्या थकव्यानंतर आता काहीतरी पोटपूजा व्हावी इतकी माफक अपेक्षा होती. इथे निरामिष जेवण काय असणार? मिळेल ते पूर्णब्रह्म म्हणायचं !

सकाळ उगवली पण इथे आमच्या राशीला ढगाळ हवामान आणि पाऊस असणार होता. दुर्दैव! आणखी काय? एरवी हा समोर दिसणारा डोंगरांच्या रांगेचा नजारा लखलखत्या सूर्यप्रकाशात बघायला किती मजा आली असती. समोरच्या बाजूला उताराची जमीन होती. सर्वत्र हिरवंगार गवत. आमच्या समोरच नदीच्या प्रवाहाचं अस्तित्व आवाजावरून जाणवत होतं. समोरच्या डोंगरापर्यंतच्या कुरणावर असंख्य गुरं वासरं चरत होती. ते गोधन नेत्रसुखद होतं. समोरच प्रवाहावर फिरणारी पाणचक्की दिसत होती. वातावरणातला शिरशिरी आणणारा गारवा, समोरचे ते अर्ध्या डोंगरावर तरंगणारे ढग आणि त्यापलीकडे दिसणारी बर्फाची शिखरं! वर्णनातीत हा एकच शब्द. कॅमेरा, शब्द सारेच अपुरे. कॅमेरा झाला तरी तो फोटो काढणार, त्याला वातावरणाची जोड कशी देता येईल? आपण आपलं डोळ्यांच्या माध्यमातून त्याला आपल्या आत खोलवर ओढून घ्यायचं.
हा भाग आता नो डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. इथे खूप कमी पर्यटक येतात, याचं एक कारण तसा हा भाग अडचणींचा. त्यातून नवीन बांधकामांवर बंदी असल्याने नवीन हॉटेल्स नाहीत. म्हणजे सुखसुविधांवर मर्यादा येते. तरीही इथे येणारे ऍडव्हेंचर प्रिय लोक चालण्यासाठी, हाइकसाठी पोहोचतातच. हाईक करता आम्हाला तेवढा वेळ नव्हता पण मनसोक्त भटकंती करायची हे मात्र ठरवलेलं होत.

ब्रेकफास्ट करून निघालो. माहितीपत्रकात सांगितल्याप्रमाणे सोलकावा गावात गेलो. अगदीच जवळ हे गाव. नदीचं नाव साविन्या! नाव पण किती आपल्याला आपलं वाटावं असं! तिच्या काठचं हे सोलकावा. तिथल्या माहिती केंद्रात जाऊन माहिती घ्यायची होती. खूप चित्रं  आणि पक्षी, प्राणी वगैरेची माहिती होती पण त्यात आम्हाला गम्य नव्हतं. तिथून पुढे गेल्यावर एका ठिकाणी गाडी पार्क करून साडेसात मैलावर (की कि.मी.?) एक रिंका धबधबा होता. तो नेचर ट्रेल करायचं आम्ही ठरवलं. जाऊन येऊन पंधरा कि.मी. म्हणजे काही फार नाही असं आम्ही दोघांनी म्हटल्यावर मग प्रश्नच उरला नाही.


     ( धुकं धुकं आणि फक्त धुक्याकडे घेऊन जाणारी ही झोकदार वाट!)

सुरवातीचा डांबरी रस्ता ओलांडून आत झाडीत शिरताना ओलांडलेला साकव (हो, पुलाप्रमाणे उपयोगात येणारा झाडाचा ओंडका म्हणजे साकव नाहीतर काय म्हणणार?) पुनः कोकण, गोव्याची आठवण करून देत होता. आता हा हिवाळ्याचा, पानगळीचा मोसम. पर्णसंभार उतरवायची घाई झालेल्या वृक्षांच्या बरोबरीने हिरवेगार वृक्ष होते. काहींना पानगळीची चाहूल लागून कासाविशी येऊन पिवळे पडलेले तर काही त्या कल्पनेने मोहरून गुलाबी लालसर झालेले.एकाच ठिकाणी असणारे सहयोगी आणि त्यांच्यात इतका फरक असावा? निसर्गाची कमाल वाटत होती. चालताना काही ठिकाणी झाडांचे ओंडके कापून पायऱ्या केल्या होत्या. झाडांच्या छायेतून जाताना वातावरणातला ढगाळपणा मग तितका जाणवत नव्हता. पण तरीही अधून मधून का होईना दिसणारा क्षीण सूर्य हवाहवासा होता.


पुढे जात असता किलबिलाट ऐकू आला. शाळेची ट्रिप आली होती. एका ठिकाणी मुलं, मुली उभ्या होत्या त्यांच्या हातात कागद, पेन आणि त्यांच्या बरोबरच्या शिक्षक, शिक्षिका माहिती सांगत होत्या ती ऐकून नोटिंग घेणं सुरु होतं. आम्ही त्यांनी अडवलेल्या वाटेवर मागे शांतपणे त्यांना डिस्टर्ब् होऊ नये या बेताने उभे होतो. काही क्षणानंतर त्यांच्या शिक्षकांचं आमच्याकडे लक्ष गेलं. मुलांना सूचना दिल्या गेल्या आणि रस्ता मोकळा केला गेला. पुढे जाताना त्या मुली आम्हाला चक्क नमस्ते नमस्ते म्हणाल्या ते ऐकून आम्ही थंडगार

या देशाविषयी आपल्या देशात किती लोकांना माहिती असेल? आम्ही इकडे येण्यापूर्वी माहिती करून घेतली होती. पण आम्हाला प्रत्येकजण हो माहित आहे पूर्वीचा झेकोस्लोव्हाकिया ना असच विचारत होता. रं त्याचं नकाशातील स्थान सांगावं तर माहितीचं नाव ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला इतकच ! इथे ही शाळेतली जेमतेम सहावी सातवीतली मुलं आम्हाला आमच्या दिसण्यावरून की उत्तराच्या कुंकवावरून नमस्ते करत होती ! एकाच वेळी आश्चर्य आणि कौतुक वाटलं.


त्यांना मागे टाकून पुढे गेलो आणि मग चढाचा भाग लागला. आतापर्यंत चालणं खूप झालं होतं. आता चढाचा भाग, पण पायवाट पुसट झाल्यासारखी वाटली. इतक्यात झाडात काहीतरी खसफसलं! दूर वर एक प्राणी होता का? नीट काही कळलं नाही. आम्ही थोडे मागे आलो. नदीचं कोरड पात्र आणि पलीकडून लांबून जाणारा रस्ता दिसत होता. पात्रातून पुढे गेलो तर तो रस्ता पुनः आमच्या वाटेत आला. तिथे एक जर्मन कि स्पॅनिश जोडपं, सायकलवरून आलेलं, दम खात उभं होतं. त्यांना म्हटलं अजून किती लांब? तर म्हणाले, नाही आता पोहोचलातच तुम्ही जवळ जवळ. हा शब्द खूप छान आहे. यातून काहीच स्पष्ट होत नाही आणि सगळं सांगितलं जातं. (ह्ये काय आलं की, असं आपल्याकडे गावातली माणसं म्हणतात त्याची प्रकर्षाने आठवण झाली) रस्ता ओलांडला आणि पायवाटेने पुनः निघालो पुढे. खाली नदीचा प्रवाह, जाणारी पायवाट आणि उजव्या बाजूला चढाचा भाग. त्यावरच्या झाडीतून जाताना एका ठिकाणी एक हिरवं जोडपं बसलेलं दिसलं. छान लाल भडक रंगाचा टी शर्ट त्या आजोबांनी घातला होता. खाली खोलवर दिसणाऱ्या दरीकडे बघत निवांत बसले होते ते दोघे जण. उत्तराला बोलायची लहर आली आणि तिने पुनः त्यांना विचारलं, रीन्का स्लाप किती दूर आहे? त्यावर ते आजोबा उत्तरले, कदाचित जवळ, कदाचित लांब आहे, पोहोचाल किंवा नाहीसुद्धा. आणि मग डोळा बारीक करून गंमत केल्यासारखा खोडकर चेहेरा केला. आजींनी मग हसून निरोप दिला. त्यांना नवऱ्याच्या या स्वभावाची सवय असणार

आता मात्र पाण्याचा आवाज येऊ लागला. धबधबा दिसत नसला तरी तो जवळ आल्याचं आम्हाला सांगत होता. तिथे एक छान टपरी होती. आत्ता बंद होती.


                     (याहून सुंदर काय असणार?)

जरा वेळ थांबू या म्हणून आम्ही बसलो तर दोघेजण, "तरुणम्हातारे" सायकल दामटवत आले. दमलेले दिसत होते. तेही थांबले आणि त्या बाईने हॅलो केलं. बहुधा बायकांना बोलायला आवडत असतं. हीसुद्धा अपवाद नव्हती. "गेल्या वेळी आम्ही तीन महिने रजा काढून फिरलो होतो. क्रोएशिया, इटली असं फिरलो. दरवेळी एवढी रजा कशी मिळणार? माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो. मुलगी जॉब करते" वगैरे. आतापर्यंत अॅक्सेंट वरून अमेरिकेची आहेत दोघे असा अंदाज श्रीशैलने मला सांगितला होता. तेवढ्यात त्या बाईने श्रीशैलकडे तिचा मोर्चा वळवला. कुठून आलास म्हटल्यावर नेदरलँडस सांगितल्यावर त्या देशाविषयी बोलून झालं. इतकं होईपर्यंत तो बावा धड हसू नाही असा स्थितप्रज्ञ होऊन बसला होता त्याने एकदम विचारलं तुझं प्रोफेशन आणि शिक्षण काय म्हणून. त्यात श्रीशैलच्या अमेरिकेतल्या शिक्षणाचा उल्लेख होताच त्याला माहेरचं कुत्रं भेटल्यागत कंठ फुटला. अमेरिकेच्या लोकांना त्या देशापलीकडे काही असतं याची बहुधा जाणीवच नसावी असं वाटायला लागतं हे अशा प्रकारचं वागणं बघून!

आतापावेतो पुरेपूर छळून आमची परीक्षा घेतली आहे आणि त्यात आम्ही चांगल्या मार्काने पासही झालो आहोत याची खात्री करून घेतल्यावर "मग त्याने" आम्हाला दर्शन दिलं. स्लोवेनियन भाषेत धबधबा याला शब्द आहे स्लाप (slap ) आमच्या दृष्टीने त्याचं इंग्रजीकरणच योग्य होत.

इथे त्यांनी वेगवेगळ्या लाकडी मनोऱ्यातून धबधबा बघण्याची व्यवस्था केलेली आहे. हा काही मोठा किंवा प्रचंड धबधबा नव्हे पण तरीही या ट्रेलचा तो अंतिम क्षण आहे. इथे आल्यानंतर त्याचं दर्शन सुखावणारं वाटतं आणि त्याचबरोबरीने येताना होणारं निसर्गवाचन लुभावणारं ठरतं .
परत येताना कळलं की आपण जे आडबाजूने आलो ते सरळ रस्त्यानेही येता येतं. फरक इतकाच की सरळ गाडी घेऊन आलो असतो तर त्याचे ७ युरो द्यावे लागले असते. त्या पेक्षाही आमचं निसर्गवाचन अपूर्ण राहीलं असतं आणि वाटेत ती शाळेतली नमस्ते करणारी ती मुलं ? फायदा तोट्याची गणितं अशी गणिती पद्धतीने थोडीच सोडवायची असतात?


आता परतीच्या वाटेवर मग आम्ही उगीच आडमार्गाने न येता सरळ रस्त्याने निघालो. या रस्त्याचा फायदा म्हणजे इथली वाटेतली घरं, त्यांचे घोडे असलेले स्टड फार्म्स बघता आले. गवताची साठवण करण्याची त्यांची वेगळी पद्धत कळली. आणि मुख्य म्हणजे या आमच्या परतीच्या प्रवासात आम्हाला पाऊस भेटला नाही.

लोगरस्का डोलीना आल्यावर आता बाकी काही शक्य नव्हतं. आता उद्या आपण पॅनोरामिक रूट आहे तो बघू हे ठरवून माघारी फिरलो. दमणूक झाली होती हे एक आणि आपल्या हिमालयाप्रमाणे इथेही दुपारी दोन नंतर हमखास हवा बदलते. त्यात आम्ही आलो तेच धुके आणि पाऊस दोघांना घेऊन त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यात अर्थ नव्हता

दुस-या दिवशी निघालो खरे पण निसर्गाची साथ नसेल तर तो रूट कितीही पॅनोरामिक असो तुमच्या दृष्टीस येत नाही. आमचं नशीब की अधून मधून तरी निसर्गाला आमची दया येऊन तो सूर्याला थोडक्या वेळासाठी मोकळं सोडत होता. आम्ही तेव्हढ्यात जे आणि जितकं मिळेल ते डोळ्यात साठवत होतो. पण यातली खरी मजा आहे ती इथून या घाटातून दिसणारं खोरं आणि डोंगर माथे ते मात्र आम्हाला दिसू शकले नाहीत. या अशा हवामानाचा आणखी एक मोठा दोष म्हणजे फोटोची शक्यता कमी होते. तरीही आम्ही जी कुरणं बघितली, गाई चरताना बघितल्या आणि वाटेतली टुमदार गावं बघितली ती नेत्रसुखद होती. हा भाग उन्हाळ्यात ट्रेकिंगला निश्चित चांगला आहे.
पाऊस आणि धुकं या वातावरणात किती पुढे जायचं हे शेवटी ठरवायला लागतं. रस्त्यांवरच्या खुणा अपुऱ्या होत्या आणि कोणाला विचारावं तर तशी वस्ती दिसत नव्हती. त्यामुळे मग आम्ही पुढच्या (?) वेळी नक्की असं म्हणत सोलकावाच्या दिशेने परत फिरलो.

                ( प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)